नीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान

5
187
carasole

श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्‍या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा या नद्यांचा संगम होतो. पश्चिमेकडून वाहत येऊन पंढरपूरच्‍या दिशेने कूच करणारी भीमा पश्चिमेकडून वाहत येऊन पूर्वेला जाणा-या नीरा नदीला आलिंगन देते. संगम झाल्यानंतर भीमा-निरा नदीचे रूपांतर चंद्रभागा नदीत होते. ती चंद्रभागा पुढे पंढरपूरच्या दिशेने वाहते. त्‍या संगमक्षेत्री असलेल्या नीरा नृसिंहपूर या गावात श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान आहे.

देवस्‍थानातील श्री लक्ष्मी नृसिंहाचे मुख्य मंदिर चिरेबंदी असून त्‍याचा आकार षटकोनी आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तेहतीस उंच चिरेबंदी पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांना लागूनच उजवीकडे नीरा नदीवरील ऐसपैस लक्ष्मीघाट आहे. घाटाच्या मध्यभागी लांबरुंद चौथरा व पायथ्याशी नदीपात्रात बुरुज आहे.

मंदिराच्या पश्चिमाभिमुखी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस सोंड वर करून उभे असलेले दोन दगडी हत्ती, गजांत लक्ष्मीची ग्वाही देतात. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या-उजव्या बाजूंना घडीव दगडाच्या ओवऱ्या आहेत.

श्री क्षेत्र नीरा नृसिंहपूर हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्याच्या आग्नेय टोकावर तर माळशिरस तालुक्‍याच्‍या उत्‍तरेकडे वसलेले आहे. नदीच्या पलीकडे सोलापूर जिल्हा सुरू होतो. ते इंदापूर शहरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभूर्णी- अकलूज मार्गापासून संगम स्थानक दहा किलोमीटर असून तेथून रिक्षा वा अन्य वाहनाने दीड किलोमीटर अंतरावरील त्या गावात जाता येते.

मंदिराच्‍या दर्शनी भागाच्‍या डावीकडे देवस्थानाचे कार्यालय आहे. भक्‍तांच्‍या निवासासाठी आवारात खोल्यांची सोय आहे. पश्चिमेकडे प्रवेशद्वारावर प्रशस्त नगारखाना आहे. सभोवतालचा परिसर पाऊण एकर म्हणजे तीस हजार चौरस फूट आहे. प्रदक्षिणा मार्गावर अनेक देवतांची मंदिरे आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा, पुढे गर्भागार, रंगशिला सभामंडप अशी रचना आहे. ते सर्व दगडी बांधकाम खसखशी टाकीचे आहे. दगडी बांधकामाच्या छतावरील देवतांच्या मूर्ती, बेलपाने, नक्षीकाम मनोवेधक आहे.

देवालयाचा मुख्य दरवाजा पितळी असून दोन्ही बाजूंला जय-विजय पुतळे आहेत. त्यांच्या बाहेरच्या बाजूस बांधकामाबद्दल माहिती देणारे दोन शिलालेखही आहेत. त्यांपैकी एक मराठी व दुसरा संस्कृत भाषेमध्ये आहे. पितळी दरवाज्यापुढे लाकडी मंडप असून त्यापुढे भक्त प्रल्हादाचे मंदिर आहे. रंग शिळेच्या मंडपाच्‍या दोन्ही बाजूस तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या भोवताली नदीपातळीपासून नव्वद फूट उंचीचा भव्य तट आहे. नदीपासून मंदिर नव्वद फूट उंच असल्याने तेथे नदीच्या पुराचा धोका नाही. बाहेरच्या तटाला वीटकामाचे दोन बुरूज आहेत. त्यामुळे बाहेरून मंदिर किल्ल्यासारखे दिसते.

मंदिराच्या मुख्य गर्भागारालगत श्री लक्ष्मीचे छोटे मंदिर आहे. नृसिंहमंदिराच्या गर्भगृहावरील शिखर सत्तर फूट उंच आहे. त्यावर सुंदर कलाकुसर आहे. दगडी बाजूवर सुबक शेषशायी भगवानाची मूर्तीही आहे. श्री लक्ष्मीमंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी वर्षभर पाणी ठिबकत असते. त्‍यास गुप्‍तगंगा असे म्‍हटले जाते. नीरा, भीमा या गंगा-यमुना तर शिखर पायथ्याची सरस्वती असा हा प्रयागच आहे असे तुकोबांनी या स्‍थानाचे वर्णन केले आहे.

गाभाऱ्यातील नृसिंह मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती वालुकाशिलेची आहे. ती वीरासनस्थ, दोन्ही मांड्यांवर हात ठेवलेल्या स्थितीत आहे. मूर्तीचा उजवा पाय गुडघ्यात मुडपून उभा आहे. डाव्या पायाची मांडी घातलेली असून उजवा हात उजव्या गुडघ्यावर आहे. डावा हात कंबरेवर आहे. रुंद छाती, बारीक कंबर, मुख सिंहासारखे रुंद व उग्र,भव्य डोळे अशी उग्र चर्या आहे. ती मूर्ती समोरील प्रल्हादाकडे व दर्शनास येणाऱ्या भक्तांकडे कनवाळू दृष्टीने बघत आहे. मूर्तीच्या डाव्या बाजूस, गाभाऱ्यातच अतिप्राचीन नृसिंह-शामराजाची उत्तराभिमुख मूर्ती आहे.

पद्मपुराणात नृसिंहपूर या क्षेत्राचे वैशिष्ट्य असे वर्णलेले आहे, की मंदिराचा कळस जेथे आहे तेथे पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे! जुन्या नृसिंह मंदिरात नृसिंह मूर्ती पूर्वाभिमुख होती. विठ्ठल शिवदेव दाणी ऊर्फ विंचूरकर सरदारांनी शके 1678 मध्ये नृसिंह मंदिराची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. नीरा व भीमा नद्यांतील प्रचंड शिळा व शिसे यांच्या सहाय्याने यंत्राकार चबुतरा बांधला. त्‍यावर भक्कम असा अंडाकृती घाट बांधण्यात आला. त्यानंतर बुरूजाची बांधणी करण्‍यात आली. मंदिराचे बांधकामानंतर शिखराचे काम करण्‍यात आले. त्याचा शिलालेख तेथे आहे. मंदिराचा पाया खणण्यासाठी अडीच लाख व मंदिरास सात लाख रुपये खर्च आला. मंदिराचे बांधकाम वीस वर्षे सुरू होते.

श्रींची मूर्ती नव्या मंदिरात पश्चिमाभिमुख करण्यात आली. विठ्ठल शिवदेव यांचे पाचव्या पिढीचे वंशज म्हणजे रघुनाथराव विंचुरकर! त्यांच्या कार्यकाळात नरसिंहक्षेत्राची भरभराट झाली. त्यांनी शिखरावर कळस चढवून सुवर्णध्वज लावला व गरुडाची भव्य मूर्ती करवून घेऊन गरुडोत्सवास प्रारंभ केला. त्यांनी श्रीमूर्तीस सोन्यामोत्यांचे शंभराहून अधिक दागिने व श्रीस एक किलो वजनाचा सोन्याचा मुकूट अर्पण केला.

प्रल्हाद मंडपाच्या वाखांच्यावर काचेचा कपाटात आंध्र प्रदेशातील कारागिरांकडून बनवून घेतलेल्या दशावतार, रामपंचायतन, कृष्ण इत्यादींच्या मूर्ती मन वेधणाऱ्या आहेत.

भीमा व नीरा या दोन्ही नद्यांच्या उलट दिशेने विविध तीर्थे आहेत. भीमेवर उजनीसारखे प्रचंड धरण आहे तर नीरेवर वीरधरण बांधले गेले आहे.

मार्गशीर्ष महिन्यात मंदिराचा वर्धापनदिन तसेच नृसिंह जयंती व गरुडोत्सव असे तीन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात.

– प्रमोद शेंडे

Last Updated On – 19th May 2016

About Post Author

5 COMMENTS

  1. अतिशय सुंदर महत्वपुर्ण माहीती
    अतिशय सुंदर व महत्त्वपुर्ण माहिती आहे.

  2. MAHARASHTRA TOURISM
    MAHARASHTRA TOURISM DESTRUCTION CORPORATION LAA ASHAA GOSHTEE NAA JAGAPUDHE NENYAA CHI SHUDDH KEVA YENAAR?
    PUNE ZILLYCHE EK MAHITI PATRAK SUDDHAA CHHAAPU SHAKAT NAHEET,TIME SQ LA DIWAALEE SAJREE KARTAAT.NIRLAJJATECHAA KALAS MTDC AAHE.

Comments are closed.