दापोली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी व्यक्ती म्हणजे नरहरी वराडकर.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वराडकर यांच्या मनात शिक्षणाविषयी तळमळ होती. त्याचप्रमाणे ते स्त्री-शिक्षणाविषयी आग्रही होते. त्यांची दूरदृष्टी व त्यांचे प्रयत्न यामुळे दापोली येथे उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली…
दापोली तालुक्यात शैक्षणिक कार्यात मोलाचे योगदान देणारा हिरा असे एक व्यक्तिमत्व म्हणजे – नरहरी काशीराम वराडकर ! त्यांना शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेला होता. त्यामुळे चिकाटी, कष्टाळू आणि प्रेमळ स्वभाव हे गुण स्वाभाविक अंगी होते. त्यांचे वडील परचुरे यांच्याकडे नोकरी करत. त्यांनी नोकरी करत व्यापार-व्यवहाराचे कौशल्य हस्तगत केले. तो काळ वस्तुविनिमयाचा होता. ते सुपारी खरेदी करत आणि बदल्यात तंबाखू, खोबरे, हरभरे शेतकऱ्यांना देत. त्यातूनच मोठ्या सुपारीचा व्यापार वराडकर अण्णांनी उभा केला. ते सुपारीचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाले.
नरहरी काशीराम वराडकर यांचा जन्म मुरुड गावात 2 मे 1898 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुरुड गावातच पूर्ण झाले. ते मॅट्रिकच्या शिक्षणासाठी दापोली या तालुक्याच्या ठिकाणी चालत जात असत. साने गुरूजी आणि न.का. वराडकर हे शाळेत सोबती होते. त्यांनी ड्रॉईंग इंटरमिजिएट ची परीक्षाही दिली. परंतु, मॅट्रिक वर्ग शिक्षणादरम्यान त्यांच्या मुरुडमधील वडील बंधूना 1917 मध्ये अचानक देवाज्ञा झाली. त्यांचा आधार संपला ! त्यांना शिक्षण थांबवावे लागले.
अण्णांनी व्यवसायात लक्ष नव्या उमेदीने घातले. त्यांना दुकानावर बस्तान बसवण्यासाठी पाच-सहा वर्षाचा काळ लागला. त्यांनी अपार मेहनत घेतली. त्यांना त्या अनुभवाचा उपयोग झाला. त्यांनी दुकानात यश मिळाल्यानंतर सुपारीच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी दापोली तालुक्यातील सुपारी एकत्र करून सोलून त्यांची मुंबईतील व्यापाऱ्यांकडे निर्यात केली जात असे. त्यांचा विवाह शेजारच्या कर्दे या गावातील राधाबाई यांच्याशी झाला. राधाबाईंनी त्यांना समाज कार्यात मोलाची साथ दिली. नरहरी अण्णा उच्च विचारांचे आणि शिक्षणाची तळमळ असणारे होते. ते स्त्री शिक्षणासंबंधी आग्रही होते. त्यांनी मुलींनी शिकले पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. त्यांनी मुलींसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती जाहीर केली.
त्यांनी महर्षी कर्वे शिक्षण संस्था व संस्थेचे एन.के. वराडकर हायस्कूल 1966 साली सुरू केले. तो शिक्षण संक्रमणाचा काळ होता. अण्णांनी अनेक मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली, विद्यादान केले; अनेक गरीब होतकरू बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकता यावे यासाठी स्वतःच्या घरी निवासाची सोय उपलब्ध करून दिली. नरहरी अण्णा यांनी शिक्षणाची अडचण दूर करण्यासाठी 5 मे 1973 साली एक पाऊल टाकले. त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच दापोली येथे उच्च शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने एकावन्न हजार रुपयांची देणगी त्या काळात दिली. दापोली मंडणगड शिक्षण मंडळाची स्थापना 25 मे 1973 झाली. त्या देणगीतून सुमारे दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ असणारी इमारत उभी राहिली. मुंबई विद्यापीठाची संलग्नता आणि अनुदान 1976 ला प्राप्त झाले. दापोलीचे न.का.वराडकर कला, रा.वि.बेलोसे वाणिज्य व शांतिलाल जैन कनिष्ठ महाविद्यालय गेले अर्धशतकभर अनेक विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे स्वप्न साकार करत आहे. नरहरी काशीराम वराडकर यांनी कोळथरे पंचनदी शिक्षण संस्थेच्या शाळा व आश्रमाला देणगी दिल्याचा उल्लेख जुन्या पत्रव्यवहारात आढळतो. त्या कार्याचा वेध घेणारे कवी आत्माराम यांनी नरहरी काशिराम वराडकर यांच्यावर काव्य लिहिले आहे.
नरहरी वराडकर हो काशीरामात्मजा मुरुडवासी
75 वर्षे झाली म्हणून विधीस तू करिसी ll१ll
शिक्षण कार्यास्तव जो अर्थ सदा देतसे सुपात्र जना
अर्थाच्या पुरुषार्था धर्माच्या कोंदणात बघ सूजना ll२ll