दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे नाव का पडले याचे कारण कदाचित त्या विभागाच्या निजामशाहीतील सरदाराचे नाव दौलाखान किंवा दौलतखान असावे.
गढी गावाच्या उत्तरेस आहे. तिचे चाळीस फूट उंचीचे महाकाय बुरूज व तटबंदी भक्कम आहेत. बुरूजांचे खालचे बांधकाम दगडी असून वरील बांधकाम विटांचे आहे. त्यामुळे ते अतिशय सुबक, रेखीव आणि देखणे दिसते. भव्य दरवाजा, सुबक कमान, घडीव दगडांच्या बाजू आणि वर विटांच्या बांधकामातील कमानीने सजलेला सज्जा हे सारे उत्तम स्थितीत टिकून आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूच्या तटबंदीच्या भिंतीतून सज्जावर चढण्यासाठी दगडी पाय-यांचा जिना आहे. त्यावरून सहजपणे सज्जात जाता येते.
आतील बाजूस इमारतींच्या कमानी व काही दालनांचा भाग चांगल्या स्थितीत आढळतो. एक मुस्लिम कुटुंब सध्या तेथे वास्तव्य करत आहे. एका बाजूस दिवाणखान्याचे अवशेष स्पष्टपणे दिसतात. साडेचार फूट रुंदीच्या पल्लेदार भिंती, भक्कम जोती, प्रत्येक दालनातील कमानीयुक्त प्रवेशद्वारे हे वैभवाच्या खुणा दाखवून जाते. तटबंदीला भरपूर जंग्या (भिंतीला असलेले छिद्र. त्यातून शत्रूवर बंदुकीच्या सहाय्याने गोळीबार करण्यात येत असे.) असून मधे मधे मोठ्या आकाराची तावदाने आहेत. वरचे मजले मात्र पूर्ण पडले आहेत. खालचा एक मजला सुस्थितीत दिसतो. चुन्याचे प्लॅस्टर भिंतींना घट्ट चिकटून राहिलेले आहे. समोरच्या सोप्याच्या भिंतीवर उत्तम प्रकारच्या कमानी तत्कालीन वास्तुशास्त्राचे दर्शन घडवतात.
गढीभोवती तीस फूट खोलीचा खंदक असल्यामुळे तेथील सरदाराची संरक्षणव्यवस्था मजबूत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे तेथे मोठ्या सरदाराचे ठाणे असावे. तेथून जवळच एका शेतात कलावंतीणीचा महाल म्हणून मोठ्या इमारतीचे अवशेष आहेत. इमारतीचा विस्तार मोठा असावा, कारण सध्या अस्तित्वात असलेल्या कमानी, चार फूट जाडीच्या भिंती, भिंतींवर कोठे कोठे शिल्लक असलेले प्लॅस्टर हे बर्याड स्थितीत दिसून येते. त्या इमारती सुमारे पाच एकरांच्या परिसरात असाव्यात. मात्र त्या परिसराला कलावंतीणीचा महाल असे का म्हणतात ते लक्षात येत नाही. त्या कलावंतीणीच्या महालातील आतील सज्जा, कारंजे आणि कबर या गोष्टी तेथे पाहण्यास मिळतात.
भातवडी
दौला-वडगावच्या जवळ असलेल्या भातवडी या गावी मेहेकर नदीच्या काठी जुने नरसिंह मंदिर आहे. विस्तृत जागेत असलेल्या त्या मंदिराच्या भोवती दगडी चिरेबंदी भिंत आहे. एका बाजूस ओव-यात व नदीच्या बाजूस षट्कोनी आकाराचे दोन बुरूज आहेत. मंदिराच्या कळसावर दशावताराचे शिल्प आहे, ते आपले मन वेधून घेते. भातवडी या गावी १६२४ मध्ये जे युद्ध झाले त्या युद्धाने भातवडी गावाचे नाव शहाजीराजांच्या पराक्रमाशी जोडले गेले.
भातवडी येथील गढी अस्तित्वात नाही. तत्कालीन विस्तीर्ण तलाव मात्र तेथे पाहण्यास मिळतो.
– सदाशिव शिवदे
(सर्व छायाचित्रे सदाशिव शिवदे)
FORT NARNALA SARKHA DARWAJAA
FORT NARNALA SARKHA DARWAJAA DISTO SUNDER
अतिशयछान माहिती
अतिशयछान माहिती
Comments are closed.