धनत्रयोदशी – राष्ट्रीय आयुर्वेद दिन

0
51
carasole

दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी. त्या दिवशी घराची स्वच्छता करून, दक्षिण दिशेला यमासाठी दिवा लावून धनाची – धनदेवता कुबेराची पूजा घरोघरी केली जाते. तो सर्वसामान्यांच्या दिवाळीचा भाग. पण तो दिवस भगवान श्री धन्वंतरी यांच्या जयंतीचा देखील आहे. देव आणि दैत्य यांच्या समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या चौदा रत्नांपैकी एक हे ‘श्रीधन्वंतरी’ अमृतकुंभांसह प्रकट झाले! ‘श्रीधन्वंतरी’ हे विष्णूचे अवतार मानले जातात. त्यांना वैद्यकाचे दैवत मानले जाते. त्यांची मूर्ती ‘चतुर्हस्त’ असून प्रत्येक हातात असणाऱ्या वस्तूंनादेखील विशेष महत्त्व आहे. त्यांच्या मागील हातात शंख आहे. प्राचीन काळापासून ‘शंखध्वनी’ हा पवित्र मानला गेला आहे आणि शंख फुंकल्यावर भोवतालचा आसमंत प्रदुषणमुक्त – निर्जंतुक होतो. म्हणूनच ‘शंख’ हे वैद्यकशास्त्रानुसार ‘रोगप्रतिबंध’ करणारे ‘प्रतीक’ आहे. त्यांच्या दुसऱ्या हातातील ‘चक्र’ हे शस्त्र आहे. ते शस्त्रकर्माचे (Surgery ) प्रतिक आहे. त्यांच्या उजव्या हातातील ‘जळू’ हे रक्तमोक्षणाचे (अशुद्ध रक्त शरीरातून काढून टाकणे) साधन आहे तर डाव्या हातात ‘अमृतकुंभ’ आहे. हे ‘अमृत’ देवांना अजरत्व (जरा – म्हातारपण, अजर – म्हातारपण नसणे) आणि अमरत्व (मृत्यू नाही) देणारे आहे. देव आणि दैत्य यांमध्ये ‘अमृत’ मिळवण्यासाठी झटापट होऊन काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातूनच दिव्य वनौषधी निर्माण झाल्या अशी श्रद्धा आहे. त्यांचाच उपयोग आयुर्वेदात रोगनिवारणासाठी केला जातो.

भारत सरकारने २०१६ या वर्षापासून धनत्रयोदशी हा ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे या वर्षी दिल्लीपासून मुंबईपर्यंत आयुर्वेदाच्या महतीचे पोषक असे काही मोजके कार्यक्रम घडून आले. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते मंत्रालयात धन्वंतरीची पूजा झाली आणि त्याचबरोबर, त्यांच्याच हस्ते आयुर्वेद क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या पाच आयुर्वेदाचार्यांचा ‘साण्डू कंपनी’तर्फे गौरव करण्यात आला.

‘सांडू कंपनी’च्या चेंबूर येथील निसर्गरम्य आवारात तो कार्यक्रम घडून येण्यात औचित्य आहे. कारण ‘साण्डू कंपनी’ने आयुर्वेदाचार्यांचा धनत्रयोदशीला सत्कार करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सांभाळलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनत्रयोदशीचा ‘धन्वंतरी दिन’ हा ‘आयुर्वेद दिवस’ म्हणून जाहीर होण्यात ‘साण्डू कंपनी’चे व्यवस्थापकीय संचालक शशांक सांडू यांचाही वाटा आहे. शशांक यांनी त्या कल्पनेचा पुरस्कार केंद्रिय आरोग्यमंत्री (आयुष विभाग) श्रीपाद नाईक यांच्याकडे सातत्याने केला. खरे तर, ‘साण्डू कंपनी’चा स्थापना दिन दरवर्षी १० एप्रिलला थाटामाटात साजरा होतो. आयुर्वेदविषयक विचारमंथन आणि भारतभरातील वैद्यांचा सन्मान असे कार्यक्रम त्या दिवशी होत असतात. महाराष्ट्रातील वैद्यांसाठी ती एक पर्वणीच असते. आरोग्यमंत्री श्रीपाद नाईक दोन वर्षांपूर्वी त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच वर्षी २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून जाहीर केला होता. ती पार्श्वभूमी त्या समारंभास लाभली होती. ती संधी साधून शशांक यांनी ‘आयुर्वेद दिवस’ही साजरा होण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले. त्यावर नाईक यांनी शशांक यांचे म्हणणे नुसते उचलून धरले नाही तर तेथल्या तेथे आश्वासन दिले, की सरकार ‘आयुर्वेद दिवस’ जाहीर करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. योगायोग असा, की शशांक साण्डू त्या वर्षी २१ जूनच्या दिवशी अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये होते. त्यांनी तेथील ‘वॉशिंग्टन मेमोरियल’च्या विस्तृत चौकात शेकड्यांनी लोक ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’साठी शिस्तबद्धपणे जमल्याचे पाहिले. ते त्या दृश्याने भारावून गेले. शशांक यांनी तेथूनच श्रीपाद नाईक यांना दिल्लीला फोन लावला व त्या अद्भुत दृश्याचे वर्णन सांगितले. शशांक त्यांना म्हणाले, की आपल्याला ‘आयुर्वेद दिवस’ही असाच साजरा करायचा आहे.

‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ जाहीर होण्यामागे अशा अनेक छोट्यामोठ्या घटना कारणीभूत आहेत. त्यामुळे पहिल्या ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवसा’च्या त्या समारंभात शशांक यांच्या नावाचा दोन-तीन वेळा तरी गौरवाने उल्लेख केला गेला. डॉ. दीपक सावंत यांनी ‘साण्डू कंपनी’च्या एकशेसतरा वर्षांच्या परंपरेचे कौतुकभरल्या शब्दांत वर्णन केले. ते म्हणाले, की भारतात इतक्या जुन्या एक-दोन कंपन्याच असतील. त्यामधील ‘साण्डू कंपनी’ ही मराठी कंपनी आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट वाटते. सन्मानित झालेल्या पाचही आयुर्वेदाचार्यांनी सांडू कंपनीच्या गुणवत्तापूर्ण औषधांबद्दल भरभरून सांगितले.

‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ यंदा, प्रथमवर्षी छोट्या प्रमाणात साजरा झाला. परंतु उत्तरोत्तर तो मोठे स्वरूप धारण करील अशी चिन्हे त्या दिवशी दिसून आली.

– आशुतोष गोडबोले

Last Updated On – 22nd Nov 2016

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here