‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ हे खरेच आहे. या वर्षीच्या बदललेल्या निवड प्रक्रियेमुळे आणि त्यातून झालेल्या सुयोग्य निवडीमुळे चिखलात रुतून बसलेला पाणघोडा किंचितसा हलला हे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहते आणि तो केवळ किंचित हलला आहे, त्याला उठवून बाहेर आणणे अपेक्षित आहे, हे आणिक सत्य आहे. ‘उठेल हो.. निदान हलला तरी’ म्हणणाऱ्या भंपक optimistic जनांना मला काही सांगावेसे वाटते. मुळात खोल पोटात झालेल्या आजाराला या प्रक्रिया बदलण, अध्यक्ष निवडीवरून बोलून बोलून दात झिजवणे, नव्याने कोणी ‘सर्वमान्य’ अध्यक्ष निवडणे हे म्हणजे वरून पोटाला थंडावा मिळण्यासाठी लावलेल्या तेलाचा फील देते आणि म्हणूनच, सुरुवातीला ‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ या मताला मी दुजोरा दिला. हे मी रोज अनुभवत आहे. समोर जो वर्गात विद्यार्थी बसतो तो साहित्यापासून सोडाच, भाषेपासूनही नाही, तर मराठीपासूनही कोसो मैल दूर आहे. त्याला मनापेक्षा पोट महत्त्वाचे आहे. समाजात वाढत चाललेला ‘उपभोक्तावाद’ हा त्याला कारणीभूत आहे. तळागाळापर्यंत साहित्य पोचत नसेलही, परंतु आज गाळच इतका साचला आहे, की त्यावर सुपीक जमीन समजून शेती करणाऱ्या किसानांना विषाचीच फळे खावी लागणार आहेत. नुकताच निसटून गेलेला, आज हातात आलेला आणि उद्या येऊ घातलेला तरुण जोपर्यंत या साहित्य संमेलनाचा मध्यबिंदू होत नाही, त्याच्याकरता जोपर्यंत हे साहित्यसंमेलन भरत नाही तोपर्यंत काही खरे नाही.
जागतिकीकरणाचीही ‘नेक्स्ट लेव्हल’ गाठलेल्या जगात हे साहित्य संमेलन खरेच कोठे उभे राहील याची कल्पनाच मुळात नसल्याने या गोष्टींवर वेळखाऊ उहापोह करून रिटायरमेंटनंतरचा कालावधी बरा घालवण्याच्या अनेकजण प्रयत्नात दिसतात. त्यांनी क्षणिक स्वार्थ झटकून, मोजक्या जागृत तरुणांना हाताशी घेऊन कार्य करण्याची गरज आहे. नाही तर, इतक्या वर्षांच्या जखमेवर मलम लावल्यासारखी ही निवड होऊन बसेल आणि कूस बदलण्यासाठी किंचित हललेला पाणघोडा पुन्हा तसाच वर्षानुवर्षे चिखलात स्वस्थ रुतून बसेल!
मी मुख्य विषयावरून ढळल्यासारखा वाटलो का? होय, मुद्दामच! मी कवितांचा इंग्रजी, हिंदी मंच बघितला आहे, तेथेही मराठी कविता सादर केल्या आहेत, एक वेगळी सुंदर लाट आपल्याकडे येत आहे इतकेच सूचकपणे सांगू शकेन. परंतु ती येईल तेव्हा जमीन पाणी मुरावणारी नसेल तर लाट आली तशीच ती परत जाईल कायमची. आणि मग काय.. आहेच शुकशुकाट.. आज आहे तसा!
अरुणा ढेरे यांचे खरेच मनापासून अभिनंदन! त्या संत साहित्य अभ्यासक, समीक्षक, कवयित्री एक थोर विदुषी त्या आहेतच, परंतु निदान त्यांनी तरी पदर खोचून दिवाळीपूर्वी जसे गृहिणी आपुलकीने घर स्वच्छ करते, तसे हे साहित्यिक घरकुल लख्ख करून टाकावे. त्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला प्रयत्न आम्ही साहित्यात धडपडणारे तरुण करण्यास उत्सुक आहोत यात शंका नाही.
– अदित्य दवणे, ठाणे