दोन विनोदवीरांची जुगलबंदी!

0
89

आचार्य अत्र्यांप्रमाणेच शा.दादा कोंडके हे महाष्ट्रातील प्रख्यात विनोदवीर! हजरजबाबीपणात दादांचा हात धरू शकेल असा माणूस शोधून सापडणार नाही. दादांशी गप्पा मारायला जायच म्हणजे ते बोलतील ते सगळा वेळ ऐकायचं आणि पोट दुखेपर्यंत हसायचं! हसून हसून पोट दुखलं हे दादांशी गप्पा मारताना अनुभवायला यायचं!

‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचे प्रयोग त्यावेळी जोरात चालले होते. हा नाट्यप्रयोग म्हणजे दादांच्या हजरजबाबीपणाची कमाल होती. चालू घडामोडींवर दादांनी मारलेले टोमणे हे अनेकांना हसवून गेले तर अनेकांना पोटदुखी करून गेले. आचार्य अत्रे यांचा उल्लेख या नाटकात एकदा होत असे तर कोतवालाच्या लग्नप्रसंगात ‘मराठा’चा उल्लेख होत असे ते दोन प्रसंग असे-

राजा: काय हे! आमच्या राज्याचा कोतवाल एवढा आजारी आणि आम्हाला खबर नाही? प्रधानजी! राजवैद्यांना त्यांची प्रकृती दाखवायला सांगा.

प्रधान: दाखवली महाराज!

राजा: कोणाला?

प्रधान: आपले ते हे…(हवालदाराला उद्देशून) तू सांग रे!

हवालदार: (गोंधळतो) आपले ते हे…म्हणजे डॉक्टर लागू!

राजा: (आश्चर्याने) लागू? पण आमचे फॅमिली डॉक्टर कुलकर्णी असताना हे लागू कुठून आले?

हवालदार: आले नाहीत. अत्र्यांनी आणले.

यात हवालदाराची भूमिका दादा करायचे. त्यावेळी रंगभूमीवर आलेलं आचार्य अत्र्यांचं ‘डॉ.लागू’ हे नाटक जोरात सुरु होतं. त्यामुळे डॉ.लागू अत्र्यांनी आणले हे खरचं होतं.

नाटकाचा शेवटचा प्रसंग! कोतवालाचं मैनावतीशी लग्न होत आहे. तयारी करताना कोतवाल शिपायाला बाशिंग बांधायला सांगतो. शिपाई कोतवालाला बाशिंग बांधण्याऐवजी आपल्याच डोक्याला बांधू लागतो. कोतवाल ओरडून हवालदाराला ते दाखवतो-

कोतवाल: हे हवालदारऽऽ! हे येडं बघ, ए!

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या.(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस-चारसोबीस, ए दरवडेखोर हरामखोर….

आयला! बरं झालं सकाळी ‘मराठा’ वाचला.

यावर नाटयगृहात एक प्रचंड हास्यकल्लोळ उसळायचा. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांची विशेषणं प्रेक्षकांनी ‘मराठया’त वाचलेली असायची.

दादांच्या विनोदानं ‘पोटदुखी’ लागलेल्या कोणीतरी अत्र्यांकडे,”दादा कोंडके तुमची बदनामी करतो’ अशी चुगली केली. अत्र्यांनी वसंत सबनीसांना निरोप पाठवला ”जरा त्या कोंडक्याला माझ्याकडे घेऊन या.”

वसंत सबनीसांना विषय काय असावा त्याची कल्पना आली. कारण खूप दिवस आधीपासून ते दादांना समजावून सांगत होते.”दादा, तू अत्र्यांच्या नादाला लागू नकोस. त्यांनी भल्याभल्यांची चड्डी सोडली. आपण तर किस झाड की पत्ती,”

दादांनी सबनीसांचं बोलणं ही मनावर घेतलं नाही आणि टोमणे मारणं बंद केलं नाही. अत्र्यांचा निरोप आल्यावर वसंत सबनीस म्हणाले,” दादा. तुला सांगूनसुध्दा तू ऐकलं नाहीस. खा आता शिव्या, अत्र्यांनी मला तुला घेऊन बोलावलंय.”

दादा आणि सबनीस, दोघं ‘मराठा’च्या कार्यालयात पोचले. अत्र्यांच्या केबिनमध्ये गेले. पाठोपाठ चहा आला.

”बसा, सबनीस. चहा घ्या. आज काय काम काढलत?”
काही नाही. कोंडकेला घेऊन आलोय.”

” हेच का ते ? काय हो तुमच्या नाटकात तुम्ही आमची बदनामी करता.”

दादा अतिबेरकी! त्यांना अत्रे साहेबांना नाटकाच्या प्रयोगाला बोलवायचं होतं. ती संधी आयती चालून आली होती.

” साहेब! आपण आमचं नाटक बघायला या. तुम्हाला जर वाटलं की मी आपली बदनामी करतोय तर पुढच्या प्रयोगातून तो भाग गाळून टाकू.”

‘पुढच्याच प्रयोगाला येतो’ असं अत्र्यांचं आश्वासन घेऊन दादा आणि सबनीस तिथून निघाले.

प्रयोगाचा दिवस उजाडला. नाही म्हटलं तरी दादांच्या मनात चलबिचल चालू होती. दुरुन अत्रे  साजरे दिसले तरी त्यांच्याशी भेट झाल्यावर दादांची थोडी गडबड उडालीच होती.

गण, गवळण, बतावणी झाली. मध्यंतरात अत्र्यांनी आत जाऊन दादांना विचारलं, ”ते आम्हाला मारलेले टोमणे कधी आहेत?”

”ते वगात आहेत. वग पूर्ण बघायवाच लागेल आपल्याला त्यासाठी.” दादा.

झालं. वग सुरू झाला.’डॉ.लागू अत्र्यांनी आणले’ या विधानाला साहेबांनी हसून दाद दिली. साहेब नाटक पाहण्यात रंगून गेले.

शेवटचा प्रसंग आला. कोतवाल हवालदाराला उद्देशून म्हणाला ‘हे हवालदारऽऽ हे येडं बघ ए!”

हवालदार: थांबा! थांबा! मला चांगला राग येऊ द्या…(थोडं थांबून) ए हलकट, ए नालायक, ए पाजी, ए बदमाश, ए चोर, ए डाकू, ए डँबीस चारसोबीस, ए दरवडेखोर

हरामखोर… आयला! बरं झालं सकाळी मराठीतलं एक वृत्तपत्र वाचलं….

यावर अत्रे ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले ”ए गाढवा!! ‘मराठा’ म्हण” मग पुन्हा दादांनी ते वाक्य ‘मराठा’चा उल्लेख करून म्हटलं.

दादांनी ‘मराठा’चा उल्लेख करणं ही ‘मराठया’ची किंवा अत्र्यांची बदनामी नव्हती तर तो सन्मान होता. मग असा सन्मान अत्रेसाहेब कसा नाकारणार?

आचार्य अत्रे यांच्यामध्ये गुणग्राहकता होती, अत्र्यांनी आवर्जून ‘मराठा’चा उल्लेख करायला लावला हा जणू दादांसाठी आशीर्वादच ठरला!

About Post Author

Previous article‘मंत्रा’वेगळा आशुतोष गोवारीकर…
Next articleसंयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.