वेगवेगळे ध्वज किंवा झेंडे वापरण्याची प्रथा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. लहान-मोठ्या लढाया, सागरी पर्यटन या ठिकाणी ध्वज प्रथम वापरण्यात आले. समुद्रप्रवास करणारे खलाशी त्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी झेंड्यांचा वापर करत. सर्वात पहिला राष्ट्रध्वज, म्हणजे देशाने अधिकृतपणे त्याचे प्रतीक म्हणून ठरवलेला ध्वज डेन्मार्क देशाचा आहे. तो 1299 साली फडकावण्यात आला. त्यानंतर ती पद्धत पडली. जगातील सर्व स्वतंत्र राष्ट्रांनी त्यांचे त्यांचे राष्ट्रध्वज निश्चित केलेले आहेत.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे. ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात चार रंगांचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. वरील भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, शुचिता, धैर्य आणि समृद्धी याचा बोध होतो. मधील भागात पांढरा रंग आहे. त्या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य व पावित्र्य यांचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. तो रंग निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवतो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोकचक्र ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला चोवीस आरे आहेत. हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्र व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करते. ते जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे दर्शवते. मूलतः ते चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्याा बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोक चक्र’ या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो.
भारताच्या घटना समितीने 22 जुलै 1947 रोजी त्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली; ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत म्हणून तर ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकृत केले गेले.
राष्ट्रध्वज नेहमी सुस्थितीत असावा. सरळ व सदैव फडकत असावा. जमिनीकडे वाकलेला किंवा अर्धवट झुकलेला नसावा. सूर्योदय ते सूर्यास्त या कालखंडात राष्ट्रध्वज फडकावता येतो. तो सूर्यास्ताच्या वेळी व्यवस्थित उतरवून ठेवायचा असतो. उच्च शासकीय कार्यालय, राष्ट्रपती व अतिमहत्त्वाच्या राजकीय व्यक्ती यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज लावण्यात येतो.
तिरंग्याची रचना मच्छोलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण 3:2 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झाल्यास त्यांच्या मृतदेहावर राष्ट्रध्वज ठेवण्यात येतो. राष्ट्रीय दुखवटा पाळताना राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेला असतो. राष्ट्रीय कार्य करत असताना सैनिकांना मृत्यू आल्यास त्यांच्या शवपेटीवरही राष्ट्रध्वजाचे आवरण घालण्याचा प्रघात आहे.
संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकावला गेला पाहिजे व ध्वज हळूहळू आदरपूर्वक उतरवला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व तो त्यावर फडकावावा.
– नितिराज शिंदे
nitiraj.s@somaiya.edu