‘दुर्गा झाली गौरी’: अखंड तीस वर्षे!

0
33

‘दुर्गा झाली गौरी’: अखंड तीस वर्षे!

काही निरीक्षणे

‘दुर्गा झाली गौरी’ हे बालनाट्य पंचवीस वर्षांनी पाहिले. आविष्कार-चंद्रशाला या प्रायोगिक नाटक मंडळींनी ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक इतकी वर्षें चालते ठेवले; त्यामध्ये नवनवीन मुले भाग घेत राहिली याबद्दल त्या सर्वांचे आणि विशेषत:, ‘आविष्कार’चे सूत्रधार अरुण काकडे यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांची चिकाटी कौतुकास्पद होय.

‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक मराठीचा मानबिंदू आहे असेही म्हणता येईल. कारण महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० साली झाल्यानंतर, तेथे अनेक चळवळी उदयास आल्या. त्या चळवळींनी नवनवे प्रयोग आरंभले. प्रथम ‘रंगायन’ 'दुर्गा झाली गौरी' पहिला नाट्यप्रयोगआणि नंतर पाठोपाठ आलेल्या ‘आविष्कार’ यांनी नाट्यजगतात अनेक नवे पायंडे पाडले, नवनवे प्रयोग केले. ‘आविष्कार’चा ‘चंद्रशाला’ हा असाच लहान मुलांना नाट्यचळवळीची ओळख करून देण्यासाठी चालवलेला एक प्रयोग. या ‘चंद्रशाले’मार्फतच ‘दुर्गा झाली गौरी’ हे नृत्यनाट्य प्रथम रंगमचावर आले. काय ताजेपणा होता त्यात! निसर्गाची दुनिया हळुवारपणे उलगडून दाखवली होती आणि राजकन्येच्या माध्यमातून मुलांना करून दिला होता बोध. खरे तर तो संदेश आबालवृध्दांसाठी आहे.

या बालनाट्याने त्यावेळी बालनाटकांच्या जगात ताजी हवा आणली. समूहकार्याची नवी प्रथा पाडली. त्यामुळे सर्वत्र उत्साह संचारला.

'दुर्गा झाली गौरी' 2009 यावर्षी नाट्यप्रयोग पंचवीस-तीस वर्षांनंतर हे नाटक नातवंडांबरोबर पाहताना वेगळी निरीक्षणे झाली. मधल्या काळात जग उलटेपालटे झाले आहे याचा प्रत्यय आला. मुळात नातवंडांना नाटकाने रिझवलेले दिसले नाही. ती शेवटपर्यंत बसून राहिली. मधून मधून, त्यांनी बोअर झाल्याचेही सांगितले. कधी-कधी, ती नाटकात गुंततही होती. विचार करू लागलो तेव्हा ध्यानी आले, की जीवनाचा स्पीड केवढा वाढला आहे! मुले संगणकावर बसली, डी.एस. खेळली, टी.व्ही. पाहत राहिली तरी सगळीकडे त्यांच्या हाती बटणे असतात आणि मुले आपले मन बटणे दाबून हवे तसे गुंतवत जातात. उलट, ‘दुर्गा झाली गौरी’ हे नृत्यनाट्य आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक घटना संवादांतून आणि नृत्यात्मक हालचालींतून ठासून ठासून प्रेक्षकांपर्यंत पोचवायची गरज असते. त्यासाठी अभिनय लाऊड करावा लागतो. प्रत्येक घटना-प्रसंगाची आळवणी विविध त-हांनी होते. हे सारे आधुनिक माध्यमांना आणि त्यामध्ये तयार झालेल्या मुलांना गरजेचे वाटत नाही. त्यामुळे नृत्यनाट्याचा फॉर्म हळूहळू बादच होईल का काय अशी भीती वाटली.

'दुर्गा झाली गौरी'ची २५ वे वर्षेदुसरे म्हणजे नाटकातील गावकरी धरण बांधतात आणि पूर अडवतात. गेल्या पंचवीस वर्षांत धरणविरोधी भावना प्रबळ होत गेली आहे. धरणे अनेक कारणांसाठी बांधली जातात. त्या प्रत्येक कारणाला आता पर्याय उपलब्ध आहे आणि म्हणून धरणांचा खर्चिक व गुंतागुंतीचा उपाय नको असा विचार जोमाने व्यक्त केला जातो. त्यामुळे आशयदृष्ट्याही ‘दुर्गा’ दुर्बळ होत जाते.

नाटकाच्या अनुषंगाने आणखी एक मुद्दा मनात डोकावून गेला. हट्टी राजकन्या कष्टाळू शहाणी मुलगी बनली. तिचे हे रूपांतर हा नाटकाचा विषय आहे. त्याचा सर्व बाज मराठी आहे. नाटकाची मोठी रंगत आहे ती कपडेपटात. राजा-राणी-राजकन्या ही पात्रे आणि मुंगी-चिमणी-ससे-बैल असे नैसर्गिक पक्षी-प्राणी यांची वेशभूषा कशीही कल्पक असू शकते. परंतु कोळीजन, दासी, भटभिक्षुक यांचे पोशाख पाहता त्यावर राजस्थानी छाप दिसली. महाराष्ट्र हा आरंभापासून स्थलांतरितांचा देश आहे. त्यामुळे येथे संमिश्र असे अनेक प्रभाव आहेत. याची प्रचीती हे मराठी नाटक पाहत असताना येत होती. मग मनात प्रश्न उद्भवला की मूळ मराठी काय आहे?


 

About Post Author

Previous articleसंयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध
Next articleमूल्यांच्या शोधात मध्यमवर्ग
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.