तिसरे साहित्य संमेलन सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. ते दुसऱ्या संमेलनानंतर तब्बल वीस वर्षांनी भरले होते. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या नावावर ग्रंथकार म्हणावे अशी ग्रंथसंपदा नव्हती. त्यांची फार मोठी साहित्यसेवाही नव्हती, तरीही ते तिसऱ्या साहित्य संमेलनाचे (म्हणजे ग्रंथकार संमेलनाचे) अध्यक्ष झाले. कारण ज्यावर्षी ते साहित्य संमेलन भरले त्याच वर्षी नवकवितेचा प्रणेता आणि श्रेष्ठ कवी म्हणून ज्यांचे नाव वाङ्मयेतिहासात नोंदले गेले त्या केशवसुतांचे निधन झाले. वास्तविक तो मान केशवसुत यांच्यासारख्या श्रेष्ठ कवीला मृत्यूपूर्वी मिळण्यास हवा होता.
रघुनाथ पांडुरंग करंदीकर हे पेशाने वकील होते. त्यांचा जन्म 21 ऑगस्ट 1857 रोजी पंढरपूर येथे खाडिलकर घराण्यात झाला होता. त्यांना त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या थोरल्या बहिणीने दत्तक घेतले. त्यांचे दत्तक वडील पांडुरंग रघुनाथ हे साताऱ्यातील प्रसिद्ध वकील होते. ते श्रीमंत होते. पण रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांचे दत्तक वडील हे घर सोडून गेले. रघुनाथ तेव्हा दहा वर्षांचे होते. त्यामुळे रघुनाथ यांची आबाळ झाली. रघुनाथ यांनी मॅट्रिक झाल्यावर लगेच मामलेदार कचेरीत नोकरी सुरू केली. त्यांनी काही काळ पंढरपूरच्या शाळेत संस्कृत शिकवण्याचे कामही केले. ते पुढे बार्शीला बेलीफ म्हणून गेले. दिवाणी कोर्टात कारकुनाची नोकरी केली. त्यांनी कोर्टातील वातावरण पाहून वकिलीचा अभ्यास केला. ते जिल्हा सरकारी वकिलीची (डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर) परीक्षा पास झाले होते. ते वयाच्या तेविसाव्या वर्षी वकील झाले. त्यांनी साताऱ्यात वकिली करून नावलौकिक मिळवला. तेथे त्यांची सबजज्ज म्हणूनही नेमणूक झाली, त्यांचे मन मात्र नोकरीत रमले नाही. त्यांनी पुन्हा वकिली सुरू केली आणि स्वतःचे आयुष्य सार्वजनिक कामाला अर्पण केले. त्यांनी छापखाना 1898 साली काढला. त्यांनी ‘भारतवर्ष’ आणि ‘प्रकाश’ ह्या नावाची दोन साप्ताहिके त्याच वर्षी सुरू केली. त्यांना इतिहासाची आवड होती. त्यांनी ‘मेणवली’ ह्या नाना फडणवीसांच्या गावी जाऊन दुर्मीळ कागदपत्र जमवले आणि प्रसिद्ध केले. त्यांनी स्वदेशीच्या प्रसाराचा वसा उचलला. त्यासाठी व्यापाऱ्यांचे मंडळ स्थापन करून स्वदेशी मालाचा प्रसार केला. त्यांचे लोकमान्य टिळक यांच्या कार्याशी निगडित असे कार्य होते. टिळक यांनी 1916 साली जेव्हा स्थानिक राजकीय संस्थांच्या पुनरुत्थानाचे काम हातात घेतले आणि ‘इंडियन होमरुल लीग’च्या बांधणीचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्यांनी सातारा विभागाची जबाबदारी दादासाहेब करंदीकर यांच्यावर टाकली होती आणि ती त्यांनी निभावली. ते लोकमान्यांच्या खटल्याच्या कामासाठी 1908 आणि 1919 साली विलायतेस जाऊन आले.
त्यांच्या रोजनिश्या ‘दैनंदिनी’ नावाने प्रसिद्ध झाल्या. त्या उपलब्ध आहेत. ते जेथे जात, तेथून ऐतिहासिक साधने गोळा करून आणत. ते 1918 साली इंग्लंडला गेले आणि तेथून त्यांनी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांचा भारताच्या रेसिडेण्टबरोबर झालेला पत्रव्यवहार नक्कल करून भारतात आणला.
ते 1911 साली मंबई कौन्सिलचे सभासद होते. त्यांनी इतिहास संशोधकाचे काम निरलसपणे केले. त्यांची केदारखंड यात्रा, दैनंदिनी (1962) आणि विलायतेहून लिहिलेली पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. त्यांचा मृत्यू 24 एप्रिल 1935 साली झाला.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————-——————————–
छान माहिती .
छान माहिती .
छान आहे
छान आहे