तबला

6
293

तबला (उजवीकडे) आणि डग्गा (डावीकडे)हिंदुस्थानी म्हणजे उत्तर भारतीय संगीतात साथसंगतीसाठी व स्वतंत्र वादनासाठी वापरल्या जाणाऱ्या एका अवनद्ध तालवाद्याची जोडी. उजव्या हाताने वाजवितात तो तबला किंवा ‘दायाँ’ व डाव्या हाताने वाजवितात तो डग्गा अथवा ‘बायाँ’. डग्ग्याचा उपयोग खर्ज ध्वनी काढण्यासाठी; तर तबल्याचा उच्च ध्वनी काढण्यासाठी करतात.

तबला ह्या वाद्याचे मूळ ‘तब्ल’ या अरबी वाद्यात असावे. इब्न खुर्दाद बिह ह्या इतिहासकाराच्या मते तब्लच्या निर्मितीचा मान तबल् बी लमक ह्या अरबी कलावंताकडे जातो. हे वाद्य मोगलांकरवी भारतात आले. १२९६ ते १३१६ च्या दरम्यान तबल्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊन ख्याल व टप्प्यासारख्या संगीतरचनांबरोबर त्याचा साथीसाठी वापर होऊ लागला. मृदंग-पखावजाप्रमाणे उपयोगात आणलेली ‘शाई’ ही महत्त्वाची सुधारणा. ह्याचे श्रेय बहुमताने अमीर खुसरौस (१२५३–१३२५) दिले जाते.

तबला खैर, शिसव, बाभूळ, चिंच इत्यादींच्या लाकडाचा बनविलेला असून तो वरील तोंडाकडे किंचित निमूळता, नळकांड्याच्या आकाराचा व आतून पोखरून काढलेला असतो. डग्गा तांब्याचा, पितळेचा किंवा क्वचित मातीचा असून घुमटाकृती असतो. डग्ग्याचा रुंद व तबल्याच्या निरुंद तोंडावर बकऱ्याचे चामडे ताणून बसविलेले असते. हे चामडे, त्याभोवतालची दुहेरी किनार (चाट), वर बसविलेली वादीची विणलेली कडा (गजरा) ह्या सर्वांना मिळून ‘पुडी’ म्हणतात. नादमाधुर्यासाठी तबल्याच्या पुडीच्या मध्यावर व डग्ग्याच्या पुडीवर मध्याच्या जरा बाजूस ‘शाई’ (लोखंडाचा कीस, काळी शाई व भात यांचे मिश्रण) घोटून वर्तुळाकार थर देतात. पुडीमधून ओवलेली वादी तळाच्या चामडी कड्यातून (‘पेंदी’मधून) तोंडाभोवती ओढून घेतात. तबल्याच्या वादीतील लाकडी गठ्ठे खालीवर ठोकून गायन-वादनाच्या आधारस्वराशी त्याचा स्वर जुळवितात.

भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्रीतबल्याच्या उत्पत्ती विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. भाजे येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे सातवाहन काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे दिसून येते. काही लोक तबल्याचा जनक म्हणून अमिर खुस्रोकडे पाहतात. पखवाजाचे दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. “तोडा और तब बोला सो तबला” अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही आहे.

वादनवैशिष्ट्यांनुसार तबल्याची विविध घराणी निश्चित झाली आहेत. ‘दिल्ली’ हे आद्य घराणे. ‘बंद बाज’ व ‘खुला बाज’ ह्या या घराण्याच्या मूळ संकल्पना होत. बंद बाज वा ‘चाँटी का बाज’ या प्रकारात चाटेवरील व शाईवरील आघात स्वतंत्र बोटांनी करतात. ‘दिल्ली’, ‘अजराडा’, ‘बनारस’ ही या प्रकारातील घराणी होत. खुला बाज अथवा ‘पूरब बाज’ (दिल्लीच्या पूर्वेकडील घराणी) या प्रकारात चाट व शाई यांच्या मधील भागावर (‘लवे’वर) पंज्यांनी अथवा बोटे जुळवून आघात केला जातो. त्यावर पखावजाच्या वादनपद्धतीची छाप दिसते. जोरकसपणा हे वैशिष्ट्य, ‘लखनौ’, ‘फरूखाबाद’, ‘मेरठ’, व ‘पंजाब’ ही या प्रकारातील घराणी होत.

दिल्ली घराण्याचे उस्ताद नथ्थूखाँ, गामेखाँ, अजराड्याचे उस्ताद हबीब उद्दिनखाँ, लखनौचे वाजिद हुसेनखाँ, फरूखाबादचे उस्ताद मुनीरखाँ, ⇨ अहमदजान थिरकवा, अमीर हुसेनखाँ, बनारसचे पंडित राम सहाय, बिरू मिश्र, पं. सामताप्रसाद मिश्र, पंजाबचे उस्ताद कादिर बक्ष असे काही प्रसिद्ध तबलावादक होत.

लयप्रधान गायकी, वादन व कथ्थकसारखी नृत्ये ह्यांस तबल्याच्या संगतीने रंगत येते.

संदर्भ :
१. मुळगावकर, अरविंद, तबला, पुणे, १९७५.
२. वशिष्ठ, सत्यनारायण, तबले पर दिल्ली और पूरब, हाथरस (अलीगढ), १९६१.

(मराठी विश्‍वकोश संकेतस्‍थळावरून साभार.)

About Post Author

6 COMMENTS

Comments are closed.