तुळशीबाग – ऐतिहासिक, आधुनिक, स्मार्ट! (Smart Tulshibaug)

0
74
heading

पुण्यातील तुळशीबागेला अडीचशे वर्षांचा जागता इतिहास आहे. तुळशीबागेचे स्वरूप एका जुन्या राममंदिराभोवती उभा राहिलेला बाजार असे आहे. पिन टू पियानो… म्हणाल ती संसारोपयोगी वस्तू तेथे विकत मिळते. पेशवेकालीन मॉल असे त्याचे वर्णन रास्त होईल. ते देऊळ बांधले तेव्हा देवपूजेला लागणाऱ्या सहाण-खोडे, फुले अशा वस्तू विकण्यास तेथे ठेवत. म्हणजे संकल्पना ती होती, पण आता त्या तुळशीबागेच्या बाजाराला जे अजस्र आणि अवाढव्य रूप आले आहे त्यात मूळ मंदिर कोठल्या कोठे हरवून गेले आहे! तुळशीबाग परिसर व्यापारी संघटनेकडे नोंदलेले तीनशे दुकानदार आणि तीनशे पथारी व्यावसायिक आहेत. त्यांनी एक एकरातील राम मंदिर वेढून टाकले आहे. ते मंदिर तुळशीबागवाले यांच्या खासगी ट्रस्टकडे आहे. त्याभोवती पुरंदरे-पंड्या-सम्राट अशी जुनी चालत आलेली ट्रस्टकडील भाड्याची पाच-सहा दुकाने आहेतच. त्या जुन्या दुकानांना व वाडाटाइप रहिवासी घरांना रूपडे इतिहासकालीन आहे. त्यांचे आणि बाहेरच्या दुकानदारांचे काही संबंध नसावे. आतील ती दुकाने तर पडिक वाटतात.

भारतासारखी जुनी संस्कृती कात टाकून (की मूलभूत परिवर्तन करून) नव्या युगात येते तेव्हा जे प्रश्न तयार होतात, त्याचे मूर्त रूप तुळशीबाग परिसरात पाहण्यास मिळते. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी नितीन पंडित जेव्हा स्मार्ट सिटी योजनेखाली त्या परिसर विकासाबाबत चाललेली बोलणी सांगतात तेव्हा गंमत वाटते, की मूळ मंदिरचालक, संबंधित राजकारणी, अधिकारी, व्यापारी आणि पथारी व्यावसायिक लोकशाही रीतीने तो प्रश्न सोडवणार कसा आहेत? खरे तर, दुकानदार व पथारी व्यावसायिक यांची, त्यांचे हितसंबंध पाहता क्षणोक्षणी भांडणे व्हायला हवीत, पण ते सुखाने एकत्र नांदतात; नव्हे, त्यांतील कित्येक भरभराट साधतात आणि म्हणून नवनवीन व्यापारी त्यांचीही दुकाने/पथाऱ्या त्या सहाशे जणांत असाव्या यासाठी जागा घेण्यास टपलेले असतात. आतील रामाच्या मंदिराभोवती  गणपती, विठ्ठलरखुमाई, शेषशायी भगवान अशी अनेक छोटी देवालये आहेत. त्यात काशीविश्वेश्वरदेखील आहे. त्या मंदिरांभोवती वाड्यामध्ये लोक राहतात. त्यांच्या रहिवासाच्या जागा, म्हटले तर महानगराच्या मध्यवर्ती, मोक्याच्या व गर्दीच्या ठिकाणी आहेत. म्हणजे निवासी जागेच्या संदर्भात केवढे वैभव! पण त्या जागांचा, त्या मंदिराचा विकास होणार कसा? ती वारसा वास्तू आहे. त्यात बदल संभवत नाही. त्यामुळे तेथे फक्त जुनी मंडळी राहतात, त्यांची मुलेबाळे दूर कोथरूड-सहकारनगर भागात असतात आणि हिंजेवाडीपासून विमाननगरपर्यंत पसरलेल्या पुण्यात नोकऱ्या-व्यवसाय करतात.

-gardi-tulshibaugपण पुणे झपाट्याने असे वाढत आहे, की अवघ्या पुण्याची गत येत्या काही दशकांत तुळशीबाग परिसरासारखी होणार आहे, हे लक्षात येते का तुमच्या? इतिहासाचे कोंदण पण भविष्याचा पेच! कारण कुटुंबेच्या कुटुंबे (दुष्काळी वा हंगामी नव्हे) साऱ्या महाराष्ट्रातून पुण्याकडे स्थलांतरित होत आहेत. कोठली कोठली सुखवस्तू माणसे पार भंडाऱ्यापासून सावंतवाडीपर्यंतची आणि जळगावपासून सोलापूरपर्यंतची, पुण्यात येऊन राहणे पसंत करत आहेत, कारण पुण्याची हवा आणि पुण्याची (सु)संस्कृती!

तुळशीबाग परिसराची निर्मिती व विकास स्वाभाविकपणे होत गेला. खाजगीवाले यांची मूळ बाग होती ती. साताऱ्याजवळच्या पाडळी गावातील नारो अप्पाजी खिरे नावाचा मुलगा अठराव्या शतकात बागेतील झाडांना दोन वेळा पाणी घालण्यासाठी म्हणून खाजगीवाल्यांकडे कामाला राहिला. नारो अप्पाजी यांच्या अंगी विविध गुण होते. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी नोकरी पत्करली. पेशव्यांनी त्यांची दप्तर ठेवण्यातील हुशारी पाहून त्यांना उच्चाधिकार दिले. त्यांचा महिना पगार त्यावेळी दहा हजार रुपये होता म्हणे! नारो अप्पाजींची भरभराट झाली. त्यांनी खाजगीवाल्यांची बाग विकत घेतली, तेथे राममंदिर बांधले, तेथे तुळशीरोपे होती म्हणून ती तुळशीबाग झाली. त्यासोबत परिसराचीही भरभराट झाली. ‘देऊळ’ नावाचा सिनेमा काही वर्षांपूर्वी आला होता. त्याचे परीक्षण करताना नगर नियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी, मंदिर हे भारतात आर्थिक विकासाचे मॉडेल कसे होऊ शकते याचे वर्णन केले आहे. मला ते समर्पक वाटते. तुळशीबाग राममंदिराचा अडीचशे वर्षें पसरलेला इतिहास हा त्याचा दाखला आहे. त्या काळात गावाबाहेरची तुळशीबाग गावाच्या हृदयस्थानी आली!

तुळशीबाग राममंदिर खाजगी होते, ते खाजगीच राहिले. मूळ नारो अप्पाजी पुढे तुळशीबागवाले झाले. त्यांचा कुटुंबविस्तार मोठा आहे. त्यांनी मंदिराचा ट्रस्ट 1970 साली केला. त्याचे प्रमुख आहेत भरत तुळशीबागवाले. ती नारो अप्पाजींची आठवी पिढी. ते म्हणाले, की राम मंदिर 1761 साली बांधले. तेव्हापासून मंदिराचे सर्व उत्सव, विधी-कार्यक्रम रीतीने होत असतात. तुळशीबागवाले कुटुंबातील सत्तर-पंच्याहत्तर मंडळी संबंधित आहेत. त्यातील तीस-चाळीस मंडळी रामजन्मोत्सवाच्या वेळी येत असतात. तो सोहळा फार दिमाखात होतो. भरत पुढे म्हणाले, की पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’त तुळशीबागवाले दप्तर आहे. त्यावर आधारित पुस्तकही छापले गेलेले आहे. आम्ही आमचे व्यवहार त्या दप्तराआधारे करत असतो. आमच्या सातव्या पिढीने तुळशीबाग परिसराचा बाजारविस्तार होताना पाहिला. आता, तेथे सारा गजबजाट आहे.

 

‘तुळशीबाग’ माहितीपट पाहण्यासाठी पुढील दुव्यावर जा- https://youtu.be/LWvE0UeCM0Q

हे ही लेख वाचा-   पुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर
               तुळशीबागेशिवाय पुणे उणे !

नरेंद्र काळे नावाचा पत्रकार कम कार्यकर्ता कम सर्वकाही अशा गृहस्थाने तुळशीबागेवर ‘कॉफीटेबल बुक’ निर्माण करण्याचा ध्यास गेली वर्ष-दोन वर्षें घेतला आहे. त्याने फेसबुकच्या माध्यमातून तुळशीबागेच्या आठवणी जमा केल्या तर जगभरातून शंभर लोकांनी साहित्य पाठवले. लोकांचा जीव असा त्या वास्तूत/परिसरात गुंतलेला आहे. कारण तुळशीबाग राम मंदिर हा एके काळच्या पुण्याचा सांस्कृतिक अड्डा होता. सुधीर फडके यांचे गीतरामायण यांसारखे प्रयोग तेथे झाले आहेत. भीमसेन जोशी यांच्यासारख्या मोठमोठ्या गायकांच्या मैफली तेथे होऊन गेल्या आहेत. कात्रजच्या तलावाचे पाणी तेथील तीन-चार विहिरींना अजून नळाने येते, अशा चमत्कृती आहेत. राम-लक्ष्मण-सीता या तिन्ही मूर्ती पांढऱ्या पाषाणाच्या, वल्कले नेसलेल्या आहेत. त्यातही राम-सीता आणि लक्ष्मण या मूर्तींच्या घडणीमध्ये व रंगकामात सूक्ष्म फरक आहे असे सांगतात. गेल्या शंभर वर्षांत तेथील बाजाराचीदेखील काही वैशिष्ट्ये झाली. जशी, की भातुकलीची भांडी तुळशीबागेजवळच घ्यायची; मिसळीचा जन्म १९१० च्या सुमारास तेथील माटेकर यांच्या हॉटेलात झाला आणि कावरे कोल्ड्रिंक्सचे ‘पॉट’मधील आईस्क्रीम साऱ्या पुण्यात पन्नास-साठ वर्षांपूर्वी कौतुकाचा विषय बनला. तेथील काकडआरती, तीन वेळा नगारेवादन हे लोकांच्या मनी बंदिस्त झालेले आहे. पुण्याच्या पंरपरेप्रमाणे तुळशीबागेचा म्हणून म्हटला जाणारा गणपती मानाचा आहे, पण तो रस्त्यावर, मूळ वास्तूच्या बाहेर आहे. आता, राम मंदिरापेक्षा तेथे वर्दळ जास्त असते. तेथे भरगच्च भरलेला बाजार असतो. बाजारात खरेदी करता करता गणेशदर्शनही होऊन जाते!

तुळशीबागेचा विकास हा मुद्दा जुनाच आहे. पण आता तो परिसर ‘स्मार्ट सिटी’त येणार आहे. म्हणजे काय होणार आहे याची जाणीव फार कोणाला नाही. नितीन पंडित म्हणाले, की विकास परिसर योजनेअंतर्गत मुख्यत: स्वच्छता व तेथे येणारे मुख्य, जे स्त्रियांचे गिऱ्हाइक त्यांची सुरक्षितता हे विषय चर्चेस येतात. त्या पलीकडे घडलेले काही नाही. ‘स्मार्ट सिटी’ची परिपत्रके मात्र निघत असतात. तेथील व्यापाऱ्यांना रोजच्या‘दंगली’ने इतके ग्रासलेले असते, की त्यांना ‘आज’ माहीत असतो. त्यांच्यासाठी उद्या ‘उद्या’ येणार असतो. भरत तुळशीबागवाले यांचे डोळे भविष्याचा प्रश्न निघाला तेव्हा थिजल्यासारखे जाणवले. कारण ते आणि त्यांची पत्नी, असे दोघेच तेथे वाड्यातील वरच्या मजल्यावरील जागेत राहतात. तशी आणखी काही जुनी कुटुंबे तेथे आहेत. त्या सर्वांच्या पुढील पिढ्या दूर मोकळ्या विकसित परिसरात राहतात व निमित्त निर्माण झाले, की त्या गर्दीत येतात. त्या जागेच्या विकासात केवढी मोठी गुंतागुंत आहे – भावनिक आणि भौतिकदेखील!

-kharedi-imitationवास्तवात तो प्रश्न तुळशीबागेपुरता मर्यादित नाही. पुऱ्या महाराष्ट्रभर शहराशहरांतून (व गावांतूनदेखील) जुन्यानव्याचा संकर कसा साधायचा? जुने काय जपायचे आणि नवे काय साधायचे याचे धोरण पक्के नाही. सरकार सध्या ते खात्याखात्यांमार्फत साधू पाहते, पण त्यामध्ये आंधळेपणा येतो वा उदासीनता येते. राम मंदिर ही वारसा वास्तू आहे. तेथे बारीकसारीक बदल करायचा तरी संबंधित खात्याची परवानगी घ्यावी लागते आणि दरम्यान, तुळशीबागवाले कुटुंबच साताठ पिढ्यांत विस्तारून सार्वजनिक वा सामुहिक झालेले आहे – कुटुंब म्हणून त्याची मांडणी विस्कटली आहे. त्या साऱ्या वारसांना एकत्र आणणे व निर्णयाप्रत येणे… कल्पनेतसुद्धा अबबच वाटते!

हा जुना देश जगण्यासंबंधातील सारे प्रश्न ‘आजचा दिवस निभावून न्या, उद्याचे उद्या पाहू’ असे सोडवत निघाला आहे. तुळशीबागेसारख्या गजबजलेल्या वस्तीत त्रयस्थपणे वावरले तर त्यातील भीषणता बोचते. मी ठिकठिकाणी तुळशीबागेसारखी उदाहरणे पाहतो तेव्हा तेथील जुन्या माणसांचे भविष्याकडे पाहताना स्थिर होऊन गेलेले डोळे आणि आजच्या माणसांची जगण्यासाठी निकराची ओढ हे प्रश्न मला सतावतात. तेथील प्रश्नांचे स्वरूप ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, भौतिक, भावनिक असे सर्वांगीण असते – त्यावर एकूण समाजाने तोड काढली पाहिजे असे वाटते. शासन वा पालिकेसारखे निमशासन हे समाजाचे प्रतिनिधी होऊ शकत नाहीत. त्या संस्था व्यक्तिनिरपेक्ष असतात आणि तुळशीबागेसारख्या इतिहासातून वर्तमानात आलेल्या परिसरात माणसांचे जीवन घडत-बिघडत असते.

दिनकर गांगल 9867118517

dinkargangal39@gmail.com

About Post Author

Previous articleपुणे येथील तुळशीबाग श्रीराम मंदिर (Tulshibaug Shreeram Mandir)
Next articleकेशवसुत यांचे खपुष्प आणि अंतराळातील ‘झीनिया’! (Keshavsut)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.