न्हैचिआडच्या रेग्यांचा गणपती (Ganpati From Nhaichiaad)

6
161

सिंधुदुर्गजिल्ह्यात वेंगुर्ल्याहूनशिरोड्याला जाताना वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ती खाडी ओलांडली की डाव्या कुशीला लागतं आमचं न्हैचिआड. न्है म्हणजे नदीअथवा खाडी. त्यांच्या आड वसलेलं, म्हणून गावाचं नाव न्हैचिआड! आमचं हे न्हैचिआड डोंगराच्या उतारावर आहे. रेग्यांचीगावात पाच घरे. गावात वरचा वाडा आणि खालचा वाडा असे दोन भाग येतात. आमची घरं खालच्या वाड्यातील.

रेग्यांच्या पाच घरांत आमचं घर मधलं. आमच्या समोर रेग्यांच्या मूळ पुरुषाचं घर. ते आबांचं घर म्हणून ओळखलं जातं. त्या घरातील मंडळींना आबा गेले‘, म्हणजेच आबांच्या घरातील असं संबोधलं जातं. आमच्या वरील अंगाला जे घर आहे तेथील मंडळीवैल्या गेलीआणि खालच्या बाजूस घर आहे तेथील मंडळी खायला गेली‘. त्याशिवाय खालील घराच्या मागील अंगाला एक घर आहे. तेथील मंडळी भाऊ गेली‘. आमच्या आजीला गावात सगळेजण काकी नावाने संबोधत. म्हणून आमचा उल्लेख काकी गेलेअसा होतो.

वैल्या गेल्यांच्या  घरासमोर मुंज्याचं देवस्थान आहे. भल्यामोठ्या पिंपळाच्या पारावर त्या देवस्थानाची स्थापना करण्यात आली आहे. गावात राहण्यास आल्यानंतर, प्रथम आंघोळ, देवपूजा उरकून मुंज्याला नमस्कार करण्यास जायचं हा रिवाज ठरलेला.  रोज संध्याकाळी मुंज्याला दिवा दाखवला जातो. त्या दिव्याला प्रत्येक घरातून कैपतीतून तेल घातलं जात असे. आता गावात वीज आली आहे. मुंजाचा पार वीजेच्या दिव्यांच्या रोषणाईने सजतो. मात्र अजूनही मुंज्यापुढे दिवा आणि अगरबत्ती लावण्याची प्रथा काही मंडळी श्रद्धेने पाळतात.

रेग्यांचे जुने घर

मी शाळेत असताना नववीच्या मे महिन्याच्या सुट्टीत न्हैचिआडला जवळजवळ महिनाभर राहिलो. त्या आधी, अगदी लहानपणीही, मी आईवडिलांबरोबर न्हैचिआडला आलोच होतो. मात्र मला त्या गावाची खरी ओळख पटली, ती त्या मे महिन्याच्या सुट्टीत. त्या काळी आम्ही दिवसभर घुलाहा खेळ खेळत असू. तो खेळ बसण्याच्या पाटाच्या पाठच्या बाजूला चौकटीचा पट आखून त्यावर सोंगट्यांऐवजी समुद्रातील विविध आकारांचे शिंपले मांडून खेळला जातो. समुद्रातील हातातील सोंगटीने दान टाकून त्यावरून पटावरील स्वत: च्या शिंपल्या सरकवत आणि वाटेतील प्रतिस्पर्ध्याच्या सोंगट्या मारत जाण्याचा तो खेळ आम्ही तासन् तास खेळत असू. दिवसभर आंबे, फणस, करवंदं, शेंगदाण्याचे लाडू, काजूचे लाडू, खाजं, आमसुलाचं म्हणजेच कोकमाचं सरबत, कैरीचं पन्हं हा खुराकही सुरूच असे. महिनाभराच्या सुट्टीतील त्या वास्तव्याने माझ्या मनात न्हैचिआडबद्दल कमालीची ओढ निर्माण झाली. मी पूर्णतः शहरात वाढलेला आणि गुरफटलेला; पण आधुनिकतेचा स्पर्शही न झालेल्या न्हैचिआडच्या खेड्यात समरस होऊन गेलो होतो.

शाळाकॉलेजात शिक्षण घेत असताना केवळ मे महिन्याच्या सुट्टीत माझं न्हैचिआडला जाणं होई. नंतर ब-याच वर्षांनी गणपतीसाठी न्हैचिआडला जाण्याचा योग जुळून आला. त्यावेळी केवळ न्हैचिआडमध्ये नव्हे तर संपूर्ण कोकण प्रांतात आलेलं उत्साहाचं उधाण पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. जात, धर्म, पंथ असे भेद ओलांडून सर्वच जण हा उत्सव साजरा करण्यासाठी तेथे सिद्ध झाले होते. तेव्हापासून गणेशोत्सव साजरा करायचा तो न्हैचिआडमध्येच अशी खूणगाठ मी मनाशी बांधून घेतली. आम्हा नातेवाईकांमध्ये गणपतीच्या कित्येक महिने आधी न्हैचिआडला जाण्यासंबधी विचारपूस सुरू होते. आम्ही तिघे चुलत बंधू एकत्रित रीत्या प्रतिवर्षी घरचा गणपती न्हैचिआडला साजरा करतो. त्याशिवाय चुलत बहिणी, आत्याकडील मंडळी असा आमचा वीसएक  जणांचा गोतावळा त्यानिमित्त न्हैचिआडच्या घरी जमतो.

न्हैचिआड गाठण्यासाठी आमची पहिली पसंती कोकणरेल्वेला असते. गणपतीच्या दिवसात कोकण रेल्वेची तिकिटं मिळणं म्हणजे लॉटरी लागण्याहूनही कठीण काम. पण त्यासंदर्भात आम्ही खरोखरच भाग्यवान. दरवर्षी आम्ही कोकणरेल्वेनेच गावी जातो. कुडाळस्टेशनवर उतरून आम्ही वेंगुर्लामार्गै न्हैचिआड गाठतो. वाटेत उंच टेकडीवरून उजव्या अंगाला नितांतसुंदर वेळेगार म्हणजेच समुद्रकिनारा दृष्टीस पडतो. त्यावर नजर पडली की मन नकळत कोकणच्या अवर्णनीय निसर्गसौंदर्यात हरपून जातं.

रेग्यांचे नवे घर

गावी पोचल्यानंतर गणपतीची तयारी सुरू होते. पहिलं काम अर्थातच देवखोली स्वच्छ करण्याचं. विहिरीवरून पाणी काढून संपूर्ण देवखोली धुतली जाते. त्यानंतर बाजारहाट. गणपतीसाठी घरात असंख्य गोष्टी लागतात. त्यांची यादी करून त्या बाजारातून आणाव्या लागतात. आमचं गाव तसं छोटसं खेडं. साहजिकच सामान खरेदीसाठी शिरोड्याचा अथवा वेंगुर्ल्याचा बाजार गाठावा लागतो. बाजारात आजुबाजूच्या गावातील शेकडो लोक जमलेले असतात. गणपतीच्यासजावटीसाठी लागणारं माटवीचं सामान, स्वयंपाकाच्या भाज्या, फळे, फुलं, फुलांचे हार, वेण्या, उमामहेशाच्या पूजेसाठी लागणारं पिवळ्या फुलांचं हरणगवत, नाडापुडी अशा असंख्य गोष्टींची यादी सोबत असते. त्या वस्तू खरेदी करत बाजार पालथा घातला जातो. त्यानंतर थकवा घालवण्यासाठी भजी आणि चहा यांचा खुराक घेऊन आम्ही घरी परततो.

घरी परतल्यानंतर देवखोली सजवण्याचं काम सुरू होतं. देवखोलीत वरील बाजूला काठ्यांची चौकट लटकत असते. तिला माटवीम्हणतात. आंब्याचे टाळ, नारळ, विविध रंगांची फळं आणि पानं लटकावून ती माटवी सजवली जाते. त्यानंतर लखलखत्या छोट्या दिव्यांची आरास. देवखोलीच्या दारावर कागदाच्या फुलांची आणि रंगीत दिव्यांची तोरणं चढतात. सजावटीची तयारी पूर्ण होते. स्वयंपाक घरात बायकांची धांदल उडालेली असते. हरतालिकेपासून तीन दिवस सोवळ्याचा स्वयंपाक. हरतालिकेला हळदीच्या पानांत शिजवलेल्या गुळाच्या पातोळ्या, चतुर्थीला उकडीचे मोदक, पंचमीला साखरभात असा ठरलेला नैवद्य दाखवायचा असतो. सर्व तयारी परिपूर्ण झाल्यावर हरतालिकेच्या दिवशी घरात गणपतीच्या मूर्तीचं आगमन  होतं. देवखोलीत चौरंगावर गणपती विराजमान होतो. चतुर्थीचा उत्सव सुरू होतो!

चतुर्थीच्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने, मंत्रांच्या घणघणीत उच्चारात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर एकादष्ण्यांची आवर्तनं. घरातील मंडळींनी एकादष्ण्या आंगवलेल्या असतात. त्याशिवाय ठरलेल्या वार्षिक एकादष्ण्या. मी लहान असताना एकादष्ण्यांचा कार्यक्रम जवळ जवळ तासभर रंगत असे. पूजाअर्चा झाल्यावर एका ताम्हणामध्ये पाण्यावर लाल कुंकू टाकून त्यात सजलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा प्रघातही पाळला जातो. फुलांनी सजलेलं, दिव्यांच्या आराशीनं उजळलेलं श्रीगणेशाचं प्रसन्न दर्शन मनाला अतीव समाधान देऊन जातं.

गावातील अन्य रेगे कुटुंबीयांच्या पूजा उरकल्या, की आरत्यांचा जल्लोष एकत्रित सुरू होतो. एकाने एक आरती म्हटली की दुसऱ्याने दुसरी आरती म्हणायची अशी ती स्पर्धा रंगात येते. एकजात सर्वांच्या सर्व आरत्या पाठ असतात. आरत्यांनंतर मंत्रपुष्पांजली. तन्नोदंती प्रचोदयाssच्या गजराने आरत्यांची सांगता होते. त्यानंतर नैवेद्याची पानं मांडली जातात. पंचपक्वानांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. नैवेद्य प्राशन केल्यावर थोडा विसावा मिळतो. तृप्तीचे ढेकर देत सर्वांची वामकुक्षी सुरू होते.

सायंकाळी पाचच्या दरम्यान गावकऱ्यांचं भजनासाठी आगमन होतं. गावकऱ्यांनी एकत्रित रीत्या सर्वांच्या घरी जाऊन भजनं सादर करण्याची प्रथा आस्थेने पाळली जाते. भजनाला तबलापेटीची साथ असते. देवखोलीच्या समोरच्या ओसरीवर मध्यभागी रांगोळीवर समई ठेवलेली असते. त्या समईच्या भोवती रांगेत उभं राहून देवाचं दर्शन घेत, टाळ आणि झांजांच्या गजरात भजन सुरू होतं. गावकऱ्यांचा एकत्रित आवाज भजनात तल्लीन होऊन जातो. उत्तरोत्तर लय वाढत जाते. भजनी ठेक्यावर सर्वांचे पायही ताल धरतात. एका सूरात नाचत, गात, भजनं सादर केली जातात. मी त्या भजनांचा भान हरपून आस्वाद घेत कडेला उभा असतो. भजनं सादर करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव मी टिपतो. छोटी छोटी मुलं आणि थकलेले वृद्ध यांच्या अंगात संचारलेला जोष मला वेगळीच अनुभूती देऊन जातो. उत्स्फूर्तपणे मीही गावकऱ्यांच्या भजनात सामील होतो. संपूर्ण रात्रभर गावात भजनाचा सूर निनादत राहतो.


गणपतीच्या दिवसांत आम्ही न्हैचिआड नजिकच्या गावातील काही प्रमुख देवस्थानांचं दर्शनही घेतो.  जवळच्याच टाक गावातील मारूती, आरवलीचे वेतोबासातेरी देवी आणि आसोलीचा नारायण या देवस्थानांचं दर्शन घेण्याचा रिवाज आम्ही पाळतो. पंचमीच्या दिवशी सकाळी पूजेची, आरत्यांची आणि नैवेद्याची पुनरावृत्ती होते. समस्त रेगे कुटुंबीयांची कुलदेवता म्हणजे गोव्याची श्री शांतादुर्गा देवी. पंचमीच्या दिवशी देवीचं मनोभावे स्मरण करून एका सवाष्ण महिलेची ओटी भरली जाते व तिच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला जातो.

संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. सर्वांच्या ख्यालीखुशालीची आणि क्षेमकल्याणाची याचना झाल्यावर चौरंग हलवला जातो. गणपती त्याच्या गावाला जाण्यासाठी निघतो व येथे आम्हा सर्वांचे डोळे पाणावतात. पुनरागमनायचच्या अक्षता टाकून देवाच्या हातावर दही ठेवलं जातं.  देवखोलीतील मूर्तीचा चौरंग बाहेर खळ्यात येतो. गावातील सर्वांच्याच घरातील गणपती विसर्जनाला निघतात. मोरयाss मोरयाss’च्या ललकाऱ्या गावभर उमटतात. एका रांगेत गावातील सर्व गणपती नदीच्या वाटेने निघतात. शेतातील बांधांतून मार्ग काढत गणपतींची रांग पुढे पुढे सरकते. सूर्य मावळतीला निघालेला असतो. आकाशात सांजरंग उमटत असतात. दूरवर हिरव्याकंच डोंगरांच्या रांगा तटस्थ उभ्या असतात. शेतातील पिकांतून वाट काढत गावातील गणपती नदीच्या काठावर गणेशकोंडीवर पोचतात. तेथे संपूर्ण गावाची एकत्रित आरती होते. गावकऱ्यांच्या वतीने गावातील प्रमुख गाऱ्हाणं घालतो. त्याला होयss महाराजाss’ म्हणत गावकरी प्रतिसाद देतात. खाली उतरलेल्या अंधारात गणपतींच्या मूर्तींसमोरील कापराच्या वाती सौम्य प्रकाश देत उजळत असतात. गावकऱ्यांचं सर्वांच्या गणपतीला वंदन होतं. त्यानंतर तरणेताठे गडी मूर्तींचं विसर्जन करतात. अंधारात वाट चाचपडत आम्ही घरी परततो.

गणेशोत्सवानंतर लगेच मुंबईला परतण्याची तयारी सुरू होते. गावातून निघताना मुंज्यापुढे नारळ ठेवून प्रवास सुखरुप होवो अशी प्रार्थना केली जाते. मुंबईला परतल्यानंतर काही दिवसांतच आम्ही दैनंदिन कामकाजात गुरफटून जातो. मात्र एखाद्या निवांत क्षणी डोळ्यासमोर न्हैचिआडचा परिसर उभा राहतो. मुंज्याचा पार, रेग्यांची घरं, आमच्या खळ्यातील फणसाचं झाड, खायला गेल्यांच्या खळ्यातील पसरलेला पारिजातकाचा सडा, त्यांच्या घरासमोरची बावम्हणजेच विहीर , मालवणी बोली भाषेतील अस्सल हेल काढत एकमेकांशी संवाद साधणारे गावकरी … सारं काही लख्ख दिसतं. मनात भजनी ठेकाही ताल धरतो … मुंबईत वावरणारा मी क्षणार्धात न्हैचिआडला भेट देऊन येतो!

शब्दांचे अर्थ –

1) कैपत- विशिष्ट आकाराचे छोटेसे भांडे. ते भांडे हातात धरण्यासाठी एक पट्टी जोडलेली असते. त्या भांड्यातील तेल पळीने समईत टाकले जाते.

2) नाडापूडी-  हळद, कुंकू, अबीर, गुलाल, गौरीचे चित्र इत्यादी पूजेचे साहित्य. एकत्र ठेवलेली पुडी.
            3) आंगवलेली एकादष्णी – इच्छापूर्तीसाठी केलेले एकादष्णीचे आवर्तन.

सुनील रेगे 96190 01191 arurege50@gmail.com

सुनील रेगे हे व्यक्तीमत्त्व विकासविषयाला वाहिलेल्या उन्नयनया त्रैमासिकाचे संपादक/प्रकाशक आहेत.  त्यांनी  महाराष्ट्र टाइम्स, साप्ताहिक लोकप्रभाव महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या इकॉनॉमिक डायजेस्टमासिकासाठी स्तंभलेखन केले. त्यांचा घळकवितासंग्रह, ‘ओंजळ‘  हा ललितलेखांचा संग्रह, मान्यवरांच्या यशोगाथांवर आधारित कर्तृत्त्ववान भाग१ व भाग२ आणितर असं सगळं आहे!” हे आत्मचरित्र अशी पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या मुंबई विभागाचे माजी अध्यक्ष आहेत.

———————————————————————————————-

About Post Author

6 COMMENTS

  1. फारच छान लिहिलंय.आमच्यापैकी एका पाटणकरांचं घर अगदी या ठिकाणाच्या जवळच आहे.अणसूर नावाच्या गावात.त्यांची नारळाची मोठी वाडी आहे.मोचेमाडच्या पुलावर उतरून चालत जावं लागत असे पूर्वी.एका बाजूला खाडी आहे.रेडीचा गणपती जवळच आहे,पण एकदाच गेलो तेव्हा पाहिला नाही.दळवींच्या आरवलीचा वेतोबा ( सारे प्रवासी घडीचे मधला रवळनाथ!) मात्र पाहिला.अतिशय रम्य परिसर.आता खूप बदललं असेल सगळं.पण पूजेच्या रात्री न बोलावता येणारे आणि भजनांचा कल्लोळ उडवून देणारे झिलगे तसंच सगळं साजरं करत असणार.आणि द्रोणातून प्रेमानं दिलेल्या काळ्या वाटाण्याच्या मसालेदार उसळीचा अन् शिऱ्याचा आस्वाद घेत असणार! – लीना पाटणकर

    • खरंच अप्रतिम लेख. मी पण रेगेच, पण मिठबावचा. तालुका देवगड. आजूबाजूची मंदिर म्हटली की… गावातलाच रामेश्वर, कुणकेश्वर, तांबलदेग ची गजबाई देवी, मिठबावं वरून देवगड ला जाताना आशीर्वाद देणारा घाटीवरचा चिऱ्यातला स्वयंभू इच्छा पूर्ती करणारा गणपती, हिंदल्याचा वेतोबा सगळंच बघावंसं वाटतं. खरं सांगायचं तर आपला कोकणच नितांत सुंदर आहे. पण कोकणवासियांनाचं त्याची अजूनही कल्पना आलेली नाही.
      शेवटी एकच सत्य……. कशासाठी पोटासाठी. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here