तमीळ कवी सुब्रमणीयम् भारती

0
29

प्रासंगिक : सुब्रमणीयम् भारती यांचा मृत्यू १२ सब्टेंबर १९२१ रोजी झाला.

( गंगा नदीच्या परिसरात होणारा गहू आपण घेऊ आणि येथील लोकांना प्रिय असलेली कावेरीच्या पाण्यावर होणारी विड्याची पाने त्या बदल्यात देऊ. मराठे कसे आहेत… शूर सिंग मराठीयर… सिंहासारखे शूर… त्यांच्याकडून काय घेऊया तर कविता ! आणि त्या कवितांच्या बदल्यात त्यांना केरळ राज्यात होणारे हस्तिदंत देऊया.)


तमीळ
कवी सुब्रमणीयम् भारती यांची ओळख

त्यांना मराठ्यांची कविता हवी.

श्रीप्रकाश अधिकारी

मैसूरच्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ इण्डियन लॅंग्वेजेस या संस्थेत तमिळ भाषा शिकण्यासाठी दहा महिने राहण्याचा योग आला. भारत सरकारचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. कोणाही शिक्षकाला वयाची पस्तीस वर्षे करण्यापूर्वी या संस्थेत शिकण्यासाठी भरपगारी रजा मिळू शकते. भारतातील विविध भाषा शिकवण्याची पुणे, पतियाळा, भुवनेश्वर, मैसूर अशी केंद्रे आहेत. दक्षिणेतील एक भाषा शिकावी आणि तीदेखील तमिळ असे मनात होते. मला ती संधी या उपक्रमाद्वारे मिळाली.

तमीळ कवी सुब्रमणीयम् भारतीमैसूरला भाषा संस्थानात तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड अशा चार भाषा शिकवण्याची सोय आहे. मी तमिळ शिकण्यासाठी गेलो त्यावेळी निरनिराळ्या प्रांतांतून बाहत्तर शिक्षक वेगळी कोणतीतरी भाषा शिकण्यासाठी तेथे आले होते. महाराष्ट्रातील आम्ही तिघे होतो. त्यांत एक कन्नड व दुसरा तेलगु शिकण्यासाठी आला होता आणि मी तमिळ.

तमिळनाडमधून कन्नड, मल्याळम, तेलगू शिकण्यासाठी दहा शिक्षक आले होते. ते एकाच प्रांतातले असल्याने त्यांचे राहणे-फिरणे एकत्र असायचे. तमिळनाडमधून आलेल्या शिक्षकांनी माझी ओळख झाल्यावर, त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, की मला मराठी कविता येतात का? त्यांना मराठी कवितेबद्दल फार औत्सक्य होते. माझ्या खूपशा मराठी कविता पाठ असल्याने मला तो प्रश्न ऐकून फार आनंद झाला.

त्यांच्या मराठी कवितेबद्दलच्या कुतूहलाचे कारण नंतर कळले. तमीळ कवी सुब्रमणीयम भारती यांचे नाव ऐकून ठाऊक होते. त्या शिक्षकांकडून भारती यांचे तमीळमधील असाधारण स्थान कळले. आपल्याला जसा मराठी भाषेचा अभिमान आहे आपण अभिमानने म्हणतो ‘माझा मराठाचि बोल कवतिके परी अमृताते ही पैजा जिंके’ तसाच किंबहुना थोडा अधिकच जाज्वल्य म्हणावा लागेल असा तमिळ भाषेचा आणि तमिळनाडचा अभिमान प्रत्येक तमिळ माणसात दिसून येतो.

भारती यांनी लिहिले आहे:

सेन्तमिळनाड एण्ड्र बोदिनिले इन्ब तेन्वन्द पायद कादिनिले.
तन्दैयार नाड एण्ड्र पेच्चीनिले ओरू शक्ती पिरत्तद मुच्चीनिले.

(तमिळनाडू असे शब्द ऐकले की कानात मधाचा गोडवा येतो. पितृभूमी.. मातृभूमी नाही बर… असे म्हटले की मिशीत शक्ती निर्माण होते.)

भारती यांची भारत देशम नावाची एक कविता आहे. ऐक्य आणि एकात्मता कशी जोपासता येईल याविषयी ते लिहितात : भारत देसम एण्ड्र पेअर सोल्लुवार मिडिपयंकोल्लुवार तुयर पघै वेल्लुवार…

(भारत देशाचे नाव घेतले तरी भय नष्ट होते आणि युद्ध जिंकले जाते.)

याच कवितेत त्यांनी श्रीलंकेला जाण्यासाठी सेतू बांधू या. जहाज समुद्रात सोडुया असे सांगताना या देशातील विविध प्रांतांतील लोकांना एकमेकांकडून काय घेता येईल व एकमेकांना काय देता येईल याविषयी लिहीले आहे. कविता मोठी आहे.

गंगै नदिपुरत्त गोदुमै पण्डम कावेरी वेट्रीलैक्क मारी कोळळुवोम
सिंग मराटीयरदम कवितै कोण्ड सेरतदन्तंगळ परिस अळीप्पोम.

( गंगा नदीच्या परिसरात होणारा गहू आपण घेऊ आणि येथील लोकांना प्रिय असलेली कावेरीच्या पाण्यावर होणारी विड्याची पाने त्या बदल्यात देऊ. मराठे कसे आहेत… शूर सिंग मराठीयर… सिंहासारखे शूर… त्यांच्याकडून काय घेऊया तर कविता ! आणि त्या कवितांच्या बदल्यात त्यांना केरळ राज्यात होणारे हस्तिदंत देऊया.)

सुब्रमणियम भारतीयांचा जन्म ११ डिसेंबर १८८४ चा आणि मृत्यू १२ सप्टेंबर १९२१. वयाच्या नवव्या वर्षीं एटैयापूरच्या राजाने त्यांना कवी भारतीयार ही पदवी बहाल केली व त्यांची एकविसाव्या वर्षी राजकवी म्हणून दरबारात नेमणूक केली. राजाने सन्मानार्थ काय हवे ते माग असे सांगितले तर कवीने राजाचा ग्रंथसंग्रह मागितला!  राजदरबारातून भारती परतले. त्यांच्या मागोमाग कापडात बांधलेले मोठमोठे गठ्ठे घेऊन राजाची माणसे आली. पत्नीला मोठा आनंद झाला! इतकी संपत्ती राजाने दिली म्हणून, वाटले घराचे अठराविश्वे दारिद्रय फिटेल. उघडून पाहते तो काय, पुस्तकेच पुस्तके!

त्यांचा राजाजी, महात्मा गांधी यांच्याशी संबंध होता. त्यांच्यावर ब्रिटिश सरकारचे वॉरंट होते, सरकारविरूद्ध लिखाण केले म्हणून. ते १९०७ च्या सुरत काँग्रेसला हजर राहिले. ते लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, अरविंद या जहाल गटाशी  जोडले गेले. त्यांनी या राष्ट्रीय नेत्यांवर कविता केल्या आहेत. त्यांना २० नोव्हेंबर १९१८ ला अटक झाली. चौतीस दिवसांचा रिमांड देण्यात आला. त्यांना तिरूवल्लीकेणीच्या मंदिरातील हत्तीला ते नेहमीप्रमाणे खाणे घालत असताना हत्तीने सोंडेत घेऊन आपटले. त्याच आजारात त्यांचा १९२१ मध्ये अंत झाला.

त्यांनी देशीय कवितैघळ, भक्ती पाडलघळ, ज्ञान पाडलघळ, तनीपाडलघळ, सुयचरितै कण्णन पाट्टु, पांचालीशपधम, कुयील पाट्टु, वचन कवितै, पुदिय पाडलघळ अशी प्रचंड काव्यसंपदा निर्माण केली आहे.

फक्त एकोणचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेला हा कवी. अव्वल इंग्रजीचा काळ. रस्ते, टपालसेवा कशी होती याची कल्पनाच केलेली बरी. फोन नाही. आजचा मिडिया, सेलफोन यांचा तर पत्ताच नव्हता. अशा काळात भारतीयारना मराठी कविता माहीत होती आणि अर्थात सुशिक्षित तमीळ नागरिकांनाही.

मराठी कवितेचे प्रेम असणारे कवी व रसिक यांनी तमिळनाडमध्ये फेरफटका मारताना भारतीयार यांची ही ओळ लक्षात ठेवून तिचा वापर केल्यास तमिळ माणूस मराठी माणसाच्या हृदयाला भिडणा-या कवितेविषयी सजग आहे हे कळल्यामुळे नक्कीच सुखावेल.. पण… एक दोन वृत्तबद्ध मराठी कविता पाठ असायला हव्यात हं…

– श्रीप्रकाश अधिकारी

गोरेगाव, रायगड

भ्रमणध्वनी : 9423806792

About Post Author

Previous articleरत्नाकर मतकरींची पुस्तके मुलांना आवडती!
Next articleमहाराष्ट्र देशी असावे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.