नामशेष होत असलेली लाकडी बैलगाडी

1
170
_Bailgadi_1.jpg

मी बैलगाडीचा जन्म कधी झाला ते सांगू शकत नाही. मात्र मी शेती करत असताना 1970 साली माझ्या वाडवडिलांपासून वापरात असलेली लाकडापासून, बनवलेली बैलगाडी नामशेष होत चालली आहे. शेतकरी बैलगाडी ग्रामीण भागात मालवाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी वापरत. विद्यमान बैलगाडी लाकडापासून न बनवता लोखंडापासून बनवली जाते. लोखंडी बैलगाडी ऊस वाहतुकीसाठी व शेतीकामासाठी वापरली जाते. बैलाच्या मानेवर असणारे जू मात्र अजूनही लाकडाचे आहे, तेव्ढीच एक खूण शिल्लक आहे, पण बैलगाडीचा प्रवासासाठी होणारा वापर जवळजवळ बंद पडला आहे.

शेतीची अनेक कामे बैलांच्या ताकदीच्या मदतीने केली जात. उदाहरणार्थ नांगरट, वखरणी इत्यादी. बैलगाडी ही बैलांच्या ताकदीद्वारा ओढली जाते. शेतकऱ्याच्या दावणीला बैल जास्त असतील तर तो शेतकरी श्रीमंत समजला जायचा. बैल हे शेतकर्‍यांचे वैभव समजले जायचे. बैलांच्या श्रमाबद्दल, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा बैलपोळा सण उत्साहाने साजरा केला जायचा. तो उत्साह यांत्रिकीकरणामुळे संपला आहे. पोळ्याला खर्‍या बैलांऐवजी मातीच्या प्रतिकृतीची पूजा करणे उरले आहे.

साधारणपणे, बैलगाडी ओढण्यासाठी दोन बैलांची आवश्यकता असते. बैलांच्या मानेवर जे लांब, आडवे, गुळगुळीत केलेले लाकूड असते त्याला जू म्हणतात. जुवाच्या दोन्ही टोकांला भोके पाडून टिपर्‍यासारखी दोन लाकडी दांडकी बसवतात, त्यांना शिवळा म्हणतात. शिवळा व बैलाची मान यांना बांधून ठेवणार्‍या सुती मफलरसारख्या पट्ट्याला जोते म्हणतात. जू हे लिंबाच्या झाडापासून बनवले जाते. लिंबाचे लाकूड उन्हामध्ये व घर्षणाने गरम होत नाही, फाटळत नाही व टिकाऊ असते.

जुवापासून मधोमध सुरूवात होऊन बैलगाडीखाली आखरी पेटीपर्यंत जाणारी दोन लांब सारखी चौकोनी लाकडे असतात, त्यांना धुर्‍या किंवा धुरीजोड म्हणतात. त्या तिवसाच्या लाकडाच्या असतात. लाकूड चिवट, लवचीक व किड न लागणारे असते. बैलगाडी प्रवास करत असताना जी ‘व्हायब्रेशन्स’ तयार होतात ती ‘अॅबसॉर्ब’ करण्यासाठी धुर्‍या स्प्रिंगसारखे काम करतात. धुर्‍या बैलगाडी खाली असणार्‍या ज्या दोन आडव्या विशिष्ट आकार दिलेल्या लाकडी भागाला फिट करत त्यांतील वरच्या मोठ्या भागाला आख्री व लहान भागाला पेटी म्हणतात. दोन्हीला मिळून आखरीपेटी म्हणतात. आखरीपेटी, धुर्‍या एकसंध राहण्यासाठी दोन्ही बाजूंला आरपार लोखंडी सळई वापरतात. बैलाच्या मानेवरील जू, धुर्‍या व आखरीपेटी यांना एकत्रित बांधून ठेवण्यासाठी सुताचा जाड दोरखंड वापरतात, त्याला नाडा किंवा साकण म्हणतात. तो विशिष्ट पद्धतीने बांधावा लागतो. बैलांच्या लांबीनुसार गाडी व जू यांतील अंतर अॅडजस्ट करण्यासाठी व बळकटी येण्यासाठी नाड्याचा उपयोग होतो.

पेटीमधे लोखंडी विशिष्ट आकाराचा घडीव किंवा कारखान्यात तयार झालेला आख ठेवतात. त्याच्या दोन्ही टोकांना बैलगाडीची मोठाली चाके अडकावतात. पेटीत असणारा भाग चौरस आकाराचा व पेटीबाहेरील भाग चाक फिरवण्यासाठी गोल केलेला असतो. आखाच्या दोन्ही टोकांना आरपार खाच असते. त्यात लोखंडी पट्टी टाकली जाते तिला कानखिळ म्हणतात. चाक निसटून निघू नये म्हणून त्याचा वापर करतात. कानखिळ निसटू नये म्हणून खालच्या टोकाला जी रिंग बसवतात तिला बाळी म्हणतात. गाडी चालताना आख व चाकातील घर्षण कमी व्हावे म्हणून ऑईलिंग करावे लागते. त्यासाठी शेतकरी वंगण म्हणून पूर्वी इंजिन ऑईलचे बदललेले खराब ऑईल वापरत, पुढे ट्रॅक्टरचे बदललेले खराब ऑईल वापरत. वंगण कायम बरोबर असावे म्हणून पोकळजोड बांबूची बाटली तयार करत. तिला नरोळी किंवा नळा म्हणतात. ती बैलगाडीला बांधत. त्यामध्ये लांब एक तार ठेवलेली असे. तिच्या एका टोकाला लांबट फडके बांधलेले असे. तिला वंगारी म्हणतात. वंगारीने चाकाला ऑईल देणे म्हणजे गाडी वंगणे असे म्हणतात. पुढील काळात नळा बरोबर नेण्याची प्रथा बंद झाली व शेतावरच पाच लिटरच्या टिनच्या ऑईलच्या डब्यात ठेवलेले काळे ऑईल वंगणासाठी वापरत, तार त्यातच ठेवली जाते. गाडी ‘स्टार्ट’ करण्याअगोदर गाडीवान गाडी वंगवून घेई. बैल जुंपणे म्हणजे गाडी गळा घालणे असे म्हणत.

बैलगाडीच्या चाकाची रचना पुढीलप्रमाणे असायची. आखाभोवती फिरणारे गोल लाकूड किंवा विशिष्ट आकाराचा ठोकळा असतो. त्याला नाई किंवा तुंबा म्हणतात. नाईमध्ये सलग लांब लोखंडी नळकांडे ठोकलेले असते, त्याला आंबवण म्हणतात. काही वेळा सलग नळकांड्याऐवजी फक्त बांगडीवजा (बुशिंगप्रमाणे) दोन तुकडे ठोकत. त्यांना विड्या म्हणतात. बैलगाडीला दोन मोठाली चाके असतात. त्याला चाकजोड म्हणतात. नाईला बाहेरच्या बाजूने स्पोकप्रमाणे लाकडाच्ये एकूण बारा आरी असतात. आर्‍यांना दुसर्‍या बाजूला सहा पाटे असतात, ते वक्राकार असल्याने सहा पाटे मिळून वर्तुळाकार चाक तयार होते. चाकाचे सर्व पार्ट्स खाचे तयार करून एकमेकांत घट्ट ठोकलेले असतात. कोठेही खिळे, स्क्रू, नटबोल्ट वापरले जात नाहीत. लाकडी चाकावर फिट बसणारी लोखंडी जी पट्टी असते तिला धाव म्हणतात. तिने चाकाला बळकटी येते व चाक एकसंध राहते. गाडी बनवण्याचे काम सुतार करत. त्यांना मिस्त्री म्हणत. त्यांना बैलगाडीमध्ये लोखंड वापरत असल्याने घिसाडी कामही करावे लागते.

लाकडाचे चाक तयार झाले, की ते जमिनीवर आडवे ठेवले जाते. नाईच्या जागी खड्डा केल्याने चाक सलग जमिनीला टेकते. शेजारीच लोखंडी धाव, चाकापेक्षा चार बोटे कमी करून रिंग करून ठेवली जाते. तिवग्यावर वर्तुळाकार गवर्‍या रचून त्या पेटवून धाव चांगली लालभडक होईपर्यंत तापवल्यावर ती लोखंडी चिमट्यांच्या साहाय्याने लाकडी चाकावर चढवतात व ताबडतोब त्यावर गार पाणी ओततात. त्या क्रियेला धाव चढवणे असे म्हणतात. ती तापल्यामुळे प्रसरण पावून चाकावर चढते व गार पाणी ओतल्यावर ती आकुंचन पावून चाकावर फिट बसते. धाव पुन्हा सहा महिने ते एक वर्षापर्यंत उतरत नाही. धाव ढिली झाली तर वरील पद्धतीने पुन्हा चढवली जाते. धाव चढवताना लगबगीने चालणारे मिस्त्रींचे कसब पाहायला लहानपणी खूप मजा यायची! ढिल्या झालेल्या धावेकडे जर दुर्लक्ष झाले तर कधी – कधी रस्त्याने बोजा घेऊन चालणार्‍या बैलगाडीची धाव निसटून जायची आणि आरे व पाटे मोडायचे. त्याला चाक चुरले असे म्हणतात. उन्हाळ्यात उष्णतेने धाव थोडी ढिली झाली असे वाटले तर तात्पुरता उपाय म्हणून धावेवर गार पाणी ओतायचे, म्हणजे लाकडी पाटे थोडे फुगायचे व धाव फिट बसायची.

बैलगाडीत बसण्यासाठी किंवा माल ठेवण्यासाठी जी ‘ट्रॅाली’ असते तिला साटी किंवा साडगे म्हणतात. साटीच्या खाली जी चौकट असते, त्यातील चाकावर येणार्‍या लांब ताशीव कोन लाकडांना साडभाई म्हणतात. पुढील व मागील आडव्या दोन लाकडांना तरशा म्हणतात. तरश्यांना समांतरमधल्या तीन लाकडांना करळ्या म्हणतात. बेस म्हणून त्यावर लाकडी फळ्या किंवा उभ्या चिरलेल्या बांबूच्या कामट्या ठोकत असत. साडभाईच्या दोन्ही बाजूंला विशिष्ट आकाराचे खुटले उभ्या स्थितीमधे ठोकलेले असतात. सात खुटल्यांची साटी लहान व नऊ खुटल्यांची मोठी असे गणित आहे. सर्व काम खाचा करून एकमेकांत फिट केलेले असते. खुटले एकसंध राहण्यासाठी आडव्या पटट्या ठोकत, काही शेतकरी त्या खुटल्यांना सलग पत्राही ठोकत, जेणे करून साटीला बळकटी येऊन आतील माल बाहेरच्या बाजूला सांडत नसे. सामान भरल्यावर दोराने गाडी आवळण्यासाठी खुटले हूकसारखे उपयोगी पडतात. त्यांचा वापर सामानाच्या पिशव्या अडकावण्यासाठीही खुंटीसारखा होतो. फक्त प्रवासी नेण्यासाठी ज्या बैलगाड्या तयार होत त्यांना टपासारखी सोय केली जात असे. अशा बैलगाड्या जुन्या चित्रपटांतून बघण्यास मिळतात. बसण्यासाठी आतमध्ये गादी टाकत. प्रवाशांना मांडी घालून बसल्या अवस्थेत प्रवास करावा लागे. लहान मुलांच्या पार्कमध्ये ‘फुलराणी’ म्हणून छोटी आगगाडी असते, सद्य काळात तशी एक बैलगाडी ठेवण्याची पाळी आलेली आहे.

बैलगाडीच्या ड्रायव्हरला गाडीवान म्हणत. त्याला गाडीवर चढण्यासाठी पुढच्या बाजूला जे आडवे लाकूड बांधलेले असते, त्याला लोट्या म्हणतात. त्यांचा वापर पायरीसारखा होतो. शिवाय, बैल मागे सरकला तर त्यालाही अटकाव होऊन तो चाकाला घासत नाही. धुर्‍यांच्या मध्ये; तसेच, एक लाकूड नाडा आवळण्यास मदत म्हणून बांधतात. त्याला डोमाळे म्हणतात. धुर्‍यांच्या पुढील टोकाच्या बाजूला जुवाखाली जे छोटे लाकूड उभे बांधतात, त्याला शिपाई म्हणतात. गाडी ‘पार्क’ करताना जमिनीवर टेकवताना त्याचा उपयोग होतो.

बैल कोवळ्या पण योग्य वयात आल्यानंतर पुढे त्याला शेतीकामासाठी वापरायचा असल्याने त्याला वेसण घालायचे छोटे ऑपरेशन करावे लागते. दाभणाच्या साहाय्याने त्याच्या दोन्ही नाकपुड्यांमध्ये एक भोक पाडतात. त्यातून बारीक दोरी ओवून ती दोन्ही शिंगांमध्ये डोक्यावर बांधतात. कालांतराने, दोरीची साईज जाड करत, वेसण बदलत जातात. सर्वात शेवटी बोटभर जाडीची सुती वेसण घालतात. त्या वेसणीवर बैल नियंत्रणात राहतो. बैलाचे चित्त वयात आल्यानंतर प्रजननाकडे जाऊ नये यासाठी बैलाला नपुंसक करण्यासाठी व्हेटर्नरी डॅाक्टरांकडून बैलाचे छोटे ऑपरेशन करतात. बैलाला जमिनीवर खाली पाडून त्याचे पाय बांधून त्याच्या वृषणाच्या दोन्ही नसा विशिष्ट आकाराच्या चिमट्याद्वारे दाबून टाकतात. छोटीशी जखम होते, ती लगेच काही दिवसांत भरून येते. त्या बैलाची तब्येत ऑपरेशननंतर आणखी सुधारते व तो शेतीकाम करण्यासाठी तयार होतो. बैल चिमटवणे असा शब्दप्रयोग त्यासाठी वापरतात.

बैलाच्या डोक्यावर लांब सुती किंवा केकताडाचे दावे वेसणीला बांधलेले असते. त्याच्या साहाय्याने बैल खुंट्याला बांधतात. गाडीवान ज्या दोरीच्या सहाय्याने बैल नियंत्रित करतो त्याला कासरा म्हणतात. केकताड म्हणजे घायपात. उजव्या बैलाचा कासरा ओढला, की तो उजवीकडे वळतो, त्याचप्रमाणे डाव्या बैलाचा कासरा ओढला, की तो डावीकडे वळतो. दोन्ही कासरे एकदम ओढणे म्हणजे ब्रेक लावणे. बैल जागीच थांबतात. औतासाठी किंवा बैलगाडीसाठी बैलाला आधी ट्रेनिंग द्यावे लागते. नव्या बैलाला जुन्या अनुभवी बैलाबरोबर आधे जुंपून काही दिवस त्याला शिकवावे लागते. कालांतराने, गाडीवानाचे इशारे त्याला समजू लागतात. चाबूक पाठीवर पडला किंवा त्याची शेपूट पिरगाळली की त्याला गती वाढवण्याची सूचना मिळते. बैलांना नेहमीचा रस्ता इतका पाठ होतो, की ते बैलगाडी नियंत्रण न करताही वस्तीवर आणून उभी करतात.

गाडीवानाच्या हातात भरीव वेळूची काठी असते. तिच्या एका टोकाला चामड्याची वेणीसदृश दोरी बांधलेली असते. दोरीच्या दुसर्‍या टोकाला चामड्याची लांबट पट्टी असते, तिला वादी म्हणतात. त्या सगळ्याचा मिळून चाबूक तयार होतो.

पूर्वी बैलगाड्या तिवसाच्या किंवा सागवानी लाकडाच्या बनवत असत. पुढे तिवस व सागवान दुर्मीळ होऊन महाग झाल्याने धुर्‍या व जू सोडून बाकी सर्व बैलगाडी बाभळीच्या लाकडापासून बनवली जाऊ लागली. बाभूळ ही तिवस किंवा सागवान यांच्यापेक्षा कमी दर्ज्याची आहे. बैलगाडी बनवणारे तज्ञ कारागीर गावोगावी उपलब्ध होते. बैलगाडी हातानेच काम करून बनवावी लागत असल्याने ती तयार होण्याला वेळ बराच लागत असे आणि कष्टही भरपूर करावे लागत. नटबोल्ट, स्क्रू इत्यादी वापरात नसल्याने गाडीचे सर्व पार्ट्स एकमेकांत गुंतवण्यासाठी खाचा पाडून लाकडे ठोकून फिट करत.

प्रवासासाठी छोट्या आकाराचा गाडा बनवत त्याला छकडा असे म्हणत. तो लहान चाकांचा व लहान आकाराचा असे. त्यावर दोन ते तीन माणसे बसू शकत. मोटार सायकलवर बसतात तसे दोन्ही बाजूंला पाय टाकून बसत असत. त्याला दोन बैल किंवा दोन घोडे जुंपत. कधी एक बैल व एक घोडा असेही जोडत, अशा छकड्याला भिरके म्हणत.

बैलगाडीला रस्त्याने चालवण्यासाठी कोठलाही सरकारी टॅक्स नाही, रजिस्ट्रेशन नाही. बैलगाडी चालवण्यासाठी कोठलेही ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागत नाही. बैलगाडीत माल व प्रवासी जागेची कॅपॅसिटी पाहून भरतात. बैलगाडी नगरपालिका हद्दीत प्रवेश करताना पूर्वी टॅक्स भरावा लागे. ती सोय जकात नाक्यावर असायची. एकदाच पैसे भरून वर्षभराचा टॅक्स भरण्याचीही सोय होती, वर्षासाठी छोटा पत्र्याचा तुकडा मिळायचा, त्यावर त्याची नोंद रंगवण्यात येई. तो पत्रा बैलगाडीवर दिसेल अशा ठिकाणी खिळ्याने ठोकला जायचा. नगरपालिका जकातमुक्त झाल्याने टॅक्स उरलेला नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बैलगाडी, घोडयाचे टांगे यांच्या वापराने प्रदूषण होत नव्हते ही त्यांच्यातील फार जमेची बाजू होती.

बैलगाडीची पिछेहाट नवीन यांत्रिक साधने आल्याने झाली. ऊस वाहतुकीसाठी नवीन आकाराच्या व टायर असलेल्या, बेअरिंग्ज असलेल्या आधुनिक बैलगाड्या निर्माण झाल्या. लाकडी बनावटीची बैलगाडी काळाच्या ओघात ‘अँटिक पीस’ म्हणूनच राहील. ती संग्रहालयात ठेवून नव्या पिढीला दाखवावी लागेल !

संजीव कोद्रे, 9850958260.

(मूळ लेख – ‘असे होते कोपरगाव’ पुस्‍तकातून)

About Post Author

1 COMMENT

  1. खूप छान ! अत्यंत तपशीलवार…
    खूप छान ! अत्यंत तपशीलवार माहिती. याला बैलगाडीच्या प्रत्येक भागाच्या फोटोची किंवा रेखाटनाची जोड दिली तर नवीन पिढीला हि माहिती भविष्यात संदर्भासाठीही उपयुक्त ठरेल. अशाच प्रकारे मोट, नांगर या सारख्या शेतीविषयक इतर साधनांचीही माहिती तयार झाली पाहिजे.

Comments are closed.