नक्षत्रांची आठवण पावसाळ्यात भारतीयांना नक्की येते. ज्येष्ठात मृगाचा पाऊस ठरलेला. त्यामुळे मान्सून ७ जूनला येणार हे गणित जसे पक्के, तसेच मृग नक्षत्राने ज्येष्ठात पावसाची सुरुवात होते हा आडाखाही पक्काच. मग ‘आर्द्रा कोरडा गेला’ वगैरे भाषा सुरू होते. सत्तावीस नक्षत्रे नभोमंडळात लाखो वर्षें फिरत आहेत, पण भारतीय जीवनात त्यांची आठवण निघते ती पावसाळ्यातच!
गंमतीची कथा अशी सांगितली आहे, की एका खेडेगावात मास्तरांनी एका मुलाला गणित विचारले, की सत्तावीसमधून नऊ गेले तर उरले काय? तर त्या मुलाने पटकन् उत्तर दिले, की आत्महत्या-दुष्काळ आणि माती!! हो खरे आहे ते. एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी पावसाची नऊ नक्षत्रे वगळली, की मग दुष्काळच ना!
‘नक्षत्र’ म्हणजे ‘न क्षरति तत् नक्षत्रम्’ – जे ढळत नाही ते नक्षत्र. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या संपूर्ण नभोमंडळाचे एकूण सत्तावीस भाग भारतीय शास्त्रात पाडले गेले आहेत. प्रत्येक भागाचा तारकासमूह निर्देशित केला गेला आहे – त्यांना भारतीय खगोलविज्ञानात नक्षत्रे असे म्हणतात. ती नक्षत्रे अशी – 1. अश्विनी, 2. भरणी, 3. कृतिका, 4. रोहिणी, 5. मृग, 6. आर्द्रा, 7. पुनर्वसु, 8. पुष्य, 9. आश्लेषा, 10. मघा, 11. पूर्वा (फाल्गुनी), 12. उत्तरा (फाल्गुनी), 13. हस्त, 14. चित्रा, 15. स्वाती, 16. विशाखा, 17. अनुराधा, 18. ज्येष्ठा, 19. मूळा, 20. पूर्वा (आषाढा), 21. उत्तरा (आषाढा), 22. श्रवण, 23. घनिष्ठा, 24. शततारका, 25. पूर्वा (भाद्रपदा), 26. उत्तरा (भाद्रपदा), 27. रेवती.
पर्जन्य नक्षत्रे म्हणून ओळखली जातात, ती नक्षत्रे म्हणजे मृग नक्षत्रापासून ते हस्त नक्षत्रापर्यंत. ती भारताची जीवनदायी नक्षत्रे!
आता एक शंका अशी, की पावसाळ्यात ही नऊ नक्षत्रे, तर मग भारतीय कालमापनात वार-महिने-वर्ष यांत महिने, जे नक्षत्रांवर अवलंबून आहेत ते महिने/ नक्षत्रे – सूर्यावलंबी आहेत. म्हणून तर ती सूर्यनक्षत्रे. पण भारतीय कालमापनातील नक्षत्रे ही चांद्रनक्षत्रे आहेत. पर्जन्य, हवामान, ऋतू – हिवाळा, पावसाळा, उन्हाळा – हे सूर्यावर अवलंबून असतात. त्या सर्व घडामोडी सूर्यामुळे होतात! परंतु भारतीय कालमापन मात्र चंद्राच्या भ्रमणावर ठरवले जाते! त्याचे स्पष्ट कारण म्हणजे रोज सूर्य उगवतो-मावळतो, त्या प्रत्येक दिवसात काहीच फरक नाही; पण, चंद्राचे उगवणे व मावळणे यांतील रोजचा फरक पटकन् ध्यानी येतो. कालच्या चंद्राचा आकार (चंद्र-कला) आज नसतो. म्हणून त्या चंद्राच्या कलेप्रमाणे कालमापन ठरवले गेले आहे. दुसरे असे, की सूर्याच्या आणि चंद्राच्या पृथ्वीभोवती फेरी (दृष्टिभ्रम!) मारण्यासाठी वेगवेगळ्या गती आहेत. म्हणूनच दोघांची नक्षत्रे निराळी. खरे पाहता, सूर्य-चंद्र-ग्रह हे कोणत्याही नक्षत्राच्या जवळ येऊ शकत नाहीत. ते सारे एकमेकांजवळ आल्यासारखे मानवी डोळ्यांना वाटतात, तो पूर्णपणे दृष्टिभ्रम आहे!
सत्तावीस नक्षत्रे म्हणजे डोळ्यांना दिसणारे पूर्ण नभोमंडळ नव्हे. सूर्य, चंद्र हे पृथ्वीभोवती फिरताना (दृष्टिभ्रम!) त्यांच्या मागे जे जे तारकासमूह येतात त्यांना नक्षत्रे समजली जातात. सत्तावीस नक्षत्रांव्यतिरिक्त नभोमंडळात अनेक तारकासमूह आहेत, पण त्यांना नक्षत्रे म्हणत नाहीत. उदाहरणार्थ, सप्तर्षी, हंस, शर्मिष्ठा, त्रिशंकू वगैरे. जी सत्तावीस नक्षत्रे सूर्य-चंद्राच्या मार्गात येतात त्याच सत्तावीस नक्षत्रांचे आणखी बारा भाग पाडले गेले आहेत. त्या राशी. एकूण राशी बारा, त्या अशा – 1. मेष, 2. वृषभ, 3. मिथून, 4. कर्क, 5. सिंह, 6. कन्या, 7. तुला, 8. वृश्चिक, 9. धनू, 10. मकर, 11. कुंभ, 12. मीन. राशींची संक्रमणे ही भारतीय अवकाशशास्त्रात बाहेरून आलेली आहेत.
वेदग्रंथात सत्तावीस नक्षत्रांचा सविस्तर उल्लेख आहे. एका राशीत अंदाजे अडीच नक्षत्रे येतात. नक्षत्रे किंवा राशी यांची नावे त्यांच्या विशिष्ट आकृतीवरून ठेवली गेली आहेत. उदाहरणार्थ, 1. मेष/आश्विनी, मृग म्हणजे हरीण – त्या नक्षत्राची आकृती चार खूर, तोंड आणि पोटात घुसलेले बाण. 2. मिथुन – दोन व्यक्तींचे मीलन.
– मुरलीधर छत्रे
Chan mahiti
Chhan mahiti.
Irshad
Irshad
छान माहिती.
छान माहिती.
Marathi
Marathi
Comments are closed.