सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील दहिगाव हे जैनांचे भगवान महावीर व ब्रम्हमहती शांती सागर महाराज यांच्या क्षेत्रामुळे प्रसिद्ध आहे. दहिगाव नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावाला संस्थानिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम यांची कन्या त्या गावात निंबाळकर घराण्यात दिली होती. तर संताजी घोरपडे याला त्याच संस्थानात मानाजी माने याने पकडल्याची नोंद आढळते.
दहिगाव परिसरात निंबाळकर राजघराण्याचे कोठलेही अवशेष आढळत नाहीत. छत्रपती राजाराम यांची कन्या आणि जावई यांची समाधी तेथे असल्याचे बोलले जाते, मात्र त्या गावात किंवा परिसरामध्ये कोठल्याही प्रकारची समाधी दिसली नाही. मात्र गावाच्या पश्चिमेला पूर्वी निंबाळकर घराण्याची जमीन होती, त्या ठिकाणी पडिक स्थितीतील समाधीसदृश वास्तू पाहण्यास मिळते. त्या दोन वास्तू आहेत हे खरे व त्या एकमेकांपासून साधारण एक हजार फूट अंतरावर आहेत. त्या ठिकाणी सत्याईचे मंदिर असून, त्या नेमक्या कोण याचाही उलगडा होत नाही.
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील कन्हेर हे गाव तेथील महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. ते नातेपुतेपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते पूर्वी दहिगाव संस्थानात येत होते. त्या ठिकाणी दोन ओढ्यांचा संगम झाला असून त्याला संगम ओढा म्हणून संबोधले जाते. संताजी घोरपडे त्या ओढ्यावर अंघोळीला येत असत; त्याच ठिकाणी त्यांचा घात झाल्याची माहिती मिळते.
तेथील महादेवाचे मंदिर दगडी काम केलेले आकर्षक असे आहे. त्यास कन्हेर देव असेही म्हणतात. मंदिरामध्ये खरे-खोटे केले जात असल्याची आख्यायिका आहे. गावाचा न्यायनिवाडा त्याच मंदिरात केला जात असल्याचे मंदिराचे पुजारी यांनी सांगितले. मंदिराला तटबंदी असून पूर्व आणि पश्चिम दिशांना दोन मुख्य प्रवेशद्वारे आहेत. आतमधील मुख्य मंदिरात नांगराचे चित्र रेखाटले आहे. ते दगडी कामात आहे. मंदिराच्या बाहेर, समोरच्या बाजूस एक समाधी असून ती पुरातन काळातील असल्याचे सांगतात. त्याच्यापुढे सभामंडपासारखे ठिकाण असून त्यात दोन भुयारी मार्ग असल्याची माहिती मिळते. ते कोणी बांधले, कशासाठी बांधले याची माहिती गावक-यांना नाही.
कण्हेर या फुलामुळे या गावास कन्हेर असे नाव पडल्याचे तेथील पुजारी दादाकिसन गुरव यांनी सांगितले.
भगवान महावीरांचे मंदिर मोठे असून ते गुहेमध्ये आहे. त्या ठिकाणी भगवान महावीरांची मोठी मूर्ती पाहण्यास मिळते. शेजारी छोटी विहीर असून त्या विहिरीतील पाणी वापरले जाते. चार दरवाजे असेलेले मंदिर त्या मंदिराशेजारी आहे. त्या मंदिरात मुख्य तीन मंदिरे आहेत. त्या ठिकाणी ब्रम्हमहती सागर महाराज यांनी समाधी घेतली. ते जैन समाजातील गुरू म्हणून ओळखले जातात. ब्रम्हमहती सागर महाराज हे मूळचे अमरावती जिल्ह्याचे. ते फिरत फिरत साधना करत असताना त्यांना दहिगावची जागा आवडली. त्यांनी तेथे तपश्चर्या चालू केली. ते दररोज नदीवर अंघोळ करण्यासाठी जात असत व तेथून एक दगड मंदिर बांधण्यासाठी उचलून आणत असे म्हटले जाते. ब्रम्हमहतीसागर यांच्यावर साहित्यनिर्मिती झालेली आहे. ब्रम्हमहतीसागर यांनी आध्यात्मिक व साहित्यिक दर्ज्याचे लिखाण केले. भगवान महावीर त्या गावात इसवी सन पूर्व 2600 वर्षांपूर्वी येऊन गेल्याची हकिगत सांगितली जाते.
गावात जैन बोर्डिंग असून अनाथ मुलांना त्या ठिकाणी मोफत जेवण, शिक्षण दिले जाते. धर्मशाळा 1930 साली मंदिराशेजारी सुरू करण्यात आली. गावातील संस्थानिक बाळासाहेब निंबाळकर यांच्या जागेत गुरुकूल उभारणीचे काम चालू आहे.
(माहिती स्त्रोत – विठ्ठल आबाजी पाटील, 9763613308)
– गणेश पोळ