दुलिपसिंग
हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्माचा प्रसार पंधराव्या शतकापासून सुरू झाला. मात्र ज्या ब्रिटिशांनी हिंदुस्तानावर दीडशे वर्षे राज्य केले, त्या ब्रिटिश सरकारने व त्यांचे पूर्वसुरी ईस्ट इंडिया कंपनी यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराला अधिकृत रीत्या पाठिंबा देणे फार उत्साहाने कधी केले नाही. ब्रिटिश सरकारची व समाजाची सुसंस्कृतता तेथे दिसते. ब्रिटिश मिशनऱ्यांकडून कृष्णपाल या सुताराचे ख्रिस्ती धर्मात प्रवेश करणे घडले ते 1800 साली. ते पहिले धर्मांतर झाले; त्या अगोदरची सात वर्षे डॉ विल्यम केरी हे प्रसिद्ध मिशनरी गृहस्थ एत्तद्देशीय जनतेस ख्रिस्ती धर्मात घेण्यासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना भारतीय जनतेचे मन वळवण्यात यश आले नव्हते. म्हणून कृष्णपालच्या धर्मांतरास महत्त्व. कृष्णपालचे आत्मचरित्र – ख्रिस्ती धर्मप्रवेशाचे इतिवृत्त असलेले कथन -प्रकाशितही झाले आहे. कृष्णपाल यांच्या मनावर ‘ते पापी आहेत’ असे बिंबवून आणि त्या पापातून फक्त येशू त्यांना तारू शकतो असे ठसवून ते (!) धर्मांतर झाले हे त्याचे वैशिष्ट्य. त्या प्रथम ‘पालक शरणार्थी’चे स्वागत आणि गाजावाजा भरपूर झाला.
मी ज्या धर्मांतराची माहिती येथे लिहीत आहे ते मात्र घडले फतेहगड या उत्तर भारतातील शहरात आणि पूर्ण विचारांती. धर्मांतर करणारा मुलगा होता दुलिपसिंग – पंजाबचाशेवटचा राजा रणजितसिंग याचा मुलगा. तो स्वेच्छेने ख्रिस्ती झाला. रणजितसिंग 1839 साली मरण पावला. तो स्वेच्छेने ख्रिस्ती झाला. रणजितसिंग 1839 साली मरण पावला. तेव्हा दुलिपसिंग केवळ दहा महिन्यांचा होता. रणजितसिंग यांच्या सहा औरस आणि अनौरस मुलांपैकी तो सर्वात धाकटा. रणजितसिंग यांनी ईस्ट इंडिया कंपनीशी मैत्री करार 1809 साली केला. नंतरची पंचवीस-तीस वर्षे पंजाबात फार कलहाची गेली. स्थानिक राजे-सरदार यांच्यात धुसफुस होत राहिली, त्यांना नियंत्रणात ठेवणारे ब्रिटिश सर्वसत्ताधीश होते. छोट्यामोठ्या राजांनी एकत्र येऊन दुलिपसिंग याला 1843 साली गादीवर बसवले. त्यांनी ब्रिटिशांच्या कुरापती काढणे थांबवले नाही. अखेर, दोन शीख – ब्रिटिश लढाया 1845आणि 1846 मध्ये झाल्या. ब्रिटिशांनी सर्व राजांचा पराभव केला आणि संपूर्ण पंजाब प्रांतावर कब्जा प्रस्थापित केला. त्यांनी घोषित केले, की सर्व राज्यांचे – त्यात राजा, त्याचा खजिना, इस्टेट, यांचाही समावेश होता – मालक ब्रिटिश आहेत. राजा दुलिपसिंग याला कोणतेही अधिकार नाहीत. त्याचे रक्षण, पालन पोषण, त्याचा ‘विकास‘ ही जबाबदारी ब्रिटिशांची राहील! त्यावेळी‘राजा‘ लाहोरच्या किल्ल्यात राहत होता. त्याची मालकी आणि जबाबदारी एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडे – जॉन लॉगिन यांच्याकडे सोपवण्यात आली. लॉगिन यांच्या पत्नीने एक मोठे पुस्तक लिहिले आहे Sir John Login and Duleepsingh. दुलिपसिंग याच्या धर्मांतराची कहाणी त्याच पुस्तकात आहे.
दुलिपसिंग वयाच्या दहाव्या वर्षी सत्ताविहीन अवस्थेत पंजाबचा नाममात्र राजा झाला. राज्याची संपत्ती अफाट होती, पण त्यावर त्याचा अधिकार कणभरही नव्हता. भाऊ, चुलते आणि अन्य मोठी माणसे त्याच्या नजरेसमोर अंतर्गत लढायांत मारली गेली होती. थोडी वाचली होती ती ब्रिटिशांबरोबरच्या लढायांत कामास आली. त्याच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या लॉगिन यांनी त्यांची जबाबदारी निष्ठेने पार पाडली. थोड्याच काळात ते दुलिपसिंग याचे मित्र बनले. लॉगिन यांची पत्नी इंग्लंडमध्ये होती आणि ते तिला दुलिपसिंगबद्दल वेळोवेळी लिहीत असत. त्यांच्याकडे लाहोरच्या किल्ल्याची मालकी (त्यात राहणाऱ्या दुलिपसिंग याच्यासकट) आली (6 एप्रिल 1849). त्यांची काही पत्रे त्यांचे दुलिपसिंग बरोबरचे नाते मनोज्ञपणे दर्शवतात.
10-4-1849 — ”बिचारा गरीब मुलगा! आत्ता तरी वाटते की तो माझ्यावर खूश आहे. तोही अगदी कोणालाही आवडावा असाच आहे. मला वाटते, आम्ही दोघे एकमेकांना कायम आवडत राहू.”
”सध्या तो अभ्यास पर्शियन आणि इंग्रजी भाषांचा करत आहे. त्याला आवड चित्रे काढण्याची आणि रंगवण्याची आहे. तू मला त्याच्यासाठी पुढील गोष्टी पाठव – रंगपेटी, चित्रे कशी काढावी हे शिकवणारे एखादे पुस्तक. त्याला नियमित स्वरूपाचा शिक्षक मिळेपर्यंत ते आवश्यक आहे.”
20-4-1849. —”माझ्या पाल्याबरोबर माझे छान जमले आहे. त्याच्या खोलीत सरळ जाता यावे म्हणून मी एक दरवाजा करून घेतला आहे. थोडेसे वाकून जाऊन, त्यातून गेल्यावर एका कट्ट्यावरून उडी मारली, की मी परत माझ्या खोलीत पोचतो. काल आम्ही तसे आलो. मी आत शिरलो, त्याने माझ्या पाठोपाठ उडी मारली आणि म्हणाला – ‘मला पकड.’
जॉन लॉगिन |
दुलिपसिंग याचा वाढदिवस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आला. लॉगिन यांनी तो साजरा करण्याचा बेत केला. त्यासाठी वरिष्ठांना विश्वासात घेतले. ”त्याला सदिच्छा देण्यासाठी एक छोटी पार्टी आयोजित करणे उचित होईल असे वाटत नाही का? फार मोठी नसेल, पण जास्तीत जास्त मुले आली तर त्याला खूप बरे वाटेल. थोडा सुसंस्कृतपणा आणि त्याच्याकडे लक्ष दिले तर आपल्या दोघांची प्रतिमा चांगली उजळेल.”
त्यांनी वाढदिवसाची हकिगत पुढील पत्रात सांगताना लिहिले – ”तो खूप छान दिसत होता. मी जेव्हा त्याला तसे म्हटले, तेव्हा तो निरागसपणे उद्गारला, ‘गेल्या वाढदिवसाला मी माझ्या दंडावर ‘कोहिनूर‘ हिरा घातला होता.‘ (कोहिनूर हिऱ्याची मालकी आता ब्रिटिशांकडे आली होती.)
(लॉगिन आणि दुलिपसिंग यांच्यातील नातेसंबंधांचे प्रसंग वाचताना आणि त्यावरील लॉगिन यांच्या टिप्पणी वाचताना, हेन्रीच हारेर व चौदावे दलाई लामा यांच्यातील संबंध कसे विकसित होत गेले ते सांगणाऱ्या पुस्तकाची आठवण अपरिहार्यपणे होत होती. त्या दोन घटनांमध्ये शंभर वर्षांचे अंतर आहे. पण सभोवतालची परिस्थिती सारखीच आहे. दलाई लामा एका साम्राज्याचे भावी सम्राट होते, तर दुलिपसिंग एका निसटलेल्या राज्याचा नामधारी राजा होता; दलाई लामा यांचे साम्राज्य चीनने बळकावले नव्हते, पण ते वयात येईपर्यंत त्यांना प्रशासनिक अधिकार नव्हते. दोघांनाही बाहेरच्या जगाचे सामान्य ज्ञान नव्हते आणि दोघांनाही त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हेन्रीच याचा संबंध दलाई लामा यांच्याशी दीर्घकाळ आल्याने तो त्यांच्याशी घट्ट जोडला गेला. लॉगिन यांच्याशी तेवढेच घनिष्ट संबंध दुलिपसिंग याचे नंतर जुळले).
अशा या दुलिपसिंग याला ख्रिस्ती धर्माबद्दल ओढ वाटू लागली. त्याच्या English Instructor या पुस्तकाच्या अखेरीस काही पाने ख्रिस्ती धर्माची तत्त्वे सांगणारी होती. त्या पानांच्या वाचनानंतर दुलिपसिंग याच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल उत्सुकता जागृत झाली. त्याने बायबल वाचण्याची इच्छा प्रगट केली. सामान्यपणे अशी मागणी एखाद्या गैरख्रिस्ती मनुष्याने करावी यासाठी मिशनरी लोकांना त्यांचे कौशल्य वापरावे लागत असे. येथे मात्र ती मागणी आपणहून केली गेली तरी ती पुरी करावी की नाही अशा संभ्रमात ब्रिटिश अधिकारी पडले होते!कारण? ब्रिटिशांनी जिंकलेल्या एका राज्याच्या पदच्युत राजाला संरक्षण देण्याचा आणि त्याचे संगोपन करण्याचा आव आणला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याच्या मार्गावर जाण्यासाठी दबाव टाकला असा ठपका लागण्यास नको! ब्रिटिश वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कल तशी सावध भूमिका घेण्याकडे असे. अखेर, ती परवानगी मिळाली. दुलिपसिंग बायबल वाचू लागला.
लॉगिन यांचे एक पत्र ‘लॉगिन आणि दुलिपसिंग’ या पुस्तकात पृष्ठ 257 वर आहे. ते म्हणतात – ”दुलिपसिंगाच्या मनात त्याने त्याच्या नजरेसमोर त्याच्या काकांचा वध शीख सैनिकांनी केल्याचे बघितल्यापासून, त्याच्या देशबांधवांबद्दल एक प्रकारची भीती आणि सैनिकांच्या धर्माबद्दल नापसंतीची भावना रुजली आहे. त्याला त्याच्या धर्माची मूलतत्त्वे समजावून सांगण्याबद्दल आवश्यक ती काळजी गेल्या कित्येक वर्षांत घेतली गेली नाही असे दिसते.”
मात्र कंपनी सरकार सावध भूमिका घेत होते, ती केवळ धार्मिक बाबतीत नाही तर इतर बाबतींतही. दुलिपसिंग याने इंग्लंडला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली. लॉगिन यांनी ती लॉर्ड डलहौसी यांच्या कानावर घातली. त्यांनी म्हटले, की या वेळी, त्याची विद्यार्थीअवस्था चालू असताना तो (दुलिपसिंग) जर इंग्लंडला गेला, तर तो स्वखुशीने गेला असे होणार नसून त्याला मुद्दाम धाडले गेले आहे असे लोक समजतील. आपल्या वर्तुळातही, दुलिपसिंग प्रौढ झाल्यावर त्याला इंग्लंडला पाठवले तर ते उचित समजले जाईल.”
दुलिपसिंग याचा ख्रिस्ती धर्माकडे ओढा वाढू लागला. लॉगिन हे त्यांची पत्नी इंग्लंडहून आली तेव्हा तिला आणण्यास कोलकात्याला गेले असताना, दुलिपसिंग याने ख्रिस्ती धर्मात प्रवेश करण्याची इच्छा प्रगट केली. लॉगिन यांच्या जागी तात्पुरते काम बघणाऱ्या अधिकाऱ्याने ते त्यांना कळवले. दुलिपसिंग यांचा एक सेवक भजनलाल याने तीन पानी पत्र लॉगिन यांना पाठवले. त्यात त्याने सविस्तरपणे लिहिले, की दुलिपसिंग याच्या मनात ख्रिस्ती धर्माविषयी ओढ कशी वाढत गेली आहे आणि त्याला हिंदू पंडितांनी सांगितलेल्या ‘शास्त्रार्था’च्या उणिवा कशा जाणवत गेल्या! लॉगिन यांनी डलहौसी यांना पत्र पाठवून कळवले होते, की दुलिपसिंगाने चंद्रग्रहणाची शास्त्रीय स्थिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि असे उदगार काढले होते, “मी दोन-तीन वर्षांत पुरेसे ज्ञान प्राप्त करून घेईन आणि पंडित लोक जे शास्त्र म्हणून सांगतात त्यांना चक्रावून टाकीन.”
दुलिपसिंग याच्याबद्दल स्वतः लॉगिन यांनी सर्व प्रकारे खात्री करून घेण्याचे ठरवले. त्यांनी अन्य काही अधिकाऱ्यांना दुलिपसिंगाशी संवाद साधून त्याने प्रगट केलेली धर्मांतराची इच्छा ही त्याच्या एखाद्या भावनेचा उद्रेक नाही ह्याची खातरजमा करून घेतली. दुलिपसिंग याने स्वतः त्याचा ब्राह्मण सेवक त्याला बायबल वाचून दाखवतो असे लॉगिन यांना कळवले होते. डलहौसी यांनी बायबल वाचनाची परवानगी देतानाही सूचना दिल्या होत्या, की त्या गोष्टीचा गवगवा होणार नाही याची काळजी घेतली जावी. मात्र तरी धर्मांतराचा प्रस्ताव सहज स्वीकारला गेला नाही.
दुलिपसिंग याला बाप्तिस्मा करून घेण्यासाठी एक ‘अर्ज‘ करावा लागला. डलहौसी यांनी इतरांशी चर्चा केली. जेव्हा सर्वांचे मत अनुकूल झाले तेव्हा त्यांनी लॉगिन आणि दुलिपसिंग यांना स्वतंत्र पत्रे लिहून बाप्तिस्मा करण्यास हरकत नसल्याचा निर्णय कळवला. डलहौसी यांनी लॉगिन यांना लिहिलेल्या पत्रात सूचना दिल्या – “बाप्तिस्मा देण्याचा समारंभ घरीच केला जावा. गुप्तता नको, पण उच्छाद होईल अशी प्रसिद्धीही नको. ‘तमाशा’ होता कामा नये. लोक लांबवरून येऊ देऊ नयेत. फार तर निवासस्थानाजवळच्या महत्त्वाच्या व्यक्तींना बोलावले जावे. जे समारंभाचे गांभीर्य जाणतात आणि त्यानुसार आब राखून वावरतील अशांनाच बोलावावे.”
दुलिपसिंग याचा बाप्तिस्मा 8 मार्च 1853 या दिवशी झाला. त्याचा वृत्तांत लॉगिन यांनी डलहौसी यांना कळवला. गंगाजलाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे हे लॉगिन यांच्या लक्षात अगदी शेवटच्या क्षणाला आले. त्यांनी गंगाजल बाप्तिस्म्याच्या पवित्र संस्कारासाठी आणले तर वेगळे औचित्य ठरेल असे उमजून एका सेवकाकरवी ते आणवले. गंगाजल बाप्तिस्म्यासाठी वापरले तर दुलिपसिंग याच्या मनात त्या जलाचे नवे पावित्र्य ठसेल असे त्यांना वाटले. डलहौसी यांनी समारंभाच्या वृत्तांतावर संतोष व्यक्त केला.
हिंदू लोकांचे धर्मांतर होत असे ते त्यांना साधारणपणे फसवून, आमिष दाखवून, त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाची जाणीव झाल्यामुळे किंवा करवून दिल्यामुळे. रेव्हरंड टिळक यांच्यासारखे काही सुशिक्षित बायबल वाचून प्रभावित होत असतही. ब्रिटिशांनी तशा सर्वांचे स्वागत अधिक हार्दिकपणे केल्याचे दिसते. त्या पार्श्वभूमीवर दुलिपसिंग याच्या ख्रिस्तवासी (ख्रिस्त धर्म स्वीकारण्याला) होण्याला ब्रिटिश सरकारने इतकी चालढकल आणि खातरजमा करून घेण्याचा पवित्रा घ्यावा हे समजण्यासारखे आहे. ‘लॉगिन आणि दुलिपसिंग’ या पुस्तकात शिखांचा इतिहास, रणजितसिंग यांची संपत्ती, त्यांच्या कुटुंबीयांतील दुफळी, कंपनी सरकारची कामकाजाची पद्धत या सर्वांचे सुरेख दर्शन होते. हाच दुलिपसिंग नंतर ब्रिटिश विरोधात गेला. त्याची बाजूही पुस्तकात मांडली गेली आहे. अभ्यासकांना एक मोठे साधन त्या पुस्तकाने मिळते.
– रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com
रामचंद्र वझे हे निवृत्त बँक अधिकारी. त्यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केले. त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्यांना प्रवासवर्णनांचा अभ्यास करत असताना काही जुनी पुस्तके सापडली. ती पुस्तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी तशा पुस्तकांचा परिचय लिहिण्यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले‘, ‘क्लोज्ड सर्किट‘, ‘शब्दसुरांच्या पलिकडले‘ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर‘ ही पुस्तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्यात आली आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा हंस, स्त्री, अनुष्टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे ‘महाराष्ट्र टाईम्स‘ आणि ‘लोकसत्ता‘ या दैनिकांमधून लेख आणि पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
—————————————————————————————————————-