‘कोमसाप’ च्या देवनार शाखेच्या वतीने गेली आठ वर्षे सुरू असलेल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेने साहित्यप्रेमींसाठी वेगळ्या प्रकारची मेजवानी निर्माण केली आहे. कुठलाही साहित्याचा प्रकार एका तासात प्रेक्षकांपर्यंत असा पोचवायचा की त्यांनी म्हटले पाहिजे, ´क्या बात है!´
आणि भाग घेणार्या संघांना ते पोचवावे लागते, प्राथमिक मंचीय सुविधा देणार्या एका शाळेच्या सभागृहात. ध्वनिवर्धक जेमतेम चालतात. शेजारीच असणार्या रेल्वे मार्गावरून लोकल्स धडाडत जात असतात. शाळेच्या मैदानावर मुलांचा गोंगाट सुरू असतो. कधी कधी, मैदान वापरणारी मुले जवळपासच्या झोपडपट्ट्यांतली असतात. त्यांना वाचन-संस्कृतीचा गंध नसतो. ‘अभिवाचना’चा तर नसतोच नसतो! स्पर्धकांना या गोष्टी सांभाळून आपले म्हणणे प्रेक्षकांपर्यंत पोचवावे लागते…आणि बहुतेक संघ त्यात यशस्वी होतात!
स्पर्धेच्या बजेटातला मुख्य खर्च बक्षिसांचा असतो. तो ‘कोमसाप’च्या देवनार शाखेचे सदस्य देणग्या मागून गोळा करतात. बाकी सगळी स्वयंसेवा . गोरगरीब मुलांच्या उत्थापनासाठी स्थापन झालेली कुमुद विद्यामंदिर ही शाळा स्वतः सभागृहाचा खर्च उचलते, साहित्यप्रेमापोटी आणि आपल्या शाळेत काहीतरी चांगले घडते म्हणून!
मी आजपर्यंतच्या आठपैकी चार-पाच स्पर्धांमध्ये परीक्षक होतो. गुणतक्ता बनवण्यातही माझे बरेच योगदान आहे. निकाल निःपक्षपातीपणे लागले पाहिजेत याकडे संस्थेचा कटाक्ष असतो आणि गुणतक्ता नीट लक्षात घेऊन गुण दिले, तर हमखास योग्य निकाल लागतो असा आमचा अनुभव आहे. म्हणूनच संघ आवर्जून पुन:पुन्हा भाग घेतात. स्पर्धेच्या यशस्वीतेची ती निशाणी आहे.
ध्वनिवर्धक वापरण्याचे भान आणि कौशल्य हा या स्पर्धेचा महत्वाचा भाग आहे. बर्याच संघांना त्याचे भान राहत नाही. आपण ध्वनिवर्धकासमोर वाटेल त्या पद्धतीने बोलून चालत नाही, जर आपणाला वाचनातून अभिनयकौशल्य दाखवायचे असेल तर त्यासाठी आपण ध्वनिवर्धक वापरण्याआधी आपण त्याचा वापर करून त्याची `लायकी` तपासणे गरजेचे असते. काही संघांना समूह-आवाजाचा समतोल राखणे जमत नाही. मग कुणीतरी खूप हळू बोलतो वा कुणीतरी खूप जोरात बोलत राहतो. असल्या प्रयोगात प्रथम बोलणार्या व्यक्तीने आवाजाची` योग्य ती ‘पट्टी’ लावणे जरुरीचे असते, त्यावर पुढल्या सगळ्या प्रयोगाचा तोल आधारला जातो.
ज्या पद्धतीने स्पर्धा पुढे जात आहे ते पाहता स्पर्धेला उज्ज्वल भविष्य आहे हे निश्चित.
अशोक ताम्हनकर,
ejetee@gmail.com
९८९२४६५१९५