नाशिकचे योग विद्या धाम

0
430

बाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ व ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात…

बाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे एकशेएकोणसाठ शहरांत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथे बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात.

मंडलिक हे साधकांमध्ये गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी योगविषयक पन्नास पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन केले आहे. त्यांनी महाराष्ट्रभर दीडशे शहरांत योग विद्या धामच्या शाखांची स्थापना केली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या योग कार्याची धुरा वाहण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची निर्मिती, त्यात नवनवीन कार्यकर्त्यांची भर घालणे, योग प्रचार व प्रसार यांतील उद्बोधन आणि संकल्प अशा अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळणे हे होय.

बिहार स्कूल ऑफ योगाचे परमाचार्य स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी विश्वास मंडलिक यांना ऋषी परंपरेची दीक्षा देऊन ‘ऋषी धर्मज्योती’ असे नाव प्रदान केले आहे. त्यांनी दूरशिक्षण तंत्र या विषयात ‘डॉक्टरेट’ ही पदवी वयाच्या सत्तराव्या वर्षी मार्च 2014 मध्ये मिळवली आहे. भारत सरकारने मंडलिक यांना विश्व योग दिनाच्या दिवशी योग क्षेत्रातील एकमेव व प्रथम ‘पंतप्रधान पुरस्कार’ 2018 साली देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे.

मंडलिक यांनी योग शिकण्यासाठी योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित व योग रत्न असा श्रेणीबद्ध अभ्यासक्रम तयार केला आहे. तो शिकवण्यासाठी योग शिक्षक, योग अध्यापक, योग प्राध्यापक अशी श्रेणी तयार करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त आहे. सर्व वर्गांच्या परीक्षा घेतल्या जातात. उत्तीर्ण होणाऱ्यांना आयुष मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येते. योग वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतले जातात.

उपचारात्मक शिबिरे व वर्ग हे संस्थेकडून चालवले जातात. त्यामध्ये उच्च रक्तदाब निवारण, मधुमेह निवारण, हृदयरोग निवारण, स्थूलता निवारण, पाठदुखी निवारण, व्यसनमुक्ती शिबिर, प्रसूतीपूर्व योगाभ्यास असे वर्ग घेतले जातात. त्याशिवाय प्राणायाम वर्ग, ध्यान वर्ग, योगनिद्रा वर्ग, प्रणवजप वर्ग, उंची संवर्धन वर्ग, सूर्यनमस्कार वर्ग असे वर्गही घेतले जातात.

योगाबरोबर निसर्गजीवन आणि निसर्गोपचार यांची सांगड घालून योग व निसर्गोपचार रुग्णालय नाशिक परिसरात सुरू केले आहे. योग व निसर्गोपचार केंद्रे डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, अहमदनगरजळगावकोल्हापूर येथे चालवली जातात. तसेच, नाशिकच्या पाच योग शिक्षकांनी महाराष्ट्राबाहेर गुवाहाटी, तीनसुकिया, धरम, दुबुडी, दिब्रुगड या ठिकाणी नियमित उपचार केंद्रे चालू केली आहेत. आंध्र प्रदेशात (तेलंगणा) हैदराबादजवळ निझामाबाद शहरातही योग व निसर्गोपचार केंद्र चालवले जात आहे. योग प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून योग कीर्तन, जाहीर योगासन प्रात्यक्षिके, योग गीते, योग नाट्य, योग नृत्य असे सादर केले जातात. संस्थेचे कार्य परदेशातही चालते. एकशेपंधरा देशांतील पाच हजार परदेशी नागरिकांनी गुरुकुलमध्ये येऊन योग शिक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. गुरुकुलची केंद्रे सोळा देशांमध्ये असून तेथे गुरुकुलचे वर्ग घेतले जातात.

योग विद्या गुरुकुलचे मुखपत्र ‘योग सुगंध’ हे मासिक होय. ते 1979 सालापासून सुरू आहे. त्याचे सुमारे साडेसहा हजार वाचक आहेत. गुरुकुलात योग संमेलन 2007 सालापासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरवले जाते. त्यावेळी सुमारे पाचशे साधक उपस्थित असतात. त्यावेळी त्र्यंबकेश्वरातील आसपासची खेडी व आदिवासी पाडे यांमध्ये गरजेच्या वस्तू, वैद्यकीय सुविधा पुरवणे अशा प्रकारचे सेवाकार्यही केले जाते.

संस्थेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – प्रमोद निफाडकर 9420484003, शरद पारगावकर 9420484021

– स्मिता विनायक वैद्य, 9960052070 smitav1497@gmail.com

—————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here