दुसर्यांच्या पैशाने उद्योग व्यवसाय करून माणसास यशस्वी होता येते! – हा मंत्र सांगितला आहे, यशस्वी उद्योजक सुरेश हावरे यांनी. त्यांनी ‘उद्योग तुमचा…. पैसा दुसर्याचा’ या पुस्तकात ते गुपित उलगडून दाखवले आहे.
सुरेश हावरे हे नागपूर विद्यापीठाचे केमिकल इंजिनीयर (बी.टेक.) आहेत. त्यांनी बीएआरसी ट्रेनिंग स्कूलमधून न्यूक्लिअर इंजिनीयरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. ते मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. करत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात सिनियर न्यूक्लिअर सायण्टिस्ट म्हणून सत्तावीस वर्षें नोकरी केली. त्यांनी मानसन्मान मिळवलेले आहेत. ते नवी मुंबईतील ‘हावरे ग्रूप ऑफ कंपनीज’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
हावरे म्हणतात, वीस वर्षांत जे अनुभवले, उद्योजक झाल्यानंतर ज्या अडचणी आल्या त्यावर मात करून, बरेच काही शिकलो, ते सर्व अनुभव या पुस्तकाद्वारे वाचकांना कथन करण्यात येत आहेत. त्याद्वारे उद्योग हा दुस-यांच्या पैशांवरच करायचा असतो, ही नवी दृष्टी जनमानसाला देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
‘दुसर्याचा पैसा म्हणजे काय ते स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे, की माणसाच्या अवतीभवती, नातेवाईकांमध्ये, शेजारी अथवा मित्रमंडळींमध्ये असे अनेक लोक असतात, की ज्यांच्याकडे भरपूर नाही, पण थोडेथोडके पैसे आहेत. माणसाने त्याची उद्योगाची योजना मांडली व त्यांना ती फायदेशीर वाटली तर ते त्यांचा पैसा त्याच्या उद्योगात टाकू शकतात. परंतु त्यांना त्यांचा पैसा सुरक्षित राहील याची हमी हवी असते. त्यांना ती सुरक्षितता वागण्या-बोलण्यातून, दैनंदिन व्यवहारातून आढळली पाहिजे. त्यांना प्रॉमिसरी नोट, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, करार, अॅफिडेव्हिट वा अन्य प्रकारेही देता आली पाहिजे. तसेच, त्यांना नफ्याचा किती हिस्सा मिळेल हे ठरवून देता आले पाहिजे.
उद्योजकाचा विश्वास उद्योग प्रामाणिकपणाने करता येतो व तो मोठाही करता येतो यावर असला पाहिजे. त्याने ती बाब सुरुवातीपासून मनात ठसवून ठेवली तर त्याचा त्याला चांगला फायदा निश्चितपणे होईल असे हावरे यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योग ही कृती नसून वृत्ती आहे. कोणत्याही उद्योगाच्या संदर्भात कृती ही नंतरची पायरी आहे. कृती करण्यापूर्वी उद्योग हा मनात भिनलेला असायला हवा. त्यामुळे वृत्ती उद्योगाला अनुकूल बनेल. कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणे महत्त्वाचे असते. ती कोठे होते ही गोष्ट गौण असते. ध्येय निश्चित असेल आणि कार्यपद्धत प्रामाणिक असेल तर कोठूनही आणि कशीही सुरुवात झाली तरी त्या गोष्टीची यशसिद्धी ठरलेली असते. काय करायचे हे मनात ठरवल्याशिवाय कोणी काही करू शकणार नाही आणि मनातील निर्णय पक्का झाल्यानंतर मुहूर्ताची वाट बघत बसले तर हातून काहीच होणार नाही, याकडेही पुस्तकात लक्ष वेधण्यात आले आहे.
आयुष्यात मोठे होण्यासाठी नशीब लागते ही मोठी गैरसमजूत लोकांमध्ये असते. ते स्पष्ट करताना हावरे यांनी म्हटले आहे, की प्रयत्न कमी पडणे हे अपयशाचे मुख्य कारण आहे. कोठलीही गोष्ट काहीतरी केल्याशिवाय मिळत नाही. पण अनेकांना ती वस्तुस्थिती समजून घेण्याऐवजी अपयश गोंजारत बसण्यास आवडते. शिवाय, बर्याच जणांना त्यांचा स्वतःच्या आवाक्याबाबत न्यूनगंड असतो. तथापि, प्रत्येकाचा आवाका हीसुद्धा मानसिक स्थिती असते. प्रत्येकाने ठरवले तर आवाका वाढवता येतो. अडचणींच्या किंवा संकटाच्या क्षणी माणूस त्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त काम करून जातो. म्हणून उद्योजकाने स्वत:चा आवाका किती आहे हे समजून घेतले पाहिजे. उद्योजकाला नशिबाने काही मिळत नाही. ते त्याला झगडून मिळवावे लागते. जेथे कर्तृत्व संपते तेथून नशीब सुरू होते! म्हणजे हाती आहे ते सगळे करून झाले, की पुढच्या कार्यभागाला नशिबावर अवलंबून राहण्यास हरकत नाही. बर्याच गोष्टी अशा असतात, की ज्या व्यक्तींच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या असतात. त्यात काय घडेल हे ती व्यक्ती सांगू शकत नाही. म्हणून त्याला नशीब म्हणायचे एवढाच नशिबाचा अर्थ आहे.
हावरे यांनी उद्योजकाने माणसे ओळखण्यास शिकले पाहिजे हा मुद्दा ठासून मांडला आहे.
जॉन कोलासो
(मूळ प्रसिद्धी – जनपरिवार, 18 मे २०१५)