अणदूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेले छोटे खेडेगाव. ते सोलापूरपासून चाळीस किलोमीटरवर अंतरावर आहे. त्या ठिकाणी डॉ. शशिकांत अहंकारी व त्यांच्या गायनॅकॉलॉजिस्ट पत्नी शुभांगी हे दांपत्य आरोग्यसेवेसंदर्भात मोलाचे काम करत आहेत. अहंकारींनी त्या खेड्यात ‘हॅलो’ (हेल्थ अॅण्ड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन) नावाची संस्था सुरू केली आहे. अहंकारी औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजात विद्यार्थी असतानाच युक्रांद वगैरे सारख्या चळवळीतल्या मित्रांना घेऊन सुट्यांत स्वयंसेवी आरोग्य सेवा आसपासच्या खेड्यांत पुरवत असत. पुढे, डॉक्टर झाल्यावर त्यांनी स्वयंसेवी कामास पूर्णवेळ देऊन, त्यांच्या आईच्या नावे ‘जानकी रुग्णालय’ सुरू केले. त्यांचा ‘भारत-वैद्य’ नावाचा प्रकल्प बराच नावाजला गेला व अनुकरणीय ठरला. सरकारनेही तो वाखाणला आहे. गावोगावच्या खेड्यापाड्यांतून थोड्याशा (इयत्ता ८ ते १२) शिकलेल्या स्त्रियांना ते पन्नास दिवसांच्या प्रशिक्षणात प्राथमिक आरोग्याचे व विशेषत: माता-बाल-संगोपनाचे प्रशिक्षण देतात. त्या स्त्रियांना ते ‘भारत-वैद्य’ म्हणतात. अशा पंच्याहत्तर भारत-वैद्य स्त्रिया सत्तर खेड्यांतून पाच रुपये/दर रुग्णामागे, एवढ्या अल्प खर्चात, रोगी तपासण्याचे काम करतात. त्यांचा नाराच आहे, की ‘एसटीच्या खर्चात, उपचार गावात.’
अहंकारी दांपत्याने स्त्रियांविषयीच्या अपार कणवेपायी अडाणी स्त्रीलाही समजतील अशा चाचण्या अमलात आणून रूढ केल्या आहेत. जसे एकदा एका मुलीने एका भारत-वैद्याला विचारले होते, की ‘एचबी’ म्हणजे काय ? त्यावर डॉक्टरांनी हेमोग्लोबीनचे गरोदरपणातले महत्त्व समजावून सांगितले व भारत-वैद्यांना शिकवले की, फक्त बाळंतिणीची नखे बघा. ती फिकी असतील तर हेमोग्लोबिन कमी आहे, तिला लोहगोळ्या द्या, पण नखे लालसर असतील तर प्रकृती ठीक आहे. गरज ही शोधाची जननी असते हे इथे पाहायला मिळते. अहंकारी त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान जे अभिनव प्रयोग योजतात त्याला दाद द्यावी असेच वाटते. उदाहरणार्थ, स्त्रीची शरीररचना समजावताना ते फरशीवर बाईची आकृती खडूने काढतात व मग त्यात यकृत, किडनी, योनी वगैरे अवयव रंगीत खडूंनी भरतात. हा ग्रामीण अॅनॉटॉमीचा वर्ग मोठा मनोहारी वाटतो व प्रभावीही.
अहंकारींनी कल्पकतेने ‘माता-दत्तक-योजना’ तिथे राबवली आहे. वस्तीतल्या लोकांच्या मदतीने तिथली भारत-वैद्य स्त्री गरोदर मातेला दत्तक घेते. तिने बारा आठवड्याच्या आत दवाखान्यात नाव नोंदवले का नाही, धनुर्वाताची तीन इंजेक्शने घेतली की नाही, शंभर लोहगोळ्या घेतल्या की नाही व योग्य आहार वेळच्या वेळी घेतला की नाही ही आरोग्याची प्राथमिक काळजी वाहते. ह्या जुजबी काळजीमुळे माता-बालक-मृत्यूचे प्रमाण घटते व आयुष्याची सुरुवात नेमकी व विश्वासक होते. ह्यामुळेच सोलापूरच्या गरीब वस्त्यात ते ह्या चळवळीचे नाव ‘शुअर स्टार्ट’ असे ठेवतात. ते चपखल असेच आहे.
सोलापूर हे अणदूरजवळ असलेले मोठे शहर. अहंकारींनी तिथल्या झोपडपट्टीसारख्या गरीब वस्तीत मोठा यशस्वी उपक्रम राबवला आहे. ऐंशी वस्त्यांतील दोन लाख स्त्रियांना बचतगटाच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवल्या जात आहेत. बचतगटामार्फत स्त्रियांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जाते. गाई, म्हशी, दळणकांडणाची लहान यंत्रे, दुकानांसाठी मदत वगैरे. ह्यासंबंधी अहंकारींचा अनुभव ह्रद्य आहे. एका बाईने बचत गटाकडून एक गाय घेतलेली असते. त्यासाठी तिने बचत गटाला अवघे साठ रुपये भरलेले असतात. पण तिच्या नव-याला तिने त्याची परवानगी न घेता हा व्यवहार केला, हे आवडत नाही. तो तिला बेदम मारतो व घरातून हाकलून देतो. ह्यावर ती बाई, डोळे पुसते व गाय घेऊन जाऊ लागते. नवरा म्हणतो, गाय कशाला नेतेस? त्यावर ती म्हणते, ‘बचत गटाने दिलीय, त्यांची त्यांना परत करते व जाते.’ स्त्रिया आत्मसन्मानासाठी कशा तयार होत आहेत त्याचे भान समाजाला ह्या अनुभवातून यावे.
अहंकारी स्त्री-भ्रूण-हत्याविरुद्ध काम करत असतानाचा एक विदारक प्रसंग सांगतात. त्यामुळे कोणाही पुरुषाला लाज वाटावी. त्यांची एक कार्यकर्ती होती. ती सरपंच म्हणून निवडून आली. नव-याचा प्रथम पाठिंबा होता. पण तिच्या कामामुळे तिचे जागोजागी सत्कार व्हायला लागले. ते सहन न होऊन नवरा तिला मारहाण करायला लागला. त्या बाईने एकदा भरसभेत स्वतःच्या पाठीवरचे वळ दाखवले. पुरुषी अहंकारामुळे ‘हॅलो’च्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास होतो. कदाचित त्या पुरुषी अहंकाराची सतत जाणीव राहवी म्हणूनच, अहंकारी यांनी, ते स्वत: निर-अहंकारी आणि कोणीही अभिमान बाळगावा असे असूनही अहंकारी हे आडनाव जपले असावे!
डॉ. शशिकांत अहंकारी यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना ६ नोव्हेंबर २०११ ला औरंगाबाद येथे ‘अनंत भालेराव-स्मृती-पुरस्कार’ देण्यात आला. ‘मराठवाडा’ या दैनिकाचे संपादक अनंत भालेराव यांच्या नावाचा हा स्मृती-पुरस्कार तेविसावा आहे. तो पुरस्कार याआधी निरनिराळ्या क्षेत्रांतल्या प्रथितयशांना, उदाहरणार्थ कुमार केतकर, वसंत पळशीकर, अप्पा जळगावकर, गोविंद तळवलकर, ना. धों. महानोर, मंगेश पाडगावकर, वगैरे व्यक्तींना मिळालेला आहे.
अहंकारींच्या अनेक प्रकल्पांना नामवंत संस्थांचे पाठबळ मिळत आहे. त्यात ऑक्सफॅम, फोर्ड फाउंडेशन, युनिसेफ, स्विस-एड, सिद्धिविनायक ट्रस्ट, महाराष्ट्र फाउंडेशन व पाथ ह्या सेवाभावी संस्था त्यांच्या प्रकल्पांचा मरातब वाढवतात. ‘भारतवैद्यक डायरी आरोग्याच्या विकासाची’ हे पुस्तक ग्रंथाली वाचक चळवळीने प्रकाशित केले आहे. तसेच युनिक फीचर्सतर्फे ‘खरेखुरे आयडॉल्स’मध्येही अहंकारी ह्यांच्या कार्याचा अंतर्भाव आहे. ‘वेगळ्या वाटांचे प्रवासी’ ह्या साकेत प्रकाशनाच्या पुस्तकातही त्यांची माहिती आहे. अहंकारी यांच्या कार्याला पंधरा वर्षे होऊन गेली आहेत. जिथे शहरातून अहंकारींचा सत्कार होतो वा सभा होतात त्याला ते त्यांच्या खेड्यातल्या पंधरा/वीस स्त्री कार्यकर्त्यांना आवर्जून बरोबर घेऊन जातात, त्यामुळे शहरातल्यांची व खेड्यातल्यांची जनजागृती होते. अहंकारींचा मुलगा सध्या इंग्लंडात एका संशोधनवृत्तीवर काम करतो, त्यावरून हा वसा पुढच्या पिढीतही जपला जात आहे! जगन्नाथाच्या रथाला जसे जितकी माणसे ओढतील तितके ते दैवत सहजी विराजते, तसेच सामाजिक सेवाभावी कार्याचे आहे.
हॅलो मेडिकल फौंडेशन, जानकी रुग्णालय,
अणदूर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद–पिन कोड: ४१३६०३ (महाराष्ट्र)
shashikant.hmf@gmail.com
www.halomedicalfoundation.org
अरुण अनंत भालेराव
022 25065651, 9324682792,
arunbhalerao67@gmail.com
आपले काम छान आहे..हेच काम
आपले काम छान आहे. हेच काम करण्याची आमची इच्छा आहे.आपण मदत करु शकता का? मो.9763210267/ 9403718584
अहंकारी दांपत्याचे कार्य
अहंकारी दांपत्याचे कार्य खरोखर वाखाणण्याजोगे, नव्हे अजोड आहे. त्यांच्या कार्यास मन:पूर्वक शुभकामना. कमलाकर सोनटक्के.
Comments are closed.