कांची नगरीत कनक नावाचा क्षत्रिय होता. तो वैश्यवृत्तीने जगत होता. त्याला नवस-सायासांनी एक कन्या झाली. तिचे नाव त्याने किशोरी ठेवले. एके दिवशी तिची पत्रिका पाहून एक ज्योतिषी त्याला म्हणाला, की ‘या मुलीचे लग्न ज्याच्याशी होईल तो तरुण अंगावर वीज पडून मरेल.’ ते भविष्य ऐकून कनकाला फार दु:ख झाले. त्याने किशोरीने कुंवार राहूनच तिने तिचे आयुष्य ब्राह्मणसेवेत घालवावे असे ठरवले.
पुढे, एके दिवशी एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णूमंत्र उपदेशिला. रोज त्या मंत्राचा जप करावा, तुळसीचे बन लावून त्याची जोपासना करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला विष्णू आणि तुळशी यांचा विवाह लावावा असे एक व्रतही त्याने किशोरीला सांगितले. किशोरीने त्याप्रमाणे सर्व केले.
दिवसेंदिवस किशोरीच्या सौंदर्याच्या कळा वाढू लागल्या. एके दिवशी एका गंध्याची तिच्यावर नजर गेली. तो तिच्या सौंदर्याने वेडापिसा झाला. तिच्या प्राप्तीसाठी त्याने अनेक उपाय केले, पण ते सर्व निष्फळ ठरले. शेवटी त्याला एक माळीण भेटली. तिला त्याने त्याची मनोव्यथा सांगितली. मग त्या दोघांनी मिळून एक कारस्थान रचले. माळिणीने गंध्याला स्त्रीवेष दिला. त्याला घेऊन ती किशोरीकडे आली आणि तिला म्हणाली, “ही माझी मुलगी, कालच सासरहून आली आहे. ही विविध पुष्परचना करण्यात तरबेज आहे. हिला तुझ्याकडे ठेवून घे म्हणजे तुझ्या देवासाठी नाना प्रकारचे पुष्पालंकार बनवून देईल.”
किशोरीला तिचे हे कपट उमगले नाही. तिने त्या स्त्रीवेषधारी गंध्याला तिच्या घरात ठेवून घेतले.
त्याच वेळी दुसरीकडे आणखी एक गोष्ट घडली. कांची नगरीच्या राजाला मुकुंद नावाचा मुलगा होता. तो सूर्योपासक होता. एके दिवशी सहजगत्या किशोरी त्याच्या दृष्टिपथात आली. तिच्या अप्रतिम लावण्याने तोही मोहित झाला. त्याने त्याच क्षणी ठरवले, की किशोरीला स्वत:ची पत्नी करायचे. पण सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला विरोध दर्शवला. ‘किशोरीचे भविष्य वाईट आहे. तिला जो वरील तो वीज पडून मरेल. तेव्हा तू तिचा नाद सोड.’ सूर्याने असा दृष्टांत दिला तरी मुकुंदाचा हट्ट कायम राहिला. त्याने सूर्यदेवाला साकडेच घातले. तो म्हणाला, “हे सूर्यदेवा, किशोरीचे वैधव्य टाळणे ही गोष्ट तुझ्यासारख्या सर्वसमर्थ देवाला अशक्य नाही. मी तुला निर्वाणीचे सांगतो, जर किशोरी मला लाभली नाही, तर मी प्रायोपवेशन करून मरून जाईन.”
त्यावर सूर्यदेवाचा निरुपाय झाला. त्याने किशोरीचा बाप कनक याला दृष्टांत दिला, की ‘तू राजपुत्राला तुझी मुलगी दे.’ कनकाला ही गोष्ट अकल्पित वाटली. दुसऱ्याच दिवशी राजाचा मंत्री कनकाकडे किशोरीला मागणी घालण्यासाठी आला. किशोरीचे भवितव्य माहीत असूनही कनकाला ती मागणी मान्य करणे भाग पडले. मग उभयपक्षी विचारविनिमय होऊन द्वादशी ही लग्नतिथी ठरली. सुमुहूर्ताच्या वेळी उभय पक्ष एकत्रित झाले. किशोरी अंत:पुरात विष्णू व तुलसी यांच्या चिंतनात निमग्न होती. राजपुरोहिताने सांगितले, की ‘किशोरी आता राजाची सून होणार असल्यामुळे तिच्यावर अन्य कोणा पुरुषाची नजर पडता कामा नये.’ तदनुसार राजदूतांनी सर्व पुरुषांना किशोरीच्या घरातून बाहेर काढले. पण गंधी मात्र तेथून निघाला नाही. कारण तो स्त्रीवेषात होता. गंद्याने त्याचे सारे उपाय व्यर्थ ठरले आणि किशोरी त्याच्या हातची गेली, हे समजून त्याच्या मनाचा चडफडाट झाला. त्याने ठरवले, की किशोरी लग्नमंडपात जाण्यापूर्वी एकदातरी तिचा हात धरायचाच. त्या दुष्ट हेतूने तो टपून बसला. एवढ्यात बाहेर वादळ झाले. मेघ गडगडले. वीजाही चमकल्या. लोकांचे डोळे दिपले. ही संधी बरी आहे, असे पाहून गंधी झटकन् पुढे झाला व त्याने किशोरीचा हात धरला. आणि काय आश्चर्य सांगावे! त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज पडली आणि तो तिथल्या तेथे मरून पडला.
अशा प्रकारे किशोरीचे अशुभ भविष्य खरे झाले. मग राजपुत्र मुकुंद व किशोरी यांचा विवाह थाटामाटाने पार पडला. तुलसीव्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.