पाईप इंडस्ट्रीजमधील एव्हरेस्ट – नामदेव जगताप (Namdev Jagtap)

0
78

अंदाजे 1933 चा काळ. सुपे, सासवड. पुण्यातील एक खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये अंदाजे तीस-चाळीस घरांचा महारवाडा. त्या महारवाड्यातील जगतापांच्या घरी नामदेवचा जन्म झाला. त्याकाळी अस्पृश्यता पद्धत जोरात होती. ती गावकी, तराळकी, महारकी अशा विविध पद्धतींनी आणि नावांनी अस्तित्वात होती. गावात एखादे ढोर मेले, की महारांनी त्याला वेशीबाहेर घेऊन जायचे. लहानग्या नामदेवने ते सारे अनुभवले होते. तशा प्रथा आणि पद्धती बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांमुळे, चळवळीमुळे, संघर्षामुळे बंद झाल्या. नामदेव त्यावेळची सातवी, जी एसएससीच्या समकक्ष मानली जायची ती पास झाला. नामदेवने घर सुधारायचे असेल तर शहराशिवाय गत्यंतर नाही हे जाणले आणि तो पुण्यात आला.

दरम्यान, तारुण्यात आलेल्या नामदेवचे त्याच्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या असलेल्या एका मुलीवर प्रेम जडले. घरात त्याने त्या मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र त्या काळी प्रेमविवाह ही संकल्पना फार मान्य नव्हती. घरच्यांनी नकार दिला. मात्र नामदेवने त्यांच्या विरोधात जाऊन शारदासोबत विवाह केला. दोघेही पुण्यात आले. शारदा पेशाने शिक्षिका होती. ती पुणे महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून रुजू झाली. नामदेव आणि शारदा हे दोघे पुण्यात भाड्याच्या घरात राहू लागले. दाम्पत्याला तीन मुले आणि तीन मुली झाल्या. सोबतच शारदाची आई, तीन बहिणी आणि भाऊसुद्धा राहू लागले. कुटुंब मोठ्ठे होते. नामदेव मोठ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी पडेल ती कामे करायचा. नामदेव पुण्याच्या रतन टॉकिजसमोर पुस्तके विक, गणेशोत्सवाच्या काळात पाट विक, पाच रुपये दराने कुणाचे घर चुन्याने रंगवून दे असे काही ना काही काम करत होता आणि घरखर्च भागवत होता. निर्व्यसनी असणे, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू हे गुण त्याची बलस्थाने ठरली. त्यामुळे तो ज्यांच्या सान्निध्यात यायचा त्यांचा विश्वास आपोआप संपादन करायचा. त्याच काळात नामदेव यांनी इलेक्ट्रिशीयनचा, मोटर रिपेअरिंगचा कोर्स केला. नामदेव जगताप देसाईं तुरळीच्या मणिभाई देसाई यांच्यासोबत काम करु लागले. उपसा सिंचनासाठी सिमेंटचे पाईप्स लागत असत. सांगली जिल्ह्यात ते पाईप तयार होत असत. नामदेव ते पाईप सांगलीवरून आणत आणि पुण्यातील शेतकऱ्यांना जोडून देत. त्यांचे त्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांशी चांगले संबंध निर्माण झाले. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे लागत ती तयार करण्यासाठी नामदेवने असु इंजिनीयरिंग नावाने वर्कशॉप सुरु केले. त्याकाळी सगळी अवजारे हाताने तयार केली जात. नामदेव यांनी वेल्डिंग, लेथ, टर्नर यांसारख्या मशिन्स आणल्या. त्यावर ते अवजार तयार करत आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याला ते पुरवठा करत.

सांगलीहून पाईप्स आणण्यापेक्षा पुण्यातच पाईप्स बनवण्याची कल्पना निघाली. नामदेव यांनी गावची चार एकरची जागा विकून आलेले नव्वद हजार रुपये आणि बॅंक ऑफ बडोदाचे एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये कर्ज असे मिळून दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयांचे भांडवल उभारले. पुणे-सोलापूर रोडपासून वीस किलोमीटर आत असणाऱ्या कुंजीरवाडी येथे एव्हरेस्ट स्पन पाईप इंडस्ट्रीज नावाने पहिले युनिट सुरु केले. वर्ष होते 1979 आणि नामदेव यांचे वय होते अठ्ठेचाळीस वर्षे. कंपनीचे पहिले उत्पादन अर्थात पहिल्या पाईपाची निर्मिती ही 1980 सालच्या गुढीपाडव्याला झाली. टिकाऊ आणि मजबूत पाईप्स म्हणजे एव्हरेस्टचे पाईप्स हे जणू समीकरण बनले. ग्राहकांनी पाईप्सची गॅरण्टी विचारल्यास नामदेव म्हणायचे, “जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पाईपाची गॅरण्टी”. नामदेव पंच्याऐंशी वर्षांचे आहेत आणि त्यांनी पुरवलेले पाईप्स चाळीस वर्षे झाली तरी सुस्थितीत आहेत. ‘इंडियन आर्मी’ एव्हरेस्टचेच पाईप्स वापरतात. ते इंड्स्ट्रियल आरसीसी पाईप्स, वॉटर टॅंक्स, सेप्टिक टॅंक्स असे विविध उत्पादने तयार करतात.

‘एव्हरेस्ट’च्याच बाजूची चार एकर जागा घेऊन 1993 साली शारदा सिमेंट वस्तुनिर्मिती आणि 2003 साली असु कॉन्क्रीट प्रॉडक्ट अशी आणखी दोन युनिट सुरु केली. कंपन्यांचा पसारा साडेनऊ एकर क्षेत्रफळात पसरला आहे. त्यामध्ये अंदाजे एकशेवीसहून अधिक कामगार कार्यरत आहेत तर आठ कोटींची वार्षिक उलाढाल आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्व महानगरपालिका, टेल्को, सहारा इंडिया, जीएम मोटर्स, महिन्द्रा लिमिटेड, आयआरबी लिमिटेड, शापूरजी पालनजी, परांजपे बिल्डर्स यांसारख्या अनेक नामवंत ग्राहकांची मांदियाळी नामदेव यांच्या कंपनीकडे आहे. नामदेव यांची तीन मुले सतीश, अविनाश आणि संजय हे सध्या तो व्यवसाय पुढे नेत आहेत. कायद्याची पदव्युत्तर पदवी आणि व्यवस्थापनाची पदवी घेतेलेले अविनाश जगताप हे कंपनीचे सीईओ म्हणून धुरा वाहत आहेत. कंपनीकडे पाईपांची ने-आण करण्यासाठी स्वत:ची वाहन व्यवस्था आहे. त्यामध्ये सहा ट्रक्स, दोन डंपर, एक क्रेन आणि एका ट्रॅक्टरचा समावेश आहे. यामुळे सामानाची डिलिव्हरी सुद्धा लवकर होते.

– प्रमोद सावंत, pramodsawantpr@gmail.com

(‘तरुण भारत’ वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleखुज्या माणसांचा साहित्यसंस्कृती प्रदेश
Next articleगावगाडा – यंत्रयुगापूर्वीची ग्रामरचना
प्रमोद ज्ञानदेव सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून संज्ञापन आणि पत्रकारिता विषयाची पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. सध्या ते मुंबई विद्यापीठामधून एम ए इन लीडरशिप सायन्स प्रोग्राम या विषयातील पदव्युत्तर पदवीचे अध्ययन करत आहेत. ते व्यवसायाने उद्योजक आहेत. ते युक्ती मीडिया कन्सल्टन्सी या माध्यम समन्वय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेचे संस्थापक संचालक आहेत. ते मुंबई तरुण भारत मध्ये स्तंभलेखन करतात. त्यांचे लेख प्रत्येक शुक्रवारी चौफेर उद्योग नावाने प्रसिद्ध होत असतात. ते विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ‘जनसंपर्काची ओळख’ आणि ‘पत्रकारितेची ओळख’ या विषयासंदर्भातील धडे देतात. त्यांचे ‘दलित उद्योजकांची संघर्षगाथा’ हे पहिले पुस्तक आहे. लेखकाचा दूरध्वनी 8108105232