दादा बोडके – पपई बागेचा प्रणेता!

17
93
_Dadasaheb_Bodake_1.jpg

दादा बोडके हे सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील असामान्य शेतकरी आहेत. दादांनी उपेक्षित ‘पपई’ या फळपिकाला राजमान्यता मिळवून दिली! पपई अन् दादा यांचे संघटन लोकांच्या मनी घट्ट आहे. दादा एकदा कुटुंबाला घेऊन बार्शी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या धामणगावला बैलगाडीतून चालले होते. त्यांना एका शेतात पिकलेल्या पपईचे झाड दिसले. ते पपईच्या मोहात पडले. त्यांनी पळत जाऊन पपई तोडून आणली. त्याच क्षणी पपईचा आणि त्यांचा सबंध जुळला!

दादांनी गावरान पपई 1983-84 मध्ये लावली. त्यावेळी पपईची करंडी तीस-चाळीस रुपयांना विकली जायची. ती वॉशिंग्टन व कोईमतूर जातीची होती. त्यांची टिकवणक्षमता कमी होती. त्याचवेळी वळसंग (तालुका – दक्षिण सोलापूर) येथील एका शेतकऱ्याने तैवान डिस्को जातीची पपई लावली. ती बारकी असल्याने तिला डिस्को म्हटले जाई. दादांनी त्याचेही बी आणले. नंतर त्यांना कळले, की ते बी तैवान देशातून येते! विशेष म्हणजे त्या बिया भारतात आणण्यास बंदी होती. दादांकडे त्यावेळी पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांना तैवान पपईची लागवड करता आली नाही. त्यावेळी ते खरबुजावर काम करत होते. त्‍या फळाच्‍या उत्‍पन्‍नात बोडके यांना यश मिळाले. मुंबईच्या वाशी मार्केटला दादा बोडके यांचे खरबुज प्रसिद्ध होते. बोडके यांची खरबुजे आजही तेथे येतात.

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील निकुंबे गावचे गुलाबसिंग झिंगागिराशे यांना मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये दादा बोडके यांचे नाव कळले व ते दादांचा शोध घेत अनगर (तालुका मोहोळ) येथे पोचले. त्यांच्याकडे शंभर एकर शेती होती. मात्र त्यांनी त्यांना अठरा लाख रुपये कर्ज झाल्यामुळे त्यांतील चाळीस एकर जमीन विक्रीसाठी काढली होती. दादांनी त्यांना इंडो अमेरिकन कंपनीचे सोना जातीचे खरबूज पाच एकरांमध्ये लावण्याचा सल्ला दिला. तेवढेच नव्हे, तर प्रत्यक्ष लागवडीवेळी, दादा त्यांच्या गावी गेले. दादांच्या लक्षात आले, की तेथील हवामानाला खरबूज चांगले येणार नाही. त्यामुळे दादांनी त्यांना तैवान पपई लावण्याचा सल्ला दिला आणि बियाणे मिळत असलेल्या मुंबईतील कंपनीचा पत्ता दिला. ते बी सोळाशे रुपये तोळा होते! एका पाकिटात दहा ग्रॅम बी असायचे.

त्यांनी वीस एकर तैवान पपई लावली. तो महाराष्ट्रातील तैवान पपईचा पहिला प्लॉट. तैवान पपईमध्ये नरमादी हा प्रकार नसतो. गुलाबसिंग यांना वीस एकरांत त्यावेळी एकवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले! त्यांचे अठरा लाखांचे कर्ज एका पिकाच्या उत्पन्नात फिटले! तो दादांच्या यशस्वीतेमधील अतिशय महत्त्वाचा टप्पा ठरला.

त्यानंतर, दादांनी कर्जबाजारी अनेक शेतकऱ्यांना पपई लावण्याचा सल्ला दिला व तत्संबंधी मार्गदर्शन केले. दादांची भटकंती कायम सुरू असते. भटकंतीतून, त्यांनी मोठा शेतीमित्र परिवार जोडला आहे.

दादा बोडके यांची रोपवाटीकादादांची व्यावसायिक ओळख ही मात्र त्यांच्या रोपवाटिकेमुळे आहे. त्या, रोपवाटिकेचे नाव आहे – ‘गरुडझेप’. दादांनी त्यांच्या मित्राच्या सहाय्याने वडवळ येथे जमीन विकत घेतली. कर्ज काढून एक विहीर बांधली. त्या पाण्यावर गहू, हरभरा, ज्वारी अशी पिके घेतली. त्याेनंतर कर्ज काढून रोपवाटिका सुरू केली. त्यांरनी हळुहळू 80 एकर जमीन खरेदी केली. ब-याच विहिरी खोदल्या. दादांची आर्थिक परिस्थिती सुधारली.

दादा स्वत: शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरतात. त्या अर्थाने दादा ‘कृषिदूत’ आहेत. दादांच्या कामाची कल्पना त्यांच्या वडवळ येथील ‘गरुड भरारी’ शेतीफार्मला भेट दिल्यानंतर येते. बोडके फार्म हाऊसमध्ये तयार होणारी पपईची रोपे सात राज्यांमध्ये जातात. दादांनी त्यांची ‘पत’ त्या सात राज्यांत तयार केली आहे. दादांनी त्यांच्या संकल्पनेतील ‘कृषी ज्ञानेश्वरी गार्डन’ बोडके शेती फार्मवर तयार केली आहे. ती भारतीय कृषी संस्कृतीचे दर्शन घडवते.

ते रोपवाटिकेकडे सेवा म्हणून पाहतात. त्यातून त्यांना अर्थार्जन झाले; परंतु निरोगी आणि खात्रीची रोपे मिळाल्यामुळे जे शेतकरी कर्जमुक्त झाले, ज्यांचे प्रपंच उभारले गेले त्याचे मोल दादांना रोपांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपेक्षा जास्त वाटते.

दादांनी तालुका कृषी केंद्र (मोहोळ), कोरडवाहू संशोधन केंद्र (सोलापूर), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), कोकण कृषी विद्यापीठ, गणेशखिंड (पुणे), हिमायतबाग (औरंगाबाद), माटे नर्सरी (रत्नागिरी), इण्डो अमेरिका सीड फार्म (बंगलोर) अशा अनेक संशोधन केंद्रांना भेटी देऊन शेतीचे ज्ञान अवगत करून घेतले. दादांना त्यातून शेतीची नवीन दिशा मिळाली. गंगा, जमुना, शेळी, जर्सी गाय, ससेपालन, फळबाग लागवडी, बोराच्या रोपांची नर्सरी चालू केली. शेतकऱ्यापासून ते विद्यार्थी, संशोधक, मंत्री असे सर्वच जण दादांच्या शेतीला भेट देत असतात.

_Dadasaheb_Bodake_4.jpgदादांची शेती आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. तेथे पाण्याचा, मातीचा आणि खतांचा उपयोग शंभर टक्के केला जातो. दादा शेतीमध्ये नव्वद टक्के शेणखत आणि दहा टक्के रासायनिक खत वापरतात. साठ किलोमीटर अंतरावरून गावखत आणून खताचे ढीग जमिनीत वरचेवर रिचवले जातात. मातीचेही ढीग तेथे वारंवार पाहायला मिळतात. त्यांनी सीना नदीच्या पात्रातून, तीन किलोमीटर अंतरावरून सहा इंच पाईपलाईनद्वारे पाणी आणून शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन नियोजनबद्ध केले आहे. शिवाय, त्यांच्या शेतात चार विहिरी आणि सहा विंधन विहिरी (बोअर) आहेत.

दादांना घरात आणि शेतीत, दोन्हीकडे मदत करणारी शिवाजी आणि भिवाजी ही दोन मुले आहेत.

दादा साधू बोडके हे शून्यातून वर आलेले शेतकरी आहेत. त्यांची रा‍हणी साधी आहे. दादांकडे 1992 मध्ये एक गुंठाही शेती नव्हती. त्यांनी वडिलोपार्जित शेती भावांना दिली. त्यांनी 1994 साली अडीच एकर जमीन घेऊन पुनश्च शेती सुरू केली. ती जिद्द, चिकाटी व सातत्य यांच्या जोरावर फुलवली. त्यांनी आधुनिक तंत्राचा आणि नवनव्या प्रयोगांचा वापर करून कमी खर्चात आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा नवा मार्ग निर्माण केला. तो दुसऱ्यांनाही दाखवला. त्यामुळे दादा समृद्ध झाले. त्यांच्याकडे ऐंशी एकर जमीन अनगर व वडवळ येथे आहे आणि त्यांचे सोलापूर येथे घर आहे.

दादांचा एकूण तेरा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आलेला आहे. देशपातळीवर दोन वेळा व  राज्य पातळीवर दोन वेळा. महाराष्ट्र सरकारने त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार 1997 साली तर कृषिभूषण पुरस्कार 2001 साली देऊन सन्मानित केले. भारत सरकारनेही त्यांना 2001 साली बाबू जगजीवन राम किसान पुरस्कार दिला आहे. दादांजवळ एक गाय होती, ती सकाळी वीस लिटर आणि रात्री वीस लिटर दूध देई. त्या गायीला भारत सरकारकडून राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. तो सन्मान त्या गाईचा नव्हता तर तिला सांभाळणाऱ्या दादा बोडके यांचा होता. महाराष्ट्र सरकारने दादांना कृषी दौऱ्याकरता चीनला 2009 साली पाठवले. दादा सांगतात, ‘मानवजन्म अमूल्य आहे. मानव जन्माचा सदुपयोग केला पाहिजे. माणसाच्या आयुष्यात अर्धे आयुष्य झोपेमध्ये जाते. आयुष्याचा एक चतुर्थांश भाग खाण्यापिण्यामध्ये जातो. उरलेल्या एक चतुर्थांश आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार करून दाखवला पाहिजे.’

दादांचे शिक्षण केवळ तिसरीपर्यंत झाले आहे. तरी त्यांच्या कष्टातून उभी असलेली द्राक्ष, जांभूळ, सीताफळ, आवळा, आंबे, नारळ सर्व फळझाडांच्या रोपांची नर्सरी, भाजीपाल्याच्या रोपांची आधुनिक नर्सरी आणि पीक लागवड व व्यवस्थापन पद्धत आदर्श घेण्याजोगी आहे. त्यांनी परिस्थितीनुसार स्वत:ला बदलले. आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र स्वीकारला आणि यशस्वी वाटचाल सुरू ठेवली.

दादा बोडके –
गरूडझेप शेती फार्म
वडवळ स्टॉप, हॉटेल सदिच्छासमोर, सोलापूर रोड,
मु. पो. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
(०२१८९)२४८५२५, २६२२०२/ ९८२२३५८९६५/ ९८५०६१००९९

– प्रमोद पाटील

(मूळ लेख – ‘शेतीमित्र’ मासिक)

(Last Updated On – 22nd Sep 2018)

About Post Author

17 COMMENTS

  1. Think Maharastra Atulniy
    Think Maharastra karat aslele kary Atulniy! lahan pramanik sanstha yaanna sabandh desh patlivar prichit karate ahe. khup khup shubecha. Ani dhanayavad.

  2. दादा बोडके याना मिळालेले
    दादा बोडके याना मिळालेले पुरस्कार:-
    १. शेतीनिष्ठ पुरस्कार १९८७( कृषी विभाग, महाराष्ट्र शासन)
    २. दुध डेअरी गुणवत्ता पुरस्कार १९९२( डेअरी विभाग, भारत सरकार)
    ३. कृषी पुरस्कार २०००( शाओलीन सोशल वेल्फेअर सेंटर , पुणे)
    ४. कृषिभूषण पुरस्कार २००१ ( कृषी विभाग)
    ५. पिक स्पर्धा प्रशीक्षण समिती सदस्य २००४-०७( पुणे विभाग)
    ६. मराठा भूषण पुरस्कार २००६-०८
    ७.महात्मा फुले पुरस्कार २००६-०७( ब्रह्मदेव माने प्रतीस्थान, सोलापूर }
    ८.मोहन भिडे आदर्श शेतकरी पुरस्कार २००६-०७( बळी राजा मासिक , पुणे)
    ९. वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार २००७ (पुसद)
    १० . मायाजाल समाज गौरव पुरस्कार २००७
    ११ . जगजीवन राम किसान पुरस्कार २००८( कृषी विभाग , भारत सरकार)
    १२ मेड इन चायना कृषी गौरव पुरस्कार २००९
    १३. शाहू महाराज किसान शक्ती पुरस्कार २००९( कोल्हापूर)

  3. नमस्कार दादा! दादांबद्दल
    नमस्कार दादा! दादांबद्दल अभिप्राय देणे म्हणजे आकाशाला हात लावण्यासारखे होईल. आपणास सा.नमस्कार आपण आमची दिशा आहात. बस्स एव्हढेच.

  4. खुप छान युवा शेतकऱ्यांना
    खुप छान युवा शेतकऱ्यांना उर्जा व नविन दिशा देणारं व्यक्तीमत्व आहे .

  5. चागंले आहे
    चागंले आहे

  6. नव्या आशा — नव्या दिशा —-
    नव्या आशा — नव्या दिशा —- नवी क्षितिजे — म्हणजे दादा बस्स दादासाठी शब्द अपुरे आहेत

  7. सर मला पपई लागवड करायची आहे
    सर मला पपई लागवड करायची आहे कोणती जात लावावी

  8. पपई लागवड़ीची माहीती
    पपई लागवड़ीची माहीती

  9. उत्कृष्ट दादांची भेट घ्यायची…
    उत्कृष्ट दादांची भेट घ्यायची आहे

  10. पपई रोपे कुठे मिळतील
    पपई रोपे कुठे मिळतील

  11. गावरान पेपेन साठी बीज पाहीजे…
    गावरान पेपेन साठी बीज पाहीजे मिळते का

Comments are closed.