पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे. तथापी प्रबोधिनीचे कार्य ग्रामविकसन, संशोधन, आरोग्य या क्षेत्रांमध्येही लक्षणीय आहे. प्रबोधिनीने अंगिकारलेला ‘संस्कार कार्यक्रम’ हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामधून प्रबोधिनी घराघरात कुटुंबाकुटुंबात जाऊन पोचते. समाजात सर्वांना व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात धार्मिक आचरण हवे असते. अपत्यजन्म, विवाह, देहावसान या कौटुंबिक घटना संस्कारांनी बांधलेल्या असतात. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संदर्भ त्या संस्कारांमधून प्रकट होत असतो. हिंदू जीवनपद्धतीत सोळा अर्थपूर्ण संस्कारांची मांडणी केली आहे. त्या संस्कारांचा मूळचा आशय काळाच्या ओघात हरवला गेला आहे. तो आशय आणि त्यांतील मूल्ये प्रबोधिनीच्या संस्कारांमधून पुनःप्रकट करण्याची योजना आहे. ती पुनर्मांडणी ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संस्थापक-संचालक अप्पा पेंडसे यांनी ‘धर्मनिर्णय मंडळा’चे रघुनाथशास्त्री कोकजे यांच्या सहविचाराने केली.
धर्माच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा, विषमता, अस्पृश्यता इत्यादी दोषांवर वैचारिक प्रबोधन काळापासून प्रहार होऊ लागले. त्यामुळे ‘धर्मच नको’ असा दुसऱ्या टोकाचा विचारही मूळ धरू लागला. दुसरीकडे, अशी एक विचारधारा पुढे आली, की ‘धर्मच नको’ असा विचार करणे हे उचित होणार नाही, पण धर्माच्या क्षेत्रात सुधारणा व्हायला हवी. राजा राममोहन रॉय, न्यायमूर्ती रानडे, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद हे धर्मसुधारक त्या प्रकारच्या विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यातूनच वैदिक धर्मशास्त्राकडे बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टीने पाहणाऱ्या अभ्यासकांचा पक्ष तयार झाला. त्यानंतरच्या काळात, भारतरत्न महामहोपाध्याय पां.वा. काणे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पं. महादेवशास्त्री दिवेकर, तर्कसांख्यतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांसारख्या विद्वान अभ्यासकांनीही धर्मशास्त्राकडे बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रात ‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनशील परिषदे’ची 1934 साली स्थापना केली. त्या परिषदेने विविध अधिवेशनांमध्ये धर्मातील सुधारणांवर चर्चा केली. त्या परिषदेचे ‘धर्मनिर्णय मंडळ’ असे नामांतर 1938 च्या अधिवेशनात झाले. त्या संस्थेने उपनयन, अन्त्येष्टी, श्राद्ध, हिंदूकरण इत्यादी पोथ्यांची रचना नव्याने केली. कोकजेशास्त्री यांनी त्या पोथ्यांचा प्रसार ठिकठिकाणी व्याख्याने देऊन केला. रघुनाथशास्त्री कोकजे आणि ‘ज्ञानप्रबोधिनी’चे संस्थापक-संचालक वि.वि. पेंडसे यांच्या भेटीगाठींमध्ये भरपूर चर्चा झाल्या. ते त्या चर्चांमधून अर्थ समजून न घेता; तसेच, स्थळ-काळाचे औचित्य दुर्लक्षून आंधळेपणाने धार्मिक विधींची प्रचलित पद्धत तशीच चालू ठेवणे योग्य नाही अशा निर्णयापर्यंत आले. पुढे, ‘धर्मनिर्णय मंडळा’चे कार्य ‘ज्ञानप्रबोधिनी’ने हाती घेतले.
‘धर्मनिर्णय मंडळा’ने त्यांच्या विविध अधिवेशनांमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले. जसे 1. मानव्य, राष्ट्रहित व हिंदू समाजसंघटना अशा तिन्ही दृष्टींनी विचार करता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांची जन्मनिमित्तक अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे; 2. प्रत्येक हिंदूला द्विजत्वाचा अधिकार आहे. त्यासाठी वैदिक पद्धतीने उपनयन संस्कार प्रत्येक हिंदूने तज्ज्ञांच्या साहाय्याने करावा; 3. सकेशा विधवांना विवाहादी मंगल कार्यांत आणि धार्मिक कृत्यांत कोणत्याही प्रकारे अनधिकारी, अशुभ, अपवित्र समजण्यात येऊ नये. स्त्रियांचे धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतील स्थान/अधिकार पुरुषांच्या बरोबरीचे आहेत; 4. दहनक्रिया झाल्यावर पहिल्या तीन दिवसांत अस्थिसंचयन आणि अकराव्या दिवशी एकोद्दिष्ट व सपिंडीकरण ही श्राद्धे करावीत. तेवढे केले म्हणजे मृतात्म्यासाठी आवश्यक तेवढा क्रियाकलाप झाला असे समजण्यास प्रत्यवाय नाही. ‘ज्ञानप्रबोधिनी’ने ते निर्णय स्वीकारले आहेत.
हे ही लेख वाचा –
साधना व्हिलेज
स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता
जावळविधीचा संस्कार
‘ज्ञानप्रबोधिनी’ पद्धतीने धर्मविधी करताना पाच तत्त्वे अवश्य पाळली जावीत असा आग्रह असतो – 1. सार्थता – सगळीकडे चालू असणारे विधी पाहिले तर त्यांतील विविध कृतींचा वा मंत्रांचा अर्थ सांगितला जात नाही. ‘ज्ञानप्रबोधिनी’ पद्धतीत पुरोहित तो अर्थ यजमानांना समजावून सांगतात. 2. सामुहिकता- कोणताही धर्मविधी करताना उपस्थित सर्व सदस्यांनी पुरोहितांपाठोपाठ मंत्र म्हणणे अपेक्षित आहे. धर्मविधींमध्ये सर्वांनी वैयक्तिकता कमी करून संघटितपणा, सहविचार याला चालना देणे हे हिंदू समाजास आवश्यक आहे. सर्वांनी मंत्रांचा अर्थ वाचणे, आशीर्वाद देणे, अभिषेक करणे इत्यादी कृतीत सहभागी व्हावे. 3. शिस्त- कोणताही धर्मविधी वेळेवर सुरू होणे, गोंगाट न करणे, सर्व तयारी आधीपासून केलेली असणे हे सर्व शिस्तीत येते. 4. समभाव- महिला, पुरुष, तसेच जन्म आणि वर्ण यांनुसार समाजात रूढ असणारे कोणतेही भेद न पाळणे, त्याद्वारे ‘ज्ञानाचा अधिकार सर्वांना’ या विचाराचा प्रसार करणे. 5. स्वयं पौरोहित्य- संस्काराच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यासाठी पुरोहितांना बोलावले जाते. परंतु आपल्या कुटुंबातील संस्कार आपणच शिकून करावेत आणि धार्मिक विधीमधील समाजाचे स्वावलंबन वाढावे असा हेतू आहे.
‘ज्ञानप्रबोधिनी’ पद्धतीत पूजा, विधी, संस्कार यांमध्ये आशयात काही भर घातलेली आहे. उदाहरणार्थ- सत्यनारायण पूजेच्या पोथीतील कथेची पुनर्रचना करून, त्या व्रतामध्ये पूजा, प्रसादभक्षण इत्यादींचे महात्म्य सांगण्याऐवजी ‘सत्यनिष्ठा’ या नैतिक मूल्यावर भर दिला गेला आहे. मृत व्यक्तीला मरणोत्तर सद्गती ही त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या श्राद्धकर्मापेक्षा, त्याने आयुष्यात केलेल्या सत्कर्मावर जास्त अवलंबून असते असे श्राद्धाच्या पोथीत सांगितले गेले आहे. मृत व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, तिच्या सद्गुणांचे स्मरण करणे यांवर जास्त भर दिला गेला आहे.
– आर्या जोशी
jaaryaa@gmail.com
लेख छान, माहिती पूर्ण…
लेख छान, माहिती पूर्ण.
दाहकर्म /श्राद्ध ह्या पोथ्या pdf स्वरूपात मिळू शकतील का? Online, download?
आर्या जोशी यांचे मेल id वर…
आर्या जोशी यांचे मेल id वर मेल केली आहे, उत्तराची अपेक्षा आहे.
मला पौरोहित्य शिकण्याची…
मला पौरोहित्य शिकण्याची इच्छा आहे तरी आपल्या संस्थेकडून मार्गदर्शन मिळेल का?
Lagnavidhisathi mahiti havi…
Lagnavidhisathi mahiti havi ahe.
I am interested in…
I am interested in Vasrushanti and navchandi Pooja by janaprobhodini Pune.
Please let me know thanks a lot.
Comments are closed.