निसर्गाच्या कुशीतील विमलेश्वर मंदिर

0
146
carasole

विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे ‘संस्कृतिकोशा’चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद काळे व अभिनेत्री पल्लवी जोशी यांचे मूळ गाव होय.

विमलेश्‍वराच्‍या मंदिरासभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपावणारे उंचच उंच माड, पोफळी आदी झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी, तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारले आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस दोन हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या जवळून, वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीचा कडा सुमारे तीन फूट खोदून चर काढलेला आहे. कळसाचे बांधकाम सिमेंटने उंच बांधून वाढवण्यात आले आहे.

प्रवेशद्वारावर मानवी रूपातील पाच कोरीव शिल्पे आहेत. ती शिल्पे पंचतत्त्वांची प्रतीके मानली जातात. मंदिराच्या पाय-या चढताच भलीमोठी घंटा टांगलेली दिसते. पुढे जाताच, 35 × 30 × 12 फूट क्षेत्रफळ असलेला सभामंडप लागतो. मंदिरात अंधार असल्याने तेथे वटवाघळांचा वावर बराच असतो. त्यांच्या चित्काराने दचकायला होते. तेथून काही पाय-या चढल्यावर मंदिराचा गाभारा लागतो. मध्यभागी सुबक आकारातील शंकराची पिंड व नंदीची मूर्ती लक्ष वेधून गेते. तेथील गाभा-यात उंचावर असलेले शिवलिंग हे भारतातील दुर्मीळ वैशिष्ट्य! मानवी कल्पकता व निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेले ते प्राचीन मंदिर त्याच स्थितीत टिकून आहे. मंदिराच्या समोर ओढा असून त्याला बारमाही पाणी असते. तेथे दोन झरे वाहताना दिसतात. पावसाळ्यात ओढ्याचे पाणी गढूळ होत असले, तरी झ-याचे पाणी मात्र स्वच्छ असते. त्यामुळे ते गंगेचे पाणी मानले जाते. लेण्यांच्या दगडांतून सफेद गोंदासारखा द्रव पाझरतो, त्यास स्थानिक बोलीभाषेत ‘पाषाण’ असे म्हणतात. त्या द्रवाचा उपयोग स्थानिकांकडून दमा या आजारावर केला जातो.

मंदिरासमोर सभामंडप व बसण्यासाठी कठडा आहे. दोन्ही बाजूंला प्रदक्षिणेसाठी चि-यांनी घाट्या बांधून काढल्या आहेत. शेजारी मोठे तुळशीवृंदावन, काळभैरव मंदिर व गणेश मंदिर आहे. धर्मशाळा व गावात पूर्वी होऊन गेलेल्या नेने नामक सत्पुरुषाचे समाधिस्थळही आहे. मंदिरात होणारा मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रीचा. माघ कृष्ण दशमी ते अमावास्येपर्यंत उत्सव असतो. एकादशीला जत्रा भरते. त्या दिवशी ग्रामदैवत रवळनाथाचे तरंग मंदिरात आणले जातात. मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घातली जाते. मंदिरात आरती, कीर्तन, प्रवचन व भजने होतात. चाकरमान्यांच्या आगमनामुळे गावातील उत्साहाला उधाण आलेले असते. अमावास्येच्या दिवशी सकाळी पालखीसह लोक समुद्रस्नानासाठी जवळ असलेल्या फणसे येथील समुद्रकिनारी जातात. रात्री लळिताच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.

नयनरम्य परिसर आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या विमलेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात मंदिर कायमचे कोरले जाते. अलिकडच्या काळात, त्या परिसरात चित्रपटांचे चित्रिकरण झालेले आहे.

विमलेश्‍वर मंदिरात जाण्यासाठी मुंबईहून रेल्वेने कणकवली स्थानकावर उतरावे. तेथून विजयदूर्गला जाणारी गाडी वाडा गावातून जाते. तेथून थेट गाडी न मिळाल्यास देवगडला जाऊन तेथून विजयदूर्गची गाडी पकडता येते. स्वतःच्या वाहनाने जाताना मुंबई-गोवा महामार्गावर तरळा या गावातून एक फाटा वाड्याला जातो. त्या रस्‍त्‍यानेदेखील वाडा गावात पोचता येते.

– पांडुरंग भाबल

About Post Author

Previous articleकाकतालीय न्याय
Next articleपुस्तकवेडे गायकरकाका!
पांडुरंग सुदाम बाभल यांचा जन्‍म 1959 सालचा. त्‍यांनी बी. ए.ची पदवी मिळवली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्‍टच्‍या गोदी विभागात बत्‍तीस वर्षे नोकरी केल्‍यानंतर ते 2014 साली सहाय्यक शेड अधिक्षक पदावरून निवृत्‍त झाले. बाभल 1988 पासून वृत्‍तपत्रात लेखन करत आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून त्‍यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. स्‍तंभलेखन करण्‍यासोबत त्‍यांनी बातमीदार आणि वृत्‍तसंकलक म्‍हणून काम केले. कोकणातील, विशेषतः देवगड तालुक्‍यातील व्‍यक्‍तीमत्त्वे, देवालये, कोकणातील संस्‍कृती आदी त्‍यांच्‍या लेखनाचे विषय असतात. लेखकाचा दूरध्वनी 9969022555, 022 25665066