पाखाडी, पदपथ… कोकणचे फूटपाथ

4
473

पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता म्हणजे पाखाडी. त्या रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत. चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत ते बांधण्याची पद्धत अवतरलेली दिसते. लंडनमध्ये सतराव्या शतकात रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली…

पाखाडी म्हणजे सखल भागातून उंचावरच्या टेपाडावर जाण्या-येण्यासाठी दगडांनी बांधलेला रस्ता. कोकणात गावागावात सर्वत्र लाल मातीचे कच्चे रस्ते असत. त्या रस्त्यांवरून, विशेषतः पावसाळ्यात चालणे कठीण ! म्हणून रस्त्यावर आच्छादण्यासाठी, रस्ता बांधण्यासाठी व रस्त्याला फरसबंदी करण्यासाठी कोकणात मिळणाऱ्या जांभा दगडांचे चिरे वापरत असत. चिऱ्यांनी बांधलेला असा रस्ता म्हणजे पाखाडी होय व कच्चा मातीचा रस्ता, पायवाट म्हणजे बिदी होय. पाखाडी व बिदी यांसारखे बोलीभाषेतील उल्लेख प्रादेशिक साहित्याचे लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले साहित्यिक श्री.ना. पेंडसे यांच्या कथाकादंबरीनाटके यांत आढळतात. पेंडसे हे कोकणातील दापोली तालुक्यातील मुर्डी या गावचे. ते गाव मुरुडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे.

दापोली तालुक्याच्या मुरुड गावातील उंच पाखाडी हे त्या गावचे वैशिष्ट्य मानले जाई. तेथे पाखाडी म्हणून नैसर्गिक उंचवट्यावर जांभा दगडाच्या चिऱ्यांनी पदपथ बांधलेला असतो. लांबलचक, रस्त्याकडेला, रस्त्यापेक्षा उंच, नैसर्गिक भूपृष्ठावर बांधलेली अशी पाखाडी दिसते. पाखाडीने ग्रामस्थांची केवळ सोय होत नसे तर तिच्यामुळे गावाच्या सौंदर्यात भरही पडे. चिरेबंद पाखाडीमध्ये खालच्या रस्त्यावरून घरांपुढील अंगणात नेणाऱ्या पायऱ्या विलोभनीय वाटतात. दिवाळीत त्यावर घरोघरच्या पणत्या तेवत. त्यामुळे चिऱ्यांना दीपमाळेसारखी शोभा प्राप्त होई. मुरुड-गुहागर-श्रीवर्धन अशा गावांमधील पाखाडी काळाच्या गरजेप्रमाणे, रस्ता रुंद करण्यासाठी टप्प्याटप्प्याने तोडण्यात आली, तरीही गावातील मुख्य मंदिराच्या दक्षिणेकडील भागाला खालची पाखाडी व उत्तरेकडील भागाला वरची पाखाडी ही नावे मात्र कायम राहिली आहेत.

मुरुड गावात पाखाडी बांधली गेली त्याला कारणीभूत होती तेथील भौगोलिक परिस्थिती. मुरुड हे गाव एका सिद्धपुरुषाने समुद्रकिनारी साधारणतः पंधराव्या शतकात वसवले अशी कथा आहे. गावात समुद्रालगतच्या उंचवट्यावरील भागात दुतर्फा घरे बांधण्यात आली. तर सखल भागात, गावाच्या मध्यभागी दुर्गादेवीचे मंदिर आहे. घरांच्या मधून जाणारा लांबलचक मातीचा रस्ता, त्या रस्त्यावरून बैलगाड्या येत-जात असत. त्या रस्त्याच्या कडेने घराघरांच्या समोर उंचवट्यावरील भागावर पाखाडी बांधली गेली. त्यामुळे गावकऱ्यांचे येणे-जाणे सोयीचे झाले.

पाखाडी हे पदपथ वा फूटपाथ यांचे एक रूप होय. कथा अशी, की पदपथ हे मूळ चार हजार वर्षांपूर्वी ग्रीकमधील नगररचनेत (ते बांधण्याची पद्धत) अवतरले. मुख्य रस्त्याच्या बाजूला पादचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या पदपथामुळे वाहनांच्या वाहतुकीस होणारा पादचाऱ्यांचा अडथळा दूर होतो; तसेच, पादचाऱ्यांची सुरक्षा राखली जाते आणि अपघातांचे प्रमाण कमी होते. ग्रीकांनी रोममधील कोरिन्थ गावात त्या हेतूने पदपथ बांधले होते; तर लंडनमध्ये सतराव्या शतकात तत्कालीन वाहने -चाकाच्या लाकडी गाड्या, घोडागाडी, बग्गी, सायकली – यांच्या रहदारीसाठी असलेल्या मुख्य रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी रस्त्यापासून किंचित उंच पदपथ बांधण्याची पद्धत रूढ झाली. पदपथ व रस्ता यांमध्ये वाहने व पादचारी यांचे एकमेकांच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहवी यासाठी लंडनमध्ये नियम केले गेले. तसेच, काही ठिकाणी पदपथ मुख्य रस्त्यापासून वेगळा दिसण्यासाठी आणि सुशोभित करण्यासाठी दगडांची नक्षी साकारली जाऊ लागली.

श्रीवर्धनमधून मनोज गोगटे यांनी पाखाडीसंबंधात कळवले आहे, की आळी – पाखाडी असे रस्त्यांचे भाग पूर्वीपासून आहेत. मात्र ते मुद्दाम बांधलेले उंच-सखल असे रस्ते नाहीत. गावात नगरनियोजन चांगले आहे. पूर्वी डोंगर पाखाडी होती – आता गणेश आळी, पेशवे आळी -अंधार पाखाडी, भैरवनाथ पाखाडी, वेताळ पाखाडी, विठ्ठल आळी अशी नावे श्रीवर्धनच्या रस्त्यांना आहेत.

विनायक बाळ (मुरुड) यांची प्रतिक्रिया – पाखाडी हे गावाचे फार मोठे वैभव होते. ते विकासाच्या नावाखाली तोडले गेले. पाखाडीच्या मौल्यवान दगडांचा पुनर्वापर कोठे केला गेला नाही; त्यांचा अक्षरश: चुरा करून बिदीत टाकण्यात आला आणि पाखाडीची शोकांतिका झाली !

पाखाडीसाठी मुरूडआंजर्लेकेळशीवेळास अशा गावांतून जांभे, प्रचंड मोठे -सहजी न उचलता येणारे दगड वापरले गेले. त्यांच्या नैसर्गिक मोठ्या आणि जड आकारामुळे ते रस्त्यात बसले ते कायमचेच. हलण्याचा, फुटण्याचा कधी प्रश्न येत नसे. बसवण्यासाठी ना सिमेंट वापरावे लागले ना चुना. अशा सात पाखाड्या मुरूडमध्ये होत्या. पाखाडीला लागून मातीचा जो रस्ता होता, त्याला ‘बिदी’ म्हणत. बिदीवरून बैलगाड्या, गुरे-ढोरे यांची ये-जा असे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी बिदी उपयोगी पडत असे. अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांना गावाने वाळीत टाकले तेव्हा त्यांना पाखाडीवरून चालण्यास बंदी होती असे सांगितले जाते.

 

– रजनी देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

————————————————————————————————————————–

About Post Author

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here