निगर्वी आणि निश्चयी! – दांडेकर

0
31

तीनचारशे कोटींची उलाढाल असणा-या एका नामांकित कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सांभाळणारी दिलीप दांडेकर ही निगर्वी व्यक्ती. रंगसाहित्य आणि स्टेशनरी क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा उमटवणारी कॅम्लिन यावर्षी आपला अमृतमहोत्सव साजरा करत आहे. कोकणातील केळशीजवळच्या छोट्या गावातून मुंबईला आलेल्या दि.प. तथा काकासाहेब दांडेकर यांनी 1930 साली गिरगावातील एका छोट्या खोलीत शाईच्या पुड्या व शाई बनवण्याचा उद्योग सुरू केला. त्यांना त्यांचे वडीलबंधू गोविंद परशुराम तथा नानासाहेब यांचे प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ लाभले.

काकासाहेबांनी व्यवसायात भरपूर मेहनत, सचोटीचा व्यवहार आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याची शांत वृत्ती ही त्रिसूत्री अंगीकारली आणि त्यांच्या व्यवसायाला बरकत प्राप्त झाली. कारखाना गिरगावातील खोलीतून 1939 साली माहीम येथे सुरू झाला; 1958 साली अंधेरीला आणि 1977ला त्याच कारखान्याची भव्य वास्तू उभी राहिली.

दांडेकर कुटुंबीयांच्या प्रत्येक पिढीने कंपनीच्या विस्तारास हातभार लावला. तारापूर येथे पेन्सिल निर्मितीचा कारखाना 1975ला सुरू झाला. त्या वर्षीच मलेशिया येथेही उत्पादन सुरू झाले. औषधनिर्मिती व औषध रसायनांच्या निर्मितीचा जोडउद्योग 1974 मध्ये अस्तित्वात आला. कॅम्लिन प्रा. लि. कंपनी 1946 साली अस्तित्वात आली होती. कंपनीचे ‘पब्लिक लिमिटेड’मध्ये रूपांतर 1988 साली करण्यात आले. जनतेसाठी समभाग खुले झाले. दांडेकर कुटुंबीयांकडे 51 टक्के समभाग आहेत.

देशभरात जवळजवळ पन्नास हजार विक्रेत्यांचे जाळे कंपनीने विणले असून कॅम्लिन दरवर्षी वीस टक्क्यांनी प्रगती करते. काकासाहेब दांडेकरांनी उंटछाप निवडताना वाळवंटातही धीमेपणे अथक प्रवास करणा-या उंटाचा गुणधर्म डोळ्यांसमोर ठेवला होता. दांडेकरांच्या पुढच्या पिढीने हाच गुणधर्म जोपासला आणि कंपनीची भरभराट होत गेली.

स्वत:ची ब्रॅण्ड इक्विटी निर्माण करणे आणि विविध उपक्रमांद्वारे ग्राहकांसमोर सतत येत राहणे हे कॅम्लिनच्या यशाचे गमक.

कॅम्लिनच्या आर्ट मटेरिअल विभागाने बालचित्रकारांपासून ते व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांसाठी रंगसाहित्य बनवले व त्याची उपयुक्तता ग्राहकांना विविध मार्गांनी पटवून दिली. क्रायलिन रंग हा कंपनीच्या यशातील मानाचा तुरा. या उत्पादनाने कॅम्लिनचे नाव अक्षरश: घराघरात पोचले. कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने या माध्यमांतून कंपनीच्या उत्पादनांचा प्रचार होत राहिला.

शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आँल इंडिया कॅमल कलर काँण्टेस्टने लोकप्रियता मिळवली आहे. देशभरातील तीस-पस्तीस लाख मुले दरवर्षी स्पर्धेत सहभागी होत असतात. कंपनीने कॅम्लिन आर्ट फाऊंडेशनची स्थापना करून व्यावसायिक चित्रकार, कलाशिक्षक यांना मानाचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. काकासाहेबांनी लावलेल्या रोपाचे सुभाष दांडेकर, सौ. रजनी, शरद, माधव, शोभना यांनी विशाल वृक्षात रूपांतर केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा, नियोजनाचा व धोरणांच्या काटेकोर अंमलबजावणीचा फायदा झाला अशी भावना दिलीप दांडेकर आवर्जून नमूद करतात.

दिलीप दांडेकरांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी कॅम्लिनमध्ये प्रवेश केला. सुभाष आणि दिलीप यांच्या आई मालतीबाई यांनी घरी सुबत्ता नांदत असूनही मुलांवर साध्या राहणीचे संस्कार रुजवले. नंतर वाणिज्य विषयामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर. सुरुवातीला कॅम्लिनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी करावी लागली. त्यांनाही इतर कर्मचा-यांप्रमाणे महिन्याकाठी पगार मिळत असे. कॅम्लिनच्या सर्व विभागांमध्ये रीतसर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे अधिकारपदाची सूत्रे सोपवण्यात आली. प्रत्येक विभागातील कामाचे बारकावे या प्रशिक्षणामुळे आपल्याला समजले असे दिलीप म्हणाले.

कंपनीमध्ये अधिकार प्राप्त झाल्यावर दिलीप दांडेकर यांनी मार्केटिंग व्यवस्थेत प्रथम लक्ष घातले. कंपनीचा वितरण व्यवस्थेवर बराच खर्च होत असे. व त्यांतून ते नवनवीन सुधारणा घडवत गेले प्रचलित पद्धतीत बदल घडवण्याचा धोका स्वीकारण्यास राजी झाले. त्यांच्या बदलास योग्य तो प्रतिसाद लाभत गेला आणि खर्चात कपात होऊन उत्पादने देशभर पोचू लागली. जागतिकीकरणाच्या आणि खुल्या अर्थव्यवस्थेच्या दिवसांत केवळ भारतीय विक्रीवर अवलंबून न राहता सा-या जगाला कवेत घेण्यास पुढे सरसावणे आवश्यक असल्याचे दिलीप यांनी चाणाक्षपणे जाणले व त्या दृष्टीने धडाडीने पाउल उचलण्यास सुरुवात केली. कॅम्लिनची उत्पादने युरोप, अमेरिकेसह अनेक देशांत पोचली असून ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले आहेत. याच विषयाची दुसरी बाजू म्हणून भारतीय बाजारपेठेत कमी किंमतीत दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी चीन-कोरियामधून कॅम्लिन ब्रॅण्ड नावाची उत्पादने बनवून घेण्यास सुरुवात केली आहे.

डॉ. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली कॅम्लिनमध्ये संप पुकारण्यात आला आणि कंपनीचे उत्पादन 1980 साली आठएक महिने थंड पडले. त्यावेळी दांडेकर बंधूनी मोठ्या संयमाने ती समस्या हाताळली. युनियन नेत्यांबरोबर चर्चेच्या फे-या घडवून, उत्पादन वाढले तरच पगार वाढवता येतील हे त्यांनी कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यानंतर सर्व कर्मचारी पूर्ववत हजर झाले. खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागताच आपल्याला कर्मचा-यांवरील खर्चात कपात करावी लागणार हे ओळखून व्ही.आर.एस.चा पर्याय सर्व संमतीने राबवण्यात आला. जागतिक बाजारपेठेत पाय रोवून उभे राहायचे तर आर्थिक शिस्त असणे गरजेचे आहे हे दिलीप दांडेकर यांचे मत ठाम असून आवश्यक तिथे खर्च करण्याचे धोरणही ते सांभाळत असतात. गेल्या पाच वर्षांत आधुनिकीकरणावर कॅम्लिनने पंचवीस कोटी रुपये खर्च केले आहेत! खर्च आणि कपात यांची तारेवरची कसरत करण्यात निष्णात असा लौकिक दिलीप दांडेकरांनी कमावला असून अशा अनेक अंगभूत गुणांच्या आधारे ते कॅम्लिनचा कारभार समर्थपणे हाताळत आहेत. तसेच विस्ताराची विविध आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी दांडेकर कुटुंबीयांतील तिस-या पिढीतील राजीव, दीपक, श्रीराम व आशीष पुढे सरसावले आहेत.

दिलीप दांडेकर यांची वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक निष्णात व्यवस्थापक एवढ्या शब्दांत ओळख संपत नाही. जीवनातील अनेक अंगांचा आनंद ते समर्थपणे उपभोगत असतात. गोल्फ हा त्यांचा एक आवडीचा खेळ. व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर ते या खेळासाठी पूर्ण वेळ देणार आहेत! अनेक संस्थांचा व्याप सांभाळणे हा त्यांचा आणखी एक छंद. महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्स अँण्ड इंडस्ट्री (फिकी), इंडियन मर्चंट्स चेंबर अशा अनेक नामांकित संस्थांचे ते पदाधिकारी असून त्यांना अऩेक मानसन्मान लाभले आहेत. सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारातील उद्योगरत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणजे नेमके कसे असते हे जर कुणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी दिलीप दांडेकर यांची आवर्जून भेट घ्यावी. भेट घेणा-या व्यक्तीचे हसतमुख चेहे-याने मनमोकळे स्वागत करत ते हस्तांदोलनासाठी हात पुढे करतील आणि म्हणतील – "मी दिलीप!"

– सुनील रेगे

 

About Post Author