गिरीज हे पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नयनरम्य ठिकाण. तेथे बऱ्याच टेकड्या पोर्तुगीजपूर्व काळात होत्या. काही उंच, काही ठेंगण्या. त्या सर्व लहानमोठ्या टेकड्यांमध्ये वसलेले गाव म्हणून त्याचे नाव गिरीज. ‘गिरी’ म्हणजे पर्वत आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेले. पर्वतातील गाव गिरीज ! पोर्तुगीज वसाहतवादी वसईत सुमारे साडेपाचशे वर्षांपूर्वी आले. त्यांनी शेषवंशी क्षत्रिय भंडारी भोंगाळे राज्याची वसई खाडीवरील गढी जिंकली. पोर्तुगीज सोजिरांची नजर आजुबाजूच्या गावांवरही गेली. त्यांतील एक गाव गिरीज.
गिरीज गावात असलेल्या टेकड्यांमध्ये किंमती दगड आहे. तो बांधकामासाठी काढण्यात आला. गिरीज गावाच्या दगडांपासून वसईचा किल्ला, गोव्यातील चर्च इत्यादी बांधकामे झाली. गिरीज गावात एकमेव टेकडी शिल्लक राहिली आहे, ती गिरीजची डोंगरी. पायथ्यापासून सुमारे पाचशे फूट उंच डोंगरावर गेले असता मोठा भौगोलिक पसारा झाडापानांनी आच्छादलेला दिसतो. तेथे धरती जणू हिरवा शालू नेसली आहे असे वाटते. त्यामध्ये मुख्यत: वसई तालुक्यातील बराचसा भूभाग आहे. अरबी समुद्रातील पोशापीर, वसईचा किल्ला, उत्तन-मनोरी येथील इमारतींचे जंगल, किनाऱ्यावरील रानगाव, कळंब ही गावे, उत्तरेला अर्नाळा किल्ला, पूर्वेला कामनदुर्ग, विरारची जीवदानी असा सर्व प्रदेश समाविष्ट आहे.
गिरीजमधील डोंगरी वगळता आजुबाजूच्या टेकड्या भुईसपाट झाल्या असल्या तरी तेथे टेकड्या होत्या हे दिसून येते. त्या ठिकाणांची त्या वेळची नावेही कायम आहेत; ‘धाकली डोंगरी’ धाकली म्हणजे लहान. ‘जोंगडेभट्टी’ भट्टी म्हणजे मोठी, उंच जागा. ‘कुंडाभट्टी’ म्हणून उंचच उंच जागा, टोकडोंगरी म्हणजे गावाच्या सरहद्दीवर असलेली लहान डोंगरी. त्या उंच जागेवर गेल्या चाळीस वर्षांपासून आदिवासी बांधवांची घरे झाली आहेत. त्या ठिकाणास टोकपाडा असेही म्हणतात. गिरीज डोंगरीच्या नैऋत्य दिशेला निर्मळ मंदिराच्या अलिकडे एक डोंगरी होती. तिचे नाव हिरा डोंगरी, ती शंभर वर्षांपूर्वी पन्नास ते साठ फूट उंच होती. ती भुईसपाट करून तेथे तलाव झाला आहे ! तलावाच्या पाळीवर आंबेडकर उद्यान बहरले आहे.
वसईची मोहीम 1737 मध्ये सुरू झाली. ती दोन वर्षेपर्यंत चालू होती. वसईचा किल्ला अवघड. चिमाजी आप्पांनी मोहिमेची आखणी करताना वसई किल्ला घेण्यासाठी गिरीज डोंगरीवर किल्ला बांधण्याचे ठरवले. त्याप्रमाणे वज्रगड किल्ला मराठ्यांद्वारे बांधण्यात आला. चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखालील पोर्तुगीजांच्या ‘प्रॉव्हिन्स ऑफ द नॉर्थ’वरील ती मोहीम प्रसिद्ध आहे. काळ निघून गेला. भारतभर इंग्रजांचा अंमल 1857 पासून सुरू झाला. डोंगरीचे खाजगीकरण झाले. त्यानंतर वर, डोंगरीच्या टकलावर असलेल्या वज्रगडाचेही खाजगीकरण झाले. किल्ला 1900 पासून खाजगी ताब्यात आला. मालकांनी तेथे दत्तमंदिर 1920 च्या सुमारास बांधले. दत्तमंदिराचे दोन वेळा नूतनीकरण झाले. मंदिर सुंदर आहे. जागा निसर्गरम्य आहे. काही बुरुज काही प्रमाणात बाकी आहेत. ते चिमाजी आप्पांची आठवण काढत अश्रू ढाळत आहेत ! लोकांनीच इतिहासाची हेळसांड करावी व भाविकता जपावी असे ठरवले आहे.
गावात मोठा तलाव आहे. तो दगड काढून तयार केला आहे. तलावाच्या बाजूने वसई-निर्मळ रस्ता जातो. तेथे तलावपाळीवर दोन मंदिरे आहेत – एक हनुमानाचे व दुसरे गावदेवी जोगेश्वरीचे. जोगेश्वरी ही ग्रामदेवता असल्याने तिचे उत्सव धुमधडाक्यात साजरे होतात. जोगेश्वरीचा वार्षिक उत्सव मे महिन्याच्या एका रविवारी साजरा केला जातो. नवरात्रात दसऱ्यापर्यंत उत्सव साजरा केला जातो, तो वेगळा. सारा गाव जमा होतो. कार्यक्रम होतात. ग्रामभोजनही होते. महिला व तरुण वर्ग यांचा सहभाग जोरदार असतो. महिला व तरुण असे दोन्ही वर्ग हे गिरीज गावची शान आहेत. जुन्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सहा वर्षांपूर्वी करण्यात आला. मंदिर फार सुंदर आहे. दोन्ही मंदिरांची व्यवस्था भंडारी सामाजिक विश्वस्त संस्था व महिला मंडळ पाहतात. गावात इतर छोटी मंदिरे आहेत. ‘बिल्काई’, ‘बोकडदेव’ व ‘ब्रह्मदेव’ ही मंदिरे गिरीज टेकडीच्या पायथ्याशी आजुबाजूस आहेत. भंडारआळीमध्ये ‘क्षेत्रपाला’चे लहान मंदिर आहे.
गावात अमर क्रिकेट क्लब, एकविरा क्रिकेट क्लब, महिला मंडळ असून गणपती- नवरात्रात स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, क्रिकेट स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. गावातील जुनी मराठी शाळा मुलांअभावी बंद पडली आहे. शाळेत महापालिका, वीज मंडळ यांची कार्यालये आहेत. गावात प्राथमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावरील वसई येथे जावे लागते. गिरीजची लोकसंख्या अंदाजे आठ हजार आहे. तेथे कादोडी, वाडवळी आणि मराठी भाषा बोलली जाते. गिरीजपासून चार पाच किलोमीटर अंतरावर तरखड, वासळई, निर्मळ ही गावे आहेत. गावात पोचण्यासाठी वसई येथून रिक्षा किंवा बस पकडावी लागते.
गावात ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने आहे. त्या समाजाचे सेंट फ्रान्सिस झेविअर चर्च आहे. त्या समाजातर्फे निरनिराळे कार्यक्रम होतात. हिंदू समाजातील लोकही त्यात भाग घेतात. दोन्ही समाज गुण्यागोविंदाने नांदतात. गिरीज गावात धार्मिक तणाव होत नाही. गावातील शेती, वाडी एकमेकांना लागून आहे. तेथे काही लोकांच्या केळीच्या बागा अजूनही आहेत. सर्व लोक एकमेकांकडे सुखदुःखात जातात. गावात कॅथलिक बँकेची शाखा आहे. त्यात खाती सर्व धर्मीयांची आहेत.
“गिरीज डोंगरीचे पायथ्याला | गाव आमुचा वसे तेथे एक |
निसर्ग वनराई पाहून त्या कडील जो तो सांगे एक दुसऱ्यास | चला पाहू सुंदर गाव गिरीज”
– रामकृष्ण बाळकृष्ण चौधरी 8806864464 cchaudhary_29@rediffmail.com
Best way to define the speciality of the village