थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)

0
70
मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या ‘थोरो-दुर्गा भागवत भेटीच्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या. त्यात ठाण्याच्या रजनी देवधर यांनी तर विचारवंत थोरोच्या अमेरिकेतील स्मारकजागेला, वॉल्डन तळ्याला भेट दिल्याचे व तत्संबंधी ‘लोकसत्ते’च्या वास्तुरंग पुरवणीत लिहिले असल्याचे कळवले. मी त्यांना फोन केला तेव्हा देवधर म्हणाल्या, की मी ठाण्यात तलावपाळीला फिरण्यास जाते तशी वॉल्डन परिसरात चार वेळा, वेगवेगळ्या ऋतूंत फिरून आलेली आहे. माझा मुलगा तेथून जवळच राहतो. मॅसेच्युसेट स्टेटमधील फ्रॅमिंगहॅम हे त्याचे गाव. देवधर यांचा थोरोच्या स्मारकाबद्दलचा लेख पुढे जोडला आहे. पण येथे काही ओळी रजनी देवधर यांच्याबद्दल, त्यांच्या आवडींबद्दल लिहाव्याशा वाटतात. त्यांचे ‘वास्तुरंग’ पुरवणीतील लेख वाचनात होते. आम्ही त्यांतील दापोलीजवळच्या देगाव येथील आजीच्या घराबाबतचा लेख ‘थिंक महाराष्ट्र’वर पुनर्मुद्रित करू इच्छितो. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क निर्माण झाला होता. देवधर यांच्याशी फोनवर अधूनमधून वेगवेगळ्या विषयांवर बोलणे होई. त्यांचा रोख मुख्यतः बांधकाम व्यवसाय आणि वैद्यक व्यवसाय यांवर असे आणि त्यांचा कटाक्ष त्या व्यवसायांतील गैरव्यवहारांबद्दल असे. बिल्डर लोक ग्राहकांना आणि डॉक्टर लोक रोग्यांना कसे आडकवतात, फसवतात व नाडतात यांच्या कहाण्या त्यांच्याकडे आहेत. मात्र त्यांच्या कहाण्या गॉसिपपुरत्या राहत नाहीत, कारण देवधरतत्संबंधी वाचन करतात व नंतर बोलतात.
          मी थोरोसंबंधीचा लेख लिहिल्यानंतर देवधर यांच्या आवडीचा नवा रुचिदार विषय माझ्या ध्यानी आला. तो म्हणजे त्यांची इंग्रजी-मराठी साहित्याची आवड, त्यांनी केलेले विविध वाचन आणि मुख्य म्हणजे लक्षात ठेवलेले संदर्भ… मला वाटले, की त्या प्राध्यापक असाव्यात! तर त्या म्हणाल्या, ‘छे हो! मी मुंबई महानगरपालिकेत कारकुनी नोकरी केली.’ त्यांनी तेथील एक गंमतीदार किस्सादेखील सांगितला. त्या म्हणाल्या, की “मी व्हील टॅक्स डिपार्टमेंटला होते. एकदा गंगाधर गाडगीळ यांची तत्संबंधात काही तक्रार आली. महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष झाले. तर गाडगीळ यांचा संतापून फोन आला. तो मीच घेतला. त्यांचे व्हील टॅक्स संदर्भात काही काम होते. ते अनावधानाने प्रलंबित राहिल्याने गाडगीळ साहजिकच संतप्त झाले होते. त्या वेळी अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ हे मराठीमधील मोठे साहित्यिक आहेत ही बाब फारशी कोणाला माहित नव्हती. गाडगीळ यांचे प्रलंबित काम त्वरेने निपटले गेले. त्या वेळी उडालेली तारांबळ यामुळे गंगाधर गाडगीळ हे नाव तेव्हा संबंधित साऱ्यांच्या चर्चेत राहिले होते.  

         

वॉल्डनचे तळे

मी त्यांना विचारले, “तुम्हाला थोरो कसा माहीत?” तर त्या म्हणाल्या, की मी दिवाळी अंकात लेख वाचला होता. माझा मुलगा अमेरिकेत गेला व मॅसॅच्युसेट स्टेटमध्ये फ्रॅमिंगहॅम येथेच राहू लागला. तेव्हा मला संदर्भ आठवला. मी त्याला म्हटले, ‘थोरोचे काँकॉर्ड गाव तुझ्या गावाजवळ आहे’. मग मी प्रथम अमेरिकेत गेले तेव्हा काँकॉर्ड गाव व वॉल्डन लेक आवर्जून पाहून आले. नंतर मी पुन:पुन्हा तीन-चार वेळा गेले. एकदा तर स्मारकासह अवघे गाव बर्फाखाली होते. ते सारे तपशील थोरोच्या निसर्गवर्णनात येतात. थोरोच्या वेळचे गाव दोनशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे, पण निसर्ग, जंगल तसेच आहे. पुस्तकातील अनेक खुणा तेथे पाहण्यास मिळतात. वॉल्डन तळ्याच्या एका बाजूने झाडीमध्ये रेल्वे रूळ आहेत. तेथे कधी कधी गाडी जाताना दिसते. वॉल्डनमध्ये थोरोने लिहिले आहे त्यापैकी रूळ, रेल्वे स्टेशन सध्याही आहेतत्या ट्रेनने मी मात्र अद्याप  प्रवास केलेला नाही. खूप छान परिसर आहे. वॉल्डन तळे छान आहे. थोरोने वर्णन केलेले cape cod तेही अप्रतिम!  

          रजनी देवधर मार्क ट्वेन याच्या गावाला जाऊन त्याचे स्मारकही पाहून आल्या. ते गाव त्यांच्या फ्रॅमिंगहॅमपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यांनी परवा ग्रंथ दिनाला मला शुभेच्छा पाठवताना मार्क ट्वेन याच्या स्मारकास भेट दिल्याचा उल्लेख करून लिहिले -गुलामगिरीवरचे पुस्तक Uncle Tom’s cabinची लेखिका हॅरिएट स्टोव आणि मार्क ट्वेन यांची घरे जवळ कनेक्टिकटला आहेत. Uncle Tom’s cabin माझ्या घरी नाही. ते मला एशियाटिकमध्ये मिळाले होते. वॉल्डन माझ्या घरी आहे. Uncle Tom’s cabin चे मराठी भाषांतर दादरला, घाटकोपर, ठाण्याला लायब्ररीमध्ये शोधले होते, पण ते मिळाले नाही. जुनी चांगली इंग्रजी पुस्तके आयआयटीच्या लायब्ररीमध्येसुद्धा मिळतात. मराठी शोधावी लागतात. जे वाचलेले असते तो सगळा कालखंड इतिहास, भूगोल, समाजजीवन, तेथील व्यक्ती त्या वास्तू पाहताना डोळ्यांपुढे येतात. कनेक्टिकटला आगळा भूगोल आहे.  टेक्टॉनिक प्लेटचा आणि मार्क ट्वेन, हॅरिएट स्टोव अशा लेखकांचा इतिहास आहे.

         

अशोक आणि रजनी देवधर
येऊरला काढलेला फोटो

रजनी देवधर यांचे मिस्टर अशोकदेखील उत्तम वाचक आहेत. ओळखीतून ओळखी निघतात तसे झाले. ते आमच्या कै.चिंतामणी(सीडी) देशमुखचे मित्र. जग लहान आहे असे म्हणतात ते अशा तऱ्हेने प्रत्ययाला आले. अशोक देवधर बँकेत नोकरी करून निवृत्त झाले. ती दोघे व त्यांचे दोन मुलगे असा संसार करत त्यांनी साहित्यादी आवडी जोपासल्या. छापील शब्दांचे माध्यम ज्या काळात प्रभावी होते त्या काळातील माणसे असे कोणतेतरी स्वत्व जपून जगलेली जाणवतात. मल्टीमीडिया गेल्या तीन दशकांत येत गेला, त्या काळात वाढत गेलेली पिढी कोणत्या प्रकारची रसिकता जोपासणार असा प्रश्न कधी कधी मनात येतो.

विचारवंत व निसर्ग अभ्यासक हेन्री डेव्हिड थोरो

 

(रजनी देवधर)
हेन्री डेव्हिड थोरो

हेन्री डेव्हिड थोरो हा लेखक, कवी, निसर्गवेडा, तिरकस बुद्धीचा आणि वागण्यात सच्चेपण असलेला विचारवंत. तो 12 जुलै 1817 रोजी अमेरिकेत जन्मला, अवघे त्रेचाळीस वर्षांचे आयुष्य त्याला लाभले. तो निसर्गाची अपार ओढ असलेला कलंदर होता. त्याच्या विचारांचा, साहित्याचा प्रभाव उच्च मानवी मूल्यांसाठी, अन्याय-शोषण याविरुद्ध झगडणाऱ्या युगपुरुषांवर होता. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग या साऱ्यांनाच थोरो गुरुस्थानी वाटे. त्याच्या Civil Disobedience (सविनय कायदेभंग) या निबंधाचे वाचन महात्मा गांधी यांनी आफ्रिकेतील तुरुंगात असताना केले होते. बलाढ्य ब्रिटिश सरकारविरुद्ध लढा देण्याच्या त्यांच्या धोरणाला अहिंसेच्या मार्गाची दिशा सापडल्यानंतर ते भारतात परतले. गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ 14 फेब्रुवारी 1930 रोजी सुरु केली. त्यांनी हिंसा न करता ब्रिटिशांचे जुलमी कायदे मोडणे आणि शिक्षा भोगणे अशी पद्धत अवलंबली. त्यांना सविनय कायदेभंगही संकल्पना थोरोच्या साहित्यात सापडली.

थोरोचा जन्म अमेरिकेतील मॅसेच्युसेट राज्यात काँकॉर्ड येथे झाला. थोरो काँकॉर्डला राहायचा तेव्हा गावात थोड्या इमारती, तलाव, शेते, नद्या आणि जंगल होते. थोरोला उपजत आवड घराबाहेर निसर्गात राहायची, निसर्गातल्या विविध गोष्टींची दखल घेत निरीक्षणे करायची. घरी त्याच्या वडिलांचा पेन्सिल बनवायचा छोटा व्यवसाय होता. त्यात मदत करत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचे लेखक व कवी राल्फ इमर्सन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध जुळले. त्यांनी थोरोचे निसर्गप्रेम पाहून थोरोला निसर्गात पाहिलेल्या घटना नोंद करून ठेवण्यास सांगितले आणि निसर्गाच्या अधिक जवळ जाण्यासाठी त्यांच्या मालकीच्या वतनवाडीत राहण्यास जागा दिली. थोरो तेथे 1845 ते 1847 अशी दोन वर्षे व दोन महिने राहिला. काँकॉर्ड येथील वॉल्डन नामक तळ्याकाठी स्वतः लहानसे साधे झोपडे बांधून तेथे राहणाऱ्या थोरोच्या गरजा फार कमी होत्या. त्याच्याकडे जरुरीपुरत्या वस्तू आणि स्वयंपाकासाठी भांडी, पलंग, टेबल, तीन खुर्च्या इतके फर्निचर होते. कमीत कमी गरजा ठेवून जास्तीत जास्त काळ निसर्गाच्या सानिध्यात जगणारा थोरो निसर्गाला गुरू माने. तो साधी राहणी, सुलभ व्यवहार याचा खंदा पुरस्कर्ता होता. 

थोरो वॉल्डन सरोवराकाठी जंगलात प्रयोग म्हणून राहिला. स्वतः जमीन खणून, मशागत करून, धान्य-बटाटे पिकवून रांधलेली श्रमाची भाकरी किती रुचकर लागते तो अनुभव घ्यायला हवा हे त्याचे श्रमाचे महत्त्व पटवणारे विचार आणि त्यानुसार कृतीदेखील. तत्कालीन अमेरिकेतील शोषणावर आधारलेल्या गुलामगिरीच्या पद्धतीविरुद्ध थोरोने वॉल्डन काठच्या  त्या दोन वर्षाच्या वास्तव्यात मेक्सिकन युद्ध पुकारणाऱ्या जुलमी सरकारचा निषेध म्हणून कर भरला नाही आणि शिक्षा म्हणून तुरुंगवासदेखील भोगला. त्याचा त्या अनुभवावर आधारित विचारप्रवर्तक निबंध Civil Disobedience यातून गांधीजींना प्रेरणा मिळाली. वॉल्डनने सरोवराकाठी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवसंपन्न होत, मानवी आयुष्यात शारीरिक श्रमाचे महत्त्व, शोषण-अन्याय याविरुद्ध सविनय कायदेभंग हे विचार जगाला दिले. त्याने विविध विषयांवर  साहित्यसंपदा निर्माण केली. वॉल्डन सरोवराचा विस्तीर्ण जलाशय हिवाळ्यात गोठलेला असतो. त्यात येणारी बदके, काठी असलेले मेपलवृक्ष -हिवाळ्याअगोदर लाल-किरमिजी-केशरी रंगांत न्हाऊन पानगळीत पर्णभार उतरवणारे …या साऱ्याचा आस्वाद घेत जगणारा तो निसर्गपुत्र! Enjoy land but own it not. जमिनीवर मालकी हक्क मिळवण्यापेक्षा निसर्गाचा आनंद घ्या असे म्हणत त्याने साधी जीवनपद्धत सहज अंगिकारली. त्याने वॉल्डन या पुस्तकात माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते, माणसाच्या ठायी असलेल्या निसर्ग जाणिवांचा शोध या संबंधीचे वॉल्डन सरोवराच्या सान्निध्यातील आणि वास्तव्यातील अनुभव लिहिले आहेत. ते इंग्रजी भाषेतील क्लिष्ट शैलीतील पुस्तक मराठी साहित्यात दुर्गा भागवत या विदुषीने वॉल्डनकाठी विचारविहारया नावाने आणले.

 

थोरोच्या घराची प्रतिकृती

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट राज्यात काँकॉर्ड परगण्यात असलेले वॉल्डन सरोवर, त्याच्या काठावर टेकडीशेजारी थोरोने स्वतः 1845 साली बांधलेले त्याचे घर तेथे अस्तित्वात नाही. थोरोच्या घराची प्रतिकृती वॉल्डन सरोवराच्या निसर्गसुंदर परिसरात त्याचे घर असलेल्या जागेपासून काहीशा दूर तलावाच्या उत्तरेला जतन केली गेली आहे. शंभर वर्षांनंतर 1945 साली पुरातत्त्व शास्त्रज्ञ रोलॉन्ड वेल्स रॉबिन्स यांनी केलेल्या उत्खननात थोरोचे घर असलेली जागा सापडली. तेथे थोरोची स्मारकशिला बसवली आहे. थोरोने घराच्या बांधकामात कोणतीही कलाकुसर, तत्कालीन स्थापत्यशैलीचे दिमाखदार आविष्कार जाणीवपूर्वक टाळले होते. घरातील माणसांना ताणतणाव नसल्यास ते घर सुंदर होते; फक्त सजावट, नक्षीकामाने तसे होत नाही असे विचार असणारा थोरो वॉल्डनकाठच्या जंगलात झोपडी बांधून राहिला. घर म्हणजे  उन्हे, पाऊस, बर्फवृष्टी यांपासून संरक्षणासाठी निवारा; घर बांधण्याचा इतकाच हेतू असल्याने थोरोचे घर एका लहान खोलीचे होते. त्या काळी असलेले तंत्रज्ञान आणि साहित्य वापरून त्याने एकट्याने ते बांधले होते. अनावश्यक फापटपसारा टाळून कमीत कमी गरजा ठेवून जगणाऱ्या थोरोने स्वतः बांधलेले त्याचे घर म्हणजे चार भिंती आणि वर छप्पर, हवेसाठी समोरासमोर दोन खिडक्या, घरात जाण्यासाठी दरवाजा इतकी साधी रचना. सरपणाची लाकडे ठेवण्यासाठी घरामागे लहानशी खोपी.थंडीपासून बचावासाठी घरात मागच्या भिंतीत बसवलेली शेगडी. त्यावर धूर घराबाहेर टाकणारे धुरांडे. त्याचे टोक छपरापेक्षा उंच काढलेले. त्या उंच धुरांड्याचा जमिनीत खणलेल्या दगडाचा पाया उत्खननात सापडला. त्यावरून वॉल्डन सरोवराकाठच्या विस्तीर्ण परिसरातील थोरोच्या लहानश्या घराची नेमकी जागा निश्चित झाली. घर बांधण्यासाठी थोरो कुऱ्हाड घेऊन वॉल्डनकाठच्या जंगलात गेला. जंगलातील पाईनवृक्ष तोडून त्याच्या लाकडापासून घराचा सांगाडा तयार करताना थोरो पाईन जंगलाचा मित्र झाला. लाकडाचा सांगाडा, लाकडाची जमीन असलेली छोटेखानी केबिन, वर लाकडी माळा, उंच छत आणि घराखाली जमिनीमध्ये खणलेले सहा फूट रुंद सात फूट खोल तळघर -शीत प्रदेशातील कडक हिवाळ्यात उबदार राहणारे. त्या काळी घरासमोर जमिनीमध्ये खड्डा करून कंदमुळे, भाज्या साठवण्याची पद्धत होती. तळघर हे त्याचे सुधारित स्वरूप थोरोने केले. थोरो दोन वर्षे तेथे राहिला. तो तेथून गेल्यावर ते घर पाडून टाकण्यात आले. मात्र थोरो जीवन शिकण्याच्या हेतूने तेथे राहिला होता. तो त्याचा हेतू सफल झाला. त्याने 6 मे 1862 रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे साहित्य प्रकाशित होऊन वैश्विक झाले.

रजनी अशोक देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
————————————————————————————————————————

—————————————————————————————————————-

About Post Author

Previous articleअपर्णा-विदुर महाजन यांचा ध्यास (Vidur-Aparna Mahajan: Art Loving Couple)
Next articleसंदीप – निराधारांचा आधार (Sandip’s Home for Destitutes)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here