देशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन

11
42
_DeshpandeYanache_Deshatan_1.jpg

ते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी! बरे, त्यांनी भारताचा असा लांब-रुंद प्रवास एक-दोनदा नाही तर तब्बल चार वेळा केला आहे आणि हो… ते एक्क्याऐंशी वर्षांचे आहेत. ते ठाण्याचे सुबोध देशपांडे.

माणसाच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा वाढत्या वयात कमी होत जातात असा साधारण प्रत्येकाचा समज असतो. त्याने एखादा संकल्प केला तरी तो पूर्ण होण्यासाठी शरीर साथ देईल याची खात्री नसते. त्यामुळे अनेक वयस्कर मंडळी सरळ सोप्या वाटा निवडतात. ते मनोमनी मावळतीचा प्रवास मान्य करत असतात. पण प्रत्येकाचे तसे नसते. अशीही काही उदाहरणे असतात, की ज्यांना पाहून वय त्यांच्यासमोर लोटांगण घालत असते. तसे ते गृहस्थ म्हणजे ठाण्याचे सुबोध देशपांडे.   

ते त्यांचा मुलगा सर्वेश्वर व त्यांची सून शिल्पा यांच्यासोबत पाचपाखाडी भागात राहतात. देशपांडे ठाणे येथील मो.ह. विद्यालयामध्ये ‘बॉटनी’ विषयाचे शिक्षक होते. त्यामुळे त्यांना मुंबईचा ‘टिपिकल’ लोकलप्रवास रोज कामावर जाण्यासाठी करावा लागला नाही. तरी त्यांना रेल्वेबद्दल मात्र फार कुतूहल वाटायचे. पूर्वी, ते ठाणे स्टेशनजवळील आनंदनगर येथे राहायचे. ते शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडत. तेव्हा त्यांचा मुलगा सर्वेश्वर याला बरोबर घेऊन जात. त्यांच्या सोसायटीशेजारून जाणारे रेल्वेचे रूळ त्यांना खुणावत असत. रुळांपाशी जाऊन येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन पाहत राहणे हा त्यांचा विरंगुळ्याचा भाग होता. मुलगा सर्वेश्वरही तेथे रमत असे. त्यांच्या त्या ओढीतून त्यांना रेल्वेबद्दल वाटणारे आकर्षण अधिक खोल होत गेले.

देशपांडे यांचा मो.ह. विद्यालयात दहा ते बारा शिक्षकांचा गट होता. ते दरवर्षी दोन सहली, त्यासुद्धा प्रामुख्याने रेल्वेने करत असत. त्यांना रेल्वेत कितीही काळ काढला तरी कंटाळा येत नाही असा अनुभव आला. त्यांचे प्रवासात नुसते खिडकीतून बाहेर पाहत तासन् तास निघून जात असत. त्याच बरोबर मनात चित्र तयार होई बाहेरच्या निसर्गाचे, सोबतच्या प्रवाशांचे. तो चित्रपटच जणू . त्यांच्या मनाने, कल्पनेने रेखाटलेला. त्यातूनच त्यांचा गाडीत जास्तीत जास्त वेळ राहण्यासाठी सर्वात लांबचा पल्ला कोणता त्याचा शोध सुरू झाला. त्या शोधातून ‘हिमसागर एक्स्प्रेस’ या गाडीचे नाव पुढे आले. ती गाडी कन्याकुमारी ते जम्मू म्हणजे संपूर्ण उभा भारत पादाक्रांत करते. देशपांडे यांनी त्या गाडीचे नाव, त्यांचा मुलगा सर्वेश्वर जो तेव्हा दहा वर्षांचा होता, याला सांगितले. त्यालाही रेल्वेबद्दल कुतूहल असल्याने त्याने रेल्वेच्या वेळापत्रकातून त्या गाडीचा संपूर्ण मार्ग शोधला व त्याने त्या गाडीतून प्रवास करण्याची इच्छा त्याचे वडील सुबोध देशपांडे यांच्याकडे व्यक्त केली. दिवसामागून दिवस पुढे पुढे जात राहिले, पण त्याला शाळा-क्लासेसमुळे मोकळा असा वेळ कधी मिळालाच नाही.

बघता बघता देशपांडे सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर, ते त्यांच्या काही शिक्षक मित्रांना महिन्यातून एकदा भेटत असत. तेव्हा गप्पागोष्टी चालू असताना, एके दिवशी देशपांडे यांनी, ‘हिमसागर एक्सप्रेस’मधून प्रवास करण्याचा विषय त्यांच्या मित्रांसमोर मांडला. त्या सहलीचा उद्देश स्थलदर्शन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खरेदी करणे असा नसून रेल्वेतून निव्वळ प्रवास करणे एवढाच आहे असे सांगितले. बहुतेक सर्वांना ती कल्पना वेडेपणाची वाटली. ही कसली सहल? असे म्हणत एकेकाने त्यांच्या बरोबर जाण्यास नकार दर्शवला. मात्र त्यांच्यातील त्यांच्यासारखाच दुसरा ‘वेडा’! अविनाश बर्वे यांना ती कल्पना आवडली. बर्वेही मो.ह. विद्यालयात शिक्षक होते. ते गेली तीस वर्षें मतिमंदांसाठी काम करत आहेत. ते डोंबिवली येथील खोणी गावात ‘अमेय पालक संघटना’ ही संस्था चालवतात. ते मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करण्यासाठीचे वसतिगृह आहे. बर्वे यांनी अधिकतर मैत्रीखातर देशपांडे यांच्यासोबत जाण्यास होकार दिला.

मोहीम पक्की झाली. देशपांडे आणि बर्वे यांनी ‘हिमसागर एक्सप्रेस’ने कन्याकुमारी ते जम्मू असा प्रवास केला. तो प्रवास कल्पनेपेक्षा कितीतरी पटींनी रोमांचक होता असे देशपांडे सांगतात. खिडकीतून बाहेर पाहत जसजशी भारतातील राज्ये बदलत होती, तसतशी तेथील माणसे, त्यांच्या चालीरीती; तसेच, तेथील स्टेशने- त्यांवरील बाजार, अन्नपदार्थ अशी सारी संस्कृती बदलत होती. जणू एखादा चित्रपट पाहवा तसाच तो अनुभव होता. फरक फक्त एवढा, की तेथे डोळ्यासमोरून जाणारे प्रत्येक चित्र अगदी खरेखुरे होते आणि तोच त्यातील सर्वात आनंद देणारा भाग होता. खरीखुरी माणसे, खऱ्याखुऱ्या जागा व तशाच वस्तू निरखताना, त्यांना जाणून घेताना अनोखा आनंद होत होता. त्यांना आनंदाचे क्षण जमा करत असताना, एक दु:खद घटनाही त्यावेळी पाहण्यास मिळाली. ‘हिमसागर एक्सप्रेस’च्या मार्गात लग्नाचे वऱ्हाड नेणारी एक कार आली आणि भीषण अपघात घडला. अपघातात एक लहान मुलगा वगळता सर्व वऱ्हाडी मृत्युमुखी पडले. ती घटना आठवली, की अजूनही अंगावर काटा येतो, असे देशपांडे म्हणाले.

देशपांडे यांची अनेक गोड तर काही कटू आठवणी सोबत घेऊन पहिली मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. देशपांडे आणि बर्वे यांना स्वस्थ बसवेना. पुन्हा कोठे तरी जावे हा विचार डोक्यात चालू असताना, त्यांनी उभा भारत तर झाला आता आडवा भारतही फिरावा असे ठरवले. त्यातूनच मग त्यांनी गुवाहाटी (पूर्व टोक) ते ओखा (पश्चिम टोक) असा आडव्या भारताचा प्रवास ‘द्वारका एक्स्प्रेस’ने केला. ओखा येथे पोचल्यावर तेथील स्टेशन मास्तरांशी भेट घडली. देशपांडे यांच्या त्या आगळ्यावेगळ्या प्रवासाची कहाणी ऐकताना स्टेशन मास्तरांनाही त्यांचे कौतुक वाटले. वयाच्या त्या टप्प्यावर भारत भ्रमणासाठीचा त्यांचा तो उत्साह सर्वांनाच भारावून टाकतो. देशपांडे आणि बर्वे यांच्या त्याच उत्साहाला खतपाणी देत, स्टेशन मास्तरांनी दिब्रुगढ ते कन्याकुमारी हा मार्ग भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा प्रवास आहे हे सांगितले. ‘विवेक एक्स्प्रेस’ असे त्या ट्रेनचे नाव आहे. ती एक्स्प्रेस चार हजार दोनशेत्र्याहत्तर किलोमीटरचा म्हणजेच चौऱ्याऐंशी तासांचा पल्ला पार पाडते. देशपांडे-बर्वे यांचे नियोजन लागलीच सुरू झाले. पाहता पाहता, ती मोहीमही फत्ते करण्यात आली.

काही दिवसांनी त्यांचा मुलगा सर्वेश्वर याने सर्वात उंचीवर जाणारी ट्रेन शोधून काढली. तिचे नाव ‘स्वराज्य एक्स्प्रेस’. ती बांद्रा टर्मिनस ते कटरा अशी धावते. देशपांडे-बर्वे दुकलीने तो प्रवास करण्याच्या कल्पनेवरही शिक्कामोर्तब केले आणि त्यांची ती चौथी मोहीमही यशस्वीरीत्या पार पडली.

सुबोध देशपांडे यांनी या चार मोहिमांत एकूण एकोणतीस हजार सातशेएकोणचाळीस किलोमीटरचा आणि पाचशेसत्त्याहत्तर तासांचा प्रवास ट्रेनने केला आहे. ते प्रवासात खिडकीच्या बाहेर निसर्ग पाहत, बर्वे यांच्याशी जुन्या आठवणींना उजाळा देत अगदी सहज होऊन जातो असे सांगतात. त्यांना एवढ्या प्रवासानंतर एक गंमत सतत जाणवते, की प्रदेश वेगळे, माणसे वेगळी, रीतीभाती वेगळ्या तरी स्टेशनांवरील कोलाहल, लगबग, उत्कंठा, चिंता अशा भावभावना सर्वत्र त्याच असतात! ते एका ठिकाणाहून दूरवरच्या दुसऱ्या ठिकाणी पोचल्यावरही ‘अरेच्या प्रवास लवकर संपला की’ असे त्यांनी एकमेकांना म्हटल्याचे आवर्जून सांगतात, त्यातच त्यांचे ट्रेन प्रवासाबाबतचे अतोनात प्रेम दिसून येते. तेच प्रेम निरंतर अनुभवण्यासाठी पुढच्या प्रवासाचा साधारण आराखडा देशपांडे यांच्या मनात तयार झालेलाच आहे. फक्त आता त्याचे नियोजन ठरले, की ते निघाले!

मुंबईतील मुंबईत लोकलने फिरताना ट्रेन मध्येच दोन-चार मिनिटे थांबली तरी प्रवाशांची चुळबुळ सुरु होते, चिडचिड होते. अशात प्रवासाचा इतका मोठा पल्ला वयाच्या त्या टप्प्यावर पार करणारे सुबोध देशपांडे, त्यांच्या या निराळ्या आवडीमुळे विशेष आणि विलक्षण वाटतात.

सुबोध देशपांडे – 97020 29175

– अनिश गांधी

About Post Author

11 COMMENTS

  1. खुप छान आणि अभिनंदन
    खुप छान आणि अभिनंदन

  2. आदरणीय आणि वंदनीय असे दोन…
    आदरणीय आणि वंदनीय असे दोन गुरु माझे शिक्षक होते याचा मला अभिमान आहे.

  3. ver6 niceartice..I have…
    ver6 niceartice..I have forwarded it to mr.Avinash Vaidya who wrote book on Railway and He is also Railway lovet

  4. सुबोध देशपांडे शाळेतील…
    सुबोध देशपांडे शाळेतील मुलांचे लाडके शिक्षक होते.

  5. आम्ही आयोलित केलेल्या…
    आम्ही आयोलित केलेल्या काश्मीर सहलीत देशपांडे सर सहभागी झाले होते तेंव्हा प्रवासाप्रति असलेला त्यांचा उत्साह मी अनुभवला आहे

  6. Our teachers have brought a…
    Our teachers have brought a new attitude to follow for their students. We learned a lot from them in their teaching days. However lessons continue. Hemant Ranadive.

  7. तुमचे अफाट साहस खरोखर कौतुक…
    तुमचे अफाट साहस खरोखर कौतुक करण्यासारखेच आहे आणी टे ह्या वयात. मीही तुमच्या सारखा रेल्वे प्रेमी आहे.

  8. तुमचे मनापासून अभिनन्दन या…
    तुमचे मनापासून अभिनन्दन या वयात एवढा प्रवास. मीही तुमच्या सारखा रेल्वे प्रेमी आहे जमल्यास तुमचा फोन न कळवा
    २.७.१८

Comments are closed.