Home वैभव प्रथा-परंपरा दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती

दिवाळी आणि करुणरम्य संस्कृती

_Diwali_Aani_Karunamay_Sanskriti_1.jpg

तमाम महाराष्ट्रातील परस्परविरोधी (आणि परस्पर पूरकही!) विचारांच्या लोकांचे विराट सांस्कृतिक संमेलन जर कोठे पाहण्यास मिळत असेल तर ते फक्त मराठी दिवाळी अंकांमध्ये! साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब या उक्तीचा दिवाळी अंकांच्या संमिश्र भट्टीत अचूक प्रत्यय येतो. दिवाळी अंकांतील याच समाजदर्शनाचा अर्थ असाही होऊ शकतो, की दिवाळी हा सण महाराष्ट्रातील पुरोगामी आणि प्रतिगामी विचारांच्या समर्थकांस मान्य आहे! म्हणून दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मराठी संस्कृतीकडे सहजपणे (चिकित्सकपणे नव्हे) टाकलेला हा एक दृष्टिक्षेप –

शिकले-सवरलेले, उच्च अभिरुचीसंपन्न मराठी लोक दिवाळी साजरी करताना दिसतात; मात्र नरक चतुर्दशीला आंघोळ का करतात? नरकासुराला मारल्याचा आनंद कारंटासारखे फळ पायांनी चिरडून साजरा का करतात? लक्ष्मीपूजन, बलिप्रतिप्रदा… सगळे यथाविधी पार पाडतात. ‘इडा पिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे’ असे म्हणून बळीराजाचे पूजन करतात. मात्र, तेच लोक नरकासुराला का मारले? बळीराजाला का आणि कोणी मारले? हा विचार करताना दिसत नाहीत. बहुतांश भारतीय सण कोणाच्या तरी हत्येशी संबंधित आहेत.

तुळशीचे लग्न, दसरा अशी कितीतरी उदाहरणे त्या संदर्भात देता येतील. त्या हत्या का झाल्या? त्यातील कारुण्याचा विचार न करता किंवा त्या संदर्भात चिकित्सा करणारे साहित्य न वाचता सण थाटामाटाने साजरा केला जातो! म्हणून मी आपली संस्कृती करुणरम्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. याचे कारण आपल्याला अद्यापपर्यंत आपली सांस्कृतिक आणि वैचारिक ओळख निश्चित करता आलेली नाही हे होय. दिवाळी अंकांचे वाचन करतानासुद्धा एकाच वेळी आपण तथाकथित साधुसंतांच्या नावाने निघालेल्या अंकांपासून राशिभविष्य ते थेट वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणा-या दिवाळी अंकांचा आस्वाद घेत असतो. परिणामत: आपले सांस्कृतिक जीवन निरामय राहिलेले नाही. उदाहरण घेऊन हा मुद्दा स्पष्ट करायचा झाल्यास पुढील बाबी विचारात घेण्यासारख्या आहेत-
 
१. लावणी :- लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक कला आहे असे अभिमानाने म्हटले जाते, पण त्यात कितपत तथ्य आहे? जर लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक कला असेल तर ती सर्वांसाठी खुली असली पाहिजे. ज्याप्रमाणे नागपंचमीच्या सणानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जातींच्या महिला फेर धरून नृत्य करतात-गातात, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक माताभगिनीस लावणीवर नाचता यायला हवे; मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. ज्या तमाशातून लावणी सादर केली जाते तो तमाशा पाहण्यास स्त्रियांना सामाजिक रुढीपरंपरेची बंदी आहे. त्याचा अर्थ तमाशा किंवा लावणी ही लोककला होऊ शकत नाही. ज्या कलेचा आस्वाद आणि सादरीकरण यांमध्ये सर्व लोकांचा समावेश असतो त्याच कलेला लोककला म्हणता येऊ शकते. मग तमाशा किंवा लावणी ही लोककला किंवा सांस्कृतिक कला कशी काय होऊ शकते? लावणी टिकली पाहिजे या उदात्त (!) हेतूने लावणीच्या किरकोळ ते भव्य स्वरूपाच्या स्पर्धा भरवून लावणी कलावंत स्त्रियांना मोठमोठी बक्षिसे दिली जातात! महत्त्वाचा मुद्दा हा, की जर लावणी महाराष्ट्राची सांस्कृतिक कला आहे तर लावणीचे हे पाठीराखे त्यांच्या घरांतील मुलींना लावणीचे प्रशिक्षण देऊन अशा स्पर्धांमध्ये का सहभागी होऊ देत नाहीत? लावणी रचायची पुरुषाने, तिचा वर्ण्यविषय स्त्रीसौंदर्य व शृंगार, ती सादर करायची स्त्रीने आणि आस्वाद घ्यायचा सवंग रसिक पुरुषवर्गाने; हा कोठला न्याय? बरे, लावणी सादर करणाऱ्या स्त्रिया कोण? तर प्रामुख्याने कोल्हाटी व इतर उपेक्षित जातींतील. त्याचाच अर्थ लावणी टिकली पाहिजे असा आग्रह धरणाऱ्यांना लावणीबरोबरच स्त्रीशोषण, आर्थिक आणि जातीय विषमता, पुरुषवर्चस्व व भांडवलशाही टिकली पाहिजे हे अपेक्षित असते आणि त्यासाठी ते सांस्कृतिक कला आणि सांस्कृतिक वारसा या शब्दांचा दुरुपयोग करतात. तेव्हा अशा प्रकारे विशिष्ट जातीला नाचण्यासाठी प्रोत्साहन देणारी लावणी महाराष्ट्राची सांस्कृतिक कला होऊ शकत नाही असे म्हणण्याला काय हरकत आहे?
 
२. वासुदेव, पिंगळा, वाघ्या-मुरळी, गोंधळी, आरादी यांना लोकसंस्कृतीचे उपासक मानणे निखालस चूक आहे :- लोकसंस्कृतीचे उपासक जातीय आणि अमानुष धार्मिक रुढींचे बळी आहेत. त्यांच्या व्यथा आणि वेदना विचारात न घेता त्यांना लोकसंस्कृतीचे उपासक म्हणणे अमानुषपणाचे आहे. ते लोक केवळ अंधश्रद्धा आणि जातीय व्यवस्था यांच्या जोखडात अडकल्यामुळे लोकसंस्कृतीची उपासना (?) करत दारोदारी भीक मागताना दिसतात. वास्तविक पाहता, धनदांडग्या अभिजनांनी लोकसंस्कृतीच्या उपासकांना त्यांच्या पालावर जाऊन सन्मानपूर्वक धनद्रव्य अर्पण केले पाहिजे. खंडोबाला सोडलेल्या वाघ्या-मुरळीकडून (जे स्वतः ‘सर्वहारा’ आहे) किंवा गोंधळींकडून (ज्याच्या जीवनातील गोंधळ अद्याप शमलेला नाही) अभिजनांच्या लग्नात जागरण-गोंधळ सादर करवून कोणते विवक्षित ‘जागरण’ घडून येते किंवा कोणता विवक्षित ‘गोंधळ’ शांत होतो? उलट, विवाहजन्य समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.

३. बालकामगार आणि बालकलाकार यांच्या बाबतीत निश्चित धोरण आहे का? :- कायद्याने कोणत्याही बालकास कामावर ठेवणे हा गुन्हा मानलेला आहे; मात्र बालकांकडून बालकांच्या मनोविश्वाशी विसंगत, त्यांच्या आकलनक्षमतेच्या पलिकडच्या आणि त्यांना न पेलणाऱ्या भूमिका अनेक नाटक-चित्रपटांमधून करवून घेतल्या जातात. हा मुद्दा आपल्या इकडचे कलाधुरीण आणि समाजधुरीण गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. किंबहुना, बालकलाकारांच्या बाबतीतील निश्चित असे सांस्कृतिक धोरण आपल्याकडे दिसून येत नाही. 
 
या तीन प्रथा-परंपरांचा दाखला म्हणून उल्लेख केला. अशा प्रकारे आपण आजवर ज्या ज्या कलाप्रकारांना किंवा विधींना सांस्कृतिक म्हणत आलो आहोत त्यांची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. मुळातच, भारताचा बहुतांश सांस्कृतिक वारसा जातिग्रस्त, धर्मांध, भांडवली आहे. तो स्त्री-पुरुष विषमतेने बरबटलेलाही आहे. हे वास्तव आपण जोपर्यंत स्वीकारत नाही आणि आपल्या आजारी पडलेल्या रसिकतेला बरे करत नाही, तोपर्यंत हे असेच चालणार… आरंभापासून आतापर्यंत आणि आतापासून अनंतापर्यंत!

… मुद्दा आहे, हे कोठे तरी थांबवण्याचा. तेव्हा सुरुवात तर करुया… ‘जुने जाऊद्या मरणालागुनी’ या उक्तीप्रमाणे जुन्या सणवारांमध्ये अडकून पडण्याऐवजी नवी सांस्कृतिक माध्यमे म्हणून पथनाट्य, लेखन, अभिवाचन, भाषण, कथाकथन, नाटक, चित्रपट, पर्यटन, इंटरनेट यांचा आवर्जून विचार केला पाहिजे. त्या माध्यमांना अधिकाधिक लोकाभिमुख आणि सार्वजनिक व सार्वत्रिक केले पाहिजे.
 
– प्रदीप मोहिते, करमाळा, सोलापूर
pradeepmohite555@gmail.com

Last updated on 27 Nov 2017

About Post Author

Previous articleदिवाळी अंक आणि आपण
Next articleऋतुरंगकार अरुण शेवते
प्रदीप मोहिते हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे राहतात. ते प्राध्यापक आहेत. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख पदावर कार्यरत आहेत. त्यांनी भारतीय भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण' या भाषा खंडासाठी लेखन केले आहे. त्यांचे भटकंती व सभोवतालाचे निरीक्षण हे छंद आहेत. प्रदीप मोहिते यांना पथनाट्य सादर करण्यास आवडते. ते पथनाट्याच्या आधारे विविध विषयांवर जनजागृती करतात. लेखकाचा दूरध्वनी 9146337952

3 COMMENTS

  1. Very thought provoking. We…
    Very thought provoking. We do not want to give justice but exploit those who are low in social hierarchy under pretext of tradition.

Comments are closed.

Exit mobile version