Home कला तुकाराम महाराजांच्या गझला

तुकाराम महाराजांच्या गझला

1
तुकाराम महाराजांच्या गझला

तुकाराम महाराजांच्या गझलासाहित्यात अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. जुने कवी घेतले तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. कवी लोक कवितेची चाल कशी आहे त्याचाही नमुना त्या काळी देत असत. आजकालचे कवी हे बहुतेक मुक्तछंदात कविता करताना दिसतात. तेच निरीक्षण मग आपल्याला असे नोंदवावे लागेल, की मुक्तछंद हा काव्यप्रकार वृत्तात कविता करण्यापासून उत्क्रांत झालेला आहे किंवा आपल्या जुन्या शालेय पुस्तकात ‘नाट्यछटा’ नावाचा छोटेखानी नाटुकल्यांचा प्रकार प्रचलित होता असे आठवेल. तो प्रकार अजिबात दिसेनासा झाला आहे,  तर साहित्यिक उत्क्रांतीच्या इतिहासात त्याबद्दल म्हणावे लागेल की ‘नाट्यछटा’ हा प्रकार ‘नाटका ’त विलीन होऊन गेला आहे. शेक्सपीयरच्या प्रभावाखाली सुनीत नावाचा १२+२ ओळींचा ( अथवा ८+६ ओळींचा) प्रकार लुप्तच झाला आहे. त्यालाच मुरड घालून पूर्वी कवी अनिल दशपदी नावाच्या कविता करत. ते  प्रकार जसे बदलतात तसाच काहीसा प्रकार गझले च्या बाबतीत झाला असावा.

निरनिराळ्या वेळी काही काव्यप्रकार कसे सारखे असू शकतात त्याचे एक उदाहरण इंग्रजीतल्या एलिझाबेथन कविताप्रकारात पाहायला मिळते. १९३०-४० च्या सुमारास प्रचलित असलेल्या त्या काव्यप्रकाराचे उदाहरण (फॉर्म ऍंड फीलींग–ले:सुसन लॅंगर–पृ.२८१) पाहा:

Forbear therefore,
And lull asleep
Thy woes, and weep
No more.

(भाषांतर:

म्हणोनि साहावी
गाई अंगाईची
कढांच्या कळांची
नको भेट)

तो काव्यप्रकार अभंगासारखा वाटतो. एव्हढेच नव्हे, तर तो लिहिण्याबाबतही अभंग लिहिण्याचा जसा काटेकोरपणा होता तसाच एलिझाबेथन काव्यासाठीही वापरला गेला आहे. त्यावरून काही भावभावनांना सारखी अभिव्यक्ती लागते असे  सहजी दिसते. मराठी त पूर्वी अभंगही तसेच लिहीत. जसे:

सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी
कर कटेवरी
ठेवूनिया

शिवाय अभंगाच्या चौथ्या चरणात, विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे, जो पंच किंवा फटका असतो त्याप्रमाणे एलिझाबेथन काव्यातल्या चौथ्या ओळीबाबत असे म्हटले जाते, की त्यात लय कमी करत जात, ठामपणे त्याला ती थांबवते. त्या सारखेपणावरूनच अभंग व गझल ह्यांच्या अभिव्यक्तीतही सारखेपणा असावा असा संशय येतो.

मराठीत गझल जोमाने आणली ती माधव ज्युलियनां नी व ती जोपासली सुरेश भटां नी. तुकाराम महाराजां च्या काळात गझल हा काव्यप्रकार अस्तित्वात होता. तशात तुकाराम महाराज उर्दू-हिंदीतही अभंग रचत हे आपण गाथेत पाहतोच. अभंग हा काव्यप्रकार केवळ भक्तीमार्गासाठी खासा होता; तसेच सुफी विचार व गझला ही त्याकाळी एकमेकांसाठी असल्याचे प्रचलित होते. राज्य तर मोंगलांचे होतेच. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या एकूण लिखाणावर ग़झलेचा काही परिणाम दिसतो का ते ह्या लेखात पाहण्याचा मानस आहे. अर्थातच ते सर्व ऐतिहासिक पुराव्यांशिवाय करण्याचे योजले असल्याने, केवळ भाषेच्या दृष्टीने ते पाहावयाचे आहे.

गझल चारशे वर्षे जुनी, तर तुकाराम महाराज साडेतीनशे वर्षे जुने. म्हणजे त्या काळात त्यांनी गझला ऐकल्या असतील. त्या काळी अभंग ह्या वृत्तात दुसर्‍या व तिसर्‍या चरणानंतर यमक योजणे ही परंपरा काटेकोरपणे सांभाळली जाई असे दिसते. ग़झलेत तसेच कडक कायदे असतात. जसे: ती एकाच वृत्तात असते, त्यात एक अंत्ययमक ( रदीफ ) असते, तर एक यमक ( काफिया) असते. दोन-दोन ओळींचे किमान पाच किंवा त्याहून अधिक  शेर ग़झलेत असतात. प्रत्येक शेराचे स्वत:चे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व असते.

अभंगात चार चरण असतात, सहा अक्षरांचे तीन  व शेवटचे चरण चार अक्षरांचे असते. दुसर्‍या व तिसर्‍या चरणाअंती यमक असावे लागते. ग़झल एका वृत्तात असावी लागते तर अभंग हा लवचीक रचना असलेली असतो. परंपरेने अभंगाच्या दुसर्‍या व तिसर्‍या चरणांती यमक योजायचे पण लवचीकपणाचा फायदा घेत. समजा, आपण तिसरा चरण चौथा करून शेवटी लिहिला तर गझलेसारखे यमक शेवटीच येईल जसे: प्रसिद्ध अभंग : सुंदर ते ध्यान । ऊभे विटेवरी । कर कटेवरी । ठेवूनिया ॥  ह्याला जर आपण असे बदलले : “सुंदर ते ध्यान; उभे विटेवरी ठेवूनिया–कर कटेवरी” —–तर तोंडावळा गझलेचाच होईल.

अभंगातली रचनेची लवचीकता व गझलेतली मात्रांची काटेकोर समानता ह्या फरकामुळे, रचनेच्या दृष्टीने अभंग व ग़झल हे वेगवेगळे पडतात. पण रचनेशिवाय ग़झलेचे जे नियम असतात ते अभंगात दिसू शकतात. अभंग व ग़झल अशी सबंध काव्यप्रकाराची तुलना करण्यापेक्षा तुकाराम महाराजांचे अभंग कुठे कुठे अगदी गझलच्या वळणाचे वाटतात, असे म्हणावेसे वाटते. ते एकेका स्वतंत्र उदाहरणावरून पाहू .

१. कैं वाहावे जीवन । कैं पलंगी शयन ॥
तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा:

कैं वाहावे जीवन। कैं पलंगी शयन॥
जैसी जैसी वेळ पडे। तैसे तैसे होणे घडे॥
कैं भोज्य नानापरी। कैं कोरडया भाकरी॥
कैं बसावे वाहनी। कैं पायीं अनवाणी॥
कैं उत्तम प्रावर्णे। कैं वसने ती जीर्णे॥
कैं सकळ संपत्ती। कैं भोगणे विपत्ती॥
कैं सज्जनाशी संग। कैं दुर्जनाशी योग॥
तुका म्हणे जाण। सुख दु:ख तें समान॥

बहादुरशहा जफर ह्याची गझल ह्या अभंगाशेजारी अशी ठेवा :

कहीं मैं गुंचा हूं, वाशुद से अपने खुद परीशां हूं
कहीं गौहर हूं, अपनी मौज में मैं आप गलता हूं
कहीं मै सागरे गुल हूं, कहीं मैं शीशा-ए-मुल हूं
कहीं मैं शोरे-कुलकुल हूं, कहीं मैं शोरे-मस्तां हूं
कहीं मैं जोशे-वहशत हूं, कहीं मैं महवे-हैरत हूं
कहीं मैं आबे-रहमत हूं, कहीं मैं दागे-असियां हूं
कहीं मैं बर्के-खिरमन हूं, कहीं मैं अब्रे-गुलशन हूं
कहीं मैं अश्के-दामन हूं, कहीं मैं चश्मे-गिरियां हूं
कहीं मैं अक्ले-आरा हूं, कहीं मजनूने-रुसवा हूं
कहीं मैं पीरे-दाना हूं, कहीं मैं तिफ्ले-नादां हूं
कहीं मैं दस्ते-कातिल हूं, कहीं मैं हलके-बिस्मिल हूं
कहीं जहरे-हलाहल हूं, कहीं मैं आबे-हैवां हूं
कहीं मैं सर्वे-मौजूं हूं, कहीं मैं बैदे-मजनूं हूं
कहीं गुल हूं ’जफर’ मैं, और कहीं खारे-बयाबा हूं

इथे आपल्याला फक्त रचनेचे साधर्म्य आणि ‘कही’ व ‘कैं’ यासारखे शब्द एवढेच जाणवत नाही तर आशयातसुद्धा सारखेपणा आहे. तुकाराम महाराज जसे कधी सुख तर कधी दु:ख असे म्हणतात तसेच जफर म्हणतात, कधी कृपेची वर्षा ( आबे-रहमत ) आहे तर कधी पापाचा कलंक ( दागे-असियां ). तुकाराम महाराजांचा ‘सज्जनाशी संग’ हाच जफरचा ‘शोरे-कुलकुल’ आहे तर ‘दुर्जनाशी योग’ हा ‘शोरे-मस्तां’ ( वेडयांचा गदारोळ) आहे. जफरच्या गझलेत कधी काय आहे तर कधी काय आहे याचे वर्णन आहे तर त्यापुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात, की कधी सुख आहे तर कधी दु:ख आहे व ते तुम्ही समान जाणा, माना. बहादुरशहा जफर हा तुकारामाच्या नंतरचा असल्याने त्याच्या ग़झलेवर तुकाराम महाराजांचा प्रभाव आहे असे आपण म्हणू शकतो. पण अभिव्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर दोन्ही रचनांमध्ये साम्य आहे हे जाणवावे. अर्थात वृत्त हा तांत्रिक भाग सोडला तर. ह्या तुलनेनंतर तुकाराम महाराजांचा अभंग ही एक ग़झलच वाटावी.
गझलेबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात ते फार महत्वाचे आहे. ते म्हणतात,  गझल हे वृत्त नसून ती एक वृत्ती आहे आणि तिच्यात सूक्ष्म नि सुंदर निवृत्तीही आहे. ती वृत्ती अभंगांतून ठळकपणे दिसते व त्यामुळेच अभंग व गझल हे एकच काव्यप्रकार असल्याचे सहजी जाणवते.

२. कवण जन्मता कवण जन्मविता?  तुकाराम महाराजांचा हा अभंग पाहा:

कवण जन्मता कवण जन्मविता?
न कळे कृपावंता माव तुझी!
कवण हा दाता कवण हा मागता?
न कळे कृपावंता माव तुझी!
कवण भोगता कवण भोगविता?
न कळे कृपावंता माव तुझी!
कवण ते रूपता कवण अरूपता?
न कळे कृपावंता माव तुझी!
सर्वां ठायी तूंचि सर्वही झालासी
तुका म्हणे यांसी दुजे नाही!

ह्या अभंगाचा पारंपरिक अर्थ असा : हे कृपावंता, जन्मणारा कोण व जन्म देणारा कोण? ही तुझी माया मला कळत नाही. तसेच हे कृपावंता, देणारा कोण व मागणारा कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, सुखदु:खभोक्ता कोण व भोगविता कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. हे कृपावंता, रूपवान कोण व रूपरहित कोण ? ही तुझी माया मला कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांच्या ठायी तुझी व्याप्ती आहे. तुजवाचून किंचितसुद्धा दुसरे स्थान नाही.

ह्या अभंगाचे हिंदीत किंवा उर्दूत सरल भाषांतर केले तर असे होईल:

कौन जनमता कौन जनमाता?
न समझे है दयालू, माया तेरी!
कौन दाता कौन मांगता?
न समझे है दयालू, माया तेरी!
कौन भोग लेता कौन भोग देता?
न समझे है दयालू, माया तेरी!
कौन रूपवान कौन रूपबगैर?
न समझे है दयालू, माया तेरी!
सबके भीतर तू हि तू है
तुका कहे दूजा स्थानही नाही!

गझलेचे तांत्रिक अंग सोडले तर हा भाषांतरित अभंग गझलच वाटावा असा होतो. गझलेत जसे एकेका शब्दाभोवती पिंजण घालत त्याचे नादमाधुर्य खुलवतात, तसेच ह्या अभंगात ‘न कळे’ व ‘कवण’ हे शब्द रुंजी घालतात. अगदी गझलेसारखे!

३. ‘बरे जाले देवा निघाले दिवाळे’  तुकाराम महाराजांचा हा प्रसिद्ध अभंग पाहा:

बरे जाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली॥
बरे जाले देवा बाईल कर्कशा। बरी हे दुर्दशा जनामध्ये॥
बरे जाले जगी पावलो अपमान। बरे गेले धन ढोरे गुरे॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज। बरा आलो तुज शरण देवा॥
बरे जाले तुझे केले देवाईल॥ लेकरे बाईल उपेक्षिली॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी। केले उपवासी जागरण॥

चांगल्या गजलेत एक प्रकारचा नाद असावा लागतो. इथे ‘बरे जाले देवा’ हा नाद टिकवून ठेवलेला दिसून येतो. गजलेत शब्दांशी खेळही असतो. इथे काही शब्द पाहा : देऊळ किंवा देवालय ऐवजी देवाईल, जे बाईल शी यमक साधताना बेमालूम साम्य साधते. तसेच रोजच्या वापरात असते गुरेढोरे तर इथे कवी त्याचे करतो ढोरेगुरे. खर्‍या गजलेत जो दर्द कवीने स्वत: घेतलेला असावा लागतो तो तुकाराम महाराजांचे चरित्र पाहिले तर दिवाळे, दुष्काळ, कर्कशा, बाईल,  दुर्दशा,  अपमान,  भक्तिशरणता ह्या शब्दांनी नेमके चित्रित होते व दर्द कसा साक्षात पुढे उभा राहतो.

पारंपरिक गझलेत शेवटी यमक यावे असा जर चंग बांधायचा तर अभंगाच्या रचनेत थोडा फेरफार करून ते सहजी जमले असते. जसे शेवटचे चरण तिसरे करणे, उदाहरणार्थ :

बरे जाले देवा निघाले दिवाळे। पीडा केली बरी या दुष्काळे॥
बरे जाले जगी पावलो अपमान। ढोरेगुरे बरे गेले धन॥
बरे जाले नाही धरिली लोकलाज। शरण देवा बरा आलो तुज॥
बरे जाले तुझे केले देवाईल। उपेक्षिली लेकरेबाईल॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी। जागरण केले उपवासी॥

गझलेत जसे प्रत्येक शेर स्वतंत्र, एकटा उभा राहायला हवा तसा इथला प्रत्येक अभंग हे स्वतंत्र सांगणे आहे व सगळे मिळून त्याची बेरीज, एकादशीच्या व्रताला घडणार्‍या उपवासाने दाखवली आहे.

कवीला नादमाधुर्याचे बर्‍यापैकी ज्ञान असल्याने त्याने ‘बरे झाले’ असे न योजता ‘बरे जाले’ असे योजले व ‘झाले’मुळे जे नाद-ओरखडे उमटले असते ते ‘जाले’मुळे सौम्य केले आहे. हे केवळ गझल-कवीला जमणारे कसब, तुकाराम महाराज सहजी वापरताना पाहिले की तुकाराम महाराजांना गझल-सम्राटच का म्हणू नये असे कोणालाही वाटावे !

४. हेचि माझे तप हेचि माझे दान. बहादुरशहा ज़फरची एक ग़जल पाहा:

रहता ज़ुबां पे आठ पहर किसका नाम है
करता है यह जो दिल में असर किसका नाम है
हमको किसी के ऐबो-हुनर की खबर नहीं
कहते हैं ऐब किसको, हुनर किसका नाम है
बदनाम है जहां में “ज़फर” जिनके वास्ते
वो जानते नहीं कि “ज़फर” किसका नाम है

इथे ज़फर काही प्रश्न विचारत आहे : जिभेवर आठ प्रहर कोणाचे नाव असते? ह्या ह्रदयावर जो परिणाम करतो ते नाव कोणाचे आहे? आम्हाला कोणाच्या कलाकुसरीची माहिती नाही, कशाला कला म्हणतात, वा कसब हे कशाचे नाव आहे?  ज्यांच्यामुळे जगात ज़फर बदनाम झाला आहे त्यांना माहीत नाही का की ज़फर हे कोणाचे नाव आहे?

तुकारामाचा हा अभंग बघा :

हेचि माझे तप हेचि माझे दान
हेचि अनुष्ठान नाम तुझे
हेचि माझे तीर्थ हेचि माझे व्रत
सत्य हे सुकृत नाम तुझे
हाचि माझा धर्म हेचि माझे कर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हाचि माझा योग हाचि माझा यज्ञ
हेचि जपध्यान नाम तुझे
हेचि माझे ज्ञान श्रवण मनन
हेचि निजध्यासन नाम तुझे
हाचि कुळाचार हाचि कुळधर्म
हाचि नित्यनेम नाम तुझे
हा माझा आचार हा माझा विचार
हा माझा निर्धार नाम तुझे
तुका म्हणे दुजे सांगायासी नाही
नामेविण काही धनवित्त

गझलेच्या मुख्य लक्षणांत एक लक्षण असते, की प्रत्येक दोन ओळींचा शेर आपला  आपण स्वतंत्र उभा राहू शकला पाहिजे. गझलेतल्या इतर ओळींची त्याला मदत लागली न पाहिजे. ही अट तुकारामाचा हा अभंग सहजी पुरी करतो. शिवाय, गझलेची अजून एक अट असते की पहिल्या ओळीत जो विषय मांडला जातो ती त्या विषयाची प्रस्तावना, आणि ती दुसर्‍या ओळीत शिगेला पोचली पाहिजे. ही शीग त्या विषयाचा शिखर गाठणे, क्लायमॅक्स गाठणे, पलट मारणे, टर उडवणे अशीही असू शकते. वानगीदाखल पाहा: तुझे नामस्मरण हाच माझा धर्म आहे, कर्म आहे ही झाली प्रस्तावनेची पहिली ओळ. तर दुसर्‍या ओळीत त्याचा परमोच्च आहे, तोच माझा नित्यनेमही आहे ! असे धोरण सर्व अभंगांत आहे.

परंपरेने अभंगात चार चरण असतात. पहिला चरण सहा अक्षरांचा (ह्या चरणाशेवटी यमक नसते), दुसरा चरण सहा अक्षरांचा, तिसरा चरण सहा अक्षरांचा ( दुसर्‍या व तिसर्‍या चरणाशेवटी यमक असावे लागते ) व चौथा चरण चार अक्षरांचा ( शेवटी यमक नसते.) . (सोयीसाठी चार चरण दोन ओळींत मांडले आहेत कारण लहान अभंग तसाही लिहितात.). आता गझल मध्ये दुसर्‍या ओळीनंतर यमक आवश्यक. परंपरा  मोडून तुकाराम महाराज चौथ्या चरणांती ‘नाम तुझे’ हे यमक योजतात ते लक्षणीय आहे आणि गझलेच्या वळणाचे आहे. गझलच्या पाच किंवा सहा शेरांपैकी पहिल्या शेरामध्ये ( ह्याला मतला म्हणतात) दोन्ही ओळींशेवटी यमक (क़ाफिया व रदीफ) असते, पण तुकारामांना अभंगात दुसर्‍या-तिसर्‍या चरणांती असलेल्या यमकाची परंपरा मोडणे प्रशस्त वाटले नसावे. तरीही त्यांनी ‘तुका म्हणे दुजे’ हे ‘नाम तुझे’ला जुळणारे यमक शेवटच्या शेरात जोडले आहे. तसे त्यांना सुरुवातीला  ‘हेचि दान माझे’ असे जराशा फरकाने सहज जमते. ते केले तर गझलेची तांत्रिक बाजूही सांभाळली गेली असती. गझलेत शेवटी तख़ल्लुस वापरावे लागते. (जसे  ‘ज़फर’). ते अभंगात तुकाराम महाराज वापरतातच (जसे: ‘तुका म्हणे’).

गझलेबाबत पु.ल.देशपांडे म्हणतात,  गजल हे वृत्त नसून एक वृत्ती आहे आणि तिच्यात एक सूक्ष्म नि सुंदर निवृत्तीही आहे. ती वृत्ती अभंगांतून फार ठळकपणे दिसते.

झल-सम्राट सुरेश भट तुकारामासंबंधी म्हणतात : “तुझे दु:ख तुझे नाही , तुझे दु:ख अमचे आहे.” इथे दु:खाचा सण साजरा करणार्‍यांमध्ये आपल्याला तुकाराम आठवतात, जे म्हणतात : बरे जाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली…शेक्सपीयर सुद्धा म्हणतो, “स्वीट आर द युजेस ऑफ अॅडव्हर्सिटी” आणि योगायोग म्हणजे ज़फरने विचारावे, ‘किसका नाम है’ आणि तुकारामांनी उत्तर दिल्यासारखे म्हणावे, ‘नाम तुझे’! हे एक प्रकारे संवादीच वाटते आणि खात्री पटते की ही तुकाराम महाराजांची एक गझलच आहे.

परवा  योगायोगाने ‘साहित्य: शोध आणि बोध’ हे प्रसिद्ध समीक्षक वा.ल.कुलकर्णी ह्यांचे जुने पुस्तक वाचत असताना ‘गीत: प्राचीन आणि अर्वाचीन’ ह्या प्रकरणात ते अभंगांसंबंधी जे म्हणतात ते वाचून अभंग हे गझलेच्या जवळ आहेत ह्या जाणिवेला प्रोत्साहन मिळाले. वा.ल. कुलकर्णी म्हणतात : ( पृ.७४) “ओवी, दिंडी, आर्या, शार्दूलविक्रीडित ह्यांत कितीही रचना झाली तरी त्यांचे साधनस्वरूप नष्ट झालेले नाही. ते अखेरपर्यंत केवळ छंदप्रकार राहिले, परंतु अभंगांचे तसे झाले नाही. तो एक छंद असूनही त्यांच्याकडे आपण केवळ एक भाववाहक छंद ह्या दृष्टीने केव्हा तरी पाहीनासे झालो. हे थोडेसे गझलासारखे झाले असे वाटते. गझल हा मूलत: एक फारसी  वृत्तप्रकार ह्या दृष्टीनेच केवळ पाहणे बरे नव्हे,  तो काव्यप्रकारच आहे ही जाणीव बळावू लागली; व आज तर त्याला एका महत्वपूर्ण काव्यप्रकाराचा दर्जा प्राप्त झाला आहे. अभंग हा मूलत: एक छंद असला तरी तो गझलाप्रमाणेच सुप्रतिष्ठित काव्यप्रकार बनला आहे. प्रत्येक अभंग ही एक स्वतंत्र कविता आहे. ती एक अलग अनुभूती आहे. प्रत्येक अभंगाची ही स्वय़ंपूर्णता व संपूर्णता हे त्याचे एक असे लक्षण आहे, की ते दुसर्‍या कोणत्याच मराठी छंदप्रकारात आढळणार नाही. ह्या त्याच्या लक्षणामुळे मुख्यत: त्याला कविताप्रकाराचा दर्जा प्राप्त झाला आहे. ह्यामुळे स्वाभाविकच अभंगरचना ह्या शब्दाला वेगळाच अर्थ आला आहे. अभंगगाथा म्हणताच स्थूलमानाने एक वृत्ती व त्या वृत्तीशी संलग्न असणारे अनुभवविश्व आपल्या डोळ्यांपुढे आपोआप येऊ लागले. भक्तिभाव व त्याच्याशी संबद्ध असलेले अनेकविध अनुभव अभंगरूपाने साकार झाले. एका दृष्टीने अभंगाचे अभिव्यक्तिसामर्थ्य एकसारखे वाढत गेले, त्याचे भावविश्वही विस्तृत होत गेले, परंतु त्याची भाववृत्ती बदलली नाही. विसाव्या शतकातील अभंगलेखन करणारे गोविंदाग्रज , मर्ढेकर , विंदा करंदीकर , आणि इतर मराठी कवी हे जनाबाई –नामदेवां च्या भक्तिभावाने लेखन करत नाहीत, हे खरे असले तरी मराठी अभंगांच्या परंपरेपासून त्यांचे लेखन फटकून राहू इच्छित नाही…”

५. नव्हती ते संत करिता कवित्व

नव्हती ते संत करिता कवित्व। संतांचे ते आप्त नव्हती संत॥
येथे नाही वेश सरते आडनावे। निवडे घावडाव व्हावा अंगी॥
नव्हती ते संत धरिता भोपळा। करिता वाकळा प्रावरण॥
नव्हती ते संत करिता कीर्तन। सांगता पुराणे नव्हती संत॥
नव्हती ते संत वेदाच्या पठणे। कर्म आचरणे नव्हती संत॥
नव्हती संत करिता तप तीर्थाटणे। सेविलिया वन नव्हती संत॥
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणे। भस्म उद्धळणे नव्हती संत॥
तुका म्हणे नाही निरसला देहे। तो अवघे हे संसारिक॥

या रचनेची मिर्झा गालिब ह्यांच्या पुढील रचनेशी तुलना करून पाहा :

दीवानगी से दोष पे जुन्नार भी नहीं
यानी हमारी जैब में इक तार भी नहीं
दिल को नियाजे-हसरते-दीदार कर चुके
देखा तो हममें ताकते-दीदार भी नहीं
मिलना अगर तेरा नही आसां तो सहल है
दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नहीं
बे इश्क उम्र कट नही सकती है और यां
ताकत बकदरे-लज्जते-आजार भी नहीं
शोरीदगी के हाथ से सर है वबाले-दोष
सहरा में ऐ खुदा कोई दीवार भी नहीं
गुंजाइशे-अदावते-अगयार इक तरफ
यां दिल में जोफ से हवसे-यार भी नहीं
डर नाला-हाए-जार से मेरे खुदा को मान
आखिर नवाए-मुर्गे-गिरफतार भी नहीं
दिल में है यार की सफे-मिजगा से रूकशी
हालांकि ताकते-खालिशे-खार भी नहीं
इस सादगी पे कौन न मर जाए ऐ खुदा
लडते है और हातमे तलवार भी नहीं
देखा “असद” को खल्वत-ओ-जल्वत में बारहा
दीवाना गर नही है तो हुशियार भी नही

अर्थ तूर्त बाजूला ठेवा आणि ग़ालिब व तुकाराम ‘भी नही’ आणि ‘नव्हती’ ह्या शब्दांचा जो दरवळ गझलेत घुमवतात तो अनुभवा. किती सारखे वाटेल!

६. तोवरी तोवरी शोभतील गारा
तुकाराम महाराजांचा हा अभंग पाहा:

तोवरी तोवरी शोभतील गारा। जंव नाही हिरा प्रकाशला॥
तोवरी तोवरी शोभती दीपिका। नुगवता एका भास्करासी॥
तोवरी तोवरी सांगती संताचिया गोष्टी। जंव नाही भेटी तुक्यासवे॥
तोवरी तोवरी जंबुक करी गर्जना। जंव त्या पंचानना देखिले नाही॥
तोवरी तोवरी सिंधु करी गर्जना। जंव त्या अगस्तिब्राह्मणा देखिले नाही॥
तोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाही॥
तोवरी तोवरी शूरत्वाच्या गोष्टी। जंव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही॥
तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे। जंव तुक्याचे दर्शन जाले नाही॥

मिर्झा ग़ालिबची ही रचना पाहा :

दाम हर-मौज में है हल्क़ा-ए-सदकामें-नहंग
देखें क्या ग़ुजरे है क़तरे पे गुहर होने तक
आ़शिकी सब्र-तलब और तमन्ना बेताब
दिल का क्या रंग करूं ख़ूने-जिगर होने तक
हमने माना कि तग़ाफुल न करोगे, लेकिन
ख़ाक हो जाएंगे हम तुमको ख़बर होने तक
परतवे-ख़ुर से है शबनम को फ़ना की तालीम
मैं भी हूं एक इनायत की नज़र होने तक
यक-नज़र बेश नही, फ़ुर्सते-हस्ती ग़ाफ़िल
गर्मी-ए-बज़्म है इक रक़्से-शरीर होने तक
गमे हस्ती का “असद” किससे हो जुज़ मर्ग इलाज
शम्‌अ़ हर रंग में जलती है सर होने तक

‘तोवरी तोवरी’ व ‘ होने तक’ ह्या शब्दांवर सगळी रचना गुंफणे पाहिले की तुकारामाची ही ग़झलच वाटावी.

८. इतुलें करीं देवा ऐकें हें वचन

इतुलें करीं देवा ऐकें हें वचन। समूळ अभिमान जाळीं माझा॥१॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी। सर्व समदृष्टी तुज देखें॥ध्रु.॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज। संतांचे चरणरज वंदीं माथां॥२॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात। हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं॥३॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा। तुका म्हणे आतां शरण आलों॥४॥

या अभंगात तुकाराम महाराजांचे जे मागणे आहे,  ते ‘सगळे संपूर्ण नाही तरी इतके तरी दे ‘ अशा वळणाचे आहे. हेच मागणे ग़ालिबनेही ‘तो दे’ अशा ढंगाने  पुढील गझलेत मांडले आहे. शिवाय, दोघांचे मागणे देवाकडेच आहे. फक्त गा़लिब दारू पीत असल्याने त्याने ‘प्याला गर नही देता,  न दे, शराब तो दे’ हे म्हणणे तुकाराम महाराजांना लागू होत नाही :

वो आके ख्वाब में तस्कीने-इज़्तिराब तो दे
वले मुझे तपिशे-दिल मजाले-ख़्वाब तो दे
करे है क़त्ल लगावट में तेरा रो देना
तेरी तरह कोई तेगे-निगह की आब तो दे
दिखाके जुम्बिश-लब ही तमाम तर हमको
न दे तो बोसा, तो मुंह से कहीं जवाब तो दे
पिला दे ओक से साक़ी, जो हमसे नफरत है
प्याला गर नहीं देता, न दे, शराब तो दे
“असद” ख़ुशी से मेरे हाथ-पांव फूल गये
कहा जो उसने, जरा मेरे पांव दबा तो दे

९. बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी

गझल साधारण चारशे वर्षांपूर्वी निर्माण झाली असे म्हणतात. त्याच काळात तुकाराम महाराज होते. गझलेत जसे भोगलेल्या दु:खाचे कढ असतात तसेच तुकारामांच्या अभंगात ओढगस्तीच्या संसाराचे चटके असतात. सुफी गझलेत जशी  देवाच्या शरणावस्थेतली झिंग असते तसेच तुकारामांच्या अभंगात भक्तिरसाचा लोट असतो. गझलेत जशी वृत्ताची अट असते तशीच अभंगात दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमकाची अट असते. (तुलना करण्यासाठी समजा आपण अभंगातला चौथा चरण अलिकडे घेतला तर अभंग हे वृत्त यमकाचे होऊन गझलेच्या जवळ जाते. जसे खालच्या अभंगातला पहिला शेर जर असा लिहिला : बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी । आली रसा बहुत या गोडी ॥ तर तो साक्षात गझलच्याच वळणाचा होतो.). गझलेत प्रत्येक शेर स्वतंत्र असतो. तसेच, सर्व गझलेत एक सूत्र गुंफलेले असते.  अभंगातही तसेच दिसते. शिवाय, गझलेत एखाद्या शब्दाचा नाद घेऊन त्याभोवती रचना फेर धरते, तसेच ह्या अभंगात ‘बहु’ ह्या शब्दाभोवती सगळी रचना उभारते.

बहु नांवें ठेविली स्तुतीचे आवडी। बहुत या गोडी आली रसा॥
बहु सोसें सेवन केले बहुवस। बहु झाला दिस गोमटयाचा॥
बहुतां पुरला बहुतां उरला। बहुतांचा केला बहु नट॥
बहु तुका झाला बहु निकट वृत्ति। बहु काकुलती येऊनिया॥

तुकाराम महाराजांच्या ‘बहु’ या शब्दाच्या भोवती रुंजी घालण्यावरून गालिब चा एक प्रसिद्ध शेर आठवतो. तो असा :

हजारों ख्वाहिशें ऐसी, कि हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले

इथे  ‘बहु निकट वृत्ती’ ह्या ग़ालिबच्या ख्वाहिशे व अरमान सारख्याच भासतात. बहु म्हणजे पुष्कळ. तुमची स्तुती करण्याची आवड असल्यामुळे तुम्हाला पुष्कळ नावे ठेवली आहेत. त्या योगाने भक्तिरसाला पुष्कळ गोडी आली आहे. मी त्या नावांचे फार सोसाने पुष्कळ दिवस सेवन केले. त्या योगाने पुष्कळ चांगले दिवस उदयास आले आहेत. देव हा पुष्कळांना पुरून पुष्कळांकरता उरला आहे व त्याने पुष्कळ वेष घेऊन पुष्कळांचा उद्धार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपली वृत्ती त्याच्या ठिकाणी पुष्कळ काकुळतीस येऊन प्रकट केली ( देवाच्या पुष्कळ जवळ ऐक्यरूपाने राहणारा झालो आहे,) अशा अर्थाचा हा अभंग आहे.

हा अभंग ह्या पुष्कळाच्या भोवती जसा क्रीडा करतो तशीच ‘पुष्कळ’ ह्या शब्दाभोवती रम्य चित्रण करणारे दुसरे कवी आहेत पु.शि.रेगे. त्यांची पुष्कळा नावाची प्रेयसीला उद्देशून केलेली ही गझलेच्या अंगाची कविता पाहा:

पुष्कळ अंग तुझं, पुष्कळ पुष्कळ मन ;
पुष्कळातली पुष्कळ तू
पुष्कळ पुष्कळ माझ्यासाठी.
बघताना किती डोळे पुष्कळ तुझे ,
देताना पुष-पुष्कळ ओठ ;
बाहू गळ्यात पुष्कळ पुष्कळ,
पुष्कळ ऊर,
पुष्कळाच तू, पुष्क-कळावंती,
पुष्कळ पुष्कळ पुष्कळणारी.

‘बहुतां पुरला, बहुतां उरला’ हे तर साक्षात सर्वोदयाचे (सगळ्यात जास्त जणांचे सगळ्यात जास्त भले) तत्त्व  झाले. ते असे चपखलपणे विठ्ठलासाठी वापरले आहे.

१०. पावलों पंढरी वैकुंठभवन

पावलों पंढरी वैकुंठभवन। धन्य आजि दिन सोनियाचा॥१॥
पावलों पंढरी आनंदगजरें। वाजतील तुरें शंख भेरी॥ध्रु.॥
पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं। संत या सज्जनीं निवविलें॥२॥
पावलों पंढरी पार नाहीं सुखा। भेटला हा सखा मायबाप॥३॥
पावलों पंढरी येरझार खुंटली। माउली वोळली प्रेमपान्हा॥४॥
पावलों पंढरी आपुलें माहेर। नाहीं संवसार तुका म्हणे॥५॥

‘धन्य आजि दिन सोनियाचा’ असे वाटायला लावणारे मिळणे ही समाधानाची परमोच्च भावना आहे. तुकाराममहाराज ती वर दाखवत आहेत. ह्यात ‘पावलों’ हा नाद गजलेच्या वळणाचा आहे. त्याच वळणाची ग़ालिबची ‘पाया’ ह्या शब्दाभोवती घुटमळणारी ग़जल आहे.

मिर्झा ग़ालिबची रचना पाहा:

कहते हो, न देंगे हम, दिल अगर पडा पाया
दिल कहां कि गुम कीजे ? हमने मुद्दआ़ पाया
इश्क़ से तबीयत ने जिस्त का मज़ा पाया
दर्द की दवा पाई, दर्द बे-दवा पाया
दोस्त दारे-दुश्मन है, एतमादे-दिल मालूम
आह बेअसर देखी, नाला नारसा पाया
सादगी व पुरकारी, बेखुदी व हुशियारी
हुस्न को तग़ाफुल में जुरअत-आ़ज़मा पाया
गुंन्चा फिर लगा खिलने, आज हमने अपना दिल
खूं किया हुआ देखा, गुम किया हुवा पाया
हाले-दिल नहीं मालूम, लेकिन इस क़दर…यानी
हमने बारहा ढूंढा, तुमने बारहा पाया
शोर पन्दे-नासेह ने ज़ख्म पर नमक छिडका
आपसे कोई पूछे, तुमने क्या मजा पाया

११. ग़झलच्या वळणाच्या इतर काही रचना:
गझल-सम्राट कवी सुरेश भट ग़झलासंबंधी म्हणतात, की गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. तुकाराम महाराजांचे सर्व अभंग हे एक प्रकारच्या कळवळ्यातून आलेले असल्याने ते ग़झलेच्या जातीचे आहेत असे दिसेल. तसेच, ते कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त सांगणारे असल्याने ग़झलच्या स्वभावाचे आहेत. ग़झलेतला शेर जणू आपण बोलत आहोत असा सहजी असावा असे सुरेश भट म्हणतात तेव्हा ते तुकारामाच्या रचनांसंबंधी बोलत असावेत, इतक्या तुकारामाच्या रचना लोकांशी संवाद साधणार्‍या आहेत. त्या इतकी वर्षे टिकून आहेत त्याचे रहस्यही तेच असावे. सुरेश भटांचे वचन आहे की काही वर्षांपुरता बोभाटा म्हणजे शाश्वत कीर्ती नव्हे,  लिहिणार्‍याने स्वत:वर सतत जागता पहारा ठेवावा. हे वचन जणू काही तुकारामांना उद्देशून आहे इतके ते तुकारामांना लागू पडते. भट असेही म्हणतात, की कोणत्याही कवीचा अखेरचा फैसला पाच-दहा वर्षांत होत नसतो. तुकारामाच्या  साडेतीनशे वर्षे टिकलेल्या काव्याला तर हे फारच चपखल बसते. ग़झलेसंबंधी सुरेश भटांच्या व इतरांच्या अपेक्षा पुर्‍या करणारे तुकाराम महाराजांचे उपरोल्लेखित अभंग व पुढील रचना, छे, गझला, ह्या कसोटीला पुरेपूर उतरतात असे कोणालाही पहिल्याच वाचनानंतर प्रतीत होईल.

काय बा करिशी सोवळें ओवळें। मन नाहीं निर्मळ वाउगें चि॥१॥
काय बा करीसी पुस्तकांची मोट। घोकितां हृदयस्फोट हाता नये॥ध्रु.॥
काय बा करीसी टाळ आणि मृदंग। जेथें पांडुरंग रंगला नाहीं॥२॥
काय बा करीसी ज्ञानाचिया गोष्टी। करणी नाहीं पोटीं बोलण्याची॥३॥
काय बा करीसी दंभलौकिकातें। हित नाहीं मातें तुका म्हणे॥४॥

——————————————————

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा। त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा॥१॥
देवाची ते खूण करावें वाटोंळें। आपणा वेगळें कोणी नाहीं॥ध्रु.॥
देवाची ते खूण गुंतों नेदी आशा। ममतेच्या पाशा शिवों नेदी॥२॥
देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा। लागों असत्याचा मळ नेदी॥३॥
देवाची ते खूण तोडी मायाजाळ। आणि हें सकळ जग हरी॥४॥
पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ। तुक्यापें सकळ चिन्हें होतीं॥५॥

——————————————————

लटिके हासे लटिके रडे। लटिके उडे लटिक्यापें॥
लटिके माझे लटिके तुझे। लटिके ओझे लटिक्याचे॥
लटिके गाये लटिके ध्याये। लटिके जाये लटिक्याचे॥
लटिका भोगी लटिका त्यागी। लटिका जोगी जग माया॥
लटिका तुका लटिक्या भावे। लटिके बोले लटिक्यासवे॥

——————————————————

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान। जरि हरिकिर्तन प्रिय नाहीं॥१॥
लटिकें चि दंभ घातला दुकान। चाळविलें जन पोटासाटीं॥ध्रु.॥
लटिकें चि केलें वेदपारायण। जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे॥२॥
लटिकें तें तप लटिका तो जप। अळस निद्रा झोप कथाकाळीं॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरी। नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि॥४॥
तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें। शिष्टांची वचनें मागिला ही॥५॥

———————————————-

शुद्ध दळणाचें सुख सांगों काई। मानवित सईबाई तुज॥१॥
शुद्ध तें वळण लवकरी पावे। डोलवितां निवे अष्टांग तें॥ध्रु.॥
शुद्ध हें जेवितां तन निवे मन। अल्प त्या इंधन बुडा लागे॥२॥
शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला। अविट तयाला नाश नाहीं॥३॥
तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां। भ्रतार वेगळा न करी जीवें॥४॥

– अरुण अनंत भालेराव
१८६/ए-१, रतन पॅलेस,
गरोडिया नगर, घाटकोपर (पूर्व),
मुंबई: ४०००७७
भ्रमणध्वनी : ९३२४६८२७९२
ईमेल – arunbhalerao67@gmail.com

(ह्या लेखाला किर्लोस्कर मासिकात पूर्वप्रसिद्धी मिळालेली आहे)

गझलकार  आणि  गझल अभ्‍यासक  सदानंद डबीर यांनी  ह्या लेखावर  घेतलेला आक्षेप वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

Last Updated On – 13th September 2016

About Post Author

1 COMMENT

  1. Apratim lekh.. अभ्यासपूर्ण व
    Apratim lekh.. अभ्यासपूर्ण व रंजकही..

Comments are closed.

Exit mobile version