लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856 – 1 ऑगस्ट 1920) – टिळकांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील ‘चिखलगाव’. टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणही पुणे येथे झाले. टिळकांनी स्वातंत्र्यसंग्रामात मोलाची कामगिरी केली. त्यांनी चिपळूणकर, आगरकर यांच्या मदतीने पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही मुलांची शाळा सुरू केली. फर्ग्युसन कॉलेजच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी लोकजागृती करण्यासाठी ‘केसरी’, ‘मराठा’ ही दैनिके व शिवजयंती आणि गणेशोत्सव हे सार्वजनिक उत्सव सुरू केले. टिळक हे राष्ट्रीय काँग्रेसचे देशपातळीवरील महत्त्वाचे नेते होत. त्यांनी ‘गीतारहस्य’, ‘रामायण’, ‘आर्क्टिक्ट होम इन द वेदाज’, ‘वेदांग ज्योतिष’ हे ग्रंथ लिहिले. त्यांचा खगोल व गणित या विषयांचा गाढा अभ्यास होता. कोकणपट्ट्यात काही कुटुंबे ‘टिळक पंचांगां’प्रमाणे मुहूर्त काढतात व सण साजरे करतात. टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्याला ‘स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार’ या चतु:सुत्रीची देणगी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956) – बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर. ‘आंबावडे’ हे त्यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे शिक्षण सातारा व मुंबई येथे झाले. ते पदवीधर 1921 मध्ये झाले. त्यानंतर त्यांना गायकवाड सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. ते अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचा व समाजशास्त्राचा अभ्यास करण्यास गेले. तेथे त्यांनी एम ए व पीएचडी या पदव्या मिळवल्या. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले. तेथे त्यांनी इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये काही संशोधन कार्य केले. त्याच वेळेस ते बॅरिस्टरही झाले. ते मुंबई येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये 1927 मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. नंतर त्यांनी पुन्हा जर्मनीला जाऊन बॉन विद्यापीठात व काही काळ लंडन विद्यापीठात अभ्यास करून अर्थशास्त्र व व्यापार या विषयांत ‘डी एससी’ची पदवी मिळवली. त्यांनी साऊथ बरो कमिटीपुढे मताधिकाराबद्दल 1918 मध्ये साक्ष दिली आणि 1926 मध्ये चलनविषयावर रॉयल कमिशनपुढे साक्ष दिली. त्यांनी ‘बहिष्कृत भारत सभा’ या नावाची संस्था स्थापन करून ‘बहिष्कृत भारत’ या नावाचे वर्तमानपत्र चालवले. त्यांनी दलितवर्गामध्ये जागृती करण्यासाठी परिश्रम घेतले. महाड येथील चवदार तळ्याचे त्यांचे आंदोलन भारतभर गाजले. त्यांचा ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथही गाजला. ते अनेक परिषदांचे अध्यक्ष होते. ते गोलमेज परिषदेचे (1930 ते 1932) सभासद होते. तसेच, ते जॉर्इंट पार्लमेंटरी कमिटीचेही सभासद होते. त्यांची महात्मा गांधींबरोबर जातीय निवाड्याबद्दल येरवडा येथे पुष्कळदा चर्चा झाली. महात्मा गांधी यांनी आरंभलेल्या उपोषणाच्या वेळी त्या प्रश्नासंबंधी दोघांमध्ये प्रसिद्ध येरवडा-पुणे करार झाला. आंबेडकर यांनी अनेक सार्वजनिक स्वरूपाच्या खटल्यांत काम केले. ते 1942 ते 1946 या काळात केंद्र सरकारात मजूर मंत्री होते. स्वातंत्र्यानंतर ते कायदामंत्री झाले. ते भारताची घटना लिहिण्यासाठी स्थापन केलेल्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. घटना लिहिण्याचे काम आंबेडकर यांनी जवळ जवळ एकट्याने पार पाडले. त्यांनी ते जबाबदारीचे, जिकिरीचे, किचकट व वेळखाऊ काम निष्ठेने व चिकाटीने केले. म्हणून त्यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ अशी सार्थ बिरुदावली प्रदान करण्यात आली. त्यांनी हिंदू धर्मीयांकडून होणारी उपेक्षा, हेळसांड, माणुसकीशून्य वागणूक, दलितांवर अन्याय करणारी विचारसरणी सोडून न देण्याचा हिंदूंचा हेकटपणा याला कंटाळून ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ एक आदर्श धर्मग्रंथ ठरावा.
विद्वान, अभ्यासू व सक्रिय सामाजिक कार्यकर्ता असलेल्या त्या युगपुरुषाचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. भारत सरकारने त्यांना 1990 साली मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब दिला.
रावसाहेब विश्वनाथ मंडलिक (8 मार्च 1833 – 9 मे 1889) – मंडलिक यांचा जन्म दापोली तालुक्यातील मुरुड या गावी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई येथे एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेज येथे झाले. त्यांनी अनेक हुद्यांवर सरकारी नोकरी केली व नंतर हायकोर्टात वकिली केली. त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात खोती प्रकरणात चांगली कामगिरी बजावली. त्यांनी ‘नेटिव्ह ओपिनियन’ हे पत्र 1864 मध्ये सुरू केले. त्या पत्राची मदत भारतीयांच्या अडचणी ब्रिटिश राज्यकर्त्यांपर्यंत पोचवण्यासाठी झाली. त्यांनी ‘हिंदू लोकांच्या मध्यस्तरीय अवस्थेविषयी विचार’, ‘हिंदुस्थानचा इतिहास’, ‘दिवाणी कायद्याची चूर्णिका’, ‘कोकणातील वतनदार खोतांचा इतिहास’ इत्यादी ग्रंथ लिहिले. ब्रिटिश सरकारने त्यांना 1874 साली कायदेमंडळात सभासद म्हणून नेमले. त्यांना व्हाईसरॉयच्या कायदेमंडळातही 1884 साली नेमले. त्यांची वक्तशीरपणाबद्दल ख्याती होती. असे सांगतात, की त्यांच्या येण्याजाण्यावर लोक त्यांची त्यांची घड्याळे लावत.
शंकर बाळकृष्ण दीक्षित (24 जुलै 1853 – 27 एप्रिल 1898) – दीक्षितांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांच्या घराण्याचे मूळ नाव वैशंपायन. पण त्यांच्या निपणजांनी यज्ञ केल्यामुळे ते घराणे दीक्षित या आडनावाने प्रसिद्ध झाले. मुरुड येथे प्राथमिक अभ्यास संपवून शंकरराव 1870 साली पुण्यास ट्रेनिंग कॉलेजात शिकण्यास गेले. ते ट्रेनिंग कॉलेजात शिकत असतानाच सकाळच्या शाळेत इंग्रजी शिकवत. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा 1874 मध्ये दिली. त्यांचा पाश्चिमात्य व पौर्वात्य गणिताचा व ज्योतिषाचा अभ्यास विशेष होता. त्यांनी जनार्दन बाळाजी मोडक यांच्याबरोबर सायनाचा पुरस्कार केला. त्यांनी सायनामानाचे पंचांगही सुरू केले. ‘ज्योतिर्विलास’, ‘सृष्टिचमत्कार’, ‘सायन पंचांग’, ‘हिंदू पंचांग’, ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’, ‘रात्रीच्या दोन घटका मौज’, ‘धर्ममीमांसा’, ‘भारतभूवर्णन’, ‘सोपपत्तिका’ इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ लिहिले.
रेव्हरंड नारायण वामन टिळक (6 डिसेंबर 1861 – 9 मे 1919) – ना.वा. टिळक यांचा जन्म व बालपण करजगावी गेले. त्यांची पुढील कारकीर्द नागपूर-नाशिक या भागात गेली. नारायण वामन टिळक यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार सातत्याने केला. त्यांना ख्रिस्ती समाजाने ‘धर्मगुरू’ ही पदवी दिली. म्हणून ते रेव्हरंड टिळक या नावाने ओळखले जातात. टिळक हे त्या काळातील नावाजलेले कवी होते. ‘घड्याळ काय म्हणते?’, ‘माझा ओसाड पडलेला गाव’, ‘माझी भार्या’, ‘बापाचे अश्रू’ ही टिळकांची स्फुट, प्रदीर्घ काव्ये पुस्तकरूपाने 1886 ते 1888 या काळात प्रकाशित झाली व गाजली. टिळक ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती पत्राचे नियमित लेखक होते. त्यांनी ‘ख्रिस्तपुराण’ हा ग्रंथ मराठीत लिहिला. भवानीशंकर पंडित त्यांच्या लेखनाचे वर्णन करताना लिहितात, ‘टिळक यांच्या वृत्तीत समशीतोष्ण असा प्रसन्न गोडवा आहे. टिळकांची कविता प्रेरणेच्या सहजतेतून उन्मेषित झाली आहे. त्यांची कविता सतत झिमझिम वर्षाव करणारी कादंबिनी आहे.’ टिळक यांनी 1889 मध्ये नागपूरहून ‘काव्यकुसुमांजली’ या नावाचे मासिकही काढले होते. त्यांनी ‘ऋषी’ मासिकही 1893 मध्ये सुरू केले होते.
रेव्हरंड टिळक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले ‘स्मृतिचित्रे’ हे आत्मकथन ना.वा. टिळक यांच्या जीवनावर झगझगीत प्रकाश टाकते. ‘स्मृतिचित्रे’ हे एकाद्या स्त्रीने लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक लेखनातील न लोपणारा तारा समजला जातो. ना.वा. टिळक यांचे पुत्र देवदत्त हे वकिली शिकले. त्यांनी ‘आपुले मुके मित्र’, ‘महाराष्ट्र तेजस्विनी पंडिता रमाबाई’, ‘भारतीय ख्रिस्ती कायदा’ हे ग्रंथ लिहिले. ना.वा. टिळक यांनी बालकवी ठोंबरे यांना प्रकाशात आणले.
केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) – (15 मार्च 1866 – 7 नोव्हेंबर 1905) –
सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरे कोकणामधी एक
नदी त्यामधूनी वाहताहे
एक खेडे तीवरी वसुनि राहे
अशा खेड्यात घर पाहा कसे होते –
ही चार पाच चढुनी पाय ठाणे
या ओसरीवर आता जपुनीच येणे
हे ऐक रे ‘टकटका’ करिते घड्याळ
या शांततेत मग ते कुटितेच टाळ !
ते दापोलीपासून सहा किलोमीटर दूर असलेल्या ‘वळणे’ गावातील एका घराचे वर्णन आहे. त्या घराला केशवसुतांच्या स्मृती लगडलेल्या आहेत. दामले यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे व जन्मठिकाण रत्नागिरीजवळील मालगुंड हे असले तरी त्यांनी काव्याची निर्मिती ‘वळणे’ या निसर्गसुंदर परिसर लाभलेल्या देखण्या गावातून केली. विश्वनाथ नारायण तथा रावसाहेब मंडलीक यांच्या ‘वळणे’ या गावच्या खोतीचे काम केशवसुत यांचे वडील पाहत होते. त्यामुळे केशवसुत यांचे वास्तव्य काही काळ ‘वळणे’ या गावी होते. केशवसुत यांच्या ‘एक खेडे’ व ‘गोष्टी घराकडील मी वदता गड्यारे!’ या कवितांतील खेड्याचे वर्णन ‘वळणे’ या गावचे आहे, तर घराचे वर्णन त्या गावात राहत असलेल्या घराचे आहे. केशवसुत हे ना.वा. टिळक यांचे समकालीन होते. ‘केशवसुत यांच्या वृत्तीत वारंवार उठणारी वादळे आहेत. त्यांची कविता भावनेच्या उत्कटतेतून उत्स्फूर्त झाली आहे. ती एका क्षणात लुप्त होणारी सौदामिनी आहे’ असे वर्णन भवानीशंकर पंडित करतात.
रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (16 फेब्रुवारी 1876 – 6 मे 1966) – परांजपे यांचा जन्म मुर्डी या गावी झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे व केंब्रिज येथे झाले. त्यांनी पॅरिस आणि गॉटिंजेन येथेही अभ्यास केला. ते भारतातील सर्व परीक्षांत पहिले आले. ते भारत सरकारची सालीना दोनशे पौंडांची शिषयवृत्ती घेऊन इंग्लंडला गेले. ते 1899 साली रँग्लर झाले. ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य व गणिताचे प्राध्यापक 1902 ते 1926 या काळात होते. ते ‘रिफॉर्म कमिटी’, ‘ऑक्झिलिअर अँड टेरिटोरियल कमिटी’, ‘मॅथेमॅटिकल सोसायटी (लंडन)’, ‘मॅथेमॅटिकल सोसायटी (अमेरिका)’ यांचे सभासद होते. ते मुंबई कायदेमडळाचे सरकारनियुक्त सभासद होते. ते मुंबई विद्यापीठाचे 1905 ते 1927 फेलो होते. ते भारत महिला विद्यापीठाचे कुलगुरू 1916 ते 1920 या काळात होते. ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून 1956 पासून तीन वर्षे होते. ते भारताचे हायकमिशनर म्हणून ऑस्ट्रेलियात 1944 ते 1948 या काळात होते. त्यांना ‘कैसर ए हिंद’ ही पदवी 1916 मध्ये तर ‘सर’ ही पदवी 1942 साली बहाल करण्यात आली. ते विद्वान व शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.
म.म. पांडुरंग वामन काणे (7 मे 1880 – 18 एप्रिल 1972) काणे यांचा जन्म चिपळूणजवळील लोटे परशुराम येथे, त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे बालपण मुरुड येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण ए.जी. हायस्कूल (दापोली) येथे झाले. ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. त्यांनी ‘एलएल एम’सहित सर्व परीक्षांमध्ये पारितोषिके पटकावली. ते गाढे संस्कृत पंडित व धर्मशास्त्र ग्रंथकार म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम काही काळ केले. पण त्यांचा मुख्य व्यवसाय वकिली हा होता. ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र (1930-1962)’ हा पंच खंडात्मक साडेआठशे पृष्ठांचा ग्रंथ हे काणे यांच्या प्रदीर्घ कार्याचे आणि व्यासंगाचे फलित होय. सरकारने त्यांना महामहोपाध्याय ही पदवी दिली. भारतातील गाढा संस्कृत पंडित म्हणून जगातील विद्वानांमध्ये त्यांची गणना होते. सरकारने त्यांची निवड मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून 1947 साली केली. सरकारने त्यांना ‘भारत रत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन 1963 साली गौरवले.
‘राधारमण’ कृष्णाजी पांडुरंग लिमये – लिमये यांचा जन्म आंजर्ले जवळील पाडले या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. माध्यमिक शिक्षण दापोली येथील ए.जी. हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुरे केले. ते दापोली येथील ए.जी. हायस्कूलमध्येच शिक्षक म्हणून 1906 मध्ये रुजू झाले आणि मुख्याध्यापक म्हणून 1922 साली सेवानिवृत्त झाले. त्यांनी ‘कालचक्र’ या काव्यसंग्रहात सर्व ऋतूंची वर्णने करण्याची हौस भागवून घेतली. ते ‘फडणीस काव्य’ या काव्यसंग्रहामुळे प्रकाशात आले. त्यांच्या ‘मोरोपंतांचा प्रभुद्रोह’ या, 1907 साली प्रसिद्ध झालेल्या काव्यात तत्कालीन राजकीय घटनेचे पडसाद उमटलेले दिसतात. त्यांचे ‘आर्यमाता विलाप’ हे काव्य 1909 साली प्रसिद्ध झाले. त्यांनी ‘आचार्य चंपू’ संस्कृतमध्ये 1918 मध्ये रचून ते शिवगंगा मठाचे स्वामी शंकराचार्य यांना दाखवले. ते वाचून स्वामींनी त्यांना ‘कवी शिरोमणी’ ही पदवी दिली. त्यांनी ‘महाराष्ट्र वीरादर्श’ हे काव्य 1919 साली लिहिले. ते वीररस वाहणारे दीर्घकाव्य आहे. लिमये त्या मानाने अप्रसिद्ध राहिले.
रघुनाथ धोंडो कर्वे (14 जानेवारी 1882 – 14 ऑक्टोबर 1953) – धोंडो केशव कर्वे यांच्या सामाजिक कामाचा वारसा सशक्तपणे चालवणार्या पुत्राचा म्हणजेच रघुनाथ कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही मुरुड येथे झाले. माध्यमिक शिक्षण दापोली येथील ए.जी. हायस्कूलमध्ये झाले. ते मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात 1897 साली सर्वप्रथम आले. त्यांनी पॅरिस विद्यापीठातून गणितातील सर्वोच्च पदवी 1920 साली मिळवली. ते मुंबई येथील विल्सन कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी करत होते. त्याच वेळेस ते संतती नियमन व लैंगिक शिक्षण यांचा उघड पुरस्कार व प्रचार करू लागले. म्हणून कॉलेजने त्यांना राजीनामा देणे भाग पाडले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पत्नी मालती यांच्या मदतीने पुण्यात संततिनियमन केंद्र सुरू केले. ते भारतातील पहिले संततिनियमन केंद्र होय. भारत देशापुढील सर्वांत गंभीर प्रश्न लोकसंख्या वाढीचा आहे. त्यांनी तो सोडवण्यासाठी गर्भनिरोधन शस्त्रक्रिया व गर्भनिरोधन साधने वापरणे यांचा प्रसार केला. त्या द्रष्ट्या विचारवंताने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ‘समाज स्वास्थ्य’ नावाचे मासिक सुरू केले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंत चालू होते. त्यांचे ‘संततिनियमन – आचार व विचार’, ‘आधुनिक कामशास्त्र’ हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी व त्यांच्या पत्नीनेही संततिनियमन करून मूल होऊ दिले नाही. त्या काळात असे विचार मांडणे व ते अंमलात आणणे हे धाडसाचे काम होते. ते त्यांचे काम समाजाचा होणारा त्रास सहन करून शेवटपर्यंत करत राहिले. त्यांचा जीवनपट उलगडणारा ‘ध्यासपर्व’ हा अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला.
मामा तथा भार्गवराम विठ्ठल वरेरकर (1883 -1964) – वरेरकर यांचा जन्म चिपळूणला झाला. ते दापोली पोस्ट ऑफिसात बदली होण्याच्या निमित्ताने काही काळ होते. मामा वरेरकर हे नाटककार म्हणून प्रसिद्धी पावले. त्यांनी सामाजिक प्रश्नांना नाटकातून वाट करून दिली. त्यांनी कामगार वर्गाची दु:खे पहिल्यांदा रंगभूमीवर मांडली. त्यांची ‘कुंज विहारी’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा संसार’, ‘भूमिकन्या सीता’ ही नाटके आशयगर्भ आहेत. त्यांनी स्त्रिया व दलित यांच्या संबंधातील स्वातंत्र्य व समता यांचा नाटकाद्वारे पुरस्कार केला. त्यांनी सत्तेचाळीसपेक्षा अधिक नाटके लिहिली. त्यांचे पंडित नेहरू यांच्याशी संबंध जिव्हाळ्याचे होते. स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू यांच्या लेखी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून वरेरकर यांना वरचे स्थान होते.
राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाची कल्पना (1954) वरेरकर यांची होती. स्वतंत्र भारतात तसा सांस्कृतिक महोत्सव पहिल्यांदा होत होता. स्वातंत्र्योत्तर काळातील सरकारची सांस्कृतिक भूमिका व योजना ठरवण्यात वरेरकर यांचा सहभाग मोठा होता.
सानेगुरुजी तथा पांडुरंग सदाशिव साने (24 डिसेंबर 1899 – 11 जून 1950) – सानेगुरुजींचा जन्म पालगड गावी झाला. गुरुजींना आईचे संस्कार चांगल्या प्रकारे लाभले. त्यांचे नववीपर्यंतचे शिक्षण दापोली येथील ए.जी. हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी पुढील शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात घेतले. त्यांनी न्यू पूना कॉलेजमधून संस्कृत विषय घेऊन बी.ए.1922 साली पूर्ण केले. ते कॉलेजात असताना महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनातही सामील झाले होते. ते मुंबई विद्यापीठातून एम. ए. 1924 साली झाले. ते शिक्षक म्हणून 1924 ते 1930 या काळात अंमळनेर येथे नोकरी करत होते. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीबरोबर 1930 ते 1942 हा काळ खानदेशात किसान-मजुरांचे लढे संघटित करण्यात गेला. ते ‘छोडो भारत’ आंदोलनात 1942 ते 1945 सहभागी झाले, त्यांचा समाजवादी आंतरभारती विचारांच्या प्रसारात 1945 ते 1950 हा काळ मुंबईतमध्ये गेला. त्या कालखंडात शिक्षक, लेखक, पत्रकार, सत्याग्रही अशी त्यांच्या व्यक्तित्वाची विविध रूपे पुढे आली. त्यांनी त्या व्यस्त आणि संघर्षमय कालखंडात केलेले अमाप लेखन पाहून छाती दडपते. त्यांच्या ‘श्यामची आई’ या आत्मकथनात्मक कादंबरीने विक्रीचे उच्चांक मोडले. ते पुस्तक सतत विकले जात असते. त्यांनी 15 ऑगस्ट 1948 रोजी सुरू केलेले ‘साधना साप्ताहिक’ नियमितपणे प्रकाशित होत आहे. त्यांनी त्यांचे जीवन आत्महत्येचा मार्ग स्वीकारून 11 जून 1950 रोजी संपवले. सानेगुरुजींच्या जीवनावरील बाबा आमटे यांच्या ‘अश्रूंच्या नोंदी’ या दीर्घ कवितेची फार आठवण होते. त्यातील काही ओळी –
न्यायी माणसासाठी अन्यायी व्यवस्थेत
फक्त दोन जागा
तुरुंग अन् मृत्यू
तुला तुरुंग नवा नव्हता
मृत्यू तर यायचाच होता
त्यासाठी प्रयत्न का केलेस? करुणा होती, कणव होती, प्रेषितांची प्रज्ञा होती
मग का झालास पराभूत प्रेषित?एकाकी होतास, मनस्वी होतास
पण अनासक्तही होतासच
मग जीवनाच्या अनासक्तीत का धरलीस
मृत्यूची आसक्ती?
कवी बदी उज्जमान खावर – कवी खावर यांचे मूळ घराणे परकार. परंतु त्यांनी त्यांच्या पारंपरिक आडनावाचा त्याग करून बदी उज्जमान खावर हे त्यांचे उर्दूतील साहित्यिक नावच पूर्ण नाव म्हणून धारण केले. कवी खावर यांचा जन्म मंडणगड तालुक्यातील बाणकोट या गावी झाला. त्यांचे वडील सुफी बाणकोटी (1919 – 1976) हेही कोकणातील प्रसिद्ध उर्दू शायर होते. त्यांचा काव्यसंग्रह ‘बाद – ए – साफी’ या नावाने प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीकडून मरणोपरांत पुरस्कारही मिळाला आहे.
कवी खावर दापोली येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये अध्यापक म्हणून काम करून तेथूनच निवृत्त झाले. त्यांची उर्दूमध्ये पंधरा पुस्तके प्रसिद्ध झाली. पैकी ‘हुरुफ’, ‘मेरा वतन हिंदोस्ता’, ‘बयाज’, ‘अमराई’, ‘लफ्जोंका पैरहन’, ‘सातसमंदर’, ‘नन्ही किताब’, ‘मोती, फूल सितारे’ आणि ‘सब्जोताजा मिहालोंके अम्बोहमे’ हे त्यांचे स्वतंत्र उर्दू कवितांचे नऊ संग्रह आहेत. कवी खावर यांनी शंभराहून अधिक मराठी कवितांचे उर्दूमध्ये अनुवाद केले आहेत. त्यांतील बहुतेक अनुवाद ‘खुश्बू’, ‘सबील’, ‘मराठी रंग’ या तीन संग्रहांत प्रसिद्ध झाले आहेत. खावर यांनी निरंजन उजगरे यांचा ‘दिनार’ आणि बापुराव जगताप यांचा ‘निळ्या पहाडाच्या कविता’ या दोन संग्रहांचा ऊर्दूत अनुवाद केला आहे. त्यांचे मराठीत ‘गझलात रंग माझा’ व ‘माझिया गझला मराठी’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
कवी खावर यांना त्यांच्या प्रदीर्घ व ठोस उर्दू साहित्यसेवेसाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, उत्तर प्रदेश अकादमी, बिहार उर्दू अकादमी, महाराष्ट्र उर्दू अकादमी आणि अन्य काही संस्थांची चौदा पारितोषिके मिळाली. लखनौ येथील ऑल इंडिया मीर अकादमीने 1985 साली त्यांना ‘इम्तियाझे मीर सनद’ हा उर्दूतील उच्च साहित्यिक बहुमान प्रदान केला.
श्रीपाद नारायण पेंडसे (4 जानेवारी 1913 – 24 मार्च 2007) – कोकणातील दापोली तालुक्याची ओळख मराठी वाचकांना श्री.ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्यांमधून झाली. त्यांच्या ‘एल्गार’ व ‘हद्दपार’ या कादंबऱ्यांमध्ये दापोली तालुक्यातील प्रदेश सढळतेने येतो. ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीत मात्र कथानकाला जितके आवश्यक आहे तितकेच कोकणचे दर्शन येते. ते वर्णन इतके खरेखुरे आहे, की त्या वर्णनाच्या पाऊलखुणा वाचक दापोलीपासून सात-आठ किलोमीटर दूर असलेल्या ‘आसूद बाग’ व ‘आसुद पूल’ या परिसरात शोधू शकतात. दापोली परिसर, पर्यावरणाची पडझड होऊनही अजूनही निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे!
श्री.नां.ची कथानके खुद्द दापोली गावात फारशी घडत नाहीत, परंतु त्यांच्या ‘जुम्मन’ या कथासंग्रहातील ‘डोह’ या कथेत दापोलीचे वर्णन येते. आश्चर्य म्हणजे त्या कथेत ज्या ठिकाणांचे उल्लेख येतात ती ठिकाणे दिसू शकतात. आसऱ्याचा पूर्वीचा पूल पाडला जाऊन नवा पूल बांधला गेला आहे. पोस्ट ऑफिस जुन्या जागेवरच आहे. त्याच्या पिछाडीस आसऱ्याच्या पुलाखालून आलेला ओढा वाहत आहे. श्री.नां.ना उदास करणारे व मोडकळीस आलेले गॅडनेचे चर्च वाचकालाही उदास करते. मुर्डी हे पेंडसे यांचे गाव. मुरुड हे त्यांचे आजोळ. पेंडसे मुर्डीत व दापोलीत वयाच्या अकराव्या वर्षांपर्यंत होते. त्यांचे पुढील सर्व आयुष्य मुंबई येथे गेले. कोकणातील त्यांचे अकरा वर्षांचे वास्तव्य त्यांच्या जीवनावर मोठा ठसा उमटवून गेले. ते लिहितात, ‘निवड हा शब्दसुद्धा अप्रस्तुत वाटावा इतक्या अहेतुकपणे तो प्रदेश माझ्या आजवरच्या लेखनात आलेला आहे. त्यांनी ‘एल्गार’, ‘हद्दपार’, ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या ’, ‘यशोदा’, ‘कलंदर’, ‘रथचक्र’, ‘लव्हाळी’, ‘ऑक्टोपस’, ‘आकांत’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीची राधा’, ‘कामेरू’ या कादंबर्या लिहिल्या. ‘गारंबीचा बापू’ने प्रसिद्धीचा कळस गाठला. त्याशिवाय, त्यांनी ‘खडकावरील हिरवळ’ हे व्यक्तिचित्रसंग्रह व ‘जुम्मन’ हा कथासंग्रह व इतर अनेक नाटके लिहिली. कथानकाची बहुपेडी गुंफण करूनही ती केंद्रबिंदू असलेल्या कथावस्तूभोवती फिरती ठेवण्याची त्यांची होतोटी विलक्षण आहे. ते ‘रॉकफेलर प्रवासी शिष्यवृत्ती’ मिळवणारे भारतातील पहिले लेखक होत.
गोपाल नीलकंठ दांडेकर (8 जुलै 1916 – 1 जून 1998) – दांडेकर यांचे मूळ गाव ‘गुडघे’ हे आहे. दांडेकर यांचा जन्म परतवाडा – अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी पाचवीपर्यंत झाले होते. त्यांचे वास्तव्य बराच काळ विदर्भात होते. अखेरीस, त्यांचे वास्तव्य पुणे येथे होते. ते महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्यासाठी घरातून पळून गेले. त्यांनी आयुष्यभर अव्याहत भ्रमंती केली. त्यांच्या ‘स्मरणगाथा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला 1986 साली ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला. त्यांनी अकोला येथे 1981 साली भरलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषवले. त्यांची ग्रंथसंपदा अफाट आहे. त्यांचे ‘देवकीनंदन गोपाला’ हे गाडगेबाबा यांच्यावरील चरित्र वास्तवदर्शी व प्रमाण मानले जाते. त्यांच्या कथानकात, दृश्यवर्णनात, भाषेत, शैलीत कमालीचे वैविध्य आहे. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये कोकण जितके सहजपणे डोकावते तितक्याच सहजपणे दख्खनच्या पठारावरचा टापूही आढळतो. कादंबरीतील व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांची भाषा कधी खडबडीत तर कधी मऊसूत होते. गाडगेबाबांचे चरित्र लिहिताना त्यांचे लेखन हरदासाच्या शैलीसारखे अघळपघळ व रसाळ होते. त्यांच्या शब्दकळेला तांबड्या मातीचा सुवास आहे तर वऱ्हाडी भाषेचा सहवास आहे.
(माहिती संकलित करण्यात शांता सहस्त्रबुद्धे, सुहास मातोंडकर, माधव गवाणकर व नीलेश वझे यांचे सहाय्य झाले)
– विद्यालंकार घारपुरे