पं. भाई गायतोंडे – तबल्याचे साहित्यिक

2
28
तबल्यावर बोटे थिरकवताना पं. भाई गायतोंडे
तबल्यावर बोटे थिरकवताना पं. भाई गायतोंडे

तबल्यावर बोटे थिरकवताना पं. भाई गायतोंडे तालाच्या अणुरेणुचे गणित सोडवणे म्हणजे तबला? पारंपरिक रचनेला सही न् सही वाजवणे म्हणजे तबला? की ‘हीरनकी चाल’, ‘मोरनी की चाल’ अशी चार घटका करमणूक म्हणजे तबला? प्रत्येक तबलानवाझ यावर वेगवेगळी ‘थाप’ मारू शकेल. पण संपूर्ण अलग विचारांची नजर देणारे, कसदार, तरीही वादनातून अनिर्वचनीय आनंद देणारे तबलजी आहेत पं. भाई गायतोंडे.

कडाडणारी वीज, वेदमंत्रांचा घोष आणि दर्याची गाज म्हणजे भाईंचा तबला, त्यांच्या हाताने एखादे मोरपीस गालावरून फिरवावे तशी नाजूक अक्षरे हलकेच उमटतात. तद्वत ते घणाने खडक फोडावा तसे तालांचे आवर्तन फोडणारे खंडदेखील सहज फेकतात आणि हे सर्व घराणेदारपणाचे ‘कुळशील’ राखून ते ‘रसिकांसाठी करावे लागते’ अशी ढाल पुढे करून अनाहूतपणे कुठलाही बोल वाजवणार नाहीत, तडजोड करणार नाहीत आणि दर्जाशी फारकत तर मुळीच सहन करणार नाहीत. भाईंचा तबला ऐकताना! ते आपल्याला तबल्यातून काहीतरी सांगताहेत व काही संवाद साधत आहेत असं वाटतं; अंतर्यामीची एखादी गोष्ट उलगडून दाखवत आहेत असं जाणवतं. कारण तबल्याच्या बंदिशीचा स्वभाव जाणून, तो अंत:करणात झिरपून, रसिकांपुढे खुलवायची त्यांना असलेली विलक्षण समज!

तबलानवाझ थिरखवा खॉंसाहेबांचे हात अतिशय मुलायम होते असं बुजूर्ग लोक सांगतात. खॉंसाहेब म्हणायचे, “मैने तबलेसे प्यार किया है. लढाई नही.” त्याच परंपरेतल्या भाईंचे हात मृदुमुलायम आहेतच पण स्फटिकासारखे पारदर्शकदेखील!

लय राखून, बलांचे पल्लेदार झुले ओवून, लख्ख ‘निकास’ साधून बंदिशीचे तोरण भाईंनीच बांधावे. भाईंचा कलाविष्कार पाहणे म्हणजेदेखील ध्यानस्थ योग्याचे दर्शन घेतल्यासारखे वाटते.

कागदोपत्री ‘वैज्ञानिक उपकरणांचे निर्माते’ अशी नोंद असलेल्या सुरेश गायतोंडे यांना त्या नावाने किंवा व्यवसायाने कुणीच ओळखत नाही. पण वैज्ञानिक उपकरणातला नेमकेपणा त्यांच्या तबल्यात खडा न् खडा उतरला आहे आणि त्या मागे आहे जगन्नाथबुवा, थिरखवा खॉंसाहेब, घांग्रेकरबुवा यांच्या तालमीचे संचित. गुरूने दिलेले ‘सबख’ ह्रदयात खोलवर रुजते आणि त्यावर स्वत:च्या विचारांचा शिडकावा होतो तेव्हा भाईंसारखा तबलजी घडतो!

 ‘क्या बात है’ आणि ‘बात है?’ यांमधे दोन्ही ‘बातां’चा लगाव वेगवेगळा आहे, तसंच तबल्याच्या एका बंदिशीत येणा-या त्याच अक्षराची ‘निकास’ प्रत्येक वेळी अलग रंगरूप घेते हे मर्म भाईंना खॉंसाहेबांनी दाखवले, तेव्हापासून भाई बंदिशीच्या विचारांची वाटचाल चालू लागले.

गाण्यात जसं बंदिशीवरून घराणं ठरत नाही तर बंदिशीच्या विस्तारावरून ठरतं तसं तबल्यातही बंद बाज म्हणजे दिल्ली, खुला बाज म्हणजे पुरब असं संकुचित समीकरण होत नाही. रचनेचा विस्तार कसा होतो, बोलांच्या महिरपी त्यात कशा विणल्या जातात, शब्दांचे काफिले त्यात पूर्ण-अपूर्ण कसे बसतात, यावरून तबल्याचे घराणे ठरते. ती नजर भाईंकडे आहे. म्हणूनच भाई बंदिशीचा विचार करतात. आळमात्रांच्या रचनेची चार-चार अशी खंड विभागणी कुणीही करेल पण ‘धा नि धागेन धा तिरकिट’ या रचनेचे खंड अडीच-अडीच-तीन असे पडतात हे भाईंनी दाखवले.

भाईं म्हणतात, “चर्मवाद्यात तबला मोठा. कारण तबल्याला भाषा आहे. भाषेची अक्षरे आहेत. म्हणूनच तबल्याच्या भाषेचे ‘साहित्य’ आहे. प्रत्येक बंदिशीचा स्वत:चा एक स्वभाव, चालचलन, मिजाज आहे. बंदिशीचा स्वभाव उमगला तर भावना वादनातही झिरपतील. म्हणूनच मी बंदिशीचा विचार करतो.” म्हणूनच भाई तबल्याचे ‘साहित्यिक’ आहेत, कारण तबल्याच्या भाषेतून त्यांनी अमूर्त भावाविष्काराचा पट मांडला आहे.

भाई गायतोंडे – ०२२ – २५४७५२९५,

drdilipgaitonde@gmail.com

मकरंद वैशंपायन-९८२०२९२३०५

Last Updated On – 21 June 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. खुपच छान लेख आहे हा, भाई
    खुपच छान लेख आहे हा, भाई गायतोंडे यांच्या वरचा.

  2. सुंदर लेख. भाई गायतोंडे…
    सुंदर लेख. भाई गायतोंडे यांची जन्मतारीख समजू शकेल का ?

Comments are closed.