नाव कळलं तर झाडच गेलं !
– प्रकाश पेठे
वसंत ऋतु सुरू आहे. खूप वर्षांपूर्वी मी वडोद-यातल्या झाडांचा सर्व्हे केला होता. एकशे अठ्ठावीस प्रकारच्या झाडांची छायाचित्रं काढून, त्याचा जाडजूड अल्बम बनवून नगरपालिकेला भेट दिला होता. त्यातल्या दोन झाडांची नावं कळली नव्हती. ती कोणाला माहीत नव्हती. त्यातलं एक निनावी झाड बसस्टॉपवर रोज दिसायचं. त्याला खरबूजाएवढं मोठं फळ येतं. मी पुढे प्रवासात कोलकात्याच्या नॅशनल लायब्ररीच्या नव्या इमारतीशेजारी ते झाड पाहिलं. तिथेही त्याचं नाव कोणाला माहीत नव्हतं. रस्ता रुंद करताना ते उखडलं गेलं. नंतर बसस्टॉपवर उभा राहिलो तरी चैन पडेना. रस्ता रूंदीकरणात तोडल्या गेलेल्या झाडांसंबंधी एकाशी हळहळ व्यक्त करत होतो, तेव्हा तो म्हणाला, माझंही त्या ‘बेगर्स बाऊल’ कडे लक्ष असायचं. ते कापलं गेलं, यार! अचानक, मला त्या झाडाचं नाव कळलं. पण नाव कळलं तर झाडंच गेलं!
फुलझाडाचं नाव कळल्याशिवाय चैन पडत नाही. सुदर्शन चक्रासारखा आकार धारण करणारी पांढरी गोलाकार फुलं सार्वजनिक बागेत एकदाच पाहिली. त्यानंतर पुन्हा ती दिसली नाहीत. दोन तीन माळ्यांना विचारलं, पण त्यांनाही नाव माहीत नव्हतं. ते नुसतं ‘सिझनल फ्लॉवर’ आहे असं म्हणाले.
मुंबईहून दिल्लीला जाताना प्रवासात एकदा लाल रंगानं फुललेला पळस दिसला होता. त्याचे ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ हे नाव सार्थ आहे. त्याची मजा इतर झाडांत तो उठून दिसतो तेव्हाच येते.
कदंबाला टेनिस किंवा पिंगपाँगच्या चेंडूच्या आकाराची फुलं पावसाळ्यात येतात. ती फुलं पाहत बसावसं वाटतं. कोकणात बकुळीच्या फुलांचे गजरे मिळतात. आम्ही सावंतवाडी-आंबोलीला गेलो असताना पत्नीनं ते गजरे घेण्याची हौस करुन घेतली. माहेरी तिच्या घरोसमोर एक मोठा बकुळ वृक्ष होता. ती माहेर सोडून आली. आमचं स्वत:चं घर वडोद-याला झाल्यावर, घरासमोर तिच्या माहेरची आठवण म्हणून बकुळ लावली, तिनं चांगला आकार घेतला आहे. पावसाळ्यात ती छोट्या छोट्या फुलांचा सडा टाकते.
वसंत ऋतूत अमलताशची हिरवी पानं नाहीशी होऊन सोनपिवळ्या फुलांचे घोस लटकू लागतात.या झाडाकडे कोणाचंही दुर्लक्ष होऊ शकत नाही. तसाच गुलमोहर. तोही आम्ही दारापुढे लावला होता. आपल्यासारख्या, महानगरात राहणा-यांच्या डोक्यात एक ना हजार विषय असतात. बुद्धिजीवींना स्वत:च्या आणि इतर विवंचना एकाच वेळी सतावत असतात. पण अमलताशाकडे पाहिलं की सगळं विसरायला होतं. मानवनिर्मित भ्रष्टाकारांपेक्षा निसर्गाची रंगाची उधळण सगळं विसरायला लावते.
प्रकाश पेठे
ईमेल : prakashpethe@gmail.com
भ्रमणध्वनी : 9427786823