Home वैभव अभयारण्‍य पनवेलचा कर्नाळा किल्‍ला

पनवेलचा कर्नाळा किल्‍ला

1
carasole

कर्नाळा किल्ला मुंबईपासून बासष्ट किलोमीटरवर व पनवेलपासून तेरा किलोमीटरवर स्थित आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे. तेथे दीडशेहून अधिक जातींचे पक्षी तेथे आढळतात. सतत हिरवे जंगल हे तेथील वैशिष्ट्य आहे.

किल्ल्यावर पन्नास मीटर उंचीचा उत्तुंग कावळकडा आहे. कर्नाळ्याची उंची अडीच हजार फूट आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेतील कर्नाळा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने सोपा समजला जातो. किल्‍ल्‍यावर जाण्‍यासाठी तिकीट काढावे लागते.

कर्नाळा त्याच्या उंचावलेल्‍या अंगठ्यासारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो. कर्नाळ्याच्‍या पायथ्‍याजवळचे अभयारण्य हे संरक्षित प्रदेश म्हणून राखले गेले आहे. कर्नाळा परिसरातील एक ते दोन दिवसांच्या भटकंतीत त्‍या परिसरातील इतर सर्व किल्ले फिरून होतात.

किल्ल्यामध्ये असणाऱ्या पाण्‍याच्‍या टाक्यांवरून तो सातवाहनकालीन असावा असे वाटते; मात्र त्याचा जुना उल्लेख यादवकाळात आढळतो. सोळाव्‍या शतकात किल्‍ला निजामशाहीच्‍या अधिपत्‍याखाली होता. शिवरायांनी 1657 मध्ये तो किल्ला घेतला. त्यानंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात आलेल्‍या तेवीस किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. महाराजांच्या सैन्याने 1670 नंतर छापा घालून कर्नाळा किल्ला पुन्हा सर केला आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व कल्याण प्रांत काबीज केला. मोगलांनी पुढे, संभाजी महाराजांच्या काळात किल्ला पुन्हा मराठी अंमलाखाली आणला. त्यानंतर 1740 ला किल्‍ल्यावर पेशव्यांचे नियंत्रण आले. तेव्हा अनंतराव फडके यांना तिथे किल्लेदार म्हणून नेमण्‍यात आले. अनंतराव फडके म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा होय. पुढे जनरल प्रॉथरने 1818 मध्ये कर्नाळा ताब्‍यात घेतला. त्‍यावेळेस कर्नाळ्यावर असलेल्या मोजक्या मावळ्यांनी ब्रिटिशांच्या हजाराच्या सैन्याशी तीन दिवस झुंज दिली होती.

कर्नाळा किल्ला प्रसिद्ध आहे तो तेथील पक्षी अभयारण्यामुळे. ते अभयारण्‍य कर्नाळा अभयारण्‍य नावाने ओळखले जाते. किल्‍ल्‍याकडे जाताना वाटेत कणाई मातेचे छोटे मंदिर लागते. देवीची मूर्ती काळ्या दगडात घडवलेली आहे. गडाची माची आग्‍नेय बाजूने उत्‍तरेकडे पसरली आहे. कर्नाळा किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. गड फिरण्यास साधारण तीस मिनिटे पुरतात. किल्ल्यावर पश्चिमेकडून जाणा-या वाटेने येताना एक दरवाजा लागतो. तो ढासळलेल्या अवस्थेत आहे. त्‍याच्‍यावर शरभाचे आणि सिंहाचे शिल्‍प आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोर भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच मोठा वाडा आहे. वाडा पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. वाड्याच्या समोर शंकराची पिंड आहे. समोर अंगावर येणारा पन्‍नास मीटर उंचीचा सुळका आहे. सुळक्‍यावर मधमाशांचे पोळे दृष्‍टीस पडते. त्‍यातील मध काढण्‍याकरता परिसरातील ठाकरांनी सुळक्‍याच्‍या दगडात पाय-या खोदलेल्‍या आहेत. त्‍याच्‍या पायथ्‍याशी चार धान्‍य कोठारे आणि पाण्‍याचे टाके नजरेस पडते. ती सुळक्‍याच्‍या दगडात खोदलेली असून ती बाराव्‍या शतकातील असावीत असा अंदाज आहे. सुळका चढण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र येणे आवश्यक आहे; सोबत प्रस्तरारोहणासाठी आवश्यक साहित्यसुद्धा हवे.

किल्‍ल्याची घडण आणि ठेवण पाहता तो प्रामुख्‍याने सभोवतालच्‍या प्रदेशावर टेहळणी करण्‍यासाठी वापरण्‍यात येत असावा. किल्‍ल्‍यावर तीन दिशांना तीन बुरूज बांधलेले दिसतात. किल्‍ल्‍याच्‍या माथ्‍यावरून पश्चिमेकडे मुंबईचे सुंदर दृश्‍य दिसते. पश्चिमेकडे माणिकगड आणि त्‍याच्‍यामागे पहुडलेली सह्याद्रीची रांग दिसते. उत्‍तरेकडे सांकशीचा किल्‍ला तर वायव्‍येकडे माथेरान पाहता येते. त्या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे काही नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य हे सर्व एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे.

किल्‍ल्‍यावर फारसी आणि मराठी भाषेतील शिलालेख आढळतात. फारसी शिलालेखात ‘सय्यद नुरुद्दीन मुहम्‍मदखान, हिजरी 1147’ असे लिहिले आहे. तर मराठी शिलालेखावर ‘शके 1592 संवत्‍सर आषाढ शुद्ध 14 कर्नाळा घेतला’ असे वाक्‍य लिहिलेले आढळते.

पेण-पनवेल रस्ता कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याजवळून जातो. मुंबई-गोवा मार्गाने पनवेल सोडल्यानंतर शिरढोण गाव लागते. लगेच, पुढे कर्नाळ्याचा परिसर आहे. महामार्गाच्या डावीकडे शासकीय विश्रामधाम आणि काही हॉटेल आहेत. एस.टी. तेथे थांबते. हॉटेलजवळून किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. वाट चांगली प्रशस्त आहे. तेथून किल्ल्यावर पोचण्यास अडीच तास लागतात. वाटेत पक्षी संग्रहालय आहे.

कर्नाळ्यावर पोचण्‍यासाठी रसायनी-आपटा मार्गाने आकुळवाडी गाव गाठावे. त्या गावातून येणारी वाट मुख्य वाटेला येऊन मिळते. वेळ साधारण तीन तास लागतो. किल्ल्यावर राहण्याची सोय नाही; मात्र किल्ल्याच्या पायथ्याशी शासकीय विश्रामधामात राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाच्या सोयीसाठी किल्ल्याखाली हॉटेले आहेत. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

(मूळ लेख, दैनिक ‘उद्याचा मराठवाडा’)

About Post Author

1 COMMENT

  1. अतिशय उपयुक्त माहीती आहे.
    अतिशय उपयुक्त माहीती आहे.

Comments are closed.

Exit mobile version