नाझरे – संतांचं गाव

6
136
carasole

नाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक ‘श्रीधरस्वामींचं नाझरं’ असेच म्हणतात. गावाला वळसा घालून वाहणारी माणनदी. तिला वरच्या अंगाला गोंदिरा ओढा मिळतो आणि खालच्या अंगाला बोलवण नदी. अशा दोन दोन संगमांवर विराजमान झालेले गाव – नाझरे! ते सोलापूर जिल्ह्याच्या सांगोले तालुक्याच्या काठावर आहे. गावाची हद्द संपते तेथे ग.दि.माडगुळकरांच्या गावाची सीमा सुरू होते. मात्र ते आहे सांगली जिल्ह्यात. नाझरे गावापासून खाली पंधरा–सोळा कोसांवर विठ्ठलाची पंढरी तर बाराएक कोसांवर दामाजीपंतांचे मंगळवेढे.

सोलापूर-कोल्हापूर हमरस्त्यावर सांगोल्यापासून दहा मैलांवर फाटा फुटतो, तो नाझरे मठ. मठापासून दोन मैलांचे अंतर तुडवले, की बेलवणचा पूल लागतो. ते आले नाझरे! गावात शिरताना महार, मांग, चांभार यांची घरे तोंडालाच. ती ओलांडून, एस.टी. पाहुण्याला गावाच्या बाजारपेठेतील भरचौकात आणून सोडते. आठवड्याचा बाजार दर शुक्रवारी भरतो. तो चौक म्हणजे गावाचे नाक. चौकातच चावडी पोलिस गेट आहे. गेटला डावी मारून थेट नाकासमोर चालू लागावे. सरळ आखलेला रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हरत-हेची दुकाने. पुढे थोडी नागमोडी वळणे घेत घेत रस्ता दीडशे पावलांवर थांबतो, तो कासारांच्या माडीपुढील मोठ्या चौकात. गावातील तो मोठा चौक. चौकातून एक रस्ता डावीकडे वीरभद्राच्या देवळाकडे जातो तर दुसरा उजवीकडील महादेव, मारुती, विठ्ठल-रखुमाईच्या देवळांकडे वळतो. मारुतीचे देऊळ हे गावचे शेवटचे टोक. त्या देवळाला लागून दगडी बांधणीची मोठी वेस आहे. वेशीच्या उंचच उंच कमानीवर शिळा टाकलेल्या आहेत. तसेच, नदीत उतरणारा दगडी घाट आहे. वेशीच्या आत, दोन्ही बाजूंला दोन देवडी आहेत. वेशीच्या डाव्या अंगाला लागून पुरुष-दीड पुरुष उंचीचा, दगडी बांधणीचा हुडा – (नदीच्या काठी बांधलेली तटबंदी) आहे. पुराचे पाणी गावात शिरू नये म्हणून ती खबरदारी.

वेशीच्या वरच्या पायरीवर उभे राहून नजर लावली, की पैलतीरावर झाडाने वेढलेला परिसर दिसतो. तो ऐसपैस पसरलेला दत्त मंदिराचा परिसर आणि तेच श्रीधरस्वामींचे आजोबा दत्तानंद यांच्या समाधीचे स्थान. दत्ताचे मंदिर छोटे असले तरी मंदिराला सन्मुख होऊन ध्यानस्थ बसावे तसे दत्तानंदांचे समाधी-स्थळ आहे. दत्तानंद, ब्रह्मानंद आणि श्रीधरस्वामी अशी परंपरा आहे. ब्रह्मानंदांनी आत्मप्रकाश हा चौदा हजार ओव्यांचा ग्रंथ १६८२ साली लिहिला. त्यामध्ये सुरुवातीसच

नाझरे नाम नगरि l माणगंगेचिये तिरि !

आनंदमठा अंतरि l समाधिस्थ दत्तानंद

असा त्यांनी नाझरे गावी दत्तानंदांनी जिवंत समाधी घेतल्याचा उल्लेख आहे.

दत्तानंद, ब्रह्मानंद आणि श्रीधरस्वामी यांची परंपरा श्रीधरस्वामींचे चुलते निजानंद रंगनाथस्वामी यांच्यापासून सुरू होते. रंगनाथस्वामी हेही अधिकारी पुरूष. त्यांचा जन्म १६१२ चा. ते चारीधाम करत नाझरे येथे स्थायिक झाले. श्रीधरस्वामी हे त्यांचे पुतणे, ते सर्व देशपांडे कुळातील असले तरी आडनाव नाझरेकर असे लावत. रंगनाथस्वामींनी ‘योगवसिष्ठसार’ नावाचा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला. नाझरेकर सर्व संतांमध्ये शिरोमणी ठरले ते श्रीधरस्वामी. त्यांनी शिवलीलामृत, पांडवप्रताप, हरिविजय, रामविजय इत्यादी विपुल रचना केली. त्यांनी सर्व लेखन अशिक्षित समाज डोळ्यांपुढे ठेवून साध्या, सोप्या व रसाळ भाषेत केले. त्यामुळे त्यांच्या ग्रंथांची पारायणे जितकी होतात तितकी अन्य कुणाच्याही ग्रंथांची होत नसावीत. नाझरे येथे संतांच्या मांदियाळीत भक्तिमार्ग जोपासून ग्रंथरचनाही केली असे घोडके कुळातील संत म्हणजे रंगनाथ स्वामी (१६१२), दत्तानंद आणि श्रीधरस्वामी (१६५८). रंगनाथ स्वामी हे राजयोगी आणि दास पंचायतनातील एक गणले गेले. त्यांच्या योगवासिष्ठ सारटीका, राजेंद्र मोक्ष, शुकरंभासंवाद या प्रसिद्ध रचना. त्यांनी बाहत्तरव्या वर्षी समाधी घेतली.

दत्तानंद स्वामी हे रंगनाथ स्वामींचे चुलते आणि श्रीधरस्वामींचे आजोबा. त्यांनी ‘आत्मप्रकाश’ ग्रंथ लिहिला. शेवटी, त्यांनी दत्तमंदिराच्या आवारात समाधी घेतली. घराण्याचे मूळ पुरूष राघोपंत घोडके (खडके). ते चवसाळा महालातील खडकी गावचे म्हणून खडके. ते विजापूरच्या दरबारी अश्वपरीक्षक होते, म्हणून घोडके झाले आणि त्यांना नाझरे महालाचे देशपांडे वतन मिळाले. राघोपंतांचा मुलगा चंद्राजी पंत. त्यांना नागेश व दत्तोपंत ही दोन मुले. दत्तोपंतांना रंगोपत हा मुलगा. त्यांचा वंशविस्तार होऊन रामजी, बोपाजी (निजानंद), कृष्णाजी आणि दत्तानंद ही चार मुले झाली. दत्तानंदांचा ब्रह्माजीपंत हा मुलगा. ते संतश्रेष्ठ श्रीधरस्वामींचे पिता. दत्तानंदांचे बंधू निजानंद यांना तीन मुले झाली. रंगनाथस्वामी हे दोन नंबरचे अपत्य. अशा त-हेने रंगनाथस्वामी आणि श्रीधर स्वामी या काका-पुतण्यांच्या जोडीने मराठी सारस्वतात मोलाची भर घातली. श्रीधरस्वामींनी साठ हजार रचना केल्या. त्यांच्या सहज सुलभ कवितेने महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भक्तिसंप्रदायाची पताका रोवली. त्या घराण्याला सातत्याने दोनशे वर्षे साधुत्वाची व ग्रंथनिर्मितीची परंपरा लाभली आहे. त्यांच्या एका रचनेत नाझरे या कर्मभूमीचा

 

पंढरीहून पश्चिमेस देख

नाझरे नगर पुण्यकारक

असा गौरवात्मक उल्लेख आहे.

पुढे, तीनशे वर्षे त्या गावाची संतपरंपरा खंडित झाली, ती संजीव स्वामींच्या रूपाने पुनरुज्जीवित झाली. (ऋणनिर्देश : डॉ. प्रा. कृष्णा इंगोले. माणदेश; स्वरूप आणि समस्या.)

नाझरे येथील संतांच्या मांदियाळीत कर्नाटकातील बेंडवारेकडील लिंगायतवाणी समाजातील पदम नामशेट्टी या कन्नड भाषिकाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांनी दत्तसंप्रदायाची परंपरा जोपासली आणि अडीचशे–तीनशे वर्षे पडिक स्थितीतील दत्त मंदिर परिसराचा जीर्णोद्धार केला. ते पुढे संजीव स्वामी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचे देहावसान १९८२ मध्ये झाले. त्यांनी सुरू केलेला दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

नाझरे गावाचा सामाजिक पोत अनेक जाती-धर्मांच्या लोकांनी विणला गेला आहे. त्यांत लिंगायत प्रमुख आहेत. लिंगायतांमध्ये रेड्डी, वाणी, जंगम हे कट्टर शैवपंथी आहेत. ब्राह्मणांची घरे त्यांची स्वतंत्र अस्मिता राखून आहेत. मराठा, माळी, परीट, कोष्टी, सुतार, लोहार, सोनार, कासार हे बहुजन समाजातील लोक आहेत. तद्वत वाघ, डवरी, बुरूड, रामोशी, घिसाडी, कैकाडी, वडार हे लोक गावाच्या विशिष्ट भागात घरे करून राहिले आहेत. महार, मांग, चांभार, ढोर हे गावाच्या सुरुवातीस वस्ती करून आहेत. गावात पेठेच्या बाजूला मशीद आहे. तिला लागून काझी, तांबोळी, मुलाणी आहेत. गावापासून एक मैलावर काझींची मोठी वसाहत आहे. गावाचे स्वरूप निखळ कॉस्मापॉलिटन असे आहे. विशेष म्हणजे खेर या मागासलेल्या समाजातील तायाप्पा हरी सोनवणे म्हणून खासदारही तेथून होऊन गेले. असे सगळे असले तरी गावावर पकड आहे ती रेड्डी समाजाची.

पंचक्रोशीत नाझरे गावाचे महत्त्व असे आहे, की ब्रिटिशांच्या राजवटीत जिल्हा लोकल बोर्डातर्फे एक प्राथमिक सेंटर आणि शाळा सुरू झाल्या. आता गावी दोन कनिष्ठ महाविद्यालये, इंग्रजी माध्यमाची शाळा, जिल्हा परिषदेची शाळा सुरू आहेत. शिकलेला आणि नोकरदार वर्ग मात्र गावात रमत नाही, त्याचा ओढा तालुक्याच्या गावी आहे. त्यामुळे तालुक्याकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. मी त्यांतील पंधरा–वीस लोकांना भेटलो, त्यावेळी ‘शेतीवाडी गावी असताना तालुक्याला राहायला आलात ते कोणत्या कारणासाठी? तेही सर्व कुटुंबकबिला घेऊन?’ असे विचारले. त्यावर त्यांची उत्तरे मजेशीर पण न पटणारी होती. कुणी सांगितले की मुलांच्या शिक्षणासाठी. कुणी म्हटले, की मुलांना इथे चांगलं वळण लागते. कुणी काही, कुणी काही. थोडे पटणारे, बरेचसे न पटणारे. हे मात्र खरे, की खेडी आता पांढरपेशांची राहिलेली नाहीत.

गावाच्या राजकारणाची सूत्रे लिंगायत रेड्डी समाजाच्या हाती एकवटली आहेत. कारण वाड्यावस्त्या मिळून त्यांचा तीस-एक उंबरा आहे. ते आहेत म्हणून त्यांचे गुरू जंगम समाजही तेथे एकवटला आहे. त्यांचीही दहा घरे आहेत. साहजिकच सर्वांचे दैवत वीरभद्र यांचे देऊळ आहे. लिंगायत समाजात मुलाच्या लग्नानंतर नवस म्हणून अग्निहोम घालतात. देवळात लागूनच अग्निहोमासाठी जागा मुक्रर केलेली असते. त्यामध्ये साधारण ५ x १० फुटांचा खड्डा खोदला जातो. त्यात लाकडाचे ओंडके टाकून ते पेटवले जातात. संध्याकाळपर्यंत त्याचे रसरशीत निखारे पडतात. संध्याकाळी सर्व स्वामी लोक अग्निहोमाच्या पूर्वमुखी उभे राहून मंत्रोच्चार करत बेलाची पाने अग्निहोमात टाकत राहतात. ज्याक्षणी पाने जळायची बंद होतात त्याक्षणी अग्नी शांत झाला असे समजून, स्वामीलोक वीरभद्राची काठी उभी धरून त्यातून चालत जातात. त्यानंतर नवरदेव त्या इंगळावरून चालत जातो. ज्यांना कुणाला जायचे आहे तेही जातात. प्रस्तुत लेखकाने अग्निहोमातून चालत जाण्याचा अनुभव घेतला आहे! इतकेच की, चाल एकदम गतिपूर्ण होती.

गावाला कोरडवाहू जमिनीचे प्रमाण मोठे आणि पावसाचे प्रमाण कमी आणि बरेचसे अनियमित. पूर्वी विहिरीच्या पाण्यावर बागा पोसायच्या. पण नंतरच्या काळात इलेक्ट्रिक पंप आले, उपसा मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आणि जमिनीतील पाण्याची पातळी खोल खोल होत गेली. विहिरींची जागा बोअर वेलने घेतली आणि जमिनीखालच्या पाण्याला कॅन्सरच लागला! आता बोअरवेलही निकामी होत आल्या. मग नदीच्या पात्रात विहिरी घेऊन उपसा सुरू झाला. ज्यांना ज्यांना हे शक्य आहे आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे त्यांनी दूरवरपर्यंत पाईपलाईन टाकून पाणी शेतात नेले आहे. नेहमीची ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा ही पिके मागे पडली आणि त्यांची जागा डाळिंबे, बोरे या नगदी पिकांनी घेतली. कमी पाण्यावर पोसणारी ही पिके. सारी माळराने त्या बागांनी फुलली. ठिबक सिंचन पद्धत वापरून कमी पाण्यावर अधिक क्षेत्र फळबागांखाली आले. पण माणदेशी पाऊस इतका बेभरवशाचा आहे, की पुन्हा बागा उजाड होऊ लागल्या. काही काळाकरता सुबत्ता आली आणि बघता बघता, निघून चालली. जी सुबत्ता आली ती मोजक्यांच्या वाटेला. बहुसंख्य शेतकरी वर्षानुवर्षे जेथे आहे तेथेच पाहायला मिळतो.

लिंगायत रेड्डी हे कर्नाटकात बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या पंथाचे अनुयायी आणि कट्टर शिवभक्त, शाकाहारी जीवनपद्धतीने बसवेश्वरांनी दिलेले आचारविचार पाळतात. पुरुष आणि स्त्रियाही शंकराचे प्रतीक म्हणून एक छोटी काळी पिंड चांदीच्या गोल डबीत ठेवून ती जानव्यासारखी घालतात. तेच ते पवित्र लिंग. कपाळावर गंधाच्या पांढ-या विभूतीचे आडवे पट्टे ओढतात.

कर्नाटकाच्या महाराष्ट्राला लागून असणा-या भागातील काही कुटुंबे नाझरे व पंचक्रोशीतील चार-पाच गावांत स्थलांतर करून राहिली, त्यांचा भर नाझरे येथे शेतजमीन खरेदी करण्यावर राहिला. काहींनी मोक्याच्या जमिनी मुबलक प्रमाणात घेतल्या. शेतीवर मात्र आलेल्या घराण्याकडे पोलिस, मुलकी पाटील ही वतने आली. ती परंपरेने त्याच घराण्यांकडे राहिली. पुढच्या पिढीने असणा-या अधिकाराच्या बळावर धूर्तपणे सरपंच, तालुका-जिल्हा पातळीवरील सभासद अशी सत्तेची पदे काबीज केली. संपत्ती, सत्ता यांची सूत्रे हाती आल्यामुळे एकमत वाढून वर्चस्व प्रस्थापित झाले.

स्वामी किंवा जंगम हे या समाजाचे पुरोहित वा गुरू. छोटेमोठे सर्व प्रकारचे धार्मिक विश्वी, अंत्यसंस्कार जंगम गुरूच करतात. लिंगायतांमध्ये दहन न करता दफन करण्याची पद्धत आहे. माजी उपराष्ट्रपती बी. डी. जती हे लिंगायत. त्यांनी या जमातीचा भटक्या जातींमध्ये समाविष्ट करून त्यांना भटक्या समाजाला मिळणा-या सवलतींचा लाभ मिळवून दिला.

राम कासार
९८३३५८०१००
ramkasar11@gmail.com

 

Last Updated On – 14th July 2017

 

About Post Author

6 COMMENTS

  1. सुंदर वर्णन माझ्या जन्म
    सुंदर वर्णन माझ्या जन्म गावाचे. धन्यवाद!

  2. श्री.रुपेश दत्तात्रय जावीर(एम.ए.बी.एड).सांगली

    माहिती सुंदररीत्या लिहीलेली
    माहिती सुंदररीत्या लिहीलेली आहे. आत्ताच्या पिढीला या माहितीच्या आधारे आपल्या गावाची ओळख होईल. पण,यामध्ये आमच्या होलार समाजाचा उल्लेख नाही याची खंत वाटते. कृपया,या माहितीमध्ये आमच्या जातीचा उल्लेख करावा. ही नम्र विनंती.

  3. Sir tumhi najharyatil sarv
    Sir tumhi najharyatil sarv jatincha ullekh kelay pan majha holar samajacha ullekh tumhi kela nahi

  4. Namaskar Sir Holar samaj kale
    Namaskar Sir Holar samaj kale chya kshetrat madhe parangat ahe tari holar samaj cha ullekh karava hee namra vinantee.

  5. nazare gavat dhangar
    nazare gavat dhangar samajachi lokasankhya sarvadhik ahe (ani sadhyache nazare gavache sarpanch dekhil dhangar samajache ahet) ani gavat baher gavat maratha samajache ekhi ghar nahi.

  6. ya lekhat nazare gavat jya
    ya lekhat nazare gavat jya jatichi lokhasnkhya sarvadhik ahe tiche varnan kele nahi. nazare gavat dhangar samajachi lokasankhya sarvadhik ahe.

Comments are closed.