नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती

0
62
carasole

‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच देतात. “आमच्या आवर्तनाने एकादशणीची पूर्तता होते, त्याप्रमाणे ह्या माझ्या अकराव्या ग्रंथपुष्पाने लेखनार्चनाची परिसमाप्ती होत आहे. त्यातही हे शेंडेपुष्प निखिल जगाचे पाप धुऊन टाकणा-या गंगा-यमुनांसारख्या पवित्र नद्यांवर पडत आहे ही संदहोकुल मनाला क्षणभर समाधान देणारी गोष्ट आहे.”

चापेकरांनी तो प्रवास नेपाळ, गंगोत्री-जन्मोत्री व केदारनाथ-बद्रिनाथ अशा पाच ठिकाणी केला. केदारनाथ व बद्रिनाथ ही यात्रा १४.५.३९ ते १७.६.३९ या काळात केली, त्यांचा नेपाळदर्शन ५ .३.४१ ते ३०.३.४१ व गंगोत्री-जन्मोत्री हा प्रवास १.५.४१ ते ३.६.४१ या काळात झाला. ते प्रवासवर्णन (अंदाजे) नोव्हेंबर ४१ मध्ये प्रसिद्ध झाले. म्हणजे पहिला प्रवास व त्याच्या वर्णनाची प्रसिद्धी यांत सुमारे अडीच वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यामुळे प्रवासवर्णनातील स्पष्टता, सत्यता कमी झालेली नाही, कारण चापेकरांनी सर्व ठिकाणच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या होत्या.

प्रवासवर्णनात प्रवास करताना आलेल्या अडचणी सोयी- निसर्गसौंदर्य-खाणेपिणे-खर्च यांचे तपशील साधारणपणे खूप येतात. कोठे कोठे, लेखकाला ‘दिसलेले’ लोक व ‘जाणवलेली’ समाजाची अवस्था प्रकट होते. पण कोठेकोठेच. चापेकरांनी स्वत: प्रवास करताना ‘नानाश्चर्य निरीक्षण’ हा प्रवासाचा हेतू असला पाहिजे असे म्हटले आहे. “तथापि प्रवाशाने सामान्यत: कोणकोणत्या गोष्टीचे निरीक्षण करावे हे सांगणे अप्रस्तुत होणार नाही. माझ्या मते, स्थळांची भौगोलिक स्थिती-हवामान, पर्जन्य; वृक्ष, पशू, पक्षी, घरांची बांधणी, स्त्री-पुरुषांचे चेहरे (डोळे, नाक, रंग), पोशाख, अलंकार, भाषा, आचार, धर्म, देवळे, शासनपद्धती, पंचांग अथवा कालगणना, उद्योगधंदे, सामाजिक चालीरीती, शासनपद्धती इतक्या गोष्टींची नोंद सुशिक्षित प्रवाशांनी त्यांच्या ग्रंथांत करणे जरुरी आहे” असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रस्तावना-पृष्ठ ३)

चापेकरांनी त्यांच्या या मताचा पूर्ण आविष्कार प्रस्तुतच्या प्रवासवर्णनात दाखवला आहे. मात्र त्यांनी त्यांचे मत ठामपणे मांडत असताना त्यांच्या स्वत:च्या लेखनाच्या मर्यादाही मोकळेपणाने मान्य केल्या आहेत.

“देखणी जनावरे, वैविध्यपूर्ण सुंदर वृक्षवल्ली, विशाल प्रस्तर आणि कष्टाळू, कणखर पण गोंडस, सुजाण व उमदा जनसमूह. त्यांचे चित्ताकर्षक चित्र उभारण्याचे कौशल्य नसलेले पाहणारी कवीची दृष्टी माझ्याकडे नाही. लोकांनी गंगेच्या पात्रात शौचविधी मारुन सर्वत्र करून ठेवलेला हिडीसपणाच मला दिसतो. आकाशातील तारे मला तारेच दिसतील.” (प्रस्तावना)

स्वत:ची मते व स्वत:च्या मर्यादा स्पष्टपणे मांडल्यावर (मर्यादा जाणवल्यामुळे मते बनली की मते पक्की असल्यामुळे मर्यादा ओलांडण्याचा मान केला नाही.) पुस्तकात वाचण्यास काय मिळेल त्याची कल्पना वाचकाला काही अंशी येते.

पण चापेकरांनी स्वत:च्याच चौकटीच्या पलीकडे जाऊन नेपाळच्या प्रवासात मराठी सत्तेच्या शेवटच्या प्रतिनिधीसंबंधी-नानासाहेब पेशव्यांसंबंधी बरीच माहिती गोळा केली व ती पहिल्या प्रकरणाच्या-‘नेपाळ’ या पाचव्या परिशिष्टात दिली आहे.

ते त्या प्रकरणात प्रथम नेपाळची माहिती देतात- म्हणजे भौगोलिक सीमा वगैरे. मग तत्कालीन नेपाळ राजवंशाची, गादीवारशाची नियमावली, प्रधानकीचा वारसा. मग नेपाळी चलन-सोने-तांबे-चांदी! यांची नाणी, त्यांची मूल्ये व वजनमाप पद्धती. जमीन जंगल कोणत्या प्रकारची झाडे अशी भौगौलिक व व्यावहारिक माहिती दिल्यावर ते नेपाळच्या इतिहासासंबंधी दोन वाक्ये लिहितात.

“तिबेट व नेपाळ ह्या दोन देशांचे युद्ध जुंपून अखेरीस चैत्र शके३ संवत १९१२ (इसवी सन १८५६) ह्या दिवशी तह झाला. तिबेट सरकारने गुरखा (नेपाळ) सरकारास दरसाल १०,००० रु द्यावे असे त्या तहात ठरले. ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे तहाच्या पहिल्याच कलमाने दोन्ही राष्ट्रांनी चिनी बादशहाचा मान राखून त्याच्या आज्ञेत पू्र्ववत वागण्याचे कबूल केले आहे. (असे असून इंग्रजांचीच बूज नेपाळात अधिक राखली जात आहे!) ह्या तहाला साक्षीदार परमेश्वर आहे.” (पृष्ठ २१)

मात्र इतिहास पूर्ण सांगणे हे चापेकरांना प्रवासवर्णनात मान्य नसावे. त्यामुळे १८५६ साली चिनी बादशहाच्या आज्ञेत राहणारे नेपाळ हे इंग्रजांच्या अधीन केव्हा झाले ते माहीत नसलेल्यांना डिसेंबर २३ च्या स्वातंत्र्याचा बोध होत नाही.

चापेकरांनी नेपाळच्या समाजस्थितीचे वर्णन सविस्तर केले आहे. त्यासंबंधी पाच पाने मजकूर आहे. त्यामतील काही माहिती मनोरंजक आहे; तशीच, विचार करण्यास लावणारी देखील आहे.-

“नेपाळच्या ब्राह्मणांनी परधर्मींयांना हिंदूंत घेऊन त्यास वैश्यवर्ण दिला असा बोलवा आहे.” (पृष्ठ २१), “सर्व ब्राह्मण मांसाहारी आहेत. ब्राह्मण क्षत्रियांकडे जाऊन वेदोक्त श्राद्ध करतो.” (पृष्ठ २०), “जिच्या हातचे अन्न चालते तीच स्त्री लग्नाची बायको होऊ शकते. तथापि अनुक्रमे विवाह रुढ असल्यामुळे निरनिराळ्या वर्णांच्या बायका करता येतात.”(पृष्ठ २३), “हिंदूला बाटवणा-या मुसलमानाला बारा वर्षांची कैद कायद्याने फर्मावली आहे. हिंदू तेथे कधीच बाटत नाही. बाटवलेला हिंदू कामी जातीत जातो. कामी ही हिंदूंची शेवटची जात होय.” (पृष्ठ २७), “नेपाळात विधवेचे केशवपन होत नाही.” (पृष्ठ २६) अशी विधाने वाचली, की भारतात रुढींनी स्त्रियांवर किती अन्याय केला आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते.

चापेकरांनी नेपाळची कालगणना व रोप-वे ने माल वाहून नेण्याची पद्धत याबाबत तपशीलवार उल्लेख केल्यावर नेपाळी भाषेसंबंधी काही उद्बोधक माहिती दिली आहे.

“गुजराथी, हिंदी, पंजाबी, सिंधी वगैरे भाषांचे परिणाम नेपाळी भाषेवर झालेले दिसतात… कोशकारांच्या मते पाच हजार नेपाळी शब्द संस्कृतोद्भव आहेत; तसेच, तीन हजारांहून अधिक नेपाळी शब्दांचे मराठी भाषेशी साम्य आहे.” (पृष्ठ३२)

नेपाळीतील काही शब्दांचे अर्थ –

राँडो-विधुर, बाछा- गो-हा, घरपट्टी (गृहपात) – यजमान ठूलो () स्थूल- मोठा

चापेकरांनी नानासाहेब पेशव्यांच्या अखेरच्या दिवसांचा शोध पाचव्या परिशिष्टात घेऊन त्यांचे काही निष्कर्ष मांडले आहेत. त्याचबरोबर, चापेकर नानासाहेबांच्या कुटुंबीयांची माहिती, त्यांचे जडजवाहीर, त्यांनी बांधलेले मंदिर, पेशव्यांच्या वाड्याचा नकाशा आणि सध्याचे (पृष्ठ१९४) मंदिर व त्याचा परिसर ह्यांची माहिती विश्वसनीय पुराव्यांसह देतात. ते नानासाहेब पेशव्यांच्या संबंधाने इंग्रजांनी केलेल्या लेखनातील चुकाही दाखवतात.

लक्ष्मी नारायणाचे मंदिर व मूर्ती यांची दोन छायाचित्रे पुस्तकात आहेत. नेपाळ प्रकरणाचा शेवट एका शिलालेखाने होतो. तो संस्कृत भाषेतील (३२ कडवी) गिरीराज भाषा आणि शेवट मराठीत सारांश असा दिला आहे. त्या सारांशात मूर्तीची स्थापना कधी-कोणी केली, मूर्तीचा दगड कोठून आणला, पुजारी कोण होते. प्रतिष्ठापना कोणत्या पुरोहिताने केली, मंदिराचा परिसर वगैरे तपशील आहे.

तसाच, प्रवासवर्णनातील अभ्यासाचा पवित्रा काहीसा पुढेही दिसतो. ते गंगोत्री-जन्मोत्रीच्या वर्णनाच्या सुरुवातीस एक नकाशा देतात. परिशिष्टात टेहरी संस्थानची विस्तृत भौगोलिक, आर्थिक व प्रशासकीय माहिती दिलेली आहे. तिस-या परिशिष्टात सामाजिक चालीरीती वर्णिल्या आहेत. तेथील ‘पांडवी विवाह’ ही प्रथा पाहा- “टेहरी संस्थानात जंवसार नावाचा विभाग आहे. तेथे सर्व भावांमध्ये एक बायको करण्याची पद्धत अद्याप चालू आहे. लग्न वडील भावाबरोबर होते. पतींच्या वडिलकींच्या क्रमाने पत्नी तिच्या पतींची रात्री भेट घेते. पहिले मूल वडील भावाचे, दुसरे त्याच्या खालच्याचे अशी मुलांची वाटणी होते. एक पती मयत झाला असता स्त्रीला विधवा राहण्याचे कारण नाही, ते सांगायला नकोच. भावांमध्ये वाटप झाल्यास बायको कोणाच्या तरी एकाच्या वाटणीला जाते.” (पृष्ठ ६९)

“दोन चालीरीतींतील विरोधाभास कसा दिसतो ते बघू. मुली विकत घेण्याची चाल गढवालप्रांती अद्यापी आहे. मुलगी विकत घेतल्यावर तिचे लग्न स्वत:शी, मुलाशी किंवा दुस-या कोणा नातेवाईकाबरोबर लावून देतात. म्हणजे स्त्रीला स्वांतत्र्य नाही. ती पूर्णत: क्रय-विक्रयाची वस्तू झाली. परंतु त्याच वेळेला स्त्रीचा काडीमोडाचा हक्क सर्व जातींत मान्य झाला आहे. ब्राह्मण जातही त्याला अपवाद नाही ही गोष्ट विशेष आहे. काडीमोडाला टेहरी संस्थानात छूट हा शब्द आहे. छूट मिळालेल्या स्त्रीला पुनर्विवाह करता येतो.” (पृष्ठ ६९) हक्क व पारंतत्र्य एकाच वेळी कसे नांदत होते? चापेकरांचा उद्देश फक्त त्यांची निरीक्षणे मांडण्याचा आहे. त्यामुळे ते त्यावर काही भाष्य करत नाहीत. पण तसे म्हणावे तर पुढे मात्र ते दोन अनुकरणीय कायद्यांची माहिती देतात.

“टेहरी संस्थानात दोन उपयुक्त कायदे अमलात असल्याचे तेथील हायकोर्ट जज्जांक़ड़ून समजले. संवत १९८८ साली (शालिवहन शके १८५३, सन १९३१) साठ वर्षांवरील पुरुषाने विधवेशी अथवा सोळा वर्षांवरील कुमारिकेबरोबरच लग्न लावले पाहिजे असा कायदा झाला. उल्लघंन करणार्यासस दोनशे रुपये दंड अथवा एक महिन्याची साधी कैद कायद्याने सांगितली आहे.”

“दुसरा कायदा संवत १९९५ (शालिवाहन शके. १८६०- इसवी सन १९३८) साली झाला आहे. त्या कायद्यामुळे कोणत्याही ऋणकोला हप्तेबंदीची फिर्याद करता येते. मला अमुक कर्ज आहे व माझी मिळकत अमुक आहे. सर्व कर्ज मला एकदम मिळणे शक्य नाही. करता, मला हप्ते ठरवून कर्ज फेडण्याचा हुकूम व्हावा असे वादीला फिर्यादीत मागणे करावे लागते. ह्या दाव्याला सर्व धनको प्रतिवादी असतात. (पृष्ठ ७१)

चापेकरांच्या तटस्थ नोंदणीकार या भूमिकेला येथे धक्का बसतो.

पुस्तकाचा तिसरा भाग केदारनाथ-बद्रिनाथ या प्रवासांसंबंधी आहे. ते प्रवासाच्या नकाशाबरोबर प्रत्येक दिवशी किती प्रवास केला, मुक्काम कोठे केला, प्रवासखर्च किती झाला असे तपशील सुरुवातीसच देतात. त्यांनी बघितलेले सारे नोंदींच्या रूपाने येते – १ ते २४ असे आकडे घालून. त्यानंतर ते मंदिरांची वर्णने, इतिहास, पुन्हा एकदा प्रशासकीय व्यवस्था, गढवाली भाषा इत्यादी अनेक प्रकारची माहिती देतात.

विवाहबाह्य संबंध त्या काळात समाजाने (गढवाल येथे) किती मान्य केले होते त्याची माहिती चमेलीच्या मॅजिस्ट्रेटच्या एका निवाड्यातील मजकुरावरून दिली आहे.

“ह्या चालीला धंता-धंतीची चाल म्हणतात. धंती म्हणजे ठेवलेली स्त्री आणि धंत म्हणजे जार अथवा स्त्रीने ठेवलेला पुरुष. विधवा एखादा पुरुष बाळगून असतात. अशा पुरुषांना तेकूवा (Tek was) म्हणतात. तशा संबंधापासून झालेली अधर्मज संतती समाजात राजरोसपणे समाविष्ट होते. त्या संततीला कोणतीही अडचण येत नाही. समाज त्या संततीला कमी लेखत नाही. बद्रिनारायणाच्या रावळाचा (पुजा-याचा) अधर्मज पुत्र शिष्टपणाने समाजात वावरतो हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. हे गृहस्थ वकील आहेत. त्यांची ओळख करून देणा-या माणसाने काढले’’ (पृष्ठ ८६)

चापेकर औंधचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंत यांच्या परिवारासोबत गंगोत्रीला गेले होते. जवळजवळ पंचेचाळीस जण त्या यात्रेत होते. त्यात राजकुटुंबातील व्यक्तींबरोबर इतर अनेक मंडळी होती. त्यात काही सुशिक्षित व व्यावसायिकही होते. “एका मुक्कामात नृसिंहजयंतीचा दिवस आला. तेव्हा त्या समुहातील प्रतिष्ठितांनी भाषणे केली. त्या दिवशी नरसिंह जयंती व थोरले बाजीरावांची पुण्यतिथी असल्यामुळे ते दोन्ही प्रसंग आम्ही पुण्याच्या टिळक मंदिरात बोलत आहे अशा दिमाखाने समर्पक भाषणे करून यथोचित पार पाडले.” (पृष्ठ ५८)

रुढ प्रवासवर्णनांपेक्षा वेगळे व तरीही उद्बोधक असे हे पुस्तक आहे. मला उपलब्ध झालेल्या प्रतीत पृष्ठ ३ ते १४ ही नव्हती. मात्र एकंदरीत प्रभाव त्यामुळे कमी होत नाही.

छायाचित्रांच्या अगोदर एक सूची आहे. त्यात ती छायाचित्रे कोणी घेतली होती हेही नमुद केले आहे. नेपाळच्या प्रवासवर्णनातील एक व गंगोत्री-जन्मोत्री प्रवासातील चौदा अशी एकंदर पंधरा छायाचित्रे औंधचे राजे (तत्कालीन) पंत व त्यांच्या कुटु्ंबीयांनी घेतली होती.

– मुकुंद वझे

About Post Author