नौकानयन स्पर्धेत सुवर्णभरारी – दत्तू भोकनळ

0
111

महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत रापलेल्या दत्तू भोकनळ याने नौकानयन (रोईंग) स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तो क्रीडाप्रकारच मुळात देशात अजून फारसा माहीत नाही. त्याने अंगात एकशेसहा इतका ताप असताना, त्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने त्यावेळी दाखवलेली जिद्द अचंबित करणारी आहे. त्याचे वैयक्तिक सुवर्ण मात्र हुकले. दत्तू हा रिओ ऑलम्पिक 2016 मधील स्पर्धेत नौकानयन प्रकारात प्रवेश मिळवणारा पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू होय. त्याचे मूळ गाव नाशिक जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील मंगळापूर. तेथे त्याच्या यशाने आनंदाचे उधाण आले होते. त्याचे स्वागत जंगी मिरवणुकीने झाले.

दत्तूला महाराष्ट्र शासनाने पंचविशीत छत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. त्याने राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेत प्रथम 2014 मध्ये दोन सुवर्णपदके मिळवली, तर तो चीनमध्ये 2016 साली झालेल्या सोळाव्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याच वर्षी, तो रिओ ऑलम्पिकसाठी त्या खेळात भारताकडून पात्रताफेरी पूर्ण करणारा एकमेव खेळाडू ठरला. त्याची विशेषत: तो स्वतःच्या नावे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बारा सुवर्णपदके कमी कालावधीत करणारा अवलिया खेळाडू मानला जातो! त्याचे जन्मदाते त्यांच्या मुलाचे हे अभूतपूर्व यश पाहण्यासाठी हयात नाहीत. दत्तू सैन्यात दाखल होण्यापूर्वी त्याच्यावरील पितृछत्र हरपले. तो रिओ ऑलम्पिकवरून परतला, पण त्याची ती कामगिरी आईला कळू शकली नाही, कारण आई अपघाती आजारपणामुळे कोमात गेली होती, 2016 सालीच आई दत्तूला पोरके करून गेली.

सहा फूट तीन इंच उंची व धिप्पाड देहयष्टी हे दत्तूचे वैशिष्ट्य. त्याचा जन्म 5 एप्रिल 1991 ला नाशिकच्या चांदवड तालुक्यात तळेगाव रोहे या छोट्याशा गावी झाला. दत्तूचे बालपण तळेगाव रोहे येथेच गेले. त्या गावात कायमचा दुष्काळ. पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. त्यांच्या घरची परिस्थिती अगदी बेताची. वडिलांच्या निधनानंतर सारी जबाबदारी दत्तूवर आली. त्याला मिळेल ती कामे करावी लागत. तो सैन्यदलात बीडमधील लष्करी भरतीत 2012 साली दाखल झाला. सैन्यदलात नौकानयन स्पर्धा होत असत. दत्तूने त्यात भाग घेतला. तेथून त्याचा थक्क करणारा प्रवास सुरू झाला. त्याला बालपणी विहिरीवर काम करावे लागले. ते करताना दोर धरून वरखाली यावे लागते आणि दत्तूचे हात प्रचंड अंगमेहनतीच्या त्या कामामुळे बळकट झाले. ती मेहनत त्याच्या नौकानयन खेळात उपयोगी पडत आहे असे त्याला वाटते. नौकानयन हा खेळ प्रचंड ताकदीचा आहे. दत्तू म्हणतो, की तो स्नायूंची बळकटी आणि शक्ती या जोरावर त्या खेळात टिकून आहे.

दत्तू सकाळी तीन तास सराव करतो. तीस किलोमीटरचा सराव आणि नंतर विशिष्ट पद्धतीचा व्यायाम. त्यात आहारालाही तितकेच महत्त्व आहे. ‘डाएट’चे नियोजन करावे लागते. ती बाब अत्यंत खर्चिक आहे. सैन्यदलात त्याला सोयीसुविधा असतातच, पण व्यतिरिक्त त्याला त्याच्या व्यक्तिगत सवयी व गरजा यावर खर्च करावा लागतो. त्याला सैन्यदलात नोकरीला लागून सहा वर्षें झाली आहेत, पण दत्तू त्यांचा सगळा पगार डाएटवर खर्च होतो असे सांगतो. दत्तूने अमेरिका, आफ्रिका यांसारख्या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतले आहे, ते त्याला अजूनही घ्यावे लागते. तशा गोष्टींची गरज आंतरराष्ट्रीय खेळात लागतेच. मात्र मोठे भवितव्य असू शकणाऱ्या या खेळाडूच्यामागे कोणी भक्कमपणे उभे राहिलेले नाही ही त्याची खंत आहे.

त्याचा प्रवास सैन्यातील करडी शिस्त आणि उचित ध्येय यांसाठी घ्यावे लागणारे परिश्रम या जोरावर सुरू आहे.

दत्तू भोकनळ 8149230537,indiarowingdattu@gmail.com

संतोष दिवे, 9404696142, Santoshdive32@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here