महाराष्ट्र हा प्रदेशच कर्तृत्वाचा आहे हे गेल्या आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. त्याचे कारण महाराष्ट्र हा प्रदेश संमिश्रतेचा आहे – संकराचा आहे; देश-परदेशांतून आलेल्या स्थलांतरितांचा आहे. तो महानुभावांचा आहे, ज्ञानेश्वरांचा आहे, शिवाजीमहाराजांचा आहे… अगदी सातवाहन-शिलाहार यांच्यापासूनचे संदर्भ, त्यांची मुळे बाहेरप्रांतांत आहेत. ज्यू दोन हजार वर्षांपूर्वी कोकण किन्याऱ्यावर उतरले. पारशी हजार वर्षांपूर्वी गुजराथेत नवसारीला आले आणि तेथून ते खाली महाराष्ट्राच्या डहाणू-पालघर भागात सरकले. सावंत-राणे यांचे, ते उत्तरेतून आल्याचे इतिहास प्रसिद्ध आहेत. शिवाजीराजांनी सुरत लुटली तेव्हा अनेक गुजराथी त्यांच्याबरोबर महाराष्ट्रात आले. त्यानंतर त्यांचा ओघ चालूच राहिला. मुंबईच्या उभारणीतील गुजराथी-पारशी लोकांचे कर्तृत्व मोठे आहे. ते महाराष्ट्र जीवनाचा अभिन्न भाग आहेत. दक्षिण महाराष्ट्र व कर्नाटक यांचे नाते एकजीव आहे, तसेच उत्तर महाराष्ट्र व आंध्र यांचे. चंद्रपूरमध्ये अनेक बंगाली वसाहत करून राहिले आहेत. फाळणीनंतर सिंधी आले त्यालाही सात दशके झाली. महाराष्ट्राच्या गोड्या पदार्थांच्या बाजारपेठेवर राजस्थानी स्थलांतरितांचे वर्चस्व शतक-दोन शतकांचे तरी सहज असेल. तेव्हापासून ती मंडळी महाराष्ट्रीय म्हणून जे जनजीवन म्हणतात त्या जनजीवनाशी एकरूप आहेत. त्या सर्व मंडळींची घराघरातील संस्कृती त्या त्या प्रांताची असली तरी बाहेर ते सर्व ‘मराठी’ असतात – मराठी बोलतात. महाराष्ट्र- स्थलांतरितांचा प्रदेश म्हणून, खरे तर, महाराष्ट्राला अमेरिकेच्या कितीतरी आधी ‘बॉयलिंग पॉट’ म्हणायला हवे! स्थलांतरितांना त्यांच्या सर्व क्षमता नेहमीच कसोटीस लावाव्या लागतात. त्यामुळे महाराष्ट्र हा शूरवीरांचा, कर्तृत्ववानांचा, सहिष्णू माणसांचा प्रदेश राहिला आहे.
गेल्या शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास काय सांगतो? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख केंद्र मुंबई-महाराष्ट्र होते. महात्मा गांधी भले असतील गुजराथचे, पण त्यांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते आणि त्यांचे कार्यकर्ते मराठीजन मोठ्या प्रमाणावर होते. विनोबांचे व त्यांचे नाते एकाच वेळी गुरू-शिष्याचे आणि शिष्य-गुरूंचे होते. गांधी यांच्या लेखी पंडित नेहरू यांच्याइतकेच स्थान अप्पा पटवर्धन यांना होते. अप्पा विलक्षण प्रतिभाशाली होते. त्यांनी चलनशुद्धीपासून विविध कल्पना राबवल्या;गोपुरीसारखा अद्वितीय आश्रम निर्माण केला. बाकी ‘गांधी’संस्था मरगळल्या असल्या तरी गोपुरीचे काम तत्त्वाधिष्ठित चालू आहे-विस्तारत आहे. अशी किती तरी जुनी माणसे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत आढळतात. शिवाजी राजांच्या आजुबाजूच्या दोन-तीनशे वर्षांच्या पराक्रमशाली इतिहासानंतर महाराष्ट्रात सेवाभाव, जो गांधीकाळापासून जागा झाला तो तसाच तेवत राहिलेला आहे. गांधींजींची कुष्ठरुग्णांची सेवा बाबा आमटे यांनी उचलली आणि कोणत्या उंचीला नेऊन ठेवली, बरे! त्यातून रुग्णसेवा या कल्पनेला ग्रामविकासाचे मोठे स्वरूप प्राप्त झाले आणि तसे ‘मॉडेल’ पनवेलजवळनेरे येथे ‘शांतिवन’ म्हणून उभे राहिले. अशा वेगवेगळ्या विषयांच्या सेवासंस्था अवघ्या महाराष्ट्रभर पसरल्या आहेत, नवनव्या निर्माण होत आहेत. म्हणून गांधीजी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणत, निरपेक्ष सेवाभावी कार्यकर्ते!
शिवाजीराजे, संभाजीराजे… आणि त्यांच्या नंतरचे पराक्रमाने भारलेले महाराष्ट्रातील शतक. जिल्ह्या जिल्ह्यातील मराठा सरदारांनी मोगल सेनेला जेरीस आणले होते. इंग्रज येथे आले नसते तर भारतावर महाराष्ट्राचा वरचष्मा राहिला असता हे कोणीही नि:शंक मान्य करतो. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राचा प्रभाव दिल्लीवर उरलेला नाही, पण दबाव सतत राहिलेला आहे, त्याची बीजे त्या इतिहासात दिसतात. सेवाक्षेत्राच्या विकासाचा उल्लेख येथे आधी केला, तो या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतो म्हणून. पहिल्या महायुद्धकाळात ‘रेड क्रॉस’ निर्माण झाले, त्याचे कौतुक अखिल मानव समाजाला वाटते. पण येथे, महाराष्ट्रात फार वेगळे घडलेले नाही.
इंग्रज आले ते एकाअर्थी चांगलेच झाले. त्यामुळे आधुनिकता आली, नवविचार आले, लोकशाही मूल्ये आली, पाश्चात्य सुसंस्कृतता आली. पुरे एकोणिसावे शतक आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा महाराष्ट्रातील प्रबोधनाचा, ज्ञानप्रकाशाचा काळ आहे. जांभेकर ते आंबेडकर ही धगधगती जवळजवळ सव्वाशे वर्षें … विचार करा, इंग्लंडचे राज्य येथे स्थापन झाले 1818 साली आणि जांभेकर यांनी ‘दर्पण’ पत्र सुरू केले 1832 साली, फक्त चौदा वर्षांनी! कसली जबरदस्त प्रेरणा असणार ती. त्यानंतर रानडे-टिळक-आगरकर-गोखले आणि फुले-शाहू महाराज-सयाजीराव गायकवाड-आंबेडकर-केशवराव जेधे अशा दोन जागृत प्रवाहांनी महाराष्ट्राचे समाजजीवन ढवळून काढले. औपचारिक शिक्षण हा त्या स्थित्यंतराचा गाभा होता आणि आधुनिक विचार व मूल्ये हे त्याचे उद्दिष्ट होते. माणसे त्यामुळे शहाणी झाली, त्यांनी त्यांच्या अनुभवाचा अर्थ लावणे सुरू केले आणि त्यातून नवयुगाची चाहूल लागली. आंबेडकर यांनी ‘शिका-संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही जी त्रिसूत्री दिली, तो त्या काळाचा मंत्र आहे. किती विचाराधिष्ठित संस्था-संघटना स्थापन झाल्या! ग्रंथालये ही त्यांतील महत्त्वाची. दीडशे वर्षें होऊन गेलेली ग्रंथालये महाराष्ट्रात शंभराहून अधिक आहेत. ते ज्ञानसंशोधनाचे अड्डे होते. तेथून समाजसंस्कृतीची सूत्रे हलत होती. त्या ग्रंथालयांचे मेळावे होतात. मात्र तंत्रज्ञानाच्या- बहुमाध्यमांच्या प्रभावात त्यांच्यातील जीव हरपलेला जाणवतो.
महाराष्ट्र राज्य महान होते आणि आहे. मात्र मराठी माणसांत अशी काहीतरी खुबी आहे, की तो त्याचे यश ‘दाखवू’ शकत नाही आणि कर्तृत्व मिरवू शकत नाही. महाराष्ट्राची स्थापना 1960 साली झाली, ती पाच-सात वर्षांच्या संघर्षानंतर. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण व संस्कृती यांना समाजात योग्य महत्त्व दिले. महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार एकोणिसाव्या शतकापासून फार जोमाने झाला. वेगवेगळ्या प्रदेशांत, विशेषत: कोकणात व विदर्भात मोठी शैक्षणिक परंपरा असलेल्या संस्था आहेत. पश्चिम महाराष्ट्राने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिक्षणक्षेत्रात आघाडी घेतली. भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रयत्नांतून सातारा-कोल्हापूर ते नासिकपर्यंत ज्या शिक्षणसंस्था निघाल्या आहेत त्यांचा इतिहास रोमांचकारक आहे! तो नीटपणे मांडला जाण्यास हवा. सध्या तसा प्रयत्न संस्थांगणिक उपलब्ध आहे, परंतु ती लाट 1930 ते 1950 सालापर्यंत पसरली आणि नंतर उसळून आली. चव्हाण यांनी त्या खाजगी, स्वयंस्फूर्त स्वरूपाच्या प्रयत्नांना औपचारिक सरकारी नियमांत आणले. त्यांनी एकूणच ज्ञानप्रसारास उत्तेजन दिले. महाराष्ट्रात सामाजिक-राजकीय जागृती येण्यास, येथे सहकार चळवळ फोफावण्यास, शेतीतील प्रयोगशीलता वर्धिष्णू होण्यास शैक्षणिक व ज्ञानसंस्था यांचा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला. ती चव्हाण यांची दूरदृष्टीच होय.
महाराष्ट्र जिल्ह्या जिल्ह्यातील कर्तृत्वाने गजबजला तो 1970 नंतर. येथील स्थानिक पुढाऱ्यांचा आत्मविश्वास जागा झाला होता. पंचायत राज्यपद्धतीमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण घडून आले होते. त्यामुळे सत्तेचे झकास जाळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून गावातील सरपंचांपर्यंत विणले गेले. सत्ता ही विधायक रीत्या वापरली गेली तर ती समाजजीवनात चमत्कार करू शकते. महाराष्ट्रात तसे बऱ्याच जिल्ह्यांत घडले. त्यातूनच विकासाचा झिरपा सिद्धांत कळण्यास मदत झाली. काही सहकार पुढाऱ्यांवर व्यक्तिगत टीका झाली, ‘सामना’सारखे चित्रपट निघाले. परंतु मागे वळून पाहताना तो सारा त्या प्रक्रियेचा भाग आहे हे लक्षात येते. सहकार फोफावला, विकासाची बेटे तयार झाली. म्हणजे बघा, एकीकडे समतेसाठी विविध पातळ्यांवर संघर्ष चालू असताना विकासाची फळे वितरीत होऊ लागली होती. संघर्ष चालू असणाऱ्या पातळ्या कोणत्या होत्या? कामगारांचे लढे जोरदार होते, स्त्रिया स्वत:चे स्थान मागू लागल्या होत्या. वैज्ञानिक दृष्टी विधायक, संस्थात्मक अंगाने जशी पसरत होती तशी लोकविज्ञान चळवळीच्या अंगाने समाजात खोलवर जाऊ पाहत होती. अंधश्रद्धा निर्मूलन कार्य हा त्याचाच एक पदर होता. महाराष्ट्र एकाच वेळी उग्र, आंदोलनात्मक कालखंडातून जात होता आणि विधायक रीत्याही घडत होता. भाववाढविरोधी आंदोलन असो, आणीबाणी विरोध असो, कामगार संघटनांचे बंद असोत, नेतृत्व महाराष्ट्राकडे होते. मुंबई हे त्या सर्व चळवळींचे केंद्र होते. तो जसा जाणीव जागृतीचा काळ आहे तसा हक्काचे स्थान मागण्याचा काळ आहे. त्या काळातील विधायकता काय आहे? तर शिक्षण सर्वदूर पसरले. डॉक्टर, इंजिनीयर व अन्य व्यवसाय अभ्यासक्रम सर्वत्र सुरू झाले. औद्योगिक वसाहतींतून उद्योगधंद्यांना बहर आला. स्वयंसेवा क्षेत्र सुदृढ झाले. आणीबाणीला विरोध म्हणून त्या काळात राजकारणात ओढले गेलेले अनेक कार्यकर्ते, नंतर विफल होऊन समाजकार्याकडे वळले. बापू उपाध्ये हे त्याचे ठळक उदाहरण. त्यांनी धरणक्षेत्रातील पाणीवाटप संस्था यशस्वी करून दाखवल्या आणि नासिकजवळच्याओझरचा परिसर शेतकऱ्यांच्या हिरव्यागार शिवारांनी बहरून गेला. तिकडे विदर्भात अभय व राणी बंग हे तसेच उदाहरण. त्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रास वाहून घेतले आणि कोवळी अर्भके जगवण्याचे जगभर प्रशंसा झालेले मॉडेल तयार केले. मोहन हिराबाई हिरालालने ग्रामस्वराज्याचा वेगळाच प्रयोग मेंढालेखात स्थानिक आदिवासींच्या सहकार्याने यशस्वी करून दाखवला. खरे तर, ही नावे जुनी झाली आहेत, कारण समाजसेवेची तशी अनेक कामे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत सक्षमपणे उभी राहिली आहेत. त्यांनी जे समाजबळ तयार केले ते फार मोठे आहे. रा.स्व. संघाचे नाव राजकारणामुळे सतत पुढे असते, परंतु त्यांच्या वनवासी कल्याणाश्रम व अन्य समाजसेवी संस्था यांनी जे काम केले आहे त्यामुळे समाज तळापासून हलून गेलेला जाणवतो. राजकारणातून आलेल्या वैफल्यातून समाजबांधणीचा हा प्रयोग सुदृढ होत गेला आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.
महाराष्ट्रात गेल्या शतकात युगे पाडायची झाली तर मला टिळक, अत्रे व चव्हाण ही तीन युगे दिसतात, त्यांच्या बरोबरीने ज्यांनी महाराष्ट्राचे मन गुंगवून टाकले अशा दोन व्यक्ती म्हणजे बालगंधर्व आणि पु.ल. देशपांडे. किंबहुना पुल-गदिमा व सुधीर फडके यांची जन्मशताब्दी होती तेव्हा आम्ही सुमारे अडीचशे मातब्बरांची नावे काढली, की ज्यांचा जन्म 1901 ते 1930 या काळात झाला (व ज्यांची जन्मशताब्दी 2001 ते 2030 या काळात झाली, होत आहे वा होईल). त्या अडीचशे माणसांचा कार्यकर्तृत्वपट केवढा आहे! ते सारे महाराष्ट्रव्यापी होते. राज्याच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील स्थानिकांचा विचार केला तर अबबब! तो वेगळ्या पुस्तकाचा, म्हणण्यापेक्षा सादरीकरणाचा विषय आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय स्थित्यंतराचा व विकासात्मक धाटणीचा परिणाम कलाजगतावर व एकूण सांस्कृतिक विश्वावरही दिसू लागला. महाराष्ट्राचे रूपडे 1960 ते 1990 या काळात विविध तऱ्हांच्या कला आविष्कारांनी उजळून उठले. पु.ल. देशपांडे यांची करमणुकीय बहुविधता प्रकट झाली, व.पु. काळे यांनी मध्यमवर्गाला भावबंधात बांधून टाकले. साहित्य-रंगभूमीवरील प्रयोग घडत गेले. विजय तेंडुलकर ही एक व्यक्ती होती जिने फक्त महाराष्ट्र नव्हे तर सारा भारत कलेच्या अंगाने हलवून सोडला; कलाक्षेत्राला नवी दृष्टी दिली. मला अचंबा वाटतो, की तेंडुलकर यांचे निधन होऊन तप उलटून गेले तरी ते अजूनही तरुणांना प्रेरणा देतात!
महाराष्ट्राचे राजकारण गेली तीन-चार दशके बरबटत गेले आहे. जनता पार्टीचा प्रयोग आणीबाणीनंतर घडून आला. तो लगेच फसलाही. त्यावेळी तत्त्वविचार कसोटीला लागला असे वाटले. परंतु वास्तवात तसे घडले नव्हते. रशियात गेल्या शतकारंभी कम्युनिस्ट क्रांती झाल्यानंतर भारतातही मार्क्सवादी (लोकप्रिय भाषेत डावा) विचार आला. त्याचे केंद्र महाराष्ट्रच होते. त्यामधून जागतिक पातळीवर समाजवादी विचार आला, तोही भारतात पोचला – त्याचे केंद्रही महाराष्ट्र हेच होते. ती महाराष्ट्राची स्वतःची गंमत आहे. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनाची पंरपरा विसाव्या शतकात सत्तर-ऐंशीच्या दशकापर्यंत चालत आलेली दिसते. डांगे-रणदिवे, गोरे, जोशी, ठेंगडी यांच्या वैचारिक अधिष्ठानाच्या राजकीय मांडणीच्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेवा दल असे विचाराधिष्ठित संघटनात्मक प्रयोग महाराष्ट्रातच घडलेले दिसून येतात. आनंदमेळावे हा तसाच समाजिक उपक्रम. साने गुरुजी हे त्या काळातील विचार आणि आचार या दृष्टींनी एक अपवादात्मक व असाधारण असे उदाहरण होऊन गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विलक्षण पैलू आहे तो भावनेचा. म्हणजे ‘श्यामच्या आई’तील हळवे साने गुरुजी ‘भारताचा शोध’ सक्षमतेने मराठी वाचकांसमोर मांडतात आणि समतेचा आग्रह धरून पंढरपूरला सत्याग्रह करतात. साने गुरुजींचे जीवन लोकविलक्षण आहे. ते समाजवादी व सेवादलीय पंथात अडकावले गेले, अन्यथा रवींद्रनाथ टागोर यांना बंगालच्या भावविचारजीवनात जे स्थान आहे तसे स्थान साने गुरुजींना मराठी लोकजीवनात मिळते आणि त्यांचा लौकिक भारतभर जपला गेला असता. भारतात भौतिक जीवन व विचार जसजसा प्रगत व प्रबळ होत गेला आणि त्यामधून पाश्चात्य व पौर्वात्य (भारतीय) असा जो जीवनविचार संघर्ष प्रखर होत गेला आहे त्याचे उत्तर साने गुरुजींच्या जीवनविचारात सापडू शकेल असेही केव्हा केव्हा वाटते. पाश्चात्य विचारसरणीतील आधुनिकता आणि भारतीय जीवनशैलीतील पारंपरिकता साने गुरुजी यांच्या विचारकृतींमध्ये एकत्र नांदताना दिसते. विनोबांची नैतिकता आणि साने गुरुजींची भावपूर्ण तात्त्विकता यांचे मिश्रण हा महाराष्ट्राच्या उत्तम जीवनाचा आधार राहिला आहे. त्या दोघांच्या जगण्यातील सात्त्विकता अथवा साधेपणा हेही महाराष्ट्राने मोठे जीवनमूल्य मानले आहे. महाराष्ट्राने एवढी गुणसंपन्नता असून जगण्यातील दिमाख अथवा रूबाब कधी दाखवलेला नाही. शिवाजीराजांपासून शोभून दिसणारी ज्ञानविचारांमुळे येणारी विनम्रता, पेशवाईच्या उत्तरार्धातील रंगढंग वगळले तर गायकवाड-शाहुमहाराज ते पंतप्रतिनिधी यांच्यापर्यंत जाणवून जाते. उत्तर पेशवाईमधील रंगढंगातूनही शाहिरी व लावणी यांसारखे कलाप्रकार निर्माण झाले आणि महाराष्ट्राच्या कलापंरपरेला वैशिष्ट्य लाभले.
महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरेचा धागा त्या वेगवेगळ्या प्रयोगांनी, यात्रांनी, कार्यक्रमांनी नव्वदच्या दशकापर्यंत चिवटपणे तगलेला राहिला, परंतु तो नंतर मात्र जागतिकीकरणाच्या व तंत्रज्ञानाच्या झपाट्यात विरून गेला. महाराष्ट्राने त्याची अस्मिता गेल्या तीन दशकांत गमावली. प्रकाश आंबेडकरसारख्या विचारी व कणखर पुढाऱ्याने त्या प्रभावात नांगी टाकली आणि राज ठाकरेसारखा थिल्लर माणूस तिचा प्रतिनिधी बनला. महाराष्ट्राला गेल्या तीन दशकांत नेताच राहिलेला नाही. विखुरलेले नेतृत्व जाणवत होते. शरद जोशी, भवरलाल जैन, एकनाथ ठाकूर हे त्यांचे असाधारण प्रतिनिधी म्हणून सांगता येतील. त्या तीन अगदी वेगळ्या माणसांचे साधारण 1980 ते 2000 या काळातील कर्तृत्व नोंदले पाहिजे. त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांत अलौकिक काम केले व महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक जीवनावर छाप टाकली. शरद जोशी यांनी साऱ्या देशाला शेतीक्षेत्राच्या महतीची जाणीव करून दिली आणि त्या क्षेत्रामध्ये तत्त्वविचार व मूल्यविचार रुजवला. त्याचा अवघ्या देशाला विचार करणे भाग पडले. भवरलालजींनी शून्यातून चार हजार कोटींच्या उलाढालीचा उद्योगधंदा जळगावसारख्या ठिकाणी उभारला, त्यांनी जगात अनेक ठिकाणी कारखाने काढले, शेतीक्षेत्राला नवी दृष्टी दिली आणि त्या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे गांधीविचाराचा अंमल होऊ शकतो हे दाखवून दिले. त्यांनी सज्जनशक्तीचा प्रभाव हा प्रयोग प्रथम मांडला. त्या सुमारास समाजात बकालपणा, उठवळपणा वाढू लागला होता. त्यांनी त्यांच्या विविध प्रयोगांतून साधेपणा व सौंदर्यदृष्टी यांची अजब सांगड घालून दाखवली. एकनाथ ठाकूर हे मुख्यत: बँकर होते – त्यांनी ‘सारस्वत’सारखी सहकारी बँक खूप मोठी केली; राष्ट्रीय पातळीवर नेली. ठाकूर यांना सामाजिक व सांस्कृतिक जाण उत्तम होती; चांगल्याची कदर होती. त्यांचा समाजभाव जागृत होता; तत्त्वनिष्ठा व मूल्यजाणीव पक्की होती. त्यांना सांस्कृतिक क्षेत्रात रस होता. त्यांनी त्या क्षेत्रात नेतृत्व करावे असे मला वाटे. कुसुमाग्रज, पुल या पिढीनंतर सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी तयार झाली. ती जागा ठाकूर यांच्यासारख्या संयोजकाने विविध क्षेत्रांतील प्रज्ञा व प्रतिभा एकत्र आणून भरून काढावी असे मला वाटे. पंरतु त्या तिन्ही जणांनी समाजाची एकात्म गरज जाणली नाही. ते त्यांच्या त्यांच्या विचारविश्वात अडकून राहिले.
समाजाची गरज सांस्कृतिक असते. त्यामध्ये समाजकारण, अर्थकारण, राजकारण असे सारे येते. ती गरज समाजभावनेतून व्यक्त होते. ती भावना प्रत्येक प्रश्नाच्या, मुद्याच्या मुळाशी असते; तरी त्या पलीकडेही सर्वव्यापक असते. ती समाजभावना टिपणे या संमिश्र समाजात फार अवघड झाले आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रादेशिक असे अनेक स्तर समाजात तयार झाले आहेत. त्यांना एकेकाळी धर्म, तत्त्वविचार, भूभाग यांमुळे एकसंधता लाभे – उदाहरणार्थ हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, डावे-उजवे, मराठवाडी, कोकणी, विदर्भी अशी वैशिष्ट्ये सांगता येतात. त्या सर्वांनी मिळून लाभलेली संमिश्रता हीच महाराष्ट्राची ताकद राहिलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये उदारमतवादी दृष्टिकोन सतत राहिलेला आहे. मराठी माणूस त्यामुळेच पराक्रमी पण सहिष्णू जाणवतो.
तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा अभाव ही लक्षणे गेल्या तीस वर्षांत दिसून येतात. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य या काळात फार बळावत गेले आहे. व्यक्तीचा कल स्वान्त असण्याकडे आहे. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्रातही येते. परंतु त्यामधून मराठी माणसाच्या कर्तृत्वाचे वेगळ्या प्रकारचे दर्शन घडून येते. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे प्रथम जिल्ह्यातील माणूस समर्थ झालेला जाणवला; तो राजकीय आविष्कार होता. नंतरच्या काळात राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ झाल्यावर माणसे स्वसामर्थ्याच्या आविष्कारासाठी वेगवेगळी क्षेत्रे निवडू लागली. नेमके त्या काळात त्यांना जगभरचे ज्ञान-तंत्रज्ञान हाताशी आले; शिक्षण तर उपलब्ध होतेच. त्यातून महाराष्ट्राच्या तालुक्या तालुक्यांत माणसे त्यांचे कर्तृत्व वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त करताना दिसतात. प्रत्येक तालुक्यांत अशी पंधरा ते पंचवीस माणसे तरी असतात असे आम्हाला आमच्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या माहिती संकलनात आढळून येते. त्यात जुन्या पोथ्यांची पाने स्कॅन करण्याच्या व त्यातून ‘इ लायब्ररी’ उभी करण्याच्या खटाटोपापासून शेतीसाठी अभिनव तंत्रसाधने बनवण्याच्या प्रयत्नांपर्यंत विविध तऱ्हांचे उपक्रम समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, हर्षल विभांडिकने धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अकराशे शाळा डिजिटल करून सोडल्या आहेत; पुण्याचे डॉ. विश्वास येवले त्यांच्या पर्यावरण प्रयत्नांत जलदिंडी गेली बारा वर्षें आळंदी ते पंढरपूर घेऊन जातात. त्याद्वारे माणूस आणि पाणी यांचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न होतो; सुभाष कदम यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या मातीत सोन्याचा/प्लॅटिनमचा शोध लावला आहे. ती गोष्ट शास्त्रीय कसोट्यांवर सिद्ध करून, त्याचे पेटंट मिळवले आहे; अशोक सुरवडे या नासिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील पिंपळस नावाच्या लहान गावाच्या प्रयोगशील शेतकऱ्याने अंटार्क्टिका खंडावर जाऊन पेंग्वीन पक्ष्यांवर संशोधन केले आहे. तसेच, त्याने वायनरी प्रकल्प केवळ साडेआठ लाखांमध्ये उभारण्याची किमया केली आहे; शैला यादव या साताऱ्याच्या माण तालुक्यातील खटाव गावाच्या डोंबारी-कोल्हाटी समाजाच्या शिक्षण, रोजगार आणि स्वावलंबनासाठी झटत आहेत; नागपूरचा सजल कुलकर्णी पशुधनाच्या ओळखीसाठी कार्यरत आहे. तो विदर्भातील गावरान गायी आणि बैल यांचे वर्गीकरण करत आहे; आशुतोष पाटील आणि शांतिलाल पुरवार हे दोघे इतिहासाचे पहारेकरी. पाटील हा कमी वयात नावाजला जात असलेला प्राचीन नाण्यांचा तज्ज्ञ आहे. तर प्रकाश पुरवार यांच्याकडे प्राचीन सतरा हजार वस्तूंचा संग्रह आहे. त्यात आदिमानवाच्या हाताच्या ठशापासून औरंगजेबाने लिहिलेल्या कुराणापर्यंतच्या वस्तू आहेत; नवनाथ कस्पटे (सोलापूरातील बार्शी तालुका), ज्ञानेश्वर बोडके (पुण्यातील मुळशी तालुका), विलास शिंदे (नासिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका) हे तिघे जण महाराष्ट्रातील ज्ञानोत्सुक आणि प्रयोगशील शेतकरी आहेत; मनीष राजनकर हा इंग्रजी घेऊन एम ए झालेला तरुण भंडारा जिल्ह्यातील तलावांचा अभ्यास व संवर्धन करत आहे तर कुलदीप राठोड तणमोर या दुर्मीळ पक्ष्यांच्या रक्षणासाठी कार्यरत आहे; नासिकचे प्रसाद पवार अजिंठा लेण्यांतील चित्रे आधुनिक तंत्रांनी घरोघरी पोचवण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे केवळ नमुने आहेत. मी नेहमी सांगत असतो, की भागवत सप्ताहात विष्णूच्या अवतारांच्या कहाण्या असतात. भक्तमंडळी त्या भाविकतेने ऐकतात, पण त्या पुराणकथा असतात आणि सगळ्या शहाण्या माणसांना माहीत आहे, की पुराणातील वानगी पुराणापुरती असते. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे चमत्कार वाटावेत अशा शेकडो कहाण्या आहेत, की ज्या रोज एक या प्रमाणे वर्षभर सांगता येतील! आणि ती सगळी माणसे पुराणकथा किंवा अवतारकथा यांच्यासारखी काल्पनिक नाहीत, तर सत्य परिस्थितीत वाचक-श्रोत्यांसमोर सादर करता येतील.
शेकडो माणसांच्या कर्तबगारीचा हा जो विशाल पट तयार होतो, त्यामधून माझ्या मनामध्ये एक वेगळा विचार उद्भवतो. या सगळ्या उपक्रमशीलतेची बरोबरी एका वेगळ्या पातळीवर युरोपात सतरा-अठराव्या शतकात जो रेनेसान्स घडून आला त्याच्याशी करावी असे वाटते. तशाच प्रकारचा ज्ञानप्रकाश महाराष्ट्रभर सर्वत्र पसरलेला आहे. ही सारी कर्तबगार माणसे त्यांचे त्यांचे काम निष्ठेने, कसोशीने, सचोटीने करत आहेत. ना त्यांना मुद्दाम प्रसिद्धी मिळवायची असते; ना त्यांना कोणत्या पुरस्काराचा मोह असतो. ती स्वांत असतात. मला खंत वाटते, की महाराष्ट्रातील प्रस्थापित व्यवस्थेचे लक्ष, गेल्या तीस वर्षांत घडत असलेल्या विलक्षण परिवर्तनाकडे नाही. सरकार, राजकीय पक्ष, विद्यापीठे, कामगार संघटना, साहित्यसंस्कृती संस्था हे सारे त्यांच्या रूढ व्यवहारात गुंतलेले आहेत. त्यांना राज्यभर घडत असलेल्या या विधायक आंदोलनाचा पत्ताच नाही! त्याची दखल घेणे ही येथील सुशिक्षित, सुसंस्कृत समाजाची जबाबदारी आहे – ते त्यांचे नैतिक कर्तव्य आहे.
टेलिग्राम |
व्हॉट्सअॅप |
फेसबुक |
ट्विटर |
– दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल हे ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत. साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे.
——————————————————————————————————————————————————————————-
माहीतीपूर्ण लेख.थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे आभार.
लेख खुप माहितीपुर्ण आहे.महाराष्ट्रात खरोखरच परंपरा आहे कर्तृृृत्ववान माणसांचीपण….तरीही …
खूप छान माहिती मिळाली खूप छान लेख….