तिसावे साहित्य संमेलन (Thirtieth Marathi Literary Meet – 1946)

 

गजानन त्र्यंबक माडखोलकर हे बेळगाव येथे 1946साली झालेल्या तिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कादंबरीकार, निबंधकार, पत्रकार आणि संपादक म्हणून प्रसिद्ध होते. राजकीय कादंबरी ही त्यांची खासीयत. माडखोलकर हे नागपूरचे. त्यांनी वाङ्मयातील सर्व प्रकार हाताळले. त्यांची हुकूमत टीका, ललित, कादंबरी, कथा, चरित्र, कविता, नाटिका, नाटके ह्या सर्व लेखनप्रकारांत होती. त्यांचा प्रमुख कलागुण म्हणजे त्यांची ओघवती भाषाशैली. त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षापासून (1921) ‘नवयुग’, ‘विविध ज्ञानविस्तार’, ‘मौज’, ‘रत्नाकर’, ‘केसरी’ अशा प्रतिष्ठित वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचा ‘केसरी’मध्ये पहिला लेख 1921च्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाला. त्यांच्या कामाला पुण्याच्या भारत सेवक समाजात व ‘ज्ञानप्रकाश’मध्ये सुरुवात 1922साली झाली. ते वयाच्या चोविसाव्या वर्षी नागपूरच्या ‘महाराष्ट्र’ साप्ताहिकाचे सहसंपादक झाले आणि तेथपासून ते संपादनकार्यात कायमचे रमले. ते ‘महाराष्ट्र’मध्ये संपादक पहिली वीस वर्षे होते आणि त्यांनी नागपूरच्याच ‘तरूण भारत’चे संपादन त्यानंतरची तीस वर्षे कुशलपणे हाताळले. त्यांनी ‘तरूण भारत’ हे विदर्भातील महत्त्वाचे आणि प्रमुख वृत्तपत्र म्हणून अक्षरशः गाजवले. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाची वैशिष्ट्ये प्रखर राष्ट्रवादी वृत्ती, वाङ्‌मयगुणांनी युक्त अशी प्रसन्न भाषाशैली आणि तर्कशुद्ध विवेचनपद्धत ही होती.

त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1899रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. त्यांची पहिली कविता ‘शिवप्रभूस’ ही त्यांच्या वयाच्या अठराव्या वर्षी ‘नवयुग’ ह्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पण पहिल्याच कवितेकडे त्या वेळचे प्रसिद्ध कवी माधव ज्यूलियन यांचे लक्ष वेधले गेले. आधुनिक कविपंचक हे माडखोलकर यांचे पहिले पुस्तक समीक्षात्मक होते. रेव्हरंड टिळक, केशवसुत, गोविंदाग्रज, विनायक व बालकवी ह्या पाच कवींच्या कवितेचा रसग्रहणात्मक परामर्श त्या पुस्तकात घेतलेला आहे. ते त्या पुस्तकाने समीक्षक म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांच्या आधुनिक कविपंचकावरील लेखांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे लक्ष वेधले गेले आणि आयर्लंडवरील त्यांच्या लेखमालेने साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचे लक्ष वेधले गेले. हे सारे त्यांच्या वयाच्या पंचवीस वर्षांच्या आत घडले, हे महत्त्वाचे.

त्यांची ‘मुक्तात्मा’ ही पहिली कादंबरी 1933साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी ‘भंगलेले देऊळ’, ‘नागकन्या’, ‘जन्मदुर्दैवी’ अशा वीस कादंबऱ्या; ‘शुक्राचे चांदणे’, ‘रातराणीची फुले’, आणि ‘उलुपी’ हे तीन कथासंग्रह;‘देवयानी’, ‘उर्वशी’ अशी दोन नाटके;आणि ‘आधुनिक कविपंचक’, ‘चिपळूणकरः काळ आणि कर्तृत्व’ असे सुमारे तीस ललित, वैचारिक टीकात्म लेख असे लेखन केले.

          माडखोलकर हे प्रसिद्धीच्या शिखरावर खूप काळ राहिले. त्यामुळे ते विविध संमेलनांचे अध्यक्ष झाले. त्यांनी पंधरा संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले. त्यात महेश्वर येथे 1937साली भरलेले मध्य भारत मराठी साहित्य संमेलन, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ठाकुरद्वार शाखेचे द्वितीय साहित्य संमेलन (1953), महाराष्ट्र साहित्य सभेचा शारदोत्सव 1958साली इंदूर येथे भरलेला, मुंबईतील 1961सालचा पहिला महाराष्ट्र राज्य नाट्यमहोत्सव, नागपूर येथे 1966साली भरलेली चौथी महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, बडोदे येथे 1969साली भरलेल्या तेहतिसाव्या वाङ्मय परिषद अशा समारंभांचे अध्यक्ष या बहुमानाचा त्यात समावेश आहे.

            माडखोलकर हे कोल्हटकर यांना वाङ्मयीन गुरू मानत होते. कोल्हटकर यांची अशी इच्छा होती, की माडखोलकर यांनी भारतीय साहित्यशास्त्र आणि पाश्चात्य साहित्यशास्त्र यांचे तौलनिक अध्ययन आणि विश्लेषण करून बदललेल्या युगमानानुसार नव्या साहित्यशास्त्राची रचना करावी. माडखोलकर यांनी त्याबाबत असे म्हटले आहे, की ते त्यांच्या गुरूची इच्छा त्यांचे सर्व आयुष्य हे सार्वजनिक चळवळीत आणि वृत्तपत्राच्या रगाड्यात गेल्यामुळे पुरी करू शकले नाहीत. बेळगावच्या त्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव प्रथम पास झाला हे महत्त्वाचे.

         ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की मराठीची हाक कानावर पडताच धर्म, जाती, पंथ आणि वर्ग यांचे सारे कृत्रिम भेद विसरून जाऊन महाराष्ट्रातील प्रत्येक मनुष्य तो/ती ‘मराठी’ असल्याच्या एकचएक जाणिवेने ज्या दिवशी उठेल तो राष्ट्रीयत्वाचा खरा सुदिन.

माडखोलकर यांनी 19301942च्या स्वातंत्र्य-आंदोलनात; तसेच, 1946 नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला. त्यांनी त्यांची लेखणी व वाणी त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली. ते हिंदी भाषेच्या प्रचारप्रसाराबाबतही प्रयत्नशील होते. ते दलित साहित्य चळवळीकडेही आत्मीयतेने पाहत. त्यांचा पत्रव्यवहार महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

              त्यांचे निधन 27नोव्हेंबर 1976 रोजी नागपूर येथे झाले.

वामन देशपांडे9167686695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर9920089488

———————————————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here