मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदिवाळी किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.
त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.
मणीसूर-मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यापूर्वी श्रीशंकराने ‘मार्तंड भैरव’ अवतार धारण केला. त्या युद्धात विजयासाठी त्याच दिवशी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा चढवत होते. सरतेशेवटी शंकराचा विजय झाला. म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला, त्यावर चंपा फुलांची वृष्टी केली तो दिवस शुद्ध षष्ठीचा होता. म्हणून चंपाषष्ठीला नवरात्र उठते अशी कथा त्यामागे सांगितली जाते.
नैवेद्याला ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पुरणपोळी करतात. गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ व गूळ हे पदार्थ एकत्र करून त्यांचा दिवा करतात व त्यात फुलवात लावतात. नैवेद्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे ठेवून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असे म्हणून ताम्हण तीनदा उचलतात. त्यालाच ‘तळी भरणे’ असे म्हणतात. ताम्हण उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात. दिवटी-बुधली घेऊन आरती केल्यानंतर देवळाच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व पुन्हा भंडारा उधळतात. नंतर दिवटी दूधाने शांत करतात. नैवेद्य झाल्यावर कुत्र्यासही घास देतात. चातुर्मासात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना, नंदादीप, खंडोबाची पूजा, मल्हारी माहात्म्याचा पाठ, एकभुक्त राहणे, शिवलिंगाचे दर्शन, सवाष्ण-ब्राह्मण भोजन, भंडारा उधळणे इत्यादी गोष्टी करतात. चातुर्मासात वर्ज्य केलेले वांगे चंपाषष्ठीपासून खाण्यास सुरुवात करतात.
खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत आहे त्यांच्याकडे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे नवरात्र असते. काहींकडे पंचमीच्या दिवशी बाजरीच्या पिठाचे पाच दिवे व दोन मुटकी करून देवाला ओवाळतात. नंतर तेच दिवे देवासमोर जी बाजरीची रास केलेली असते त्यावर ठेवतात. चंपाषष्ठीला देवांची पूजा करून नैवेद्य दाखवतात व नंतर नवरात्र उठते. त्या सहा दिवसांत मल्हारी माहात्म्य या ग्रंथाचे वाचन करतात.
त्या महिन्यातील मोक्षदा एकादशीलाच गीता जयंती असते. गीता हे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. तो दिवस गीतेचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. त्या दिवशी गीतापठण करतात. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर जग्दगुरू दत्तात्रयांचा अवतार झाला. त्या दिवशी दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. काही ठिकाणी कुलाचाराप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत दत्तनवरात्र असते. त्या काळात उपासना म्हणून कोरडी भिक्षा मागणे, सत्यदत्तपूजा करतात. दत्तजयंतीपूर्वी सात दिवस आधी श्रीगुरुचरित्र पारायणास सुरुवात करतात. दत्तजयंतीच्या दिवशी उपवास करून दत्तजन्मोत्सव करतात. काही ठिकाणी दत्तजन्म माध्यान्ही किंवा संध्याकाळी साजरा करतात. ठिकठिकाणी मोठी यात्राही भरते. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबात विशेष करून मराठवाड्यात मार्गशीर्षातील अमावास्या ही ‘वेळ अमावास्या’ म्हणून साजरी करतात. काही ठिकाणी त्यामचा उच्चावर ‘वेळा अमावस्या्’ असा केला जातो. वेळ म्हणजे खरा मूळ कानडी शब्द ‘येळ्ळ’ म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या. त्या दिवशी शेतीकामास लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूजा करतात. सकाळी ज्वारी-बाजरीचे उंडे, पुरणपोळी सर्व भाज्या मिळून केलेली एकच भाजी व एका रंगवलेल्या माठात आंबिल असे सर्व साहित्य घेऊन सगळा परिवार स्वत:च्या शेतात जातो. डोक्यावरील घोंगड्यावर आंबिलीचा माठ ठेवून कुटुंबप्रमुख संपूर्ण शेताला प्रदक्षिणा घालतो. त्यावेळी बाकीची मुले ताटली वाजवत त्याच्यापुढे असतात. नंतर सोबत आणलेल्या पदार्थांपैकी थोडे पदार्थ एकत्र करून शेतावर शिंपडतात. ‘हर हर महादेव, हरमला भगत राजो’ असे म्हणत एका झाडाखाली आंबिलीच्या माठाची पूजा करून सर्वजण आनंदाने जेवायला बसतात. ज्यांची शेती नाही अशा गावकऱ्यांना त्यावेळी आवर्जून बोलावतात. जेवणानंतर आंबिलीचा माठ खड्ड्यात पुरतात. पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून त्यावर पाच खडे ठेवून त्यांची पूजा करतात. एकूणच ते सगळे दिवस सुखा-समाधानाचे आणि समृद्धीचे. वातावरणातही गारठा वाढू लागलेला असतो, कामानिमित्त दूरवर गेलेले गणगोत दसरा-दिवाळीसारख्या सणांचे औचित्य साधून एकत्र येतात, परत जातात ते आनंदाची शिदोरी घेऊनच!
– अनिता कुळकर्णी
(आदिमाता दीपावली विशेषांक २०१५ वरून उद्धृत)
Very good information
Very good information
Comments are closed.