दिंडी

0
dindhi2

अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बरोबर चालणारा वा राहणारा वारक-यांचा समूह म्हणजे दिंडी, असा ‘दिंडी’ शब्दाचा अर्थ ‘मराठी विश्वकोशा’ त दिला आहे; तर लहान दरवाजा किंवा पताका असेही त्याचे दोन अर्थ सांगितले जातात.

‘दिण्डु’ या कानडी शब्दापासून ‘दिंडी’ हा शब्द आला असावा. वारकरी आपल्याला स्वर्गाची दारे उघडावीत म्हणून भजन करतात, यावरून त्यांच्या वाटचालीला ‘दिंडी’ नाव मिळाले असे म्हणतात. वै. सोनोपंत दांडेकर ह्यांच्या मतानुसार भजनी मंडळातील एकजण ‘दिंडी’ नावाचे वीणेसारखे एक वाद्य वाजवत पुढे जातो व बाकीचे त्याच्या मागोमाग जातात, म्हणून त्या मंडळाला ‘दिंडी’ असे म्हणतात. तर काहींच्या मते, वारकरी खांद्यावर पताका घेऊन वाटचाल करतात, यावरून त्या वाटचालीस ‘दिंडी’ असे म्हटले जाते. ठरावीक वेळेला देवाच्या भेटीला जाणे ह्याला वारी म्हणतात. त्यावरूनच दिंडीतील लोकांना वारकरी म्हटले जाते. भगव्या पताका, टाळ , मृदंग आणि विठ्ठला च्या जयघोषात ‘दिंडी’त राहून (छोट्याशा दरवाज्यात) भजन केले, की स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडतो अशी वारक-यांची ठाम श्रध्दा आहे.

महाराष्ट्रात ल्या खेड्यापाडयांतून असंख्य वारकरी ऊन, पाऊस, वारा, ह्या कशाचीही पर्वा न करता दिंडीत सामील होतात. वारक-यांचा हा मेळा नाचत नाचत जाऊ लागतो. मधेच, भारुडे रंगतात. फुगडया खेळल्या जातात. माणूस द्वैत विसरतो आणि अद्वैताचा खेळ सुरू होतो. दिंडी हा खेळ आहे. एकनाथां नी तर ह्याचे वर्णन केले आहे –

‘नाचत पंढरीशी जाऊ खेळिया
क्षराक्षरातील पाहू रे।
टाळ मृदंग मेळवूनि मेळा रे
गुरुवचनी खेळ खेळा रे।

दिंडीत सारे वाद मिटवायचे असतात, देहाहंकार सोडून द्यायचा असतो.

आषाढी एकादशीस वारक-यांचे जथेच्या जथे पंढरीकडे निघतात. त्यात टाळकरी, पखवाजवादक, पताकाधारी, विणेकरी अशांचा समावेश होतो व त्यांचेच पुढे दिंडींमध्ये रूपांतर होते. दिंडीची स्वत:ची अशी शिस्त असते. दिंड्यांचे काही अलिखित नियम असतात. वीणाधारी वारकरी या दिंडीचा मुख्य असतो. दिंड्यांची जागा व क्रम आखून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे निश्चित असतो. दिंडीतील वारकरी दोन रांगा करून समोरासमोर उभे राहतात व मृदंग वाजवणारे त्या रांगांच्या मध्ये पुढच्या बाजूला असतात. सर्वांच्या हातात टाळ असतात. टाळ व मृदंग ह्यांच्या साथीवर तोंडाने भजन म्हणत व मागेपुढे पावले टाकत ते हळुहळू मार्गक्रमण करतात.

भजनात संतांचे अभंग व गवळणी गायल्या जातात. मधुनमधून विठ्ठलनामाचा गजरही होतो. पराकोटीची शिस्त ही दिंड्यांची वैशिष्टे आहेत. यात्रा संपल्यावर पंढरपूरात आपापल्या मठात, राहुटीत मुक्काम केलेले हे वारकरी नगर प्रदक्षिणा, यथासांग पार पडून आपापल्या गावी जातात. ही शिस्तबद्ध यंत्रणा गेली शेकडो वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे.

संदर्भ :

1. देखणे, रामचंद्र, महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला, तृतीयावृत्ती, पद्यगंधा प्रकाशन- पुणे, 2004, 48-58
2. भारतीय संस्कृती कोश, खंड चौथा, 353-60

सुरेश पांडुरंग वाघे
(०२२) २८७५ २६७५

About Post Author

Exit mobile version