कोकणी माणूस त्याचे कुळाचार, त्या त्या समाजाने (जातीने) ठरवलेल्या रूढी-प्रथा-परंपरा कटाक्षाने पाळणारा आहे. कोकणवासी मंडळी धार्मिक सण-उत्सव यांत वर्षभर मग्न व दंग असतात. तरीही दापोली तालुक्यातील नास्तिक नमुने त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात याचा मला अचंबा वाटत आला आहे. मी त्यांची जीवनशैली अभ्यासली. दापोलीतील निरीश्वरवादी मंडळींवर उपजत चिकित्सक वृत्ती, वाचन, नास्तिक मंडळींचा सहवास आणि समाजवादी धोरण या घटकांचा प्रभाव दिसून येतो. नास्तिक मंडळी प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते शोधले, की चमत्कारप्रधान किंवा ऐकीव गोष्टींची आवश्यकता भासत नाही यावर सहमत आहेत. दापोली तालुक्यातील शिक्षक वर्गात मात्र या नास्तिक विचारांचा स्वीकार अगदी क्वचित दिसला. नास्तिक मंडळी विविध व्यवसायांत स्थिरावलेली आहेत. ती प्रौढ, वृद्ध आणि युवक अशा तिन्ही वयोगटांत आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम दापोलीत दृढावले आहे, तरी चळवळीतील मंडळी मात्र वेगवेगळ्या मतांची आहेत. नास्तिक मंडळी विश्वावर नियंत्रण करणारी एक अद्भुत, अंतिम आश्वासक, नैतिकता व न्याय या बाबी सांभाळणारी शक्ती आहे हे मानत नाहीत हे त्यांचे मुख्य एकमत वगळले तर वेगवेगळे मतप्रवाह जाणवतात. उदाहरणार्थ, अनिश पटवर्धनसारखी वयाच्या पन्नाशीचा उंबरठा गाठत असलेली व्यक्ती अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत वेगळी भूमिका घेते; म्हणजे असे, की अनिश अंधश्रद्धेला सक्रिय विरोध करतात, पण देवधर्माच्या बाबतीत मौन पाळतात ! कारण देवधर्माला विरोध अशी त्यांची भूमिकाच नाही. अनिश स्वत: मात्र त्यांच्या खासगी जीवनात कोणतेही कर्मकांड-उपासना करत नाहीत. त्यांची निरीश्वरवादी भूमिका गेली चाळीस वर्षे अगदी कोवळ्या वयापासून आहे. त्यांनी ती संकटांच्या-आघातांच्या काळातही बदललेली नाही.
अनिश पटवर्धन यांचे आजोळ दापोलीचे. डॉक्टर मंडलिक यांचे ते कुटुंब. मंडलिक मंडळी पुरोगामी. त्यामुळे पटवर्धन यांच्यावर पुढारलेल्या, परिवर्तनवादी आचार-विचारांचा संस्कार आईच्या परिवारातून झाला. पटवर्धन परिवर्तनवादी असले तरी त्यांनी स्वतःच्या वैचारिक भूमिकेत परिवर्तन केलेले नाही. त्यांनी कर्मकांड न करणाऱ्या युवतीशी, ‘अं.नि.स.’च्या चळवळीतून मैत्री होऊन भावबंध तयार झाल्यावर नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यांच्या पत्नी मुक्ता या नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या. त्यांनी अनिश यांना वैचारिक साथ दिली. त्या दोघांचे वास्तव्य दीर्घकाळ दापोलीत होते. त्यांनी तेथील सामाजिक उपक्रमांत, विशेषत: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा दापोलीत चालवून उत्तम सहभाग घेतला. त्यात पुढाकार सहसा त्यांचा असे. त्यांची मुलगी मितवा हीदेखील ‘ब्राईट’ विचारसरणीची आहे.
सुनील प्रसादे हे दापोलीतील यशस्वी उद्योजक व्यापारी आहेत. त्यांना व्यावसायिक यश लाभले आहे व त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील स्पर्धा यथार्थ पेलली आहे. संशोधक मन व उपक्रमशीलता हे त्यांचे गुण. प्रसादे यांना पारंपरिक श्रद्धामूल्ये व्यावसायिकता सांभाळताना आवश्यक वाटत नाहीत. ते कर्मकांड तर अजिबात करत नाहीत. ते समाजमाध्यमांतून लेखनसक्रिय आहेत. ते पर्यावरणस्नेही आहेत; तितकेच ते बुद्धिप्रामाण्यवादीही आहेत. प्रसादे चर्चा करताना म्हणाले, की स्पर्धेत उतरल्यावर जी शिस्त लागते ती बुद्धिवादामुळे अधिक येते. मुख्य म्हणजे नास्तिकांचा वेळ पारंपरिक, रुढीबद्ध गोष्टींमध्ये फार कमी जातो. त्यामुळे ध्येय-धोरणांबाबत आणि इतर वाचन-चिंतन-अभ्यास यावर भर देणे शक्य होते ! त्यांनी पागोळीचे पाणी वाचवण्यासाठी मोठी मोहीम चालवली आहे.
डॉक्टर प्रकाश साठे हे पुणेकर, पण त्यांनी दापोलीत मानसोपचारतज्ज्ञ म्हणून दीर्घकाळ सेवा केली आहे. ते त्यांच्या तर्कशुद्ध विचारांवर आणि निरीश्वरवादी तत्त्वावर ठाम असतात. डॉक्टर साठे संगीतप्रेमी व संग्राहक आहेत. एक समज आहे, की नास्तिक नंतर आपोआप बदलतो. हातपाय थकले, की समजते ‘काय आहे ते’ असे जे बोलले जाते तसे, घडत असलेले कोकणातील या नास्तिकांच्या बाबतीत तरी माझ्या अवलोकनात नाही. कारण त्यांनी नास्तिकता भावनिक पातळीवर किंवा एखाद्या आघाताचा परिणाम म्हणून आपलीशी केलेली नाही. ते सारे विचार करून नास्तिक बनले आहेत. स्थानिक दापोलीकरांपेक्षा बाहेरून येऊन कोकणात कार्य करणाऱ्या व्यक्ती मला नास्तिक म्हणून अधिक आढळल्या.
बौद्ध धर्मातील काही स्थानिक युवक उदाहरणार्थ पियुष शिर्के दापोली तालुक्यातच लहानाचे मोठे झाले. ते त्यांचा निरीश्वरवादी कल उघडपणे दाखवतात. दापोलीत शिक्षणासाठी काही वर्षे असलेले कोकणातील युवकही स्पष्टपणे निरीश्वरवाद जपतात. रोहन तांबे (खेड- टीव्ही वाहिनीवर कार्यरत), कौस्तुभ खातू (गुहागर) ही चटकन आठवणारी उदाहरणे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शुभम मटकर हा युवकही दापोलीतील वास्तव्यात निरीश्वरवादी विचार उघडपणे बोलून दाखवत असे. नास्तिक तरुणांमध्ये ‘मीडिया सेंटर’वर नोकरी करणाऱ्या दापोली तालुक्यातील गणेश सकपाळ या माध्यमकर्मीचा उल्लेख विशेष करावा लागेल. भीती हा विषयच त्याच्याकडे नाही. त्याला त्याचे असामान्य धैर्य मुंबईत व्यावसायिक खिंड लढवताना उपयोगी पडले असे तो म्हणतो. तेजस बोरघरे हा टीव्ही वाहिनीवरील वृत्त निवेदक दाभोळचा आहे. तो निरीश्वरवादाकडे कोणाच्या सांगण्यावरून वळलेला नाही. त्याची वृत्ती उपजत संघर्षशील व बंडखोर आहे. मी ज्यांचे उल्लेख येथे करत आहे त्यांच्यापैकी कोणाच्याही बाबतीत ज्येष्ठांकडून नास्तिकतेचा आग्रह धरला गेलेला नाही; सक्तीचा तर प्रश्नच नव्हता. हे नवयुवक स्वेच्छेने आणि स्वतःच्या वृत्तीला स्मरून निरीश्वरवादाकडे ओढले गेले. त्यांचे उदंड, अखंड वाचन नव्हते; तरीही त्यांना सत्यनिष्ठ विज्ञानप्रेमी व्हावेसे वाटले. त्या मुलांना त्यांचे मनोबल नास्तिकतेमुळे कायम राहिले हे मान्य आहे.
रमेश जोशी हे दापोलीतील तरुण व्यावसायिक स्वतःच्या कंपनीचे चालक-मालक आहेत. ते डोंबिवलीत स्थिरावले आहेत. गप्पा करताना ते म्हणाले, “मी निरीश्वरवादी आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. मी लहानाचा मोठा संघर्ष करत झालो. आई नव्हती घरात; रूढार्थाने धार्मिक वातावरण, कर्मकांड नव्हते. कॉलेज शिक्षण ज्या घरात राहून केले तेथील व्यक्तीही कर्मकांड न करणारी होती. त्यामुळे माझा संबंध पारंपरिक जीवनाशी फार आलेला नाही. मात्र मी माझ्या पत्नीला, नातलगांना, त्यांचे श्रद्धास्वातंत्र्य पूर्णपणे दिलेले आहे. हा त्यांचा मला माझा समंजसपणा वाटतो. कोणी म्हणेल, की ही तडजोड आहे !” नास्तिकांची कोकणात उपेक्षा होते का? असे मी रमेश जोशी यांना विचारले असता, जोशी म्हणाले, “त्या संदर्भात विचार करण्या इतपतही वेळ आम्हाला बिझनेस जगतात मिळत नाही. फार धावपळ असते, पण मुळात परंपराप्रिय समाजात नास्तिकांचा काही खास उल्लेख- गौरव तर वगळाच- व्हावा अशी अपेक्षा कशी करता येईल? नास्तिकता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे- तो पुरस्कार वा सन्मानाचा नव्हे. तिरस्कार मात्र कोणी कोणाचा करू नये.”
अरुण जोगदेव हे खाजगीत अध्यापन करत आलेले गृहस्थ आहेत. त्यांनी स्वतःपुरता निरीश्वरवाद जोपासताना त्यांच्या आनंदी घरगृहस्थीत सासऱ्यांसह सर्वांना पूजा, प्रार्थना इत्यादी स्वरूपातील स्वातंत्र्य दिले आहे.
मनोज पवार (दैनिक तरुण भारत) हे व्यावसायिक पत्रकार माझ्याशी भावासारखे नाते जोडत माझे नातलगच बनले आहेत ! त्यांच्यावरही बुद्धिप्रामाण्यवादाचा संस्कार होत गेला. त्यांनीही कौटुंबिक व सामाजिक जीवनात नास्तिकतेचा कोणताही अट्टाहास न करता इतरांचे स्वातंत्र्य जपले !
दापोलीतील निरीश्वरवादी लोकांची आर्थिक स्थिती एखादा अपवाद वगळता उत्तम आहे असे म्हणावे लागेल. या मंडळींनी सुसंस्कृतपणाबरोबर भौतिक सुखांचा आनंद, आस्वाद रसिकतेने घेतला आहे. निरीश्वरवाद खाजगी जीवनात जोपासणारी तरुण मंडळी माध्यमदंग व स्वयंकेंद्रितच आहेत. ती समाजकार्यात रस घेताना मला दिसत नाहीत. वयाची साठी ओलांडणारी नास्तिक मंडळी मात्र सामाजिक उपक्रमांत सहभागी होतात. उदाहरणार्थ, विद्यालंकार घारपुरे यांनी स्मृतिशेष नातलग महिलेच्या नावे छोटा ट्रस्ट स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबवले, शिबिरे आयोजित केली, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उपक्रमांत सहभागी झाले. विद्यालंकार यांचा व्यासंग व त्यांचे नोकरीच्या निमित्ताने व्यापक होत गेलेले अनुभवविश्व- त्या अनुभवांचा त्यांनी लावलेला अर्थ, त्यातून ते चिंतनशील व नास्तिक बनत गेले आहेत. ते कोणाचे अनुकरण नव्हते वा नक्कल नव्हती. ते त्या बाबतीत इतर नास्तिकांपेक्षा मला थोडे अधिक आग्रही दिसले. त्यांनी बँक अधिकारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेऊन सामाजिक काम व बालसाहित्य लेखनही केले आहे.
मी स्वत: कॉलेज अध्यापन दापोलीत गेली अनेक वर्षे करत आहे; पण निरीश्वरवादावर ठाम आहे. माझ्या बाबतीतही प्रश्न उपस्थित करण्याची ही वृत्ती उपजत, कुमार वयातच होती. ती नंतर वाढली. माझे बहुतेक स्नेही- सहकारी श्रद्धाळू, भाविक आहेत. माझे आणि त्यांचे संबंध अत्यंत खेळीमेळीचे, मधुर मैत्री जपणारे आहेत. तेव्हा नास्तिक व अस्तिक यांच्यात जीवनव्यवहारात भेद असण्याचे कारण नाही व मला तरी तसा प्रसंग आलेला माझ्या दापोलीतील वास्तव्यात गेल्या पंचवीस वर्षांत आठवत नाही. मी विद्यार्थ्यांच्या भावना न दुखावता त्यांना नास्तिकतेच्या गोष्टी सांगत असतो.
माझ्या सर्वेक्षणात एकही निरीश्वरवादी व्यसनांमुळे उद्ध्वस्त झालेला आढळलेला नाही. तसेच, माझ्यासकट आम्ही सर्व नास्तिकही रसिक, साहित्य-कलाप्रेमी असल्याने वैफल्यग्रस्त झालो नाही. मी आरोग्यदक्षही राहिलो. गंमत म्हणजे लॉकडाऊनच्या कठीण काळात मला प्रामुख्याने माझ्या देवभक्त, श्रद्धाळू मित्रांनी आर्थिक धीर दिला !
दापोली तालुक्यात निरीश्वरवादी महिला या अपवादात्मक पातळीवर दिसतात. येथील महिला निरीश्वरवाद व स्वतंत्र विद्रोही विचार याकडे वळत नाहीत किंवा वळल्या तरी थेट व्यक्त होत नाहीत. स्थानिक संस्कृती, कौंटुबिकता, रुढी यांचेच संस्कार महिलांवर ग्रामीण व तालुका पातळीवर प्रामुख्याने होतात. त्यांच्या तुलनेत पुरुष वर्ग एकमेकांच्या कमीजास्त संपर्कात राहून निरीश्वरवादच नव्हे, तर एकूण सामाजिक विषय चर्चेसाठी घेत असतात.
निरीश्वरवादी व्यक्ती दापोली तालुक्यात इतिहासकाळातही होत्या. मात्र त्या दापोलीत, कोकणात राहिल्या नाहीत, स्थलांतरित झाल्या. शिवाय, त्यांना लेखक वगैरे बनण्याचे नसल्यामुळे विशेष अभिव्यक्तीची गरजही भासली नाही. ‘देव दानवा नरे निर्मिले’ म्हणणाऱ्या कवी केशवसुतांचे नाव दापोलीशी जोडले जाते. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही प्रखर बुद्धिवादी राहिली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कर्वे मंडळी दापोली तालुक्यातील मुरुडची. ‘समाजस्वास्थ्य’कार र.धों. कर्वे निरिश्वरवादी सुधारक म्हणूनही अभ्यासकांना आदरणीय वाटतात. हा बुद्धिवादी वारसा त्यांच्याकडे त्यांचे वडील महर्षी कर्वे यांच्याकडून आला.
कोकणातील या नास्तिकांचा पूजा-प्रार्थना-उपवास-व्रतवैकल्य- उत्सव यांवर खर्च; पारंपरिक रूढीप्रथा यांत सहभाग नसल्यामुळे आपोआपच कमी होतो. तसा सहभाग नसल्यामुळे एक प्रकारची अलिप्तताही त्यांच्या जीवनात आली आहे. मात्र त्यामुळे त्यांचे काही ‘वाईट’ झाले अशी वस्तुस्थिती नाही. संकटे सर्वांच्या जीवनात येत-जात असतात. मिलिंद सकपाळसारखी काही मंडळी अलिप्त वाटली तरी त्यांचे वाचन-चिंतन बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून सुरूच असते असे मला दिसते. स्मिता जोशी या ज्येष्ठ नागरिक असलेल्या समाज कार्यकर्त्या वयाची नव्वदी पार झाली तरी निरीश्वरवादी भूमिकेवर ठाम राहिल्या आहेत. पूर्वी दापोली तालुक्यात गव्हे येथे दीर्घकाळ वास्तव्य असलेले स्मृतिशेष डॉक्टर दत्तात्रय ताम्हणकर हे हौशी लेखकही होते. ते त्यांची प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका गप्पांच्या ओघात मांडत असत. ते म्हणत, की “निसर्गयंत्रणा, निसर्गनियम यांत कोणी परमेश्वर बघत असेल तर ते फार विसंगत नाही, पण कर्मकांडातून त्याला वश करणे, अवलंबून राहणे हे विज्ञानात येत नाही.”
पुढील पिढीकडे नास्तिकतेचा वारसा आपोआप जाऊ शकतो- कारण घरात असे बुद्धिवादी वातावरण असते. त्या बाबतीत विद्यालंकार घारपुरे यांचा मुलगा पार्थ पूर्णपणे निरीश्वरवादी भूमिकेकडे झुकला आहे. सुनील प्रधान आता पुण्यात असले तरी त्यांचा निरीश्वरवाद लक्षात घेता, त्यांची पुढील पिढीही किमान अंधश्रद्धाविरोधी झाली.
मी माझे जीवन गेली चाळीस वर्षे निरीश्वरवादी भूमिकेतून, कोणतेही कर्मकांड न करता जगलो. माझी नास्तिकता माझ्या वृत्तपत्र लेखनातून अनेकदा डोकावत असते. मी कोणत्याही शिष्याच्या बाबतीत ‘तुलाही नास्तिक बनवतो’ असे केलेले नाही. तशी गरजही वाटली नाही. मात्र माझ्या सहवासात आलेले काही कॉलेज विद्यार्थी त्यांच्या बुद्धिवादी भूमिकेवर माझ्यामुळे अधिक ठाम झाले. मी मुंबईत लहानाचा मोठा झालो व तेथे अगदी शेजारीच (गोरेगावला) समाजवादी आमदार मृणाल गोरे राहत असत. त्या नास्तिक होत्या. ‘मी नास्तिक का आहे?’ (लेखक – क्रांतिवीर भगतसिंग) यांसारख्या पुस्तकांचा प्रभाव तरुण वयात माझ्यावर पडला. लोकांना माहीत नसलेले आमचे काही शिक्षक (उदाहरणार्थ दामोदर सामंत, द.गो. प्रभू) निरीश्वरवादी व समाजवादी होते. दापोलीत ‘मुक्त’ जीवनशैलीने जगत असताना, मला निरीश्वरवादी विचारसरणीचाच उपयोग व आधार झाला. तेव्हा माझे तत्त्वज्ञान माणसाने स्वयंप्रकाशित असले पाहिजे हे दापोलीत जगताना, शिकवताना राहिले आहे. ‘तुझा तू आहेस व प्रयत्नवादाने जे काही थोडे फार यश मिळेल ते खरे. अस्तित्वाच्या पल्याड काही नाही. शून्य अंधार आहे.’
सुखदेव काळे हे कृषी विद्यापीठ प्राध्यापक. त्यांचा उल्लेख लेखाच्या अखेरीस करतो. ते ठामपणे नास्तिक आहेत. त्यांचे वडील डाव्या विचारसरणीचे होते. तो संस्कार व वाचन-व्यासंग, आगरकर यांच्यासारख्या सुधारकांच्या विचारांचा प्रभाव काळेसरांवर आहे. त्यांच्यासारख्या प्रखर व्यक्ती पाहिल्या की वाटते, दापोली नास्तिकांचीही आहे.
– माधव गवाणकर 9765336408
—————————————————————————————————————————————–
Hello All ,
I was born in Dapoli , therefore I read anything and everything concerning Dapoli .
I had also attended Kokan Marathi Sahitya Sammelan in Dapoli .
My Great Grand Father ( Karandikar ) was several years
Teacher in Alfred Gadney Highschool ( AG Highschool ).
He used to teach Marathi to Spanish Fathers !
My Grand Father served several years as Post Master
in Dapoli .
Dapoli is known as Mahabaleshwar in Kokan because of its weather and nature. British Officers used to stay in Dapoli in several seasons and they named the region as
Camp Dapoli ( Kap Dapoli in local language )