परमवीरचक्र विजेते रामा राघोबा राणे (Paramveer Chakra honoured Rama Raghoba Rane)

0
226

रामा राघोबा राणे यांचा जन्म धारवाड जिल्ह्याच्या हवेली या गावी 1918 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत व पुढील शिक्षण उत्तर कन्नड जिल्ह्यातील चेंदिया या गावात झाले. त्यांचे वडील राघोबा राणे हे पोलिस दलात कॉन्स्टेबल होते. राणे हे लढवय्या राजपूत राणा जमातीचे वंशज. ते गांधीजींच्या असहकार चळवळीने प्रभावित झाले होते. त्यांच्या मनात देशासाठी कार्य करण्याची भावना जागृत झाली.

          रामा राघोबा ब्रिटिश भारतीय लष्करात बॉम्बे रेजिमेंटमध्ये 10 जुलै 1940 रोजी भरती झाले. दुसरे महायुद्ध सुरू होते. ते त्यांच्या तुकडीत सर्वश्रेष्ठ प्रवेशकठरले. त्यांना कमांडंटची छडीबक्षीस म्हणून मिळाली. त्यांना नाईकपदावर बढती लगेच मिळाली. राणे यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर ते अठ्ठाविसाव्या फिल्ड कंपनीत रुजू झाले. ते दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांकडून म्यानमारमध्ये (तेव्हाचा ब्रह्मदेश) जपानविरूद्ध लढण्यास गेले. तेथून माघार घेताना त्यांच्यावर बुथिदौंग येथील दारुगोळा भांडार; तसेच, गाड्या नष्ट करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी तेथे ‘आराकान मोहिमेत उत्तुंग कामगिरी केली. त्यांना त्यांच्या धैर्य, चिकाटीबद्दल हवालदारपदावर बढती मिळाली. त्यांची सेकंड लेफ्टनंटपदी नेमणूक 1948 मध्ये जम्मू-काश्मीर आघाडीवर जाण्यापूर्वी झाली. तो त्यांच्या सैनिकी जीवनातील सर्वोत्तम पराक्रमी काळ होता.

          पाकिस्तानी हल्लेखोरांनी काश्मीरमध्ये आक्रमण 1948 मध्ये केले. तेव्हा भारताची धडपड गमावलेला जम्मू-काश्मीरचा भूभाग पुन्हा मिळवण्याची होती. भारतीय सैन्याने प्रथम नौशेरावर ताबा मिळवला. त्यापुढे झांगरराजौरी, बरवाली, चिंगस या जम्मू-काश्मीरमधील ठिकाणांवर कब्जा मिळवणे हे भारतीय सैन्यासाठी आवश्यक होते. शत्रूने त्या ठिकाणांच्या वाटांवर अनेक अडथळे निर्माण केले होते, रस्त्यांची नासधूस केली होती. त्यामुळे युद्धसामग्रीची वाहतूक करणे, सैन्य घेऊन जाणे कठीण होत होते. त्या अडचणीवर मात करावी, भारतीय सैन्याच्या रणगाड्यांचा मार्ग मोकळा करावा म्हणून शूरवीर रामा राघोबा राणे त्यांच्या साथीदारांसह सरसावले. भारताच्या चौथ्या डोगरा बटालियनने बरवाली पुलासह राजौरी 8 एप्रिल 1948 रोजी काबीज केले. राणे यांनी शत्रूने पेरलेले सुरुंग आणि अडथळे दूर करतत्याच बरोबर पाकिस्तानी सैन्याच्या तोफांचा मारा चुकवत मोठ्या धाडसाने आणि शौर्याने सर्व काम साधले. तोफगोळे आणि बंदूका यांच्या फैरी चहुबाजूंनी झडत होत्या. राणे जिवाची पर्वा न करता बेधडकपणे शत्रूच्या काफिल्यात घुसले. त्यात ते मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आणि त्यांचे दोन साथीदार तर शत्रूच्या गोळीबारात शहीद झाले. जखमी अवस्थेतील राणे त्या परिस्थितीतही मागे हटले नाहीत. राणे यांनी त्या अवस्थेत त्यांच्या तुकड्यांची पुनर्रचना केली. त्यांचे ध्येय एकच होते- अंतिम विजयासाठी भारतीय सैन्याच्या रणगाड्यांचा मार्ग मोकळा करणे. ती मोठी जबाबदरी त्यांच्यावर होती. रस्त्यावर पुढे देवधरची झाडे अडथळा म्हणून टाकली होती. त्यांनी ते वृक्ष टप्प्याटप्प्याने बाजूला सारले. काही ठिकाणी पूलदेखील उद्ध्वस्त झाले होते. राणे व त्यांचे सहकारी यांनी ते पूल बांधले, सुरूंग दूर केले आणि चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी करून दिली. ते 8 एप्रिल रोजी (1948) दुपारी सुरू झालेले काम सलग चोवीस तास चालू होते. तयार झालेल्या त्या रस्त्यावरून सैन्य आणि रणगाडे 9 एप्रिलला दुपारी जाऊ लागले. त्यामुळे भारतीय रणगाडे सुरळीतपणे चिंगस येथे पोचू शकले. रामा राघोबा राणे यांचे नेतृत्व, धैर्य, संयम, आत्मविश्वास, अपार देशप्रेम हे गुण मुद्दाम नोंदवावे असेच आहेत. राणे यांच्या त्या अतुलनीय साहसी पराक्रमाने राजौरी आणि चिंगसमधील शेकडो जणांचे प्राण वाचले भारत सरकारने त्यांचा त्यांच्या त्या कार्याबद्दल परमवीर चक्रदेऊन सन्मान केला. राजौरीचा गुज्जर मंडी चौक त्या पराक्रमाची आठवण करून देतो. तेथील विमानतळालाही राणे हवाई पट्टी असे नाव दिले आहे.

राजौरीचा गुज्जर मंडी चौक

राणे मेजर म्हणून 25 जून 1958 रोजी निवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी 7 एप्रिल 1971 पर्यंत भारतीय सेनेत पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून काम पाहिले. राणे यांचा मृत्यू पुण्याच्या सैनिक इस्पितळात 11 जुलै 1976 रोजी अल्पशा आजाराने झाला. पुण्यातील संगमवाडी भागात त्यांच्या नावाने एक शाळा उभारण्यात आली आहे.

(संकलित)

————————————————————————————————————————————————–

—————————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here