दीडशे वर्षांचे कल्याण सार्वजनिक वाचनालय

4
152
carasole

कल्याणच्या सांस्कृ्तिक जीवनाचा गेली दीडशे वर्षें सतत अविभाज्य भाग होऊन गेलेली संस्था म्हणजे ‘कल्याण सार्वजनिक वाचनालय’. संस्थेने ३ फेब्रुवारी २०१३ रोजी दीडशे वर्षें पूर्ण केली. तो समारंभ थाटात झाला.

रावबहाद्दूर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी ‘कल्याण सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना १८६४ साली केली. ते ग्रंथालय, तेथील पुस्तकांचा ठेवा आणि तेथे राबवले जाणारे उपक्रम यांमुळे कल्याणचेच नव्हे तर आजुबाजूच्या परिसराचे सांस्कृतिक केंद्र कित्येक दशके बनून गेले होते. आता मात्र शहरी गजबजाटात वाचनालयास ती महती उरलेली नाही. उपक्रम रीतसर चालू असतात. कार्यकर्ते त्यासाठी कष्ट घेतात, पण नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा उरलेला नाही.

सदाशिवराव साठे यांना स्वत:ला वाचनाची आवड होती. त्यांनी त्यांच्या घरी अनेक पुस्तके खरेदी करून ठेवली होती. तो उत्तम पुस्तकांचा संग्रह होता. सदाशिवभाऊ यांनी १ ऑगस्ट १८६४ ते ५ ऑक्टोबर १८६४ अशा दोन महिन्यांसाठी कल्याणच्या मामलेदारपदाचा कार्यभार स्वीकारला. त्या काळात त्यांनी मराठी शाळांना भेटी दिल्या. सदाशिवभाऊंना शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी असे वाटले. मूळात, त्यांनी वाचनाचा छंद जोपासला होता. त्‍यांना स्वतः चांगले पुस्तक वाचावे व ते इतरांनाही वाचनास मिळावे असे वाटे. सदाशिवभाऊंना वाचनालय सुरू करण्याची इच्छा झाली. त्यांनी घरातच तात्पुरते वाचनालय सुरू करुन, ती पुस्तके आमजनांसाठी उपलब्ध करून दिली. त्यांनी अन्य सहकाऱ्यांकडून काही पुस्तके मिळवली. त्यावेळी त्यांच्या संग्रहात एकशेत्रेचाळीस पुस्तके जमा झाली होती. वाचनालयाचे दरमहा शुल्क एक रुपया होते.

त्यानंतर साठे वाड्यातून दामोदर जोशी (पहिल्या स्त्री डॉक्टर डॉ. आनंदी गोपाळ यांचे थोरले बंधू) यांच्या वाड्यात वाचनालय स्थलांतरित केले गेले. सदाशिवभाऊ प्रांत ऑफीसर म्हणून १८८० साली निवृत्त झाले. त्यांची नगरपालिकेवर सरकार नियुक्त अध्यक्ष म्हणून १८८४ मध्ये निवड झाली. त्यावेळी त्यांनी नगरपालिकेचे काम व वाचनालय यांवर लक्ष ठेवता यावे यासाठी नगरपालिकेच्या समोर असलेल्या‍ डाकबंगलेवजा वास्तूमध्ये वाचनालय स्थलांतरित केले. त्याचे उद्घाटन म्युलक नामक साहेबांच्या हस्ते‍ झाले. म्हणून वाचनालयास ‘म्यूलक जनरल लायब्ररी’ असे नाव देण्यात आले. पुढे, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने वाचनालयाचे नामकरण ‘सार्वजनिक वाचनालय’ असे करण्यात आले.

त्यानंतर काही काळ वाचनालयासाठी खडतर होता. आधी १८९६ मध्ये प्लेगची साथ आली. त्यात अनेक कार्यकर्ते मरण पावले. पाठोपाठ, १८९८ मध्ये रावबहाद्दूर सदाशिव साठे यांचे निधन झाले. त्या घटनांमुळे गावातील व्यापार-उद्योगात मंदी आली. त्यामुळे वाचनालयाची १९१० सालापर्यंत परवड झाली. वर्गणीदार नसल्यामुळे वाचनालय बंद राही. पुस्तकांना कसर लागली. वाचनालयाची ती उतरती कळा पाहून रा.कृ. सबनीस वकील, प्रभाकर काशिनाथ ओक, गोविंद वासुदेव भिडे यांसारखे नवे कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी वाचनालयाची जबाबदारी स्वीकारत ती संस्था सावरली. शंकर रामकृष्‍ण सोहोनी आणि त्यांचे सहकारी यांनी कष्ट करून वाचनालयाची इमारत दुरूस्त केली. तेथील ग्रंथसंग्रह वाढवला. वाचनालयाचा सुवर्णमहोत्सव १९३३ साली साजरा करण्यात आला. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांच्या अध्यक्षतेखाली तो समारंभ झाला.

कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वास्तूमध्ये कालानुसार बदल होत गेले आणि त्यासोबत संस्थेचे कार्यही वृद्धिंगत होत राहिले. वाचनालयाचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने १९४० ते १९५० या दशकात वाचनालयाच्या जागेत दुकानांसाठी गाळे काढण्यात आले. वाचनालयाने ‘केसरी’ वृत्तपत्राची वितरण व्यवस्था घेतली. शासनाचे धोरणही तालुक्या‍च्या ठिकाणी ‘मुक्तद्वार वाचनालय’ असावे असे होते. त्या‍मुळे ‘कल्याण सार्वजनिक वाचनालया’स ‘सरकारमान्य मुक्तद्वार वाचनालय’ म्हणून १ एप्रिल १९५१ पासून मान्यता मिळाली. कल्याणचे वाचक प्रामुख्याने चाकरमानी होते. त्यांच्या मागणीमुळे त्यापुढील वर्षापासून वाचनालय सकाळच्या वेळेतही सुरू ठेवले जाऊ लागले. त्यामुळे सभासदांची आणि जोडीला पुस्तकांची संख्या वाढू लागली. वाचनालयाच्या कामाचा व्याप वाढला. वाचनालयाची जागा अपुरी पडू लागली. तेव्हा जुनी डाकबंगलेवजा इमारत पाडून वाचनालयाची एक मजली इमारत २७ डिसेंबर १९५८ रोजी पूर्ण करण्यात आली. इमारतीच्या खर्चासाठी दत्तो वामन पोतदार, प्रा. ग. प्र. प्रधान, शां. शं. रेगे, ग्रंथालय संचालक कृ. द. पुराणिक आदी मान्यवरांच्या प्रयत्नांमधून महाराष्ट्र शासनाने पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली. कल्याणच्या ‘रोटरी क्लब’नेही वाचनालयास वीस हजारांची देणगी देऊन सहकार्य केले. त्या बळावर वाचनालयाचा पहिला मजला १९६९ साली बांधून पूर्ण झाला. कल्याणला जाणवणारी सामाजिक, सर्वांगीण व्यासपीठाची कमतरता वाचनालयाने भरून काढली.

महाराष्ट्र सरकारचा ग्रंथालय कायदा १९७०-७१ च्या सुमारास अस्तित्वात आला. वाचनालयास ‘ब’ दर्जा प्राप्त झाला. शासकीय अनुदानामुळे वाचनालयास अधिक ग्रंथ खरेदी करणे शक्य होऊ लागले. समाजाची गरज आणि वाचन संस्कृतीकडे वाढता कल यामुळे वाचनालय स्थिरावत गेले. कल्याण शहराच्या विस्ताराबरोबर वाचकांची संख्या वाढत गेली. त्यामुळे वाचनालयाने रामबागेत १ ऑक्टोबर १९७२ रोजी आणि मुरबाड रोड परिसरात सरस्वती मंदिर येथे ४ जानेवारी १९७३ रोजी वाचनालयाच्या शाखा सुरू केल्या. बालविभाग १ मे १९७७ पासून सुरू केला. मासिक विभाग, अभ्यासिका आणि ‘पु .भा. भावे व्याख्यानमाला’ हे उपक्रमही त्याच बेताला सुरू करण्यात आले. कल्याणमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली अभ्यासिका रामबाग शाखेतील एक हजार चौरस फुटांच्या जागेत आहे. वाचनालयाने साजऱ्या केलेल्या शताब्दी महोत्सवास कविवर्य कुसुमाग्रज उपस्थित होते.

कल्याण वाचनालयाच्या प्रगतीत रामभाऊ जोशी यांची कामगिरी महत्त्वाची आहे. त्यांच्या सरचिटणीस पदाच्या काळात वाचनालयाला ‘अ’ दर्जा मिळाला. वाचनालयातील वर्तमान ग्रंथसंख्या पासष्ट हजार एवढी आहे. वाचनालयाच्या संदर्भ विभागात शंभर वर्षांपूर्वीचे शंभराहून अधिक ग्रंथ आहेत. बदलत्या काळानुसार वाचनालयानेही कामकाजाच्या पद्धतीत बदल केले आहेत. वाचनालयातील सर्व पुस्तके बारकोड व्यवस्थेने वर्गीकृत करण्यात आली आहेत. वाचनालयात ई-दिवाळी अंक, ई-बुक्स अशा प्रकारे ई-साहित्याची सोय आहे. तेथे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांची गॅझेटिअर्स ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. बदलत्या काळात वाचनालय अधिका‍धिक वाचकाभिमुख राहवे याकरता जून २०१२ पासून वाचनालयाची वेळ बारा तासांपर्यंत वाढवली गेली. पुस्तकांच्या देवाण-घेवाणीचा व्यवहार संगणकीकृत करण्यात आला. जुने दुर्मीळ ग्रंथ नव्या तंत्रज्ञानानुसार जतन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कल्याणचा मानबिंदू असणारा ‘सुभे कल्याण’ हा कै. विवेकानंद गोडबोले यांचा दुर्मीळ ग्रंथ सीडीच्या रूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. वाचनालयाचे मराठी-इंग्रजी भाषेत संकेतस्थळ तयार करण्यात आले असून त्यावर वाचनालयातील सर्व पुस्तकांची यादी उपलब्ध आहे.

कल्याणचे प्रा. जितेंद्र भामरे आणि प्रशांत मुल्हेरकर यांनी ग्रंथालयाची वाटचाल शब्दबद्ध करण्यासाठी वाचनालयाचा इतिहास लिहून काढला. त्यांचा ‘ग्रंथ कल्याणी’ हा ग्रंथ ज्योर्तिभास्कर जयंत साळगावकर यांच्या हस्ते २००८ मध्ये प्रकाशित करण्यात आला. त्या दरम्यान, इतिहास संशोधन करणाऱ्या भामरे यांना वाचनालयाची स्थापना १८६४ साली करण्यात आल्याची नोंद गॅझेटिअरमध्ये सापडली. वाचनालयाच्या संदर्भातील ते महत्त्वाचे इतिहास संशोधन ठरले. वाचनालयास दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. ती स्मरणिका वाचनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘वाचनालया’चे अध्यक्ष म्हणून राजीव जोशी काम पाहतात, तर भिखू बारसकर हे सरचिटणीस आहेत.

– नेहा जाधव

About Post Author

4 COMMENTS

  1. फार सूंदर लेख.छान माहिती.
    फार सूंदर लेख.छान माहिती.

Comments are closed.