‘दुर्गा’मय!
– सुहिता थत्ते
यशवंत नाटयमंदिरात ‘दुर्गा झाली गौरी’चा प्रयोग मे महिन्यातील एका रविवारी सकाळी होता. पेपरमध्ये जाहिरात बघितल्याबरोबर मुलीला, ‘मिस्किल’ला सांगितलं. ती आता नोकरी करते. तिला रविवारशिवाय सुट्टी नसते. तिनं ताबडतोब म्हटलं, ‘मला परत बघायचंय – जाऊया आपण!’ आणि आम्ही तिथं पोचलो. खूप excitement होती. तिला आणि मलाही.
पहिल्यांदा ‘दुर्गा’ बघितलं ते जवळजवळ वीस-बावीस वर्षांपूर्वी. मिस्किल त्यावेळी तीन-साडेतीन वर्षांची असेल-नसेल. बहुधा रघुकुल किंवा प्रदीप मुळे यांनी कोणीतरी आग्रह केल्यामुळे असेल. मला नाच पाहायला-करायला आवडत असल्याचं त्यांना माहीत होतं. शिवाय, गुरू पार्वतीकुमार-रमेश पुरव-आविष्कार-चंद्रशाला अशी नावं त्या प्रयोगाशी जोडलेली होती. त्यामुळे अतिशय उत्सुकता-उत्कंठा होती.
प्रयोग पाहिला ‘छबिलदास’मध्ये. त्यांतली गाणी-नाच-प्रकाशयोजना-वेषभूषा-मुलांचा उत्साह-प्रेक्षकांचा प्रतिसाद हे सगळंच थक्क करणारं होतं. पन्नास-साठ मुलं अगदी तीन-चार वर्षांपासून साठ वर्षांच्या ‘तरुण’ काकडेकाकांपर्यंत इतक्या उत्साहानं सहजपणे रंगमंचावर वावरत होती, नृत्य करत होती, की त्यावेळेला मलाही वाटलं होतं – ‘अरे! यांच्याबरोबर आपणही नाचावं!, मी लहान मिस्किललाही एक-दोनदा घेऊन गेले. ‘तू मुंगी हो..पक्षी हो…वगैरे’ म्हटलं, पण ते होऊ शकलं नाही.
‘दुर्गा’चा प्रवास आणि माझा प्रेक्षक म्हणून प्रवास असे समांतर चालू झाले. प्रथमदर्शनी ‘दुर्गा’ भावली ती त्यातल्या सोप्या-सहज पटणा-या गोष्टींमुळे. सहज-सुंदर हालचाली – त्यांचे लोकधर्मी आकृतिबंध-पारंपरिक असून-नसलेल्या वेषभूषा यांमुळे. त्यातल्या एकेक प्रसंगात मी हरवून गेले. राजाराणी-दुर्गा, माळीसाळी-विदूषक-दासी यांचे प्रसंग – फुलं ‘आज्ञा झाली राजाची – फुलांना सा-या पकडायची’ या ओळींबरोबर कावरीबावरी होतात. माळीणीच्या मागे लपतात. गवळणी – ‘चला गं चला पाऊल उचला – नंदाचा खट्याळ पोर’ म्हणणा-या आणि मग ‘जय एकवीरा’ म्हणत हट्टी दुर्गाला नावेतून वादळातून घेऊन जाणारे कोळी. भोव-यात नाव फुटते तो प्रसंग. त्यानंतर पाण्यात गटांगळया खाणारी दुर्गा मध्यंतरात जिवाला हुरहुर लावत होती. ती पुढे गावात येऊन गौरी होते, शहाणी होते. तिच्या बुध्दीचा गावक-यांना फायदा होतो. ती ‘आधी तिला बांधून घाला’ म्हणत नदीवर धरण बांधायला सांगते. कारण तिच्या स्वप्नात मुंग्या राब-राब राबतात. पक्षी मंजुळ गाणी गाऊन उठवतात. मधमाश्या कामात गुंगून जातात… हे सगळं इतक्या मोहक हालचालींतून घडतं! सुरुवातीला आसूड फटकावणारी-‘माळयांना फासावर चढवा’ सांगणारी दुर्गा हळुवार गौरी बनते. गावातल्या तिच्या पालकांची सेवा करते. ‘पाऊल पुढेच टाका रे’ म्हणत सगळयांबरोबर धरणाचं काम करू लागते आणि शेवटी, ती राजाराणीची दुर्गा आणि गावक-यांची गौरी बनते. इतकी साधी-सोपी गोष्ट!
पुढे, माझा आविष्कार संस्थेशी संबंध आला, वृध्दिंगत झाला. मी चेतन दातारबरोबर अनेक नाटकं केली. काही नाटकांची वेषभूषा केली आणि मधून-मधून ‘दुर्गा’च्या तालमी बघण्याची संधी मिळाली. पूरवमास्तरांशी, मेधा परबशी, क्षमा साखरदांडेशी ओळख होतीच, पण हळुहळू त्यांच्या ‘दुर्गा’मय असण्याचीही ओळख होत गेली. रविवारची नियमित तालीम, मुलांचा-पालकांचा त्यातला सहभाग, जवळजवळ कुटुंबकबिल्यासह त्यांचा तिथला वावर, जिवापाड धडपड करून नवीन नवीन मुलांना तयार करत राहणं आणि सुट्टयांमध्ये प्रयोग करणं, काकडेकाकांचा अपरिमित उत्साह, दोन-दोन बस बुक करून मुलांसह-पालकांसह दौरे करण्याची जिद्द, हे पाहून मी वारंवार थक्क होत राहिले. मीही राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाबरोबर लहानपणी दौरे केले. पण आजच्या काळात इतक्या मुलांची जबाबदारी घेऊन ठिकठिकाणी प्रयोग करणं ही किती अवघड गोष्ट आहे हे मी जाणून आहे – मोठया मुलामुलींना घेऊन नाटकाचा एखादा दौरा किंवा आमच्या ‘स्मितालया’चा पंधरा-वीस मुलामुलींना घेऊन केलेला दौरासुध्दा एखाद्या वेळी किती अडचणीचा ठरू शकतो हे आम्ही अनुभवलंय. म्हणून यांचं सगळयांचं जास्तच कौतुक वाटत राहिलं.
भले, आमच्या नाटकाच्या तालमींशी ‘दुर्गा’च्या तालमींची मारामारी असायची – मग ‘त्यांना आधी बाहेर निघायला सांगा. आमचा उद्या प्रयोग आहे, आम्हाला जागा द्या. ह्यांचे प्रयोग आणि तालमी तर सारख्याच चालतात,’ वगैरे प्रतिक्रिया वेळोवेळी ऐकायला मिळत किंवा ‘जसा माहीमचा दर्गा – तशी आविष्कारची दुर्गा’ असं कोणी म्हणतं – किंवा विनोदानं असंही म्हटलं जातं ‘अरे ‘दुर्गा झाली गौरी’ किती जुनं आहे, माहितंय का? यात उर्मिला मातोंडकरांनी ‘मुंगी’पासून ‘दुर्गा’पर्यंतच्या सा-या भूमिका केल्या, एवढंच नाही तर ए. के. हंगलसुध्दा मुंगी म्हणून काम करत होते.’ विनोद अलाहिदा, पण महत्त्वाचं हेच आहे, की अथक कष्ट घेऊन आविष्कार-चंद्रशाला एक चळवळ म्हणून, एक मिशन म्हणून ‘दुर्गा झाली गौरी’ करतात. त्यात सहभागी होणा-या मुलांना भरभरून आनंद देतात. त्या संस्थेला-पुरव मास्तरांना, काकडेकाकांना, क्षमा-मेधाला आणि माझ्या लहानग्यांना प्रेमपूर्वक सलाम!
सुहिता थत्ते
दूरध्वनी : 022-26591494
(सुहिता थत्ते अभिनेत्री आहेत. त्या नाटकांप्रमाणेच दूरदर्शन मालिका-चित्रपट-जाहिरातपट यांच्यामध्ये दिसतात.)