“जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल घडवू शकतो, ह्यावर आपली परिस्थितीच नाही तर उत्क्रांती अवलंबून असते. माहिती ही सतत, अनंत हस्ते मिळत असते, जगण्याच्या ढोबळ किंवा प्राथमिक उद्दिष्टांसाठी आपण सर्वच जीव काही समज (माहिती) प्रयत्नपूर्वक वेचत असतो, …..
– दिनकर गांगल
“जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल घडवू शकतो, ह्यावर आपली परिस्थितीच नाही तर उत्क्रांती अवलंबून असते. माहिती ही सतत, अनंत हस्ते मिळत असते, जगण्याच्या ढोबळ किंवा प्राथमिक उद्दिष्टांसाठी आपण सर्वच जीव काही समज (माहिती) प्रयत्नपूर्वक वेचत असतो, पण त्यापुढे जाऊनही आपण सूक्ष्म संदर्भ, सूचक उदाहरणे आणि अप्रत्यक्ष संकल्पनांच्या वा भाववाचक नावांच्या महासागरात दिवसरात्र डुचमळत असतो. अशा विनासायास दिसणार्या खुणांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न मी या सदरात करणार आहे. संपूर्णपणे व्यक्तिकेंद्रित असल्याने त्यात सार्वभौम, त्रिकालाबाधित असे काही बहुधा नसेलच, पण तरी अशा गोष्टींची निदान नोंद तरी व्हावी हा माझा हेतू साध्य होईल.”
ऋचा गोडबोले यांनी त्यांच्या 'थिंकमहाराष्ट्र'वरील नव्या लेखमालेची ओळख करून दिली आहे ती अशी. ‘थिंकमहाराष्ट्र’ या वेबपोर्टलचा मुख्य हेतू महाराष्ट्राच्या संस्कृतिसंचिताची नोंद करणे हा आहे आणि भविष्यवेध हा त्या कामाचा गाभा आहे. तथापी संस्कृती ही प्रवाही असते. आपले आजचे जीवन हे उद्याच्या संस्कृतीत गणले जाते. आणि म्हणूनच ‘थिंकमहाराष्ट्र’वर वर्तमानाचा वेधही तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने आपण वाचकांच्या व मान्यवरांच्या वर्तमानकालीन घटनांवरील टिकाटिप्पणी 'दैनिक मल्लिनाथी'मध्ये नोंदवत असतो. त्यामध्ये आता काही लेखमालांची भर टाकण्याचे योजले आहे. त्यांतील पहिले लेखन ऋचा गोडबोले यांचे आहे. म्हटले तर ही लेखमाला म्हणजे गोडबोले यांचे साप्ताहिक सदर होय. दर आठवड्याच्या सोमवारी त्यांचा नवा मजकूर अपलोड केला जाईल. याच पद्धतीने आणखीही काही अभ्यासू व बहुश्रूत व्यक्तींना ‘थिंकमहाराष्ट्र’वर नियमित लेखन करावे अशी विनंती केली आहे. आठवडा-दहा दिवसांत त्यांचे नवनवे सदरलेखनदेखील येथे सुरू झालेले दिसेल.
वेबसाईटचे खरे महत्त्व आहे, ते त्याच्या लोकशाही स्वरूपात; तसेच विकेंद्रित कार्यपद्धतीत त्यामुळे आम्ही सुचवल्यामुळे वेगवेगळ्या तर्हेचा मजकूर वेबसाईटवर येत असला तरी वाचकांना, त्यांनी त्यांची मते व त्यांचे लेखन या वेबपोर्टलकडे जरूर सादर करावे असे आमचे आवाहन आहे. आकडेवारीचे फुलोरे – ऋचा गोडबोले