पंढरपुरी म्हैस दुधाला खास! म्हशीची दुग्ध व्यवसायातील विशेषता!

1
49
_protest

पंढरपूर हे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. त्या नगरीमध्ये स्वत:चा चरितार्थ छोटे-मोठे व्यवसाय करून चालवणारी अनेक कुटुंबे गेल्या अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. त्यांपैकी एक आहेत कृष्णाजी पाराजी औसेकर व गोविंद पाराजी औसेकर हे दोघे बंधू. वडिलांपासून त्यांच्याकडे जातिवंत पंढरपुरी म्हशींचे संगोपन चांगल्या पद्धतीने केले जाते. त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान दूधविक्रीचा व्यवसाय करून सचोटीने निर्माण केले आहे. कृष्णाजी औसेकर यांचा मुलगा अप्पा याने व्यवसायात पुढचे पाऊल टाकले आहे.

औसेकर बंधू पंढरपूर शहरात लोकांच्या घरासमोर म्हैस घेऊन जात आणि लोकांच्या नजरेसमोर म्हशीचे दूध काढून देत. तेथपासून त्या कुटुंबाची व्यावसायायिक यशाची कहाणी आहे. त्यांच्याकडील दूध आता प्लॅस्टिक पिशव्यांत उपलब्ध असते. त्यांची व्यावसायिक इमारत संत तनपुरे महाराज मठाजवळ आहे. त्या इमारतीच्या गाळ्यात दूधविक्री सुरू केली.

अप्पा औसेकर म्हणाले, की पंढरपुरी म्हशींचे व्यवस्थापन म्हशींच्या इतर जातींपेक्षा सोपे आहे. पंढरपुरी म्हशींची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यांचे संगोपन सुक्या तसेच दुय्यम प्रतीच्या चाऱ्यावरही शक्‍य आहे. त्यांच्या दुधाची गुणवत्ता चांगली आहे.

औसेकर यांचा पंढरपूर शहरात वाडा आहे. त्या वाड्यामध्ये दोन वेगवेगळे गोठे तयार केले आहेत. गोठ्यात स्वच्छ खेळती हवा राहवी यासाठी गोठ्याचा वरचा भाग मोकळा ठेवण्यात आला आहे, मात्र म्हशींचे उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून शेडनेट लावले आहे. गोठ्यामध्ये गव्हाण बांधली आहे, म्हशींना पाणी पिण्यासाठी गोठ्याजवळच हौद बांधला आहे. पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी कूपनलिका घेतली आहे. त्यांच्याकडे चाळीस पंढरपुरी म्हशी आहेत. त्यांपैकी वीस म्हशी दुधात आहेत तर दहा गाभण आणि दहा भाकड आहेत.

दररोज सकाळ- संध्याकाळ मिळून सरासरी दीडशे लिटर दूध गोळा होते. दुधाची विक्री चाळीस रुपये प्रति लिटर दराने होते. दररोज दूधविक्रीतून सहा हजार रुपये मिळतात. म्हशींसाठी चारा, पशुखाद्य, मजुरांचा पगार आणि स्वतःची मजुरी धरून दररोज साडेचार हजार रुपये खर्च येतो.

दर महिन्याला दोन ट्रॉली शेणखत तयार होते. शेणखतासाठी हौद बांधला आहे. एक ट्रॉली एक हजार रुपये दराने विकली जाते. फळबागायतदारांकडून शेणखताला चांगली मागणी आहे. त्यामुळे शेणखतातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.

म्हशींची दोन मजुरांकडून दररोज दोन वेळा स्वच्छता केली जाते. गोठा सकाळी सहा वाजता स्वच्छ केला जातो. त्यानंतर म्हशींची जागा बदलली जाते. सकाळी सात वाजता दूध काढले जाते. म्हशींना गावाच्या बाहेरून दुपारी दोन तास फिरवून आणले जाते. दूध पुन्हा संध्याकाळी सहा वाजता काढले जाते. एक म्हैस सकाळ, संध्याकाळ मिळून सरासरी आठ लिटर दूध देते.

औसेकर यांची शेती नाही. त्यामुळे चारा विकत घेतला जातो. म्हशींना ऊसवाढे, मका, कडवळ, कडबा असा ओला व सुका चारा कुट्टी करून दिला जातो. एका म्हशीला दररोज वीस किलो चारा आणि तीन किलो पशुखाद्य दिले जाते. पशुखाद्यामध्ये सरकी पेंड, गहू भुसा आणि गोळी पेंड पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दिली जाते. चाराकुट्टी केल्याने बचत होते, चारा वाया जात नाही.

म्हशींना लाळखुरकूत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुतज्ज्ञांकडून लसीकरण केले जाते.

औसेकर यांनी पंढरपुरी रेड्याचा रेतनासाठी सांभाळ केला आहे. रेड्याची निगा स्वतंत्रपणे राखली जाते. जातिवंत पिढी गोठ्यातच तयार करण्यावर त्यांचा भर आहे. ते दर दोन वर्षांनी रेडा बदलतात.

औसेकर लहान पाड्यांचेही चांगले संगोपन करतात. त्यांच्याकडे सहा ते नऊ महिने वयाचे दहा पाडे आहेत. त्यांचा आहार, आरोग्य यांची योग्य काळजी घेतली जाते. पाड्यांसाठी स्वतंत्र गोठा बांधला आहे. त्यांच्या गोठ्यातील पाड्यांना शेतकऱ्यांकडून मागणी असते. एक वर्षाची पाडी सरासरी दहा हजार रुपयांना विकली जाते.

औसेकरांच्या म्हशींना बंगळूर येथे झालेल्या तृतीय राष्ट्रीय पशुधन प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. मद्रास (तमिळनाडू) येथे 41 व्या अखिल भारतीय पशुधन प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. सिंधुदुर्ग येथे झालेल्या 45 व्या अखिल भारतीय पशुधन प्रदर्शनामध्ये पुन्हा पहिला क्रमांक प्राप्त झाला. जिल्हा, राज्य आणि आंतरराज्य स्तरांवरील आणखी काही पुरस्कारांनी औसेकर सन्मानित झाले आहेत.

ग्राहकांच्या आगाऊ मागणीनुसार औसेकर यांनी श्रीखंड, आम्रखंड, लोणी आणि दही विक्रीस सुरुवात केली आहे. श्रीखंड 130 रुपये प्रति किलो, चक्का 110 रुपये प्रति किलो, दही 40 रुपये किलो दराने विकले जाते. मूल्यवर्धनातून नफाही वाढतो असे औसेकर सांगतात.

पंढरपुरी म्हशी सोलापूर, कोल्हापूर, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या गोठ्यात प्रामुख्याने पाहण्यास मिळतात. त्या म्हशींमध्ये खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता अधिक आहे. म्हशींना वाळलेल्या व सुक्‍या चाऱ्याबरोबरच पेंड, भुसा आदी पशुखाद्य दिल्यास चांगले दुग्धोत्पादन मिळते. पंढरपुरी म्हशींची पैदास करण्यासाठी कृत्रिम रेतनाचा वापर करावा. कृत्रिम रेतनामुळे गोठ्यात निरोगी आणि सुदृढ पैदास होते.

अप्पा कृष्णाजी औसेकर – 9665656575

– भारत नागणे

About Post Author

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर नियोजन विक्रि…
    अतिशय सुंदर नियोजन विक्रि साठी म्हैस कोठे आहेत

Comments are closed.